Author: bittambatami.com

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात पाडकामाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सागरनाथ रामा मढवी, घर नं – 30 ,मच्छी मार्केटच्या मागे, दिवा गाव ,सेक्टर – 9 , ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.1591/2023 च्या आदेशानुसार आज रोजी दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अंशत: निष्कासीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सदर ठिकाणी पोकलेन, जेसीबी सारखी मशनरी जावु शकत नसल्याने या मोहिमेसाठी 10 हॅमर, 7 ब्रेकर, व 16 मजूर यांचा वापर करण्यात आलेला असून मोहिमेकरीता जी विभाग ऐरोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. 0000  

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

 माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते मधुकर मुसळे, प्रदेश कार्यालय सहसचिव भरत राऊत उपस्थित होते. या समितीमध्ये  तीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष कार्यकर्ते सज्ज झाले असल्याचेही  दानवे यांनी नमूद  केले. यावेळी दानवे म्हणाले की, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे –  जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर,  कृषी क्षेत्र संपर्क – अशोक चव्हाण, लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मीडिया- अतुल भातखळकर, ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर, अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, सोशल मीडिया – निरंजन डावखरे, निवडणूक आयोग संपर्क- माजी किरीट सोमय्या.महायुती निवडणूक अभियान समन्वयक म्हणून  ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत. विशेष आमंत्रित म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ही  दानवे यांनी नमूद केले. पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, विक्रांत पाटील, माधवी नाईक, विजय चौधरी आणि संजय केनेकर काम पाहणार आहेत.

खारघरकरांसाठी नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

 प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने पाच हजार चौरस मीटरचा भूखंड द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल विधानसभा मतदारसंघाची आजमितीस लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाखांच्या आसपास असून आज झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल व उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठया प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मुलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ हे एकमेव नाट्यगृह आहे, त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहेत. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पध्दतीने विकसित होत असलेला विभाग असून, त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठया प्रमाणावर वाढत आहे. खारघर क्षेत्राची ओळख ही उत्तम शैक्षणिक केंद्र (Educational Hub) म्हणून असून सेंट्रल पार्क गोल्फ कोर्स, उत्सव चौक तसेच अन्य धार्मिक प्रार्थनास्थळांमुळे एक वेगळी ओळख या परिसराची निर्माण झाली आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर रहात असून त्यांची मागणी व सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाटयगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडापैकी ५००० चौ. मी.चा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. कोट- पनवेलला कला व सांस्कृतिक वारसा आहे. त्याच प्रमाणे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या खारघरमध्येही कलाप्रेमी आहेत. येथील नागरिकांची नाट्यगृह असावी अशी मागणी आहे. त्यानुसार सिडकोकडून भूखंडाची मागणी केली आहे. नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्या अनुषंगाने सिडको आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. – आमदार प्रशांत ठाकूर

एसटी महामंडळाची बसगाडी मेट्रो खांबाला धडकली

आठ प्रवासी जखमी ठाणे : घोडबंदर येथील ओवळा भागात मंगळवारी पहाटे राज्य परिवहन सेवेची (एसटी) बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या अपघातात चालक आणि वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाची बसगाडी घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलाजवळील कठड्याला धडकली होती. त्यानंतर हा दुसरा अपघात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेजोगाई येथून बोरीवलीच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतुक करत होती. त्यामध्ये वाहक आणि चालकासह एकूण १३ प्रवासी प्रवास करत होते. ही बसगाडी पहाटे ५.३० घोडबंदर येथील ओवळा नाका परिसरात आली असता, बसगाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडी मेट्रो मार्गिकेच्या खांबाला धडकली. या धडकेमध्ये बसगाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. तर बसगाडीमधील १३ पैकी आठ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना उपचारासाठी ब्रम्हांड आणि मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे के. अडसूळ (चालक, वय- ३५), चाटे (वाहक), उद्धव चौरे (६५), उर्मिला चौरे (५५), सलीम शेख (५८), आत्मराम शेजुळ (४९), राजश्री शेजुळ (४२) आणि आकांक्षा शेजुळ (३५) अशी जखमींची नावे आहेत. 0000

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ध्वनी अवरोधक

मुंबई : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी या मार्गावर ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. या मार्गावरील ५०८ किमी अंतरापैकी आतापर्यंत ८७.५ किमी परिसरात १ लाख ७५ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन खाडी भाग, डोंगराळ प्रदेश, नागरी वस्तीमधून जाणार आहे. विशेषतः बुलेट ट्रेन नागरी भागातून जात असताना प्रचंड ध्वनिप्रदूषण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन आणि रुळाच्या घर्षणामुळे होणाऱ्या कर्कश आवाजाने मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन मार्गाच्या दोन्ही बाजूला ध्वनी अवरोधक बसविण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमध्ये सर्वाधिक वेगात काम झाले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १ लाख ७५ हजारांहून अधिक ध्वनी अवरोधक बसवण्यात आले आहेत. एक किमी अंतरावर व्हायाडक्टच्या दोन्ही बाजूला २ हजार ध्वनी अवरोधक बसविण्यात आले आहेत. ध्वनी अवरोधक सुरत, आनंद आणि अहमदाबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आले आहेत. रेल्वे पातळीपासून २ मीटर उंच आणि १ मीटर रुंद काँक्रीटच्या पॅनेल स्वरुपात ते आहेत. प्रत्येक ध्वनी अवरोधक अंदाजे ८३०-८४० किलो वजनाचा आहे. ध्वनी अवरोधकामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.

मीरा-भाईंदरच्या पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत !

 प्रताप सरनाईक यांची आयुक्त संजय काटकर यांच्याकडे मागणी अनिल ठाणेकर/ अरविंद जोशी मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना शासकिय घरे देण्यात यावीत अशी मागणी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्याकडे केली आहे. गेल्या १५ वर्षापासून मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ओवळा- माजिवडा विधानसभा मतदारसंघातील आमदार असून माझ्या मतदारसंघातील अंदाजे ५० टक्के भाग हा मीरा-भाईंदर क्षेत्रात तर ५० टक्के भाग हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना महानगरपालिकेची घरे देण्यात आली असून १०० हून अधिक पत्रकारांनी घराचा ताबाही घेतलेला आहे. तश्याच पध्दतीची योजना मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही लागू करावी, अशी विनंती अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्याकडे, माझ्याकडे तसेच आयुक्त या नात्याने आपल्याकडेही केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काही इमारतींमध्ये शासकिय कोट्यानुसार महानगरपालिकेला घरे मिळणार असून त्यापैकी ५० टक्के घरे पत्रकारांना व ५० टक्के घरे ही विस्थापितांना देण्यासाठी मी आपणाकडे विनंती केलेली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पत्रकारांना घरे देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यानुसार आपण सदरची घरे ही पत्रकारांना देण्यासंदर्भात शासनाकडून अभिप्राय मागवून ही घरे ठाणे शहराच्या धर्तीवर पत्रकारांना वितरीत करावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांना केली आहे.

स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छतेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे –  एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या मोहिमेचा शुभारंभ १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आुयक्त इनुजा शेख आदी उपस्थित होते. क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर विविधि विभागांची बैठक आयोजित करावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांना सूचना द्या. वेगवेगळे नाविण्यपूर्ण उपक्रम करावेत, त्याचबरोबर त्याचे छायाचित्र पोर्टलवर अपलोड करावेत. समुद्र किनारी स्वच्छता बाबतही सर्वांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार म्हणाले, सफाई मित्रांना लाभ द्यायचा आहे, त्याचबरोबर टाकाऊ पासून टिकाऊ यासाठी तसेच विविध स्पर्धांसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सहकारी गृह संस्था, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक या सर्वांना सहभागी करुन उपक्रम करावेत. सफाई कामगारांच्या कल्याणांसाठीच्या योजनाही राबवाव्यात. जिल्हाधिकारी सिंह यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, प्रधानमंत्री जनमन, विश्वकर्मा अशा योजनांचा यावेळी सविस्तर आढावा घेतला. वयोश्री योजनेमध्ये १० हजार अर्जांना मंजुरी देवून जिल्हाधिकारी म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेत आधार सिडींगची प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करावी. वयोश्री योजनेतील मंजूर अर्ज अपलोड करावेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तीर्थ दर्शन योजनेबाबत यादी तयार करुन पाठवावी. युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र यांनी अधिकाधिक उद्दिष्ट गाठून पूर्ण करावेत. पीएम जनमन योजनेत जनधन योजनेसाठी अग्रीण जिल्हा व्यवस्थापक यांना पत्र द्यावेत. किसान सन्मान योजना, मातृवंदना, शिधा पत्रिका वाटप अशा विविध योजनांचे लाभ वाढवावेत. तसेच विश्वकर्मा योजनेसाठी सरंपच स्तरावर प्रलंबित असणारी प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी मंजुरीसाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर फिशिंग नेट मेकर, क्वॉयर विव्हर, ब्रुम मेकर, बास्केट मेकर या क्षेत्रातील लाभार्थी यादी पाठवावी.

भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे

विशेष श्याम ठाणेदार थोर गांधीवादी नेते भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे यांची आज १२९ वि जयंती. कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गोगादे या छोट्या गावात ११ सप्टेंबर १८९५ रोजी…

2 हजार दिव्यांग मानधनापासून वंचित – स्वप्नील पाटील

उल्हासनगर : 10-पहिल्यांदाच उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत 2200 कर्मचारी आणि 1800 सेवनिवृत्तांचा पगार हा 31 ऑगस्ट रोजीच करण्यात आला आहे.त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.  असे असताना शहरातील 2199 दिव्यांगांना त्यांच्या मासिक मानधनापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी केला आहे. 2 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार स्विकारणारे विकास ढाकणे यांनी गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांना गावी जावे लागते, त्यांनी घेतलेल्या विविध वस्तूंचे आणि लोणचे हप्ते भरावे लागतात. या दूरदृष्टीचा विचार करून 1 सप्टेंबर रोजीच कर्मचारी आणि सेवानिवृत्त यांचा पगार करण्याचे निर्देश मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखापरिक्षक शरद देशमुख यांना दिले होते. मात्र 1 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने किरण भिलारे,शरद देशमुख यांनी 31 ऑगस्ट रोजीच कर्मचाऱ्यांच्या व सेवनिवृत्तांच्या खात्यात पगार जमा केला.आयुक्त विकास ढाकणे यांच्यामुळे पहिल्यांदाच दुसऱ्या महिन्याची तारीख येण्यापूर्वीच पगार झाल्याने सर्वच कमालीचे सुखावून गेले. दिव्यांगांना 2018 पासून एक हजार रुपये मानधन देण्यास सुरुवात झाली.2022 मध्ये दिड हजार रुपये मानधन करण्यात आले.अशातच तत्कालीन आयुक्त डॉ.अझिझ शेख यांनी दिव्यांगांच्या दिड हजार रुपये मानधनात सातशे रुपयांची वाढ करून मानधन 2200 रुपये केले.मात्र कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना गणेशोत्सवात मानधन देण्याबाबत लेटलतीफपणा का करण्यात येत आहे?असा सवाल अ‍ॅड.स्वप्निल पाटील यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याशी विचारणा केली असता,दिव्यांग कल्याणकारी विभागाकडून बिल आले नसल्याचे सांगितले.दिव्यांग विभागप्रमुख राजेश घनघाव यांच्याशी संपर्क साधला असता,दर महिन्याला वेळेत दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा होते.पण दिव्यांग विभागातील लिपिकाची निवडणुकीच्या कामासाठी तहसील कार्यालयात बदली झाल्याने मानधनाचे बिल काढता आले नाही. लिपिकाला पालिकेत पाठवण्याची विनंती करण्यात आली असून ते येताच मानधनाचे बिल तात्काळ काढून मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राजेश घनघाव यांनी दिली.  

श्रीगणपतीची साडेतीन शक्तीपीठे श्रीक्षेत्र राजुरेश्वर गणपती दुसरे पूर्ण शक्तिपीठ

विशेष राजेंद्र साळसकर हे देवस्थान गणेशाच्या महाराष्ट्रातील एक संपूर्ण शक्तिपीठ (गणपतीचे शक्तिपीठ) आहे. जालना अधिकार भोकरदन हे तीर्थ क्षेत्र आहे. जालन्यापासून २५ किलोमीटर अंतरावर राजुर (राजूर गणपती) गाव आहे.राजुरेश्वर हे…