कर्ली खाडी –तारकर्ली मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सेवा; दोन तासांचा प्रवास १५ मिनिटांत
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) — सिंधुदुर्गातील अंतर्गत  जलवाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्ताव असून  प्रायोगिक तत्वावर अशी सेवा सुरु करण्यात येणार आहे.  मत्स्योद्योग व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला.
कर्ली खाडी –तारकर्ली मार्गावर सुरुवातीला  प्रायोगिक तत्त्वावर फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या रस्त्याने या भागात पोहोचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. फेरीसेवा सुरू झाल्यास हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठा फायदा होणार असून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासालाही  चालना मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी सुरुवातीला कर्ली खाडी–तारकर्ली, कर्ली खाडी –मोबार -देवबाग, देवबाग–निवती, विजयदुर्ग–अणसुरे–दांडे आणि आरोंदा–किरणपाणी या पाच संभाव्य मार्गांचा विचार करण्यात आला आहे. तिम मार्ग निश्चित करण्यापूर्वी जेटींची उपलब्धता, पाण्याची खोली, प्रवासी व वाहनांची मागणी तसेच अन्य तांत्रिक बाबींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. चारचाकी, दुचाकींसह  वाहतूक  प्रस्तावित फेरीबोट सुमारे २० मीटर लांब व ७.५ मीटर रुंद असणार आहे. या फेरीबोटीत प्रवाशांसह चारचाकी व दुचाकी वाहून नेण्याची क्षमता असेल. एका फेरीबोटीच्या बांधणीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
फेरीबोटीचे बांधकाम शिपयार्ड किंवा सक्षम संस्थेमार्फत तांत्रिक निकषांनुसार करण्यात येणार आहे. संचालन, मनुष्यबळ आणि देखभालीची जबाबदारी संबंधित ऑपरेटरची राहणार असून, मार्ग, वेळापत्रक व भाडे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर शासनाचे नियंत्रण राहणार आहे. मंत्री राणे यांनी मार्ग निश्चितीपूर्वी जेटी, चढ-उतार व्यवस्था,  पाण्याची खोली तसेच प्रवासी व वाहनांची मागणी याबाबत सविस्तर सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. फेरीसेवा सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील जलवाहतुकीला आधुनिक पर्याय मिळण्याबरोबरच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *