Author: bittambatami.com

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती दिवा- संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रेरणा टॉवर, दिवा महोत्सव मैदानाजवळ, दिवा शिळ रोड (पूर्व) येथे रविवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर गोरबंजारा समाजाने संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण दिव्यात फिरवण्यात आली. तसेच भोग विधी कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचा संकल्प केला. संत सेवालाल गोरबंजारा समिती (दिवा) कमिटी अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार, खजिनदार मिथुन आडे, तर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, शिवसेना दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, स्नेहा अमर पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, समाजसेवक कैलास भगत, बालाजी कदम उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख अतिथी चंदर राठोड, वासु सेठ राठोड, बाबू राठोड, देविदास राठोड हे सर्व मान्यवरांनी उपस्थीती दाखवून जयंती कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजय पवार, प्रविण राठोड, लक्ष्मण चव्हाण, रामदास चव्हाण, रमेश राठोड, रामेश्वर पवार, चंदू चव्हाण, गुंडू राठोड, शंकर राठोड, श्याम राठोड, गणेश पवार, संतोष पवार, रमेश राठोड, वशिया राठोड, रामू राठोड, रामदास चव्हाण तसेच संत सेवालाल महाराज गोरबंजारा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिवा (आरती परब) – दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ऊॅ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे शिव मंदिर दिवा आणि कोपर स्थानका दरम्यान खाडी किनारी असलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याणची सगळी आगरी, कोळी आणि कोकणी माणसे श्रद्धेने पूजा करायला येतात. या महाशिवरात्री महोत्सवात पहिल्या दिवशी सकाळच्या वेळी दातिवलीच्या प्रवचन गुरुभक्त प्रकाश महाराज दळवी यांचे प्रवचन झाले. दुपारच्या वेळी ह.भ.प. गुरुवर्य शरद महाराज म्हात्रे यांच्या विठ्ठल रखुमाई महिला भजन मंडळ, दातिवलीचे सुस्वर भजन होते. तसेच संध्याकाळी माऊली महिला हरिपाठ मंडळ (दातिवली) यांचे भजन तर गावदेवी भजन मंडळ, बेतवडे यांचे ही भजन झाले. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ, बेतवडे यांचे भजन झाल्यावर महादेवाची महा आरती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या नंतर महाप्रसाद सर्वांसाठी ठेवण्यात आला होता. हा महाशिवरात्री महोत्सव विना विघ्न पार पडण्यासाठी ऊॅ म्हातार्डेश्वर ट्रस्टी मंडळ व समस्त ग्रामस्थ (म्हातार्डी) अध्यक्ष सदाशिव शंकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत शंकर पाटील, सचिव जयदास कान्हा शेलार, खजिनदार गोवर्धन पाटील, सदस्य दिपक कान्हा शेलार, अशोक शेलार, वैद्यनाथ शेलार, मंगेश शेलार, शांताराम पाटील, भोलाराम शेलार, सुदेश पाटील यांनी मेहनत घेतली होती. तसेच स्वयंपाकी ग्रुप बेतवडे, द्वारकानाथ पाटील, जयदास पाटील, बाळाराम पाटील, नारायण पाटील, गणेश दळवी, नामदेव नाईक, गणेश पाटील आणि टीम यांनी ही जेवणाचे योग्य नियोजन करून नागरिकांसाठी प्रसाद आणि जेवण बनवले होते. त्यावेळी आमदार राजेश मोरे, दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, साक्षी मढवी, विभाग प्रमुख राजेश पाटील, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, उपविभाग प्रमुख शंकर पाटील हे मान्यवर उपस्थित होते.

शिवरायांचे महिला विषयक धोरण आणि आजची स्थिती

रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केल्याचे समजताच त्याचे हातपाय तोडून चौरंग केला. आज मात्र माता भगिनींची अब्रू लुटणारे हजारो नराधम न्यायालयाच्या छत्राखाली स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत ! म्हणून आजही शिवरायांच्या स्वराज्याची छाप…

संसदेतील लक्ष्मणरेषा !

कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्यामुळे संसदेमध्ये देशाच्या धोरणात्मक विषयांवर तसेच नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी; परंतु अलिकडच्या काही वर्षांमध्ये संसदेचा आखाडा व्हायला लागला आहे. अलिकडे तर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधानांना आभारदर्शक…

पूजन आराध्यदेवतेचे

पूजन आराध्यदेवतेचे आपल्याकडे शिव ही अनेकांची आराध्यदेवता आहे. आपल्याकडे त्रिमूर्ती म्हणतात त्यात ब्रम्हा सृष्टीकर्ता, विष्णू पालनकर्ता आणि शिव हा संहारक अशी माहिती येते पण पुराणाच्या आधीदेखील वेदवाड्मयामध्ये शिवाचा उल्लेख रुद्र…

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ

रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ अनिल ठाणेकर ठाणे,  ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे. ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे नुकताच संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष प्रदीप जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगार, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत यानिमित्ताने दिले.

  वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ?

माथेरान मध्ये एवढ्या महागड्या शौचालयांची आवश्यकता आहे का ? मुकुंद रांजणे माथेरान : प्रशासकीय राजवटीत माथेरान मध्ये जवळपास दहा शौचालये आणण्यात आली आहेत. स्त्री आणि पुरुषांच्या करिता वेगवेगळ्या स्वरूपात असणाऱ्या या शौचालयांची किंमत अडतीस लाख रुपये प्रति असून एवढ्या महागड्या शौचालयांची खरोखरच या दुर्गम भागातील पर्यटनस्थळावर आहे का? असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. यातील एक शौचालय नगरपरिषदेच्या आवारात याठिकाणी अगोदरच दोन शौचालय असताना देखील नाहक एवढी महागडी शौचालय खासकरून अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी बसविण्यात आले आहे. तर काही शौचालये अद्यापही नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. माथेरान मध्ये आजमितीला खर्चिक पर्यटकांचा भरणा होत नाही. पर्यटन कशाप्रकारे वाढेल इथे पर्यटन वाढीसाठी वाहतूक व्यवस्था त्याचप्रमाणे सुस्थितीत रस्ते असावेत, पाणी, वीज सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासकीय राजवटीत माथेरान पुढील काही वर्षे पिछाडीवर गेल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या तिजोरीत खळखळाट असून कामगारांना त्याचप्रमाणे लहानसहान कामे करणा-या  ठेकेदाराला वेळेवर पगार,बिले  मिळत नसल्याच्या तक्रारी येत असतात. एखादया निकृष्ट कामांबाबत केलेल्या कामांची बिले किती अदा केली आहेत याबाबत कुणी माहितीच्या अधिकारात माहिती मागविल्यास मोगम उत्तरे देऊन कामात चालढकल सुरू असते.मोठया कामातील ठेकेदाराला शुल्लक रक्कमेसाठी अभय दिले जात असून पाठिशी घातले जात आहे. आजवर इथल्या विकास कामांबाबत सकारात्मक कामे न होता सुध्दा लाखो,करोडो रुपयांची बिले अदा करण्यात आलेली आहेत यामागे कुणाचा  वरदहस्त आहे. प्रशासकीय राजवटीत मोठया प्रमाणावर अनाठायी खर्च आणि भ्रष्टाचार झाल्याचे नागरिक बोलत आहेत.एकंदरीत माथेरान नगरपरिषदेच्या अनागोंदी  कारभार बाबतीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच दोषी असणाऱ्या या  मंडळींना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती!

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती! हरिभाऊ लाखे नाशिक – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मूळ प्रस्तावित सरळ मार्गाने नेण्यात यावा, यासाठी चाललेल्या लढ्याला जनआंदोलनाचे व्यापक रूप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अग्रस्थानी राहण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुण व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना पत्राद्वारे कळवण्याचे आवाहन केले आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू असून आता तिचा विस्तार सिन्नर तालुक्यातही झाला आहे. सिन्नर रेल्वे कृती समितीने तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका पत्र मोहिमेतून शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक- सिन्नर– अकोले– संगमनेर– नारायणगाव– राजगुरुनगर– चाकण या मार्गाचे मूळ संरेखन होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल करून पुणे– अहिल्यानगर– पुणतांबा– साईनगर शिर्डी–नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केल्यापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये असंतोष आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. नाशिक-पुणे जलदगती रेल्वे ही आपल्या हक्काची आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आपला संघर्ष अधिकाधिक तीव्र करावा लागेल. ही लढाई एकाच वेळी अनेक माध्यमातून लढावी लागणार आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपण ही लढाई लढत आहोत. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजूट करून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या लढ्याला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा लढला जात आहे, त्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आ. तांबे यांनी मांडली. संबंधितांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू झाली आहे. आता ही पत्र मोहीम सिन्नर तालुक्यातही राबविली जाणार असल्याचे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी सांगितले. पत्रातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया, अशी ही मोहीम आहे. या माध्यमातून हा रेल्वे मार्ग बदलल्यास आमच्या भागातील मुलांचे शिक्षण, पालकांचा रोजगार व विकास थांबेल. त्यामुळे भविष्यासाठी मूळ सरळ रेल्वे मार्ग कायम ठेवा, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून पत्राद्वारे केली जात आहे. रेल्वे मार्ग परिसरातील नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वाजे यांनी सांगितले. मार्ग बदलल्यास मूळ मार्गावरील भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी कमी होतील, शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ मिळणे कठीण होईल, आदींकडे लक्ष वेधले जात आहे.