तरुणावरील हल्ल्यात दोघे अटकेत
राज भंडारी
पनवेल :मुंबई पुणे दृतगती महामार्गांवरील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हादीत असणाऱ्या जाधववाडीतील परिसरात असलेल्या एका चायनीज सेंटरवर ३१ ऑगस्ट रोजी चायनीज खाण्यासाठी गेलेल्या तिघांनी फिर्यादी बसलेल्या टेबलवरच बसण्याचा हट्ट करून वाद घालत एका तरुणाला बेदम मारहाण करून गुन्हा दाखल होताच फरार झाले. कळंबोली पोलीसांच्या अथक प्रयत्नानंतर यापैकी दोघा आरोपींना कळंबोली पोलिसांनी अखेर महिन्याभरानंतर अटक केली. मात्र या घटनेतील एक फरार आरोपी निनाद पाटोळे हा अद्यापही पोलिसांच्या कचाट्यात सापडला नाही. यावेळी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी पिडीत कुटुंबाने मात्र या अशा दहशतवाद्यांना तडीपार करावे अथवा मोक्का लावण्याची विनंती प्रसारमध्यमांशी बोलताना केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय डांगे हे कळंबोली (जाधववाडी) परिसरातील चायनीज सेंटरवर जेवण करण्यासाठी गेला असताना याठिकाणी आरोपी प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे हे तिघे आले. यावेळी फिर्यादी अक्षय डांगे ज्या टेबलवर बसला होता त्याला तिथून उठण्यास सांगू लागले. यावेळी अक्षय डांगे हा उठण्यास तयार झाला नाही. याचाच राग प्रसाद रंगिले उर्फ गोलू आणि त्याच्या साथीदारांना आला. याच रागात या तिन्ही आरोपिंनी अक्षय याला मारण्यास सुरुवात केली. अक्षयला झालेली दुखापत इतकी भयानक होती की, या तिघांनी केलेल्या हल्ल्यात त्याच्या हातावर चॉपरने मोठा घाव बसला, तसेच त्याच्या इतर अवयव्यांना जबर मार बसला. त्यामुळे अक्षय डांगे या तरुणाला तब्बल ४ ते ५ दिवस रुग्णालयात भरती होऊन उपचार घ्यावे लागले.
शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्यासाठी केलेला हा हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा होता. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कळंबोली पोलीस ठाण्यात प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे या तिघांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच प्रसाद रंगिले उर्फ गोलू, धनंजय सेंगर आणि निनाद पाटोळे हे तीनही आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाले. तब्बल १ महिना आणि ८ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर कळंबोली पोलिसांनी यातील दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र निनाद पाटोळे हा तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे.
याबाबत फिर्यादी अक्षय डांगे यांच्यासह परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसाद रंगिले उर्फ गोलुभाई आणि त्याच्या साथीदारांबाबत मोठी गोष्ट समोर आणली. या परिवाराने घटना घडल्यानंतर माहितीच्या अधिकारात गोलुभाई आणि धनंजय सेंगर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीच मागवून घेतली. यामध्ये गोलुभाई याच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात तब्बल १२ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तर धनंजय सेंगर याच्यावरही मारहाण केल्याचा एक गुन्हा दाखल आहे.
0000
