Author: bittambatami.com

  ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महिलाराज

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महिलाराज महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून लाडक्या बहिणींची वर्णी- एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे, महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता महापौर निवडीची प्रक्रिया सर्व ठिकाणी सुरू असून ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये यंदा अनपेक्षित पध्दतीने महिलाराज येणार आहे. महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील लाडक्या बहिणींवर विश्वास दाखवला आहे. ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण डोंबिवलीत हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगर येथे अश्विनी निकम यांची महापौरपदी वर्णी लागणार आहे. लाडक्या बहिणींनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महापौरपद देताना लाडक्या बहिणींनाच प्राधान्य द्यावे अशी आग्रही भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. त्यावर एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर आता महिलाराज दिसणार आहे. महिलांसाठी पद आरक्षित नसताना त्यांना हे पद मिळण्याची ही या पालिकांच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार हे निकालातून स्पष्ट झाले होते. त्यामुळेच निकालानंतर शिवसेना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. या तिन्ही ठिकाणची महापौरपदे महिलांसाठी आरक्षित झालेली नव्हती. त्यामुळे पुरूषांनाच तिथे संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती.परंतु, ती चुकीची ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या तीनही महापालिकांची जबाबदारी आपल्या पक्षाच्या लाडक्या बहिणी असलेल्या महिला नगरसेवकांकडे सोपवली आहे. विशेष म्हणजे महापालिकांमध्ये महिला आरक्षण नसतानाही जाणीवपूर्वक हा निर्णय घेत महिलांना संधी देण्यात आली आहे.एकनाथ शिंदे यांनी आजवर लाडक्या बहिणींच्या सबलीकरणाला प्राधान्य दिलेआहे. त्यामुळेच महिलांना संधी ही आरक्षणाची वाट न पाहता कुवतीनुसार मिळावी हा विचार करून तीनही महापालिकांमध्ये महापौरपदासाठी नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. चौकट शिवसेनेच्या महिलांचा वरचष्मा मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या २९ पैकी १९ महिला नगरसेविका आहेत. मुंबईतील युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला ९० जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी ६३ जागी शिवसेनेने महिला उमेदवार दिल्या होत्या हे विशेष.नगरपालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष निवडून आले. त्यापैकी ३३ महिला आहेत. त्यामुळे शिवसेनेत नगरपालिकांमध्येही लाडक्या बहिणींचे राज्य कायम राहणार आहे.

पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींची तरतूद

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पायाभूत सुविधांसाठी १२.२ लाख कोटींची तरतूद महामार्ग व शहरी विकासाला गती देणारा अर्थसंकल्प मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये पायाभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या १२.२ लाख कोटी रुपयांच्या…

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्‌डाण-२०२६ चे शानदार आयोजन

महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टमध्ये भव्य व रंगारंग वार्षिकोत्सव ‘उड्‌डाण-२०२६ चे शानदार आयोजन राजेंद्र साळसकर मुंबई -महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचालित राजे शिवाजी वि‌द्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यालय मराठी, हिंदी, उर्दू माध्यम)…

 बी. के. बिर्ला महाविद्यालयात नव साहित्यिकांचा सन्मान

बी. के. बिर्ला महाविद्यालयात नव साहित्यिकांचा सन्मान कल्याण: बी. के. बिर्ला महाविद्यालय आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे पुरस्कृत साहित्य भारती प्रांत यांनी कोंकण प्रांतातील नवलेखक व साहित्य अभ्यासक यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभ यशस्वीपणे पार पडला. या सन्मानासाठी कोकण प्रांतातील शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी त्रिस्तरीय — त्रिभाषिक नवलेखक शोध निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी १२७ शैक्षणिक संस्थांकडून हिंदी, इंग्रजी आणि मराठीत एकूण १५८७ निबंध प्राप्त झाले. पात्र परीक्षकांच्या मूल्यमापनानंतर एकूण ६९ विद्यार्थ्यांची पारितोषिकांसाठी निवड करण्यात. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. सन्मान समारंभाचे मुख्य पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक इंदुशेखर तत्पुरुष (जयपूर) उपस्थित होते. त्यांनी स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेल्या ‘पर्यावरण संरक्षणात आपली भूमिका’, ‘वर्ष २०४७पर्यंत भारत कसा विकसित होईल’ आणि ‘स्वदेशी स्वीकारा: आत्मनिर्भर भारत घडवा’ या तीन विषयांबाबत आपले विचार मांडले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेशप्रताप सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी नवसाहित्यिकांसाठी आशा कार्यक्रमांचीअत्यंत आवश्यकताअसल्याचे सांगत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित महाराष्ट्र राज्य गृह रक्षक दलाचे सहायक संचालक विजयकुमार कलवले यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना नेहमी प्रश्न उपस्थित ठेवण्याचे आणि ‘स्क्रोल’च्या बदल्यात ‘स्कॉलर’ बनण्याचे महत्व सांगितले. प्रमुख उपस्थित डॉ. बलिराम गायकवाड यांनी मानवी जीवनातील साहित्याच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडण्याचे आवाहन केले. सन्मानित अतिथी दुर्गेश सोनार यांनी या सन्मान समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत साहित्यातील नैतिकता आणि राष्ट्राबद्दलचे योगदान यावर भर दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  समन्वयक डॉ. श्यामसुंदर पांडे यांनी केले.

सर्कस रद्द झाल्याने भूमिपुत्र मैदान खेळाडूंसाठी पुन्हा खुले – संजय केळकर

सर्कस रद्द झाल्याने भूमिपुत्र मैदान खेळाडूंसाठी पुन्हा खुले – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे: आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारातून आणि स्थानिक लोकांच्या सहभागातून अतिक्रमणमुक्त झालेले भूमिपुत्रांचे मैदान नियोजित सर्कशीमुळे दोन महिने शेकडो खेळाडूंसाठी बंद होणार होते. मात्र संजय केळकर यांच्या दणक्याने सर्कस रद्द करण्यात आली असून खेळाडूंनी जल्लोष केला आहे. पाच वर्षांपूर्वी अतिक्रमण आणि कचऱ्यामुळे कळव्यातील भूमिपुत्र मैदानाची दुरावस्था झाली होती. भविष्यात तेथे कचऱ्याचे डम्पिंग निर्माण होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत होते. हे मैदान मोकळे झाल्यास कळव्यातील शेकडो मुलांना, खेळाडूंना हक्काचे मैदान मिळणार होते. आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी लोकचळवळ सुरू केली आणि लोकसहभागाचे आवाहन केले. फोर्टी प्लस टीमचे रणजीत पाटील, अशोक भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह येथील नागरिकांनी प्रतिसाद देत लोकसहभागातून ही मैदान मोकळे करण्यात आले. गेली चार वर्षे या मैदानात सुमारे ५०० विद्यार्थी आणि खेळाडू या मैदानाचा लाभ घेत असल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली.ही जागा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने एका सर्कशीला दोन महिन्यांसाठी हे मैदान देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. ही बाब तेथील नागरिकांनी आणि खेळाडूंनी  केळकर यांच्या कानी घालून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.  केळकर यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय रद्द करण्यास भाग पाडले. ही सर्कस रद्द झाल्याने शेकडो खेळाडूंना हे मैदान पुन्हा मोकळे झाले असून त्यांनी जल्लोष केला आहे. हे मैदान लोकसहभागातून निर्माण झाले असून त्याचा वापर खेळासाठी आणि खेळाडूंसाठीच व्हावा असा आग्रह मी प्रशासनाकडे धरला आहे. यापुढे खेळाशिवाय हे मैदान इतर कारणांसाठी वापरण्यात येऊ नये, अशी सूचनाही प्रशासनाला केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.

आनंदवाडी येथे संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

आनंदवाडी येथे संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न कल्याण: कल्याण पूर्व आनंदवाडी येते संत शिरोमणी रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने श्री संत शिरोमणी रविदास महाराज ६४९ वी जयंती मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने रविवारी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते मोठ्या भक्तिभावात पार पडला. या जयंती उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे, उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीची सुरवात करण्यात आली. संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक केडीएमसी दवाखाना, गणपती मंदिर, कोळसेवाडी, उतेकर बिल्डिंग, दुर्गामाता मंदिर, डबल टॉवर मार्गे आनंदवाडी येथील नव्या समाज मंदिरापर्यंत नेण्यात आली असून मिरवणुकीत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंत्रोच्चार व विधीपूर्वक संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व पूजन करण्यात आले. यावेळी सुरेश पवार, सोनी क्षिरसागर, संदीप क्षीरसागर, भैरवनाथ वाघमारे, प्रकाश लांडगे, सोमनाथ राऊत, कविता रुपवते, मंगल गायकवाड, ललीता साबळे, वंदना नायडू, रेखा चंद्रे, रेश्मा शिरकर, रेखा साळे, अस्मिता गायकवाड, मंगल बनसोडे, कलावती शेवाळे, विठाबाई धनशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दत्तक मुलाला पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क- मुंबई उच्च न्यायालय

दत्तक मुलाला पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क- मुंबई उच्च न्यायालय अनिल ठाणेकर ठाणे, दत्तक घेतलेल्या मुलाला दत्तक पालकांची जात लावण्याचा पूर्ण हक्क असून, तो हक्क नाकारणे म्हणजे त्या मुलाचे भविष्य अंधारात टाकण्यासारखे ठरेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियमाअंतर्गत दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा दत्तक पालकांचे वैध अपत्य ठरतो आणि त्या नात्याशी संबंधित सर्व हक्क, सवलती व जबाबदाऱ्या त्याला प्राप्त होतात, असे न्या. एम. एस. कर्णिक व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.मुलाला जात प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने संबंधित महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधित मुलाचा जन्मावेळी त्याग करण्यात आला होता. त्यानंतर पुणे जिल्हा न्यायालयाने बाल न्याय अधिनियम, २००० अंतर्गत दिलेल्या आदेशाने महिलेला व तिच्या पतीला दत्तक पालक घोषित केले होते. तसेच पुणे पालिकेला मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात दत्तक पालकांची नावे नोंदविण्याचे निर्देश दिले होते.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत सर्वंकष स्वच्छता मोहिम

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली कोपरीत सर्वंकष स्वच्छता मोहिम अनिल ठाणेकर ठाणे :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली सर्वंकष स्वच्छता मोहिम  नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या कोपरी परिसरात व्यापक प्रमाणात राबविण्यात आली. सकाळी ७.३० अष्टविनायक चौकातून स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. “कर्तव्य आज, मग पदाचा चार्ज” असे नमूद करीत उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली ही मोहिम संपूर्ण ठाणे शहरात अधिक व्यापक प्रमाणात राबविणार असून या मोहिमेत ठाणेकरांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे नियोजित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नगरसेवक मालती पाटील, नम्रता पमनानी, भरत चव्हाण, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त मधुकर बोडके, दीपक  झिंजाड, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, मुख्य स्वच्छता निरीक्षक शंभूराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, चारू घुट्टे आदी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थ‍ित होते. अष्टविनायक चौकातून या मोहिमेस प्रारंभ झाला, त्यानंतर कोपरी गाव, कन्हैया नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच बारा बंगला या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कचरा संकलन व साफसफाईबरोबरच रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यासाठी (एसटीपी)  प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला.या मोहिमेत नागरिक देखील उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते. पिपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूल, नानीक इंग्लिश स्कूल, श्री मा बालनिकेतन, विद्यासागर एज्युकेशन सोसायटी, जीवन ज्योती इंग्लिश मीडियम, इत्यादी शाळेचे शिक्षक व प्रत्येक शाळेचे ५० विद्यार्थी स्वच्छता अभियान मध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सहभागी होते.  तसेच उद्यान विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम शिक्षण,अतिक्रमण, मलनिसारण विभाग व इतर विभाग सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली. स्वच्छ सुंदर ठाणे ..हाच करुया निर्धार रे’ च्या घोषणा यावेळी  विद्यार्थ्यांनी  दिल्या.या मोहिमेसाठी जेटिंग गाडी, पाण्याचे टँकर, सीएनडीच्या 2 गाड्या, जेसीबी डंपर तसेच कचरा उचलण्यासाठी ३ आरसी कॉम्पॅक्ट १० घंटा गाड्याचा वापर करण्यात आला. या मोहिमेसाठी जवळपास ७०० सफाई कर्मचारी उपस्थित होते.

खारदांडा कोळीवाड्याच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करा – वर्षा गायकवाड

खारदांडा कोळीवाड्याच्या जमिनीवरील बांधकामे नियमित करा – वर्षा गायकवाड मुंबई: मुंबईतील खारदांडा, कोळीवाडा हा गावठाण भाग असून येथील रहिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या  गावठाण क्षेत्रातील बांधकामांबाबत स्वतंत्र व स्पष्ट नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत खार दांडा कोळीवाडा येथील बांधकामांबाबत महानगरपालिका तसेच अन्य यंत्रणांकडे प्रलंबित असलेल्या सर्व तक्रारींवर कारवाई स्थगित ठेवण्याबाबत शासन आदेश काढावा आणि येथील मालकी हक्काच्या जमिनीवरील बांधकामांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून बांधकामे नियमित करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात खासदार वर्षा गायकवाड म्हणतात की, कोळी समाज हा महाराष्ट्र, गुजरात आणि कोकण किनार पट्टीवरील सर्वात जुना, म्हणजे ‘आद्य’रहिवाशी मानला जातो. १५ व्या शतकापासून मुंबईच्या किनारपट्टीवर वसलेल्या या समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून, त्यांना ‘मुंबईचे मूळ रहिवासी’ म्हणून ओळखले जाते. हे समाज बांधव सागरी संस्कृती आणि परंपरांचे जतन करणारे आहेत. सदर भागातील इमारतींच्या दुरुस्ती व बांधकामाबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियमातील ठोस व स्पष्ट नियमावली अद्याप तयार झालेली नाही, त्यामुळे बांधकाम परवानगी मिळण्यास अडचणी येत असून, मालकी हक्काच्या जमिनीवरील अत्यावश्यक दुरुस्तीची कामेही करता येत नाहीत. या तांत्रिक अडचणींचा गैरफायदा घेत काही स्थानिक घटकांकडून रहिवाशांवर तक्रारी दाखल करून महानगरपालिका व न्यायालयीन माध्यमातून खंडणीची मागणी केली जात असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. खार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल असून,संबंधित तक्रारी व पुरावे उपलब्ध आहेत. खंडणी न दिल्यास गरीब व सामान्य रहिवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरातून बेघर केले जात असल्याच्या घटना घडत आहेत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.  सरकारने याची दखल घेऊन येथील गरीब व गरजू रहिवाशांना खंडणीखोर प्रवृत्तीपासून संरक्षण द्यावे असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.