खासदार नरेश म्हस्केंसह नगरसेवक संजय वाघुलेंच्या प्रयत्नांना यश
ठाणे : मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नौपाड्यातील बांदल चाळीत ५० वर्षांपासून राहणार्‍या १४९ कुटुंबांना ठाणे महापालिकेकडून घर मिळणार असून, या चाळीतील रहिवाशांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
नियोजित नवे ठाणे रेल्वे स्टेशनच्या जागेजवळ रेल्वेमार्गालगत बांदल चाळ वसली आहे. या घरात कुटुंबांच्या चार ते पाच पिढ्या झाल्या. नव्या रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे १४९ घरे तोडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्या मालमत्ता विभागाने संबंधित कुटुंबांना नोटीसा बजाविल्या होत्या. त्यामुळे रहिवाशी हवालदिल झाले होते.
नवीन रेल्वे स्टेशन प्रकल्पामध्ये रेल्वेबरोबरच ठाणे महापालिका सहभागी झाली आहे. महापालिकेने नव्या स्थानकासाठी जोड रस्ते व पायाभूत सुविधांची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे या कुटुंबांचे महापालिकेने घर देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली होती. त्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांच्यासह संजय वाघुले यांनी नुकतीच आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली होती. त्यावेळी संबंधित कुटुंबांना घर देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर बांदल चाळीतील कुटुंबांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यास मान्यता देण्यात आली होती.
भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी आज बांदल चाळीला भेट दिली. या वेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, कनिष्ठ अभियंता अमेय चव्हाण यांचीही उपस्थिती होती. त्यावेळी महापालिकेकडून लवकरच बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होणार असल्याची माहिती रहिवाशांना देण्यात आली. तसेच त्यांना महापालिकेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याबाबत शाश्वत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *