Author: bittambatami.com

मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा

जुहू किनाऱ्यावर दुग्ध उद्योगाविरोधात निदर्शने मालाड-  जागतिक दूध दिनानिमित्त प्राण्यांच्या हक्‍कासाठी कार्यरत असलेल्‍या ‘युनायटेड फॉर कम्पॅशन इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडून जुहू समुद्रकिनाऱ्यावर दुग्‍ध उद्योगांविरोधात निदर्शने करण्यात आली. मुक्‍या प्राण्यांचे शोषण थांबवा, अशी…

सम्राट,  जश, प्रिजेश, ध्रुव विजेते

गोविंदराव मोहिते बुध्दिबळ स्पर्धेत मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धेमधील ८/१०/१२/१४ वयोगटात मुलांमध्ये सम्राट जिंदल, जश शाह, व्ही. प्रिजेश, ध्रुव जैन यांनी आणि मुलींमध्ये अनिश्का बियाणी, आराध्या पुरो, हुसैना राज, मयंका राणा यांनी विजेतेपद पटकाविले. याप्रसंगी गेली ५ दशके विविध क्रीडा स्पर्धांद्वारे खेळाडूंना प्रोत्साहन देणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सोन्याची अंगठी देऊन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक-अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नामवंत बुध्दिबळपटू, क्रिकेटपटू, कॅरमपटू, कबड्डीपटू, व्यायामपटू, क्रीडा पत्रकार तसेच कामगार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील नामवंत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटूसह एकूण ११७ खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. ८ वर्षाखालील मुलांमध्ये सम्राट जिंदलने (५ गुण) प्रथम, रेयांश सचदेवने (४ गुण) द्वितीय, ऐडेन लासराडोने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये अनिष्का बियाणीने (२ गुण) प्रथम, पृषा गाडाने (२ गुण) द्वितीय, भावना श्रॉफने (१ गुण) तृतीय; १०  वर्षाखालील मुलांमध्ये जश शाहने (५ गुण) प्रथम, समर्थ गोरेने (४ गुण) द्वितीय, समक्ष कर्नावटने (३ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये आराध्या पुरोने (४ गुण) प्रथम, नित्या बंगने (३ गुण) द्वितीय, वेदा कपूरने (३ गुण) तृतीय; १२ वर्षाखालील मुलांमध्ये व्ही. प्रिजेशने (४ गुण) प्रथम, लोबो फेरद्यनने (४ गुण) द्वितीय, विराज शाहने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये हुसैना राजने (२ गुण) प्रथम तर १४ वर्षाखालील मुलांमध्ये ध्रुव जैनने (४ गुण) प्रथम, अर्जुन पाधारीयाने (३ गुण) द्वितीय, आदित्य राणेने (२ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये मयंका राणाने (५ गुण) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिंकला.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा `पाऊसवेळा’ कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे. पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

उन्हाचा तडाखा अजून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जात आहे याचा फटका पशू पक्षांना देखील बसताना दिसत आहे ठाणे गावदेवी येथे अशाच एका कॉपर्स स्मित बारबेट पक्षाला उष्माघाताचा त्रास होऊन पक्षी रस्तावर पडला होता पक्षी मित्रांनी या पक्षाला उचलून पाणी पाजून जीवदान दिले … फोटो प्रफुल गांगुर्डे

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथे १ जून २०२४ रोजी महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रात एकंदर ८ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून सायंकाळी ५ ते रात्रौ ९ दरम्यान हे केंद्र सराव व प्रशिक्षणासाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडूंसाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय व अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेपूर्वी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरुष व महिला गटातील खेळाडूंचे शिबीर या केंद्रात आयोजित केले जाणार आहे. विशेष करून ज्युनिअर गटातील मुला मुलींना या प्रशिक्षण केंद्रात खेळाच्या प्रशिक्षणासोबतच नियमांची माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी कॉम्रेड वेणू नायर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरजू खेळाडूंना या उपक्रमाचा विशेष फायदा व्हावा व महाराष्ट्रात अधिक गुणी खेळाडू तयार व्हावेत म्हणून या केंद्रासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनला जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिशनला स्पर्धा आयोजित करण्यासाठी संस्थेचा हॉल व इतर सहकार्य करण्याची ईच्छा व्यक्त केली. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी कॉम्रेड वेणू नायर यांनी रुपये १ लाख देणगी जाहिर केली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  मानद सचिव अरुण केदार यांनी नॅशनल मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर, युनियनचे सहाय्यक चिटणीस कॉम्रेड विनय सावंत तसेच इन्स्टिट्यूटचे सचिव कॉम्रेड चेतन सावल यांचे कॅरमचे घड्याळ भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्धल आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार उपस्थित होते. शिवाय अनेक कॅरम खेळाडूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला प्रतिसाद नोंदविला. अधिक  माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क करावा.

पावसाळ्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ घ्या – वेंगसरकर

मुंबई : या वर्षीचा क्रिकेट मौसम आता संपला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. मात्र पाऊस आहे म्हणून चार महिने घरात बसून न राहता या वेळेचा सदुपयोग करताना शारीरिक फिटनेस आणि क्रिकेटचं तंत्र पक्कं कारण्यासाठी इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ करून घ्या असे आवाहन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. तुम्ही जर असे केलेत तर ऑक्टोबर मध्ये जेव्हां नवीन मोसमाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही फॉर्मात राहू शकाल. मुंबईतील युवा क्रिकेटपटूनसाठी  पावसाच्या चार महिन्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधा या महत्वपूर्ण ठरू शकतात असेही त्यांनी पुढे सांगितले. माहुल, चेंबूर येथील वेंगसरका क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पोर्टींग्स क्लब कमिटी ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मुंबई क्रिकेट क्लब संघावर ९९ धावांनी विजय मिळविला. मुंबई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा लाभ उठवत स्पोर्टींग्स क्लब कमिटी संघाने निर्धारित ४० षटकांत ७ बाद २५७ धावांचे लक्ष्य उभारले.  त्यांच्या प्रणव अय्यंगार याने सर्वाधिक ७९ धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी रुद्र बन्दीछोड (४४) याच्या साथीने ९१ धावांची तर नंतर युग पाटील (४५) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भर टाकली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई क्रिकेट क्लबच्या अरहाम शहा (४७) आणि आरव ठाकर (४६) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली त्यावेळी हा संघ जोरदार लढत देणार असेच वाटत होते. मात्र हे दोघे बाद होताच त्यांच्या अन्य फलंदाजांनी देवांश शिंदेच्या अचूक गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. देवांशने केवळ १८ धावांत ७ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवत त्यांचा डाव ३३ षटकांत १५८ धावांतच गुंडाळला. देवंशाला युग पाटीलने २६ धावांत २ बळी मिळवत चांगली साथ दिली.  अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणेच देवांश शिंदेची निवड करण्यात आली.  स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून कृष्णा पोस्वाल (१३ बळी) याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून अरहाम शहा (१६२ धावा) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्लोक शिगवण (५ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एम.सी.ए.चे खेळपट्टी बनविण्यात विशेषज्ञ  नदीम मेनन आणि एजिस फेडरलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय गंगार्डे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. संक्षिप्त धावफलक –  स्पोर्टींग क्लब कमिटी ठाणे – ४० षटकांत ७ बाद २५७ ( विवान हजारे २५, रुद्र बन्दीछोड ४४, प्रणव अय्यंगार ७९, युग पाटील ४५) वि वि. मुंबई क्रिकेट क्लब – ३३.१ षटकांत सर्वबाद १५८ (अरहाम शहा ४७, आरव ठाकर ४४; देवांश शिंदे १९ धावांत ७ बळी , युग पाटील २६ धावांत २ बळी )

तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जागृतीची गरज-न्या. डॉ. सुधीर देशपांडे

अशोक गायकवाड रत्नागिरी : तंबाखूचे दुष्परिणामाविषयी ज्येष्ठांनी तरूण पिढीस जागृत करणे काळाची गरज आहे, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती, खेडचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा न्यायाधीश १ डॉ. देशपांडे म्हणाले, तंबाखूमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होतात.माणसाच्या शरीरातील सर्व क्रियांवर तंबाखूचे दुष्परिणाम होत असतात, सिगरेटचे सेवन केल्याने फुफ्फुसामध्ये अनेक विष द्रव्य साचून फुप्फुसाची क्षमता कमी होते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्या व्यसनावर माणसे प्रचंड पैसा खर्च करतात. त्यामुळे त्यांच्या घराची आर्थिक गणित बिघडते. मन कमकुवत बनते शरीर खंगून जाते. तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्यामध्ये वैफल्य निर्माण होते. वैफल्य आणि व्यसनाधीनता या चक्रामध्ये तरुण अडकतो. त्यामुळे नागरिकांनी आजूबाजूच्या सर्व व्यसनाधीन लोकांचे तरुणांचे याबाबतीत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक बाबी डॉक्टर देशपांडे यांनी विशद करून सांगितल्या. व्यसनाधीनतेच्या विरोधात जनजागृती करण्यात येईल, अशी ग्वाही आणि भावना ज्येष्ठ नागरिकांनी याप्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकवृंद मोठ्या संख्यने उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ, खेडचे अध्यक्ष आबा निकम व सदस्य ओमप्रकाश लठ्ठा तसेच तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी एस. के. जोशी व सहदेव अंधारे यांनी परिश्रम घेतले.

मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा – जिल्हाधिकारी संजय यादव

निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून अशोक गायकवाड मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी,आढावा घेताना दिल्या. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी शनिवार,(दि.१ जून २०२४) रोजी शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,पोलीस उपायुक्त संजय लाटकर, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे स्ट्राँग रूम संचालक तथा समन्वय अधिकारी अभिजीत घोरपडे,तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था,माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यादव यांनी दिल्या. मतमोजणी केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. मतमोजणी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, चौकशी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत संबंधितांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

उल्हासनगर खेमानी नाल्याचे सांडपाणी उल्हास नदीत

लाखो नागरिकांना दूषित पाणी उल्हासनगर : शहरातील खेमानी नाल्याचे सांडपाणी ओव्हरफ्लॉ होऊन उल्हास नदीत जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित असल्याची ओरड सुरू झाली. उल्हास नदी पात्रात ज्या ठिकाणी खेमानी नाल्याचे सांडपाणी मिळते त्याच ठिकाणाहून एमआयडीसी पाणी उचलत आहे. उल्हासनगर संच्युरी कंपनी जवळून वाहणाऱ्या उल्हास नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करते. नेमके त्याच ठिकाणी शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळत असल्याने, नदीतील पाणी प्रदूषित होते. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा लाखो नागरिकाला होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप झाल्यावर, महापालिकेने खेमानी नाल्याचे पाणी विहिरीत अडविले जाते. अडविले पाणी पंपिंग करून शांतीनगर मलनिस्सारण केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करून नदी खाडीत सोडले जाते. यावर महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. नाल्याचे सांडपाणी अडवलेल्या ठिकाणी तुंबून ओव्हरफ्लॉ होत नदी पात्रात जात असल्याचे चित्र आहे. यावर महापालिकेने त्वरित कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थेकडून होत आहे. शहरातील खेमानी नाल्या प्रमाणे, म्हारळगावातून येणारा सांडपाणी नाला खेमानी नाल्यापुर्वी उल्हास नदीला मिळून नदीचे पाणी प्रदूषित करीत आहे. त्या नाल्याचे पाणी अडवून, त्यावर प्रक्रिया करून नदी ऐवजी नदी खाडीत पंपिंगद्वारे सोडण्याच्या मागणीने जोर धरला आहे. खेमानी नाल्याचे पाणी ज्याठिकाणी अडविले आहे. त्याठिकाणी नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी एक लोखंडी जाळी बसविली आहे. त्या जाळीला कचरा अडकुन पाणी ओव्हरफ्लॉ होऊन नदीत जात असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून ही परिस्थिती असून संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत महापालिका पाणी पुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

साहित्यिकांनी सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या बाजूने लिहावे – कृष्णात खोत

ठाणे : लेखक आणि कवींनी कुठल्याही काळात सत्तेच्या नव्हे, तर सत्याच्या बाजूने असले पाहिजे. सत्याचे लेखन हाच त्यांचा धर्म, तीच त्यांची जात असली पाहिजे. आत्मविस्थापनाच्या सद्ध्याच्या दुर्दैवी काळात तर लिहिणाऱ्या हातांनी निर्भयपणे लिहीत रहायला हवे. स्वतःला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारत रहायला हवेत असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वर्धापन दिनाचे दुसरे पुष्प कै. वा. अ. रेगे साहित्य पुरस्काराच्या वितरणाने गुंफले गेले. शनिवारी वा. अ. रेगे सभागृहात खोत यांनी आपले विचार मांडले ते म्हणाले. सत्तेचे ढोंग फाडण्याचे काम च्हित्यिक करत असतो. कोणताही साहित्यिक हा लोकशाही वादी असतो त्यात जास्त लोकशाही वादी हा कादंबरीकार असतो कारण तो अल्पमतवादी असतो. तो एकट्या माणसाचे सत्य घेऊन लढत असतो. लिहीणारा माणूस हा नेहमी शेवटच्या हबाकावर बसलेलेा असतो. सामान्यांचा आवाज पोहोचवण्याची ताकद लेखकात असते. राजाला लेखकाची भिती वाटत असते. सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व लेखक, कवीने करावे तेव्हाच सामान्य माणसांचा चेहरा वाचता येतो. लेखकाने सभ्यतेकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. जेत्यांचा इतिहास लिहीताना पराजितांच्या इतिहासाकडे देखील बाकराने पहावे. मानवता, करुणा याकडे देखील लेखकाचे लक्ष हवे. धर्म म्हणजेच सत्य यापलिकडे काही नाही अशी त्याची भूमिका असावी. धर्म हा उंबराच्या आत आणि उंबराच्या बाहेर आल्यावरमानवतेचा, भूतदयेचा धर्म लेखकाने पाळावा. मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे यावर लेखकाचा विश्वास असला पाहिजे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे प्र.संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, २०२४ पासून ज्या साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात त्या साहित्यकृतींचा समावेश शासनाच्या ग्रंथालयात केला जाणार आहे. शासकीय ग्रंथालये देखील आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत. ४७ लाख शासनमान्य ग्रंथ शासनाकडे असून त्यापैकी ३० लाख ग्रथांची नोंदणी ई प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तसेच, १०० हून अधिक वर्षे झालेल्या पुस्तकांचे शासनाच्या माध्यमातून डिजीटायझेशन करुन ती पुस्तके वाचकांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. सुरूवातीला विद्याधर ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ललित गटात वैभव साटम लिखीत भावकी अन गावकी तर ललितेतर गटात रुपाली मोकाशी लिखीत श्रीस्थानकाचे शीलेहार यांना ॲड. वा. अ. रेगे जिल्हास्तरीय साहित्य पुरक्साराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डावीकडून ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, दा.कृ. सोमण, ठाणेकर, गाडेकर, खोत, विश्वस्त मकरंद रेगे, हेमंत काणे आणि विनायक गोखले आदी उपस्थित होते. वृंदा दाभोलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.