ठाणे- काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्रातील नवनियुक्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांसाठी नाशिक येथे विशेष निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी अत्यंत मनमोकळा व जिव्हाळ्याचा संवाद साधला. सलग दहा दिवस चाललेल्या या निवासी शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सर्व प्रशिक्षणार्थींसोबत पूर्णवेळ उपस्थित होते.  राहुल गांधी यांनी शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक एकाग्रता, आणि संयम पाळणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी मार्शल आर्ट्समधील ‘जिऊ-जित्सू’  मॅटवर प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले.
काय म्हणाले राहुल गांधी? शिबिरादरम्यान मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून ते एक कुटुंब आहे,एकमेकांच्या सुख-दुःखात आस्थेने सहभागी व्हा सत्ताधारी पक्षाकडून समाजात द्वेष आणि घृणा पसरवण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे, त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रेम आणि आपुलकीने उत्तर दिले पाहिजे. काँग्रेस पक्षाला समाजातील द्वेष आणि घृणा संपुष्टात आणायची आहे.केवळ निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होऊन निरंतर देशहिताचे काम करा. निवडणूक एवढेच लक्ष्य न ठेवता सातत्याने देशाच्या हिताचे काम करीत राहिले पाहिजे.तसेच  प्रत्येक बूथ स्तरावर जाऊन काँग्रेसची विचारधारा पोहोचवा आणि समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करा.द्वेषाला प्रेमाने हरवा, समाजात सुरू असलेले धार्मिक व सामाजिक वाद मिटवून देशाच्या विकासासाठी तरुणांना सोबत घ्या. धर्मातील वाद संपुष्टात आले पाहिजे, देशाच्या विकासातूनच प्रत्येकाला संधी मिळणार.
या भेटीबद्दल आणि शिबिराबद्दल बोलताना ठाणे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे भावूक झाले. त्यांनी सांगितले की, “राहुलजी गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात आले होते, तेव्हा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. परंतु, वेळेअभावी त्यावेळी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. मात्र, या निवासी शिबिराच्या निमित्ताने राहुलजींसोबत तब्बल ४ ते ५ तास घालवण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि मॅटवरील प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह त्यांचे मोलाचे मार्गदर्शन ऐकण्याचा योग आला. माझ्या संपूर्ण कुटुंबाशी त्यांनी अत्यंत आपुलकीने चौकशी केली.आपले वडील, पती राजकारणात कशा प्रकारे कुटुंबप्रमुखाच्या जबाबदारी सोबत समाजसेवेला प्राधान्य देतात याची प्रत्यक्ष कल्पना माझ्या कुटुंबाला या भेटीतून आली.त्यामुळे ते देखील राहुल गांधी यांच्या भेटीने भारावून गेले होते.
राहुलसोबत घालवलेला हा वेळ माझ्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील एक ‘अनमोल ठेवा’ आहे. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा घेऊन आम्ही ठाण्यात काँग्रेसची विचारधारा आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत राहू,” असा संकल्प त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *