Author: bittambatami.com

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.

मोखाड्यात तीन दिवसांपासून नुकसान

मोखाडा : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून विविध परिसरांत वादळासह अवकाळी पावसाने धुमशान घातले आहे. सोमवारी  झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यातील अनेक भागांतील गाव-पाड्यांमधील घरांचे नुकसान केले आहे. पावसाळ्यापूर्वी अवकाळीने घरावरील छप्पर उडवल्याने घराची डागडुजी करण्याचा मोठा प्रश्न आदिवासी बांधवांसमोर उभा राहिला आहे. मोखाडा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी वादळी पाऊस कोसळत आहे. मात्र, सोमवारी तालुक्यातील काही भागांत वादळी, तर काही भागांत गारांचा पाऊस कोसळला. त्यामुळे वेगवेगळ्या भागांत घरांवरील छप्पर उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आसे आणि चास ग्रामपंचायतीमधील गाव-पाड्यांना सर्वाधिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. धामोडी येथील प्रकाश वाजे, तर चास पांगरी येथील ढवळू वाजे यांसह अन्य गाव-पाड्यांतील आदिवासींच्या घरावरील छपरे या वादळी पावसाने उडवली आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच घरावरील छप्पर अवकाळीने उडविल्याने येथील आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे. घरांची डागडुजी कशी करायची, असा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दरम्यान, नुकसानग्रस्त भागातील माहिती तलाठ्यांकडून येत आहे. तसेच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली.

उद्धव ठाकरे आज वसईत

विरार : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या (ता. १४) वसईत येत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारानिमित्त वसई-माणिकपूर येथील वायएमसीए मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ते प्रमुख म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. वसई सनसिटी येथील मैदानावर सायंकाळी साडेचार वाजता हेलिकॉप्टरमधून त्यांचे आगमन होईल. त्यानंतर येथून जवळच असलेल्या बिशप हाऊसला ते भेट देतील. त्या ठिकाणी उपस्थित नागरिक आणि धर्मगुरूंसोबत संवाद साधतील. त्यानंतर नियोजित वेळेत सभास्थळी पोहोचून सभेला मार्गदर्शन करतील. उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांची उमेदवारी घोषित केली होती. महाविकास आघाडीने भारती कामडी यांच्या रूपाने महिला उमेदवार दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी ६ एप्रिल आणि उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल रोजी अनुक्रमे वसई व बोईसर येथे सभा घेतलेली आहे. आदित्य ठाकरे यांनीही ८ मे रोजीच्या ‘बाईक रॅली`तून विरार-नालासोपारा भागातील नागरिकांसोबत संवाद साधला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवार, ११ मे रोजी पालघरमध्ये पुन्हा भेट दिली होती. या भेटीत त्यांनी येथील विविध क्षेत्रांतील संघटनांची भेट घेऊन त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा वसईत जाहीर सभा घेत आहेत. पर्यावरण हानी, आरोग्य व्यवस्था, वाहतूक कोंडी, औद्योगिकीकरण, वाहतूक व्यवस्था, अनधिकृत बांधकामांमुळे शहराची होणारी वाताहत व पाणी योजना आदी विषयांवर या सभेतून ते जनतेशी संवाद साधतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

बाबासाहेबांच्या शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! या संदेशानुसार शैक्षणिक प्रगती करा – डॉ. जयपाल पाटील

अशोक गायकवाड अलिबाग : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! असा दिलेला संदेश आपल्या समाजातील मुला मुलींनी शैक्षणिक प्रगती करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उंच करावे असे मार्गदर्शन पंचशील बौद्ध मंडळ खंडाळे अलिबाग यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात समाज भूषण, आपत्तीव्यवस्थापन तज्ञ, रायगड भूषण प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष. मंगेश मोरे. उपाध्यक्ष. वैष्णवी कदम. प्रा. डॉ.जयपाल पाटील. उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन. त्रिशरण,पंचशील, घेण्यात आले. यानंतर पुरस्कार प्राप्त जयपाल पाटील यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.जयपाल पाटील यांच्या समाजसेवेबाबत उपस्थित त्यांना माहिती व आपल्या समाज बांधवांना कायम आरोग्याबाबत मदत करणारे असून त्यांना अलिबाग तालुक्यात प्रथमच हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना आपल्या मंडळामार्फत बोलावले आहे. यावेळी प्रा.जयपाल पाटील यांनी रायगड जिल्ह्यात शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मोफत चालविले जाणारे अलिबाग, पनवेल, पाली व महाड येथील मुलींचे वसतिगृह व मुलांसाठी अलिबाग, तळा, महाड येथील व जावळी माणगाव येथील १०वी पर्यंतचे माध्यमिक विद्यामंदिर याचा आपल्या समाजातील गोरगरीब, गरजवंतांनी शिक्षणासाठी लाभ घ्यावा असे सांगितले. यावेळी कधी केव्हाही अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. आपली मुलगी बाळंतपणासाठी बाहेर आल्यावर तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी १०२ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा. पावसाळा आता जवळ आल्याने काही वेळा विजा कोसळतात त्यासाठी केंद्र सरकारने “दामिनी” ॲप काढला असून विजय बाबत सुरक्षेची माहिती मोबाईलवर कशी मिळते. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा. या माहिती सोबतच महिलांनी आपल्या घरातील गॅसची काळजी कशी घ्यावी सांगितले.त्याचबरोबर विहाराच्या ग्रंथालयास संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तक आपत्ती सुरक्षेची पुस्तके भेट दिली. यापुढे असा कार्यक्रम तालुक्यात जिल्ह्यात आपल्या समाजातील महिला पुरुषांसाठी बुद्ध विहारात करणार असल्याचे सांगितले. यावेळी अँड. अनुष्का गायकवाड, प्रीती रघुनाथ मोरे, प्रतिभा मोरे, पांडुरंग मोरे व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार प्रदर्शन मंडळाच्या सचिव सिमरन ओहाळ यांनी मानले.

महिला, दिव्यांग आणि युवा संचलित मतदान केंद्र

विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणार मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी संचलित प्रत्येकी एक मतदान केंद्र असणार आहे. मतदान केंद्र उभारणीची सर्व तयारी आणि नियोजन पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 26 मतदारसंघ आहेत. 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, तर चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन मतदारसंघांचा समावेश मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोकसभा मतदारसंघात आहे. या चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 7,384 एवढ्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर मतदारांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एका मतदान केंद्रांचे संचलन महिला, तरुण आणि दिव्यांग अधिकारी व कर्मचारी करणार असून त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात महिला अधिकारी व कर्मचारी संचलित एकूण 26, तरुण अधिकारी व कर्मचारी संचलित 26, तर दिव्यांग अधिकारी व कर्मचारी (सक्षम केंद्र) संचलित एकूण 26 मतदान केंद्र असतील, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या  मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे  आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांच्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा रविवार, २३ जून, २०२४ रोजी होणार आहे. परीक्षेचा कालावधी स. ११ ते दु. १ असा राहील. प्रवेश परीक्षा शुल्क १०० रुपये आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १९ जून २०२४ पर्यंत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.cdinstitute.net) उपलब्ध असलेल्या लिंकवरील विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.  टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.        सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२५८८१४२१ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना मासिक तीन हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते.तसेच, सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन सत्रेही या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित करण्यात येतात.

धीम्या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल

ठाणे : मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे आज (सोमवार) सकाळ पासूनच या मार्गावरील ट्रेन अनिश्चित वेळापत्रकानुसार धावत आहेत. तर कल्याणहुन मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल ट्रेन अचानक रद्द करण्यात आल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाल झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे ही अडचण उदभवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, ऐन पीकअव्हर मध्ये लोकल खोळंबल्‍याने सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे आदी स्थानकांसह इतर रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यातच आज तापमानात वाढ असल्याने मोठा उकाडा जाणवत असून महिला व लहान मुलांचे मोठे हाल झाले. धीम्‍या गतीच्या लोकलचे वेळापत्रक कोलमडल्‍याने प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कंपनीतील कामगारांना मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सवलत

पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता.१३) मतदानासाठी कामगारांना सुट्टी देण्याचे निवडणूक आयोगाचे शासन परिपत्रक असतानासुद्धा तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदारांनी कामगारांना मतदानाची सुट्टी सरसकट न दिल्याने कामगारांनी थेट मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क साधल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईच्या दट्यानंतर कामगारांना दुपारच्या सत्रातील मतदानासाठी दोन तासांची सवलत देण्यात आली. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील डब्ल्यू २४ या भूखंडावरील मार्वल ड्रग्स या कंपनीने सोमवारी निवडणुकीसाठी कामगारांना सुट्टी न दिल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांना समजल्यावर त्यांनी तातडीने निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या कंपनीकडे रवाना केले. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी तातडीने पोलिसांचे पथकसुद्धा कंपनीकडे प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पाठविल्यावर कंपनीने निवडणुकीसाठी सुट्टी दिली नसल्याचे सिद्ध झाले अखेर निवडणूक आयोगाने कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने दोन तासांची सवलत जाहीर करुन कामगारांना निवडणुकीत मतदान करा आणि मतदान केलेले छायाचित्र कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवावा अशा सूचना केल्या. कंपनी मतदान केलेल्या कामगारांसाठी एक सोडत घेऊन बक्षीस देणार असल्याचे मार्वल कंपनीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे तळोजातील अनेक लहान कारखान्यांनी निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी काही तासांची सवलत देणे अपेक्षित होते. परंतु रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकाचा दाखल देत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी तळोजातील काही कारखानदारांनी कारखाने बंद ठेवल्याची सबब देण्यात आली. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कारखानदारांनी काही तासांची सवलत देणे गरजेचे होते असे कामगारांच्यावतीने मागणी करण्यात येत होती.

वादळी वाऱ्यासह कल्याण डोंबिवलीत अवकाळी पाऊस

डोंबिवली : कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. डोंबिवली येथे आज उद्धव ठाकरे यांची सभा असून त्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने शिवसैनिकांना सभा कशी पार पडणार याची चिंता लागली आहे. दुपारी 3 वाजल्या शहरात सोसाट्याचा वारा सुटल्याने शहरात धुळीचे वादळ उठले होते. त्यात अचानक पावसाच्या सरी आल्याने नागरिकांची धांदल उडाली. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिक काहीसे सुखावले आहेत. उन्हाच्या तीव्र झळा, अंगाची होणारी काहिली यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिक हैराण झालेले होते. सोमवारी दुपारी 2 नंतर शहरात सोसाट्याचा वारा सुटला. यामुळे रस्त्यावरील धूळ हवेत उडून सगळीकडे धुळच धूळ दिसत होती. सव्वा 3 च्या सुमारास पावसाच्या सरी सुरू झाल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे नागरिक काहीसे सुखावले. पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून काही भागाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. लग्नसराईचा हंगाम सुरू असून दुपारी ही हल्ली बाजारात गर्दी दिसून येते. अचानक आलेल्या पावसाने दुकानदार, विक्रेते यासोबतच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धांदल उडाली. नागरिकांजवळ छत्र्या नसल्याने पावसापासून बचाव म्हणून लगेच आजूबाजूच्या दुकानाचा आसरा नागरिकांनी घेतला. राज्यामध्ये या आठवड्यामध्ये दुपारी तापमानात वाढ होणार असून, सायंकाळी मात्र पावसाची हजेरी लागणार आहे.असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. कल्याण,डोंबिवली सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने रस्त्यावरील वाहन देखील वाहनचालकांना दिसून येत नव्हती. तर मुसळधार पावसाने प्रचंड अंधार दाटून आला आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महावितरण कडून ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बाल तस्करी करणाऱ्या गँगचा उल्हासनगर पोलिसांकडून पर्दाफाश

उल्हासनगर : शहरातील झुलेलाल मंदिरासमोरील भिकाऱ्याच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका केली आहे.  पोलिसांनी एका अपहरणकर्त्याला हैदराबादमधून तर दुसऱ्याला बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीना सुनील सोनवणे (35) या उल्हासनगरच्या म्हारळगाव येथे सासू, पती आणि पाच मुलांसह राहतात.  तिचा सर्वात लहान 5 महिने वयाचा मुलगा कार्तिक आजाराने त्रस्त होता, गरिबीमुळे मीना त्याच्यावर उपचार करू शकली नाही, म्हणून तिने हॉस्पिटलचा अहवाल आणि मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या स्वाती बेहराने सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आणि मीनाला भेटण्यासाठी मुंबईहून उल्हासनगरला आली.  मदतीच्या नावाखाली तिने हैद्राबाद येथे राहणाऱ्या तिच्या मैत्रिणी कृष्णाताई सुरक्षावेणी हिच्याशीही बोलून सांगितले की, हैद्राबादमध्ये एक चांगला बालरोगतज्ञ असून तेथे स्वस्तात उपचार केले जातील.  मीनाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि आजारी मुलासह पतीसोबत हैदराबादला गेली.  तिथे त्यांची कृष्णाताईंची भेट झाली.  ते म्हणाले की येथे एक डॉक्टर आहे जो कमी खर्चात मुलाला बरा करेल.  त्यांनी मीना आणि सुनीलला हॉटेलमध्ये राहायला लावले आणि दुसऱ्या दिवशी मुलाला डॉक्टरकडे नेले, रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की मुलाला बरे करण्यासाठी एक महिना लागेल.  आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मीना यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली .  मदतीच्या नावाखाली त्यांनी उपचार घेण्याचे मान्य केले.  मात्र मुलाला एक महिना हैदराबादमध्ये राहावे लागेल, असे त्यांनी मीनाला सांगितले.  आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी मीना दोन दिवसांनी मुंबईला रवाना झाली.  दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगद्वारे ती आपल्या मुलाच्या संपर्कात राहिली. महिनाभरानंतर मीनाने त्यांना मूल परत करण्यास सांगितले असता त्यांनी सांगितले की, मी दोन लाख रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च केले आहेत, ते पैसे आधी मला द्या, मग मी मुलाला तुमच्या ताब्यात देईन.  मीना यांनी अनेकदा विनंती करूनही ते मूल परत करण्यास तयार नव्हते.  त्यांनी फोनही बंद केले आहेत.  शेवटी मीना यांना पोलिसांचा आधार घ्यावा लागला आणि स्वाती आणि कृष्णाताई यांच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपींना  पकडण्यासाठी पोलीस पथक हैदराबादला रवाना झाले. कृष्णाताईंना मदत करणाऱ्या सोनीदेवी पासवान (वय 32) हिला तेथून अटक करण्यात आली. अन्य तेथून मुलाला घेऊन पळून गेले होते.  पोलिसांनी आरोपी महिलेची पोलीस कोठडीत रवानगी केली व त्यानंतर उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोनी देवी अद्याप पोलिस कोठडीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की माला देवी (24) बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील बकरपूर गावात तिच्या मुलासोबत आहे.  भागलपूर हा नक्षलग्रस्त भाग असल्याने उल्हासनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाच जणांचे पथक बिहारला रवाना झाले आणि मोठ्या सतर्कतेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात पोहोचून स्वातीला अटक करून पाच महिन्यांच्या चिमुरडीला ताब्यात घेतले. तिच्यापासूनही सुखरूप सुटका केली.  उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयाने स्वातीला 17 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले की, स्वाती सहदेव बेहरा, कृष्णाताई सुरक्षादेवी, संतोषी रेड्डी आणि सुनीता यांचा या गुन्ह्यात सहभाग असून ते अद्याप फरार आहेत. बिहारमध्ये कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलिस निरीक्षक निकिता भोईगड यांनी सांगितले की, आरोपी महिला मुलाला घेऊन नक्षलवाद्यांचा परिसर असलेल्या बकरपूर गावात गेली होती.  गावाचे नाव ऐकल्यावर एकही वाहनचालक तिकडे जायला तयार नव्हता.  दुप्पट भाडे मोजावे लागले.  बकरपूर गावात जाण्यासाठी आरोपी महिलेला पीरपथी गावातून जावे लागते, दोन्ही भागातील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.  पोलीस महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेले असता गावातील शेकडो लोकांनी पोलिसांना घेराव घातला.  मोठ्या कष्टानंतर पोलिसांना यश आले. निकिता भोईगडने पुढे सांगितले की, आरोपी आणि मुलाला तेथून पळवून नेणे सोपे नव्हते, माझ्या कारच्या पुढे एक पोलिस जीप होती आणि त्यानंतर आम्ही तेथून निघू शकलो.  किंवा असे म्हणता येईल की, पोलिसांनाही पोलिस बंदोबस्त घेऊन निघावे लागले.