Author: bittambatami.com

अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी विकासकावर गुन्हा दाखल

विकासक सलमान डोलारे अद्याप फरारच कल्याण : कल्याणमधील कुख्यात बिल्डर सलमान डोलारे यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे. ९ मजली इमारत आणि एका भला मोठा बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले आहे. इमारतीमधील सर्व सदनिका आणि वाणिज्य गाळे विकून टाकल्या आहेत. यूसूफ हाईटसनंतर कल्याणमधील जे.एम. टॉवर आणि जमजम व्हीला बंगला अनधिकृत घोषित झाल्याने रहिवासी हवालदील झाले आहे. आत्ता या इमारतीवर लवकर कारवाईचा हातोडा चालविणार जाणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे विकासक डोलारे याच्या विरोधात गुन्हे दाखल होऊनही त्याला पोलिस शोधू शकलेले नाहीत. महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर बिल्डर डोलारे याने यूसूफ हाईटस ही इमारत उभी केली. या प्रकरणी बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याच बिल्डरने अन्सारी चौकात जे. एम. टॉवर या तळ अधिक ९ मजली इमारतीत वाढीव बांधकाम केले आहे. वाढीव बांधकामाची महापालिकेच्या नगररचना विभागाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. याच टॉवर शेजारी १२ मीटर रुंद विकास योजनेच्या रस्त्यात बाधित असलेल्या जागेत जमजम व्हीला हा तळ अधित तीन मजली बंगल्याचे बांधकाम केले. या बंगल्याच्या वाढीव बांधकामाची बिल्डरने परवानगी घेतली नाही. या प्रकरणी बिल्डरला महापालिकेने नोटिस बजावून सुनावणीकरीता बोलावले होते. वाढीव बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. जे. एम. पावर मधील वाढीव बांधकामाची परवानगी तसेच जमजम बंगल्याच्या अधिकृततेविषयी कोणती कागदपत्रे बिल्डरने सादर केली नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम महापालिकेने अनधिकृत असल्याचे घोषित केले. हे अनधिकृत बांधकाम बिल्डरने स्वत:हून पाडावे अशी नोटिस ही महापालिकेने बिल्डरला बजावली. या नोटिसलाही बिल्डरने प्रतिसाद दिलेला नाही. अखेरीस महापालिकेच्या क प्रभागाचे अधीक्षक उमेश यमगर यांनी बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी  ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले की, संबंधितल बिल्डरच्या विरोधात एमआरटीपी अ’क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची मदत घेऊन इमारत पाडकामाची पुढील कारवाई केली जाईल.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री . मुश्रीफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष  द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी,  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या  इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री . राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

मुंबई : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले. मंत्रालयात मंत्री . सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी  मंत्री .सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खो-खोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड!

पुरूषांचा केरळवर तर महिलांचा पश्चिम बंगालवर विजय हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो-खो संघांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली. पुरूषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर ११ गुणांनी (४७-३६) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे १० गुणांची (२४-१४) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (१.३० मि., २ मि. संरक्षण आणि २ गुण), राहूल मंडल (१.३० मि. संरक्षण व १० गुण), रामजी कश्यप (१.१० मि., १.४० मि. संरक्षण व ८ गुण), शुभम थोरात (१.४० मि., १.२५ मि. आणि २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत झालेल्या केरळकडून निखिल बी (१.१० मि. संरक्षण व १० गुण), देवनारायण (१ मि. संरक्षण व  गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. महिलांची दमदार कामगिरी महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व ४ गुणांनी (२४-२०) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (२.१५ मि., नाबाद १.५० मि. आणि ६ गुण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण आणि ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. याचबरोबर पायल पवार (१.४० मिनिटे संरक्षण), संध्या सुरवसे (२.५५ मि. व १.२५ मि. संरक्षण आणि २ गुण) यांनीही दमदार कामगिरी केली. पश्चिम बंगालकडून इशिता विश्वास (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), दिपिका चौधरी (१.१० मि. संरक्षण आणि ४ गुण) यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला.

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

नेमबाजीत आर्या बोरसेला पदकाची संधी, वॉटर पोलो-रग्बीत दणदणीत विजय डेहराडून  ः  उत्तराखंड येथे होणार्‍या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत  महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत गाठून पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. दुसरीकडे वॉटर पोलोमध्ये पुरूषांनी, तर रग्बीमध्ये महिला संघाने जोरदार विजयी सलामी देत स्पर्धेत बुधवारचा दिवस गाजविला. डेहराडूनमधीलइ त्रिशूल शुटींग रेजवरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरसे हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठून पदकाच्या आशा कायम ठेवल्या. आज झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 634.5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हरियाणाची रमिता हिने 634.9 गुणांसह अव्वल स्थानी राहिली. आर्या ही नाशिकची खेळाडू असून, सध्या ती नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे. तिने आजपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. उद्या देखील ती सर्वोत्तम कामगिरी करील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पथकाचे प्रशिक्षक ओंकार गोसावी यांनी व्यक्त केला. रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वाटर पोलो मध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.

महाराष्ट्राचा पदकांचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी

38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25 आदिती, ओमला कांस्य, रिले शर्यतीतही रूपेरी कामगिरी हल्दवानी  ः  उत्तराखंडात सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आज पदकाची चौकर झळकविला.  2 रौप्य व 2 कास्य पदके जिंकून महाराष्ट्राने…

सरस्वती स्पोर्ट्स क्लब, मध्य रेल्वे आणि महिलांमध्ये रचना नोटरी वर्क्स अंतिम विजेते 

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे पार पडली.   व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा  (८-८-९-६) १७-१४ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे दिलीप खांडवीने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अवधूत पाटीलने १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने प्रत्येकी १:००, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले. पश्चिम रेल्वेतर्फे सम्यक जाधवने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. वृषभ वाघने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. दिपक माधवने २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले. व्यावसायिक महिला गट: व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महावितरण कंपनी संघाचा (६-५-४-६) ११-१० असा  १ गुण व १:१० मिनिटे राखुन पराभव केला. रचनातर्फे पुजा फरगडेने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. श्वेता जाधवने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. सेजल यादवने ३:२०, १:४० मिनिटे संरक्षण केले. महावितरण तर्फे दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. ४ फुट ११ इंच किशोर गट: ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा  (३-१-१-२) ४-३ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. सरस्वतीतर्फे मेहक आदवडेने नाबाद ६:००, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. वरुण गुप्ताने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. शिवम झाने १:००, १:०० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थीतर्फे अपसर शेखने ३:२० मिनिटे संरक्षण केले. पवन गुरवने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओमकार जाधवने २:३० मिनिटे संरक्षण केले. तृतीय क्रमांकाचे सामने: व्यावसायिक महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र पोस्टाने मुंबई पोलीस संघाचा (५-३-४-५) ९-८ असा १ गुणांनी पराभव केला तर व्यावसायिक पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोस्टने संघाचा (९-७-३-४) १२-११ असा  १ गुण व ३:१० मिनिटे राखून पराभव केला. ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-२) १०-४ असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ४ फुट ११ इंच किशोर गट आक्रमक – पवन गुरव (विदयार्थी) संरक्षक – अधिराज गुरव  (ओम साईश्वर)…

 माँ शिक्षण संस्था आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

ठाणे :  माँ शिक्षण संस्था समूह आयोजित 22 व्या ठाणे शहर आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन  ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट  यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये 37 शाळांनी सहभाग घेतला. ठाणे शहर चॅम्पियनशिप 2024-25 विजेते पुढीलप्रमाणे – मुली – होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल, ठाणे; मुले – ठाणे पोलीस स्कुल, ठाणे ; समूह – ठाणे पोलीस स्कुल वैयक्तिक पारितोषिके – 6 वर्षाखालील मुले – स्पर्श कांबळे (वसंत विहार शाळा); 6 वर्षाखालील मुली – निर्वी कुलकर्णी (वसंत विहार शाळा); 8 वर्षांखालील मुले- जिहांश पाटील (अंबर इंटरनॅशनल स्कूल); 8 वर्षाखालील मुली- निष्का मनुधने (मती सुनीतीदेवी सिंघानिया शाळा); 10 वर्षाखालील मुले- जयदीप खैरनार (ठाणे पोलीस स्कुल); 10 वर्षाखालील मुली- पिरल बिरवटकर (वसंत विहार शाळा); 12 वर्षाखालील मुले- अभिराज वाळंज ( मावळी मंडळ शाळा); 12 वर्षांखालील मुली- इरा जाधव (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा); 14 वर्षाखालील मुले- अनिरुद्ध नंभोदारी (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा); 14 वर्षाखालील मुली- रिसा फर्नांडिस (मती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल); 16 वर्षाखालील मुले- धैर्य सूर्यराव (मती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा); 16 वर्षाखालील मुली- रिद्धी माने (होली क्रॉस कन्व्हर्ट हायस्कूल)

मुंबई पोर्टमधुन सेवाभावी कार्यकर्ते गणेश पोळ सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणामधील २७  वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा  सेवानिवृत्ती बद्दल २८  जानेवारी २०२५  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. गणेश पोळ हे मुंबई पोर्टमध्ये ५  जानेवारी १९९८  रोनजी टॅली क्लार्क  म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना नोकरीमध्ये  टीसीसीसी, ज्युनियर असिस्टंट,  सीनियर असिस्टंट असा बढतीचा प्रवास मिळाला. गणेश पोळ यांचा २७  वर्षाच्या कालावधीमध्ये  मुंबई पोर्टच्या जमीन धोरणात सहकार्य करण्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता.  म्हणूनच तत्कालीन चेअरमन श्रीमती राणी जाधव यांनी मुंबई पोर्ट लँड पॉलिसीचा जो केंद्र सरकारला अहवाल पाठविला,  त्यामध्ये त्यांचा नामोउल्लेख होता. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये नोकरी लागण्यापूर्वी त्यांनी गुड नाईट या कंपनीच्या  उत्पादकतेमध्ये संशोधनाचे मोठे काम केले आहे. त्यांच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा मुंबई पोर्ट  प्रशासनाला चांगलाच फायदा झाला.  त्यांनी मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व निस्वार्थीपणे सेवा केली.  त्यांच्या सेवेचा अनेक कामगारांना व  अधिकार्‍यांना चांगलाच फायदा झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासात गोल्ड मेडल मिळविले आहे. मुंबई पोर्ट  मधुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन गणेश पोळ यांनी सिव्हीलमध्ये वकिलाची प्रॅक्टिस करण्याचा  निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा व हुशारीचा  न्यायालयामार्फत  सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळो, अशा सर्वच वक्त्यांनी  त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पोळ यांच्या सेवाभावी कार्यावर आधारित ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे  व फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्टचे मुख्य यांत्रिक अभियंता नितीन बोरवणकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर्स प्रदीप नलावडे,  ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे  पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील. संदीप चेरफळे तसेच कर्मचाऱ्यांमधील सहकारी मित्र मंगेश गवारे, संदीप गावडे. ॲड. गिरीश तळेकर. अधिकारी बोस, पत्नी रेखा पोळ मुलगी अनुषा पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. गणेश पोळ यांनी सत्काराला उत्तर दिले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी शीला भगत,  विष्णू पोळ, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस,  संतोष कदम तसेच मुंबई पोर्टचे अधिकारी, गणेश पोळचे सहकारी मित्र,  कुटुंबिय, गोदीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मंगेश सावंत यांनी  सुंदर केले तर आभार युनियनचे संघटक चिटणीस आप्पा भोसले यांनी मानले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा सत्कार

अनिल ठाणेकर ठाणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण ५३ गटामध्ये स्पर्धा राबविण्यात आली होती‌. जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेत वडपे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला असून ६ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला असून ४ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. भिवंडी तालुक्यातील मोरणी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला असून ३ लाख रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन या कामात विशेष स्व.वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत म्हाळुंगे ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन गौरविण्यात आले. शौचालय व्यवस्थापन या कामासाठी स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे ५० हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह‌ देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील आर.आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन १० ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.‌ आर.आर. (आबा) पाटील जिल्हा व तालुका सुंदर गाव सन २०२१-२२ वर्षातील कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीस जिल्हा सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील कुसापूर ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील भावसे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, मुरबाड तालुक्यातील पेंढरी ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील साई ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव सन २०२२-२३ वर्षातील मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, भिवंडी तालुक्यातील डोहाळे ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, शहापूर तालुक्यातील वाशिंद ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, कल्याण तालुक्यातील पळसोली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार, अंबरनाथ तालुक्यातील ढोके दापीवली ग्रामपंचायतीस तालुका सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.