डोंबिवली : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टरेट देऊन सन्मान करणाऱ्या जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते तथा कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नव्या शैक्षणिक पर्वाला सुरुवात झाली आहे. TRIUM Global MBA या अभ्यासक्रमासाठी लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी संस्थेच्या कॅम्पसमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी ते भावूक झाले.
शतकभरापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच संस्थेत दाखल झाले होते. ‘The Problem of the Rupee’ या प्रबंधासाठी त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि पुढे भारताच्या संविधान निर्मितीसह रिझर्व्ह बँकेच्या पायाभरणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्यानंतर या विचारांचा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवला. महाराष्ट्राचा खासदार म्हणून नव्हे, तर एक विद्यार्थी म्हणून येथे उभा असताना अभिमानाने ऊर भरून आला,” असे डॉ. शिंदे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले.
एम.एस. ऑर्थोपेडिकनंतर ही आपली दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचे सांगत डॉ. शिंदे म्हणाले की, वैद्यकशास्त्राने उपचार करण्याचे ज्ञान दिले, तर आता आर्थिक प्रश्न आणि धोरणांचा सखोल अभ्यास करण्यासाठी या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. या शिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि अनुभव महाराष्ट्र तसेच देशाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
तरुणांनी पदवी, नोकरी किंवा एखादे पद मिळाल्यानंतर शिक्षण संपले असे समजू नये. बदलत्या जगात जिज्ञासू राहणे आणि सतत शिकत राहणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘मनाची जोपासना हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे’ हा विचार तरुणांनी आत्मसात करावा, असा सल्लाही डॉ. शिंदे यांनी ‘जेन झी’ला दिला.
००००
