कल्याण : वीज चोरीमुळे महावितरणच्या महसुली नुकसानीचा भार प्रामाणिकपणे वीज देयक भरणार्‍या ग्राहकांवर पडत असल्याने यापुढे वीज चोरी सापडल्यास महावितरण आपल्या पध्दतीने शॉक देणार आहे. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाचे नाव आणि पत्ता प्रकाशित करण्यात येणार आहे. वीज चोरी मुळे महसुली नुकसान तर होतेच आहे सोबतच शॉर्ट सर्किट, रोहित्र भार वाढल्याने नादुरुस्त होणे, आगीच्या घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे महावितरणने वरील निर्णय घेतला आहे. वीज चोरी करताना आढळून आल्यास संबंधित ग्राहकाचे नाव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महावितरणचे संचालक संचलन धनंजय औंढेकर यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन वरील निर्णय घेतला आहे.

वीज चोरी हा सामाजिक अपराध आहे. अनेकदा वीज चोरी करतेवेळी प्राणांतिक अपघात झाले आहेत. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी अनधिकृत वीज जोडणी अधिकृत करण्याचे आवाहन महावितरण कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी केले आहे. मागील महिन्यात कल्याण परिमंडळात ११७५ वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून याचे मुल्यांकन झाल्यानंतर संबंधित ग्राहकांची नावे सार्वजनिक करण्याचा महावितरणचा मानस आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *