ठाण्यात हिट अॅण्ड रनचे चार महिन्यांत ३६ बळी
ठाणे -ठाण्यात चार महिन्यांत हिट अॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर या अपघातात १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे येऊर, घोडबंदर…
ठाणे -ठाण्यात चार महिन्यांत हिट अॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर या अपघातात १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे येऊर, घोडबंदर…
मुंबई : रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर ३१ मे ते २ जूनपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला असून जवळपास ९३० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त लोकलने प्रवास करतात. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग खूप संवेदनशील असून, येथे कोणतीही घटना घडल्यास, त्याचे पडसाद सर्वदूर पडतात. शुक्रवारी रात्रीपासून सीएसएमटी येथे ब्लॉक आहे. त्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने याची माहिती अगोदर देणे गरजेची होती. परंतु, जनसंपर्क विभागाच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रवासी घराबाहेर पडले तर गर्दीचे नियोजन रेल्वे प्रशासनाने कसे करणार? प्रवासादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी उपस्थित केले आहे. तसेच या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागातील अनेक प्रवाशी नोकरीनिमित्त प्रवास करतात. परंतु, मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी लोकलमधून प्रवास कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे, नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावा, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
महाविद्यालय पसंतीक्रमाचा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून भरता येणार मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरत आहेत. परंतु दहावीचा निकाल जाहीर होऊनही उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात पडले आहेत. आता बुधवार, ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दरवर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीची प्रवेश क्षमता वाढ आणि शासनाकडून नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येते. या सर्व महाविद्यालयांना केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व जागा आणि नवीन महाविद्यालयांची नोंदणी ही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यानंतर ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येईल. तसेच उर्वरित प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग १ भरून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात (लॉक) आले आहेत. तर ३८ हजार ३८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित (ऑटो व्हेरिफाय) आणि २३ हजार ७५५ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही मार्गदर्शन केंद्रावर (जीसी व्हेरिफाय) झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे कसे? विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ हा ५ जूनपासून भरता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागतील.
येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मुंबईत आजपासून (३० मेपासून) ५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सातही धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ही कपात लागू करण्यात आली आहे. मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी आहे. तसेच, या सात धरणांमध्ये आता केवळ १ लाख २१ हजार ४१९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाने ओढ दिल्यास मुंबईकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने मान्सूनबाबत सकारात्मक अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिकाधिक वापर व्हावा, यासाठी पालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला असून सातही धरणांमध्ये केवळ ८.३९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पाणीसाठा १४.४ टक्क्यांवर होता. या पाणीकपातीमुळे पूर्वीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या पाणी चिंतेत आणखी वाढ झाली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईकरांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका प्रशासनातर्फे येत्या ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पालिकेने लागू केलेल्या पाणीकपातीचा या भागांनाही फटका बसणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन धरणांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पनवेल : महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आव्हाडांविरोधात पनवेलमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कामगारनेते जितेंद्र घरत, अनुसूचित जाती मोर्चाचे अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर उरणकर, अमोल जाधव, कोषाध्यक्ष शोभा मिंठबावकर, चित्रा भंडारी, सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनवणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाल पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे, आत्रम, गणेश जाधव, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य बंटी रसाळ, श्री ढवळे, श्री तायडे, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे, यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकत्यांनी आंबेडकरांचे फोटो फाडले. त्यामुळे भीम अनुयायींकडून मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशीची जोरदार मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम ठाणे : दिवसेंदिवस वातावरणातील तापमान अधिकाधिक तीव्र होताना आपणास जाणवत आहे. दिवसागणिक वाढत चाललेली उष्णता अशीच वाढत राहिली तर पुढच्या काही वर्षातच भारतातील जीवसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. जर येणाऱया काळात मनुष्यनिर्मित आपत्तीमुळे आरोग्यपुर्ण जीवनच जगता येणार नसेल तर अशा भौतिक सुख निर्मितीचा उपयोग काय ? यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे, ती ओळखून संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प इको फ्रेन्डली लाईफ या पर्यावरणवादी संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. याची सुरुवात ५ जुन रोजी पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सरकारी प्रशासकीय आस्थापनांचा सहभाग मिळावा यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याबरोबर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्वेसर्वा पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांच्यासोबत सिद्धांत चासकर, कुणाल बागुल, सागर झेंडे, किशोर बनकर, राहूल गायकवाड आदी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यामधील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, जव्हार, वाडा, मोखाडा, इत्यादी तालुक्यातील फळझाडांच्या लागवडीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेच्या ७०० कोटी फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याच्या संकल्पनेला कुलकर्णी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाकरिता सामाजिक वनिकरण विभागाकडून काही प्रमाणात फळझाडे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. तसेच आता वेळ खूप कमी आहे. पुढील वर्षीय योग्य नियोजन करून या उपक्रमाकरिता अधिक फळझाडे तयार करण्यास संबंधितांना सांगता येईल त्यामुळे फळझाडांच्या रोपाची उपलब्धता अधिक होऊ शकेल. असे कुलकर्णी म्हणाले. ठाणे जिल्हा वनरक्षक विभागाचे संतोष रास्ते यांनी देखील या उपक्रमाला रोपे देण्याची तयारी दर्शवली. तसेच भविष्यात मोठ मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फन्ड या उपक्रमाकरिता कसा मिळेल याकरिता प्रयत्न करण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामिण भागात होणारी प्रचंड वृक्षतोड थांबवण्यासाठी ग्रामिण भागातील संपूर्ण गाव कंपन्यांनी दत्तक घेऊन त्यांचा सीएसआर फंन्ड त्या गावातील शेतकऱ्यांसाठी इन्सेन्टीव्ह म्हणून दिल्यास ही वृक्षतोड पुर्णपणे थांबू शकते, असा आशावाद रास्ते यांनी व्यक्त केला. तसेच राज्यशासनाच्या पातळीवर या प्रकारचा जीआर काढून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी पब्लिक प्रा.पार्टनरशीप म्हणजेच पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था व पर्यावरण विभाग यावर देखरेख ठेवून लाखोंच्या संख्येने होणारी वृक्षतोड निश्चित थांबू शकेल, याबाबत सविस्तर चर्चा करताना ते पुढे म्हणाले, वनखात्यातील वर्कस पडीत जागा ह्या पुर्ण वृक्षलागवडीखाली आणता येतील त्यासाठी सामाजिक संस्था व वनखाते महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये नियमानुसार एग्रीमेन्ट करून मोठ्या प्रमाणात फळझाडांची लागवड करून जोपासता येईल. म्हणजेच प्रा.पब्लिक प्रार्टनरशीपमधून हे यशस्वी करता येईल. तसेच ८०० कि.मी.च्या संमृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूंनी योग्य नियोजन करून फळझाडांची लागवड केल्यास संपूर्ण रस्ता सावलीमध्ये राहील. तापमान कमी होईल व फळझाडांचाही लाभ घेता येईल. पब्लिक प्रा.पार्टनरशीपमधून हे सहज करता येऊ शकते. या संदर्भात सरकारकडे कृती योजना सादर करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले, संपूर्ण भारतभर 700 कोटी फळझाडे लावून फळझाडांनी बहरलेला समृद्ध भारत निर्माण करण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम 5 जून 2024 पासून अर्थात जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या ठिकाणी धडक कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात आपण सहभागी होण्यासाठीचे निवेदन आणि इको फ्रेन्डली लाईफच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या कार्यक्रमाची रुपरेषा असलेली माहिती पुस्तिका संस्थेचे प्रमुख पर्यावरण तज्ञ अशोक एन.जे. यांनी मान्यवरांना दिली.
आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. तसेच त्यांच्या छायाचित्राला काळे फासले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनातून आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यातील कोर्ट नाका, कळवा, भीमनगर आणि कोपरीत झालेल्या आंदोलनात आव्हाडांचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच चितळसर पोलिस ठाणे व वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडमधील ऋषीकेश येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, वृषाली वाघुले-भोसले यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार, ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात आंदोलन करून आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला. ठाण्यातील कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आमदार संजय केळकर यांच्यासह ठाणे शहर विधानसभा निवडणूकप्रमुख सुभाष काळे, माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर, माजी नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनिल हंडोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, राजेश मढवी, विक्रम भोईर, महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथे झालेल्या आंदोलनात आव्हाडांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. त्यानंतर भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष आनंद बनकर यांनी वर्तकनगर पोलिसांना निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या आंदोलनात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुरज दळवी, वर्तकनगर मंडल अध्यक्ष संतोष जायसवाल, लोकमान्य नगर मंडल अध्यक्ष निलेश पाटील, बाळा केंद्रे, राम ठाकूर, वीरसिंह पारछा आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघाचे सहप्रभारी भरत चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. समीरा भारती, सहसंयोजक कृष्णा भुजबळ, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, वागळे मंडल अध्यक्ष सचिन सावंत, इंदिरानगर मंडल अध्यक्ष दयाशंकर यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर सुरेश कांबळे यांनी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर कळवा येथे भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सोहेल शेख, हिरोज कपोते यांनी आंदोलन करून आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
नवी मुंबईकरांचा उत्साही सहभाग नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागातून नवी मुंबई महानगरपालिका नानाविध उपक्रम राबवित असून शाश्वत पर्यावरण विकासाकडे वाटचाल करीत आहे. या अनुषंगाने नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 मे पासून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करणारे पथनाट्य सादरीकरण, सोसायट्यांमध्ये कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत नागरिक शहराचे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी कशा प्रकारे हातभार लावू शकतात याविषयी माहिती देणारी व त्यांना त्यासाठी प्रोत्साहित करणारी हस्तपत्रके छापण्यात आली असून त्याचे वितरण पर्यावरण स्वयंसेवकांमार्फत घराघरात जाऊन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागरिक विरंगुळ्यासाठी येत असतात अशा जागा आणि नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी पर्यावरण जागृती स्टॉल लावून नागरिकांना माहिती दिली जात आहे. या सप्ताहभरात आठही विभागांमध्ये प्रत्येकी तीन ते चार मुख्य ठिकाणी हे किऑक्स लावण्यात आले असून नवी मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबविण्यात येणा-या या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने त्यांची व्यापकता वाढवून त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री. शिरिष आरदवाड यांनी सांगितले आहे.
ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा वेंगसरकर संघ गावस्कर संघाने शास्त्री संघाला २०९ धावांवर रोखले मुंबई, ३० मे : आरुष कोल्हेच्या (खेळत आहे १८३) दमदार नाबाद शतकी खेळीमुळे वेंगसरकर संघाने ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या साखळी लढतीत पहिल्या दिवशी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दोन्ही लढतीत शतकाने हुलकावणी दिलयानंतर आज मात्र त्याने सारी कसर भरून काढण्याच्या जिद्दीने फलंदाजी केली आणि समोरून अन्य फलंदाजांची पाहिजे तेवढी साथ मिळत नसतानाही आपल्या धावांचा ओघ कायम राखला. त्याच्या नाबाद १८३ धावांमुळे वेंगसरकर संघाने पहिल्या दिवसाखेर ८६ षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या रोशन फारुकी (२२), अरहाम जैन (१८), लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा (२३) आणि दर्शन राठोड (खेळत आहे २२) यांची त्याला सुरेख साथ लाभली. तेंडुलकर संघाच्या अनुज सिंग (३५/२), मोक्ष निकम (५०/२) आणि आर्यन कुमार (४८/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत सुनील गावस्कर संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या रवी शास्त्री संघाला ४६.४ षटकांत २०९ धावांवर रोखले. प्रवीर सिंग याने ६२ धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखविला तर शौर्य राणे (४४ धावांत ३ बळी) आणि शेन रझा (३४ धावांत २ बळी) यांनी देखील अचूक गोलंदाजी केली. रवी शास्त्री संघासाठी यश सिंग या सलामीवीराने (५३)केवळ ३५ चेंडूत अर्ध शतकी खेळी करताना ११ चौकार ठोकले. शाहिद खान याने ६८ तर कबीर जगताप याने नाबाद ७४ धावांची खेळी करून संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना गावस्कर संघाने ३२ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत, त्यात देवाशिष घोडके याचा ४२ धावांचा वाटा होता. संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९ (यश सिंग ५३, शाहिद खान ६८, कबीर जगताप नाबाद ७४; शेन रझा ३४/२, शौर्य राणे ४४ धावांत ३ बळी, प्रवीर सिंग ६२ धावांत ४ बळी) वि. गावस्कर संघ – ३२ षटकांत २ बाद १०३ (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर खेळत आहे २५) ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – ८६ षटकांत ७ बाद ३१९ (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे खेळत आहे १८३ , उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड खेळत आहे 22; अनुज सिंग ३५ धावांत २ बळी , मोक्ष निकम ५० धावांत २ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी) वि. तेंडुलकर संघ. फोटो ओळी – पहिल्या दिवसाअखेर नाबाद १८३ धावांची खेळी करणारा वेंगसरकर संघाचा फलंदाज आरुष कोल्हे.