दापोलीत कृषी क्षेत्रातील दिग्गजांची ‘परीक्षा’
– ५४व्या संयुक्त कृषी संशोधन-विकास समिती बैठकीत शेतकरीकेंद्री संशोधनावर खल
अशोक गायकवाड
रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणींपासून संशोधन दूर राहिले, तर प्रयोगशाळांतील निष्कर्षांचा उपयोग काय? बदलते हवामान, पिकांवरील संकटे, उत्पादनखर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता अशा कोंडीत शेतकरी सापडलेला असताना कृषी संशोधनाला थेट शेतकऱ्यांच्या बांधाशी जोडण्याचे आव्हान दापोलीतील बैठकीसमोर आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक-२०२६ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर विश्वेश्वरैय्या सभागृहात उद्घाटन होणार आहे. कृषीमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी असतील. मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आशिष जयस्वाल आणि खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यातील कृषी संशोधनाची सद्यस्थिती, त्याची उपयुक्तता आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या यंत्रणेवर बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे, विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कृषी सचिव परिमल सिंग आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल महिवाल यांचीही उपस्थिती राहणार आहे.
चौकट
बैठकीपुढचे खरे आव्हान
संशोधन झाले, निष्कर्ष आले; पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? कृषी संशोधनाचा प्रत्यक्ष शेतीत वापर वाढवणे, शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर ठोस दिशा मिळणे अपेक्षित आहे. यामध्ये तीन ठळक मुद्दे आहेत. शेतकरीकेंद्री संशोधनाला प्राधान्य देण्याचे आव्हान, बदलत्या हवामानाशी जुळणाऱ्या शेती तंत्रज्ञानावर भर, संशोधनाचा प्रयोगशाळेतून थेट शेताच्या बांधापर्यंत प्रवास.
0000
