शतकानुशतकांच्या लेखन-परंपरेचे दर्शन
रमेश औताडे
मुंबई : भारताच्या प्राचीन लिखित वारशाची सफर घडवणाऱ्या ‘हस्तलिखित’ प्रदर्शनाचे आयोजन मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिका मार्ग मेट्रो सिनेमा जवळ ९ ते ११ सप्टेंबर या तीन दिवस हे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाची संकल्पना प्रसिद्ध इतिहास अभ्यासक सेंट झेवियर्स कॉलेजच्या मुख्य डॉ. अनिता राणे-कोठारे यांची होती.
शिलालेख, कोरीव लेख आणि दुर्मिळ हस्तलिखिते या विषयाला वाहिलेले हे विशेष प्रदर्शन आहे. यात दगडावर कोरलेले शिलालेख, ताम्रपटांवरील कोरीव लेखांपासून ते ताडपत्री आणि जुन्या कागदावरील हस्तलिखितांपर्यंतचा मोठा संग्रह मांडण्यात आला आहे. शतकानुशतके भारताचा इतिहास, धर्म, प्रशासन आणि साहित्य कसे जतन केले गेले, याची प्रत्यक्ष अनुभूती या प्रदर्शनातून मिळणार आहे. भारतीय लिपी आणि लेखन माध्यमांचा विकासक्रम अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने येथे उलगडून दाखवण्यात आला आहे. प्रत्येक वस्तूचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भही समजावून सांगण्यात आला आहे.
या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोबत दिली जाणारी विशेष माहिती-पुस्तिका आहे. डॉ. अनिता राणे-कोठारे व हृदय कुलकर्णी यांनी या पुस्तिकेचे लेखन आणि संपादन केले आहे. ही पुस्तिका केवळ प्रदर्शनाची माहिती देत नाही, तर प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्रातील शिलालेखांच्या अभ्यासाचे महत्त्व या पुस्तिकेत सांगितले आहे.
