आरती परब

दिवा : दिवा प्रभाग समितीअंतर्गत प्रभाग क्रमांक २९ मधील खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या परिसरात प्रभागातील पाचवे आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. सुमारे एक ते दीड लाख लोकवस्ती असलेल्या परिसरातील नागरिकांना या केंद्रामुळे घराजवळच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी प्राथमिक उपचारांसाठी नागरिकांना सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरील कल्याण फाटा येथील आरोग्य केंद्रात जावे लागत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेऊन बाबाजी पाटील आणि अर्चना पाटील यांनी परिसरात स्वतंत्र आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

या पाठपुराव्याला यश मिळून प्रभाग २९ मध्ये सुसज्ज लोखंडी केबिन स्वरूपातील आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. येथे रक्तदाब व मधुमेह तपासणी, मोफत औषधे, डॉक्टरांचा सल्ला, लहान मुलांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी आणि प्राथमिक उपचार अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ व आर्थिक खर्च वाचणार असून, आपत्कालीन परिस्थितीतही तातडीने प्राथमिक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

आरोग्य केंद्राच्या शुभारंभप्रसंगी नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका अर्चना पाटील, वेदिका पाटील, विभाग प्रमुख गणेश मुंडे, विभाग संघटक वैभव आलिमकर, अन्वर कच्ची, आरिफ शेख, दोस्ती फाउंडेशनचे चेअरमन आरिफ शेख, आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. नवीन आरोग्य केंद्रामुळे खान कंपाउंड, दोस्ती आणि शिबली नगर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *