मुंबई – आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ.शिरोडकर हायस्कूल व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात परेल परिसरातील ६८ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू नरसिंगराव सकारी, डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा माने, क्रीडा शिक्षक सत्यविजय डामरे, राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक सचिन शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांनी सर्व सहभागी शालेय खेळाडूंना कॅरमचा प्राथमिक सराव, बसण्याची पध्दत, स्ट्रायकर सोडण्या संदर्भात बोटांच्या पकडी, ब्रेक करण्याची कला, कॅरमच्या पृष्ठभागावरील निशाणांचा होणारा उपयोग, एकाग्रता निर्माण करण्यासाठी उपयुक्त असलेले प्राणायाम, खेळण्यापूर्वी करावे लागणारे हातांचे वॉर्मअप, प्रमुख नियम आदीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक सराव देऊन त्यामधील निवडक उदयोन्मुख शालेय खेळाडूंना नियमित सरावाबाबत महत्वाचे कानमंत्र दिले.
