Author: bittambatami.com

 चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव!

 कोळीवाडावासियांच्या आत्मियतेच्या बंदराला भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्या मागणीला यश   ठाणे : अनेक दशकांपासून चेंदणी कोळीवाड्यातील कोळी समाजबांधवांबरोबरच अन्य समाजातील नागरिकांच्याही आत्मियतेचे बंदर असलेल्या चेंदणी कोळीवाडा मिठबंदर रोड बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नवे नाव देण्यात आले आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आयोजित कार्यक्रमात नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ठाणे शहराच्या स्थापनेपासून चेंदणी कोळीवाड्याला इतिहास आहे. कोळी समाजबांधवांचे वास्तव्य असलेल्या चेंदणी परिसराने अन्य मराठीजनांनाही सामावून घेतले. चेंदणी कोळीवाड्यालगतच्या खाडी किनाऱ्यावर काही वर्षांपूर्वी मिठाचे उत्पादन होत होते. त्यामुळे खाडीवरील बंदराला मिठबंदर रोड असे नाव पडले होते. कालांतराने मिठाचे उत्पादन बंद होऊन, गणेशोत्सवात दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशमूर्तींचे खाडी किनाऱ्यावर विसर्जन केले जात होते. त्यामुळे या बंदराला चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर असे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी सातत्याने केलेल्या मागणीमुळे या ठिकाणी चेंदणी कोळीवाडा विसर्जन बंदर अशा नावाचा फलक बसविण्यात आला. याबद्दल चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचचे अध्यक्ष विक्रांत कोळी, सुभाष कोळी, कमलाकर कोळी, प्रकाश ठाणेकर, जीत बारांगुळ, हेमंत ठाणेकर, कृष्णकुमार कोळी, गिरीश कोळी, प्रशांत नाखवा, कुणाल भोईर, जमीर कोळी यांच्यासह चेंदणी कोळीवाड्यातील कोळी बांधवांनी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार

ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदे मार्फत देण्यात येणारा “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५” सोहळा गुरुवारी बी. जे हायस्कूल येथे पार पडला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षांतील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत.‌ शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, एफ. एल. एन, वोपा टूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्याज्ञान इ. दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षक दिनाच्या सदिच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा ५ सप्टेंबर रोजी पार पाडतोय ही आनंदाची बाब आहे. आई-वडील, शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचे काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा, असे मार्गदर्शन उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे तीन वर्षांतील १५ शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला.‌ जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात, शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव मिळण्यास मदत होते. शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्‍नशील असलेल्‍या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा, असे आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असे मनोगत व्यक्त केले. विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाराम ढमके, राजश्री पाटील यांनी केले. सन २०२२-२३ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील सहा. शिक्षिका अनघा आनंद सोनकांबळे, भिवंडी तालुक्यातील मुख्याध्यापिका पुष्पलता काशिनाथ गायकवाड, कल्याण तालुक्यातील पदवीधर शिक्षक आत्माराम बाळाराम पागडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अरुण विनायक गोडांबे, शहापूर तालुक्यातील सहा. शिक्षक डॉ. हरिश्चंद्र तुकाराम भोईर. सन २०२३-२४ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुचित्रा राजेंद्र सोनार, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विलास अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्रद्धा सुनिल पवार, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अशोक महादू रोठे, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुधीर पुंडलिक भोईरसन २०२४-२५ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुका तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणपत शंकर धुरी, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अर्चना अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चतूर महारू वाघ, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक डॉ. प्रशांत तुकाराम माळी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शेखर शिवराम घोडविंदे. ०००००

 सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात

 ७ सप्टेंबरपासून तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकीटाचा किमान दर रु. १० व कमाल रु. ३० असणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ कि.मी. आणि २ ते ४ कि.मी. करिता रु. १०, पुढील ४ ते ६ कि.मी. आणि ६ ते ८ कि.मी. करिता रु. २० आणि ८ ते १० कि.मी. च्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रु. ३०, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. ४० इतका होता. हा तिकीट दर आता रु. ३० असणार आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे. कोट “जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ घ्यावा.” श्री. विजय सिंघल उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

ठामपाच्या पर्यावरण स्पर्धेत २६ लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण

ठाणे-  ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेत गृहसंकुले, शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था या चार गटातील वेगवेगळ्या स्वरुपाच्या स्पर्धेत ७० जणांनी एकूण २६ लाख रुपयांची पारितोषिके जिंकली आहेत. ‘आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिना’चे औचित्य साधून या पर्यावरण स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि पर्यावरणपूरक चित्रपटांचा महोत्सव यांचे आयोजन आज, बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ यांच्या निर्देशानुसार, ७ सप्टेंबर या ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिना’चे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात पर्यावरण स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ठाण्याची हवा चांगल्या गुणवत्तेची असावी यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्याला नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाली तर हे उद्दीष्ट लवकर साध्य होईल. पर्यावरण स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी दिलेला प्रतिसाद आमचा हुरूप वाढवणारा आहे. सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी याप्रसंगी केले. त्यांच्यासह, माजी नगरसेवक गुरूमुख सिंग, परिवहन सेवेचे व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त मनोहर बोडके, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ स्नेहा कांबळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके, उपनगर अभियंता विनोद पवार,मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, पर्यावरण दक्षता मंचाच्या अध्यक्ष डॉ. मानसी जोशी आणि विद्याधर वालावलकर, पोलिस निरिक्षक गौरी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान १.०’ मध्ये ठाणे महानगरपालिकेस अमृत शहराच्या गटात प्राप्त झालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाच्या रकमेतून या पर्यावरण कृती आणि जनजागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गृहसंकुले, खाजगी आणि महापालिकेच्या शैक्षणिक संस्था, वाणिज्य आस्थापना, औद्योगिक संस्था, महाविद्यालये यांनी सहभाग घेतला. त्यात सर्व नऊ प्रभाग समिती स्तरावर गुणांकन करून स्पर्धेतील गुणानुक्रमे तीन विजेते निवडण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा, जनजागृती स्पर्धा अशा दोन स्वरुपात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा ही संस्थात्मक पातळीवर तर, जनजागृती स्पर्धा सर्व ठाणेकरांकरिता खुली होती. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये विजेत्यांना प्रत्येक प्रभाग समितीक्षेत्रात रु. ५१ हजाराचे प्रथम पारितोषिक, रु. २१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. ११ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे. जनजागृती स्पर्धेकरिता महापालिका स्तरावर रु. एक लाखाचे प्रथम पारितोषिक, रु. ५१ हजाराचे द्वितीय पारितोषिक व रु. २१ हजाराचे तृतीय पारितोषिक देण्यात आले आहे. विवेक कोरलेकर, श्रीपाद भालेराव आणि सुरेश देशपांडे यांनी या स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. तर, पर्यावरण दक्षता मंचतर्फे डॉ. जयश्री कुलकर्णी, संध्या टेंभे, अंजली दांडेकर, प्रिती काजरोलकर, मनीषा मोडक यांनी काम पाहिले.हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ०७ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षाची संकल्पना स्वच्छ हवेसाठी गुंतवणूक (#investincleanair) अशी आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेतर्फे मुख्यमंत्री हरित अभियानात नुकतीच एक लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. तर, स्मशानभूमींमध्ये महापालिकेने गॅसवर आधारित व्यवस्थाही विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यास महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने अतिरिक्त आय़ुक्त रोडे यांनी केले. 00000

४० वर्षीय नराधमाने ८ वर्षीय बालिकेवर केले अत्याचार

पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल राज भंडारी   पनवेल : शहरातील गजबजलेल्या ठिकाणी राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाने याच परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय बालिकेला घरातील बाथरूममध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत आरोपी विरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरातील वाल्मिकी नगर परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने सोमवारी दिनांक ०३ सप्टेंबर रोजी परिसरात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलीला बोलावून तिला घराच्या समोरील शौचालयात नेवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने घडला प्रकार आपल्या आईजवळ कथित केल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी पोलिसांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीला अटक केली. याबाबत आरोपींविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पनवेल शहर पोलिस करीत आहेत. 00000

 घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास

 पहिल्या टप्प्यात २२ मजली आठ इमारतींची उभारणी मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १४ हजारांहून अधिक रहिवाशांचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून…

ठाण्यात १५८ गणेशोत्सव मंडळे मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत,

 ३०७ पैकी १४९ गणेशोत्सव मंडपांना परवानगी ठाणे : अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असतानाच, गणेशोत्सवाच्या मंडपासाठी अर्ज करणाऱ्या ३०७ मंडळांपैकी १४९ मंडळांना पालिका प्रशासनाने परवानगी देऊ केली आहे. उर्वरित…

डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून ठाण्यातील वाहतुकीचे नियोजन !

 वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत – अभिजीत पवार   ठाणे : शहरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन वाहतूक पोलीस करीत आहेत. यामुळे या…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा- 2024’ आयोजन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करुन समाजामध्ये एकात्मता आणि सामाजिक सलोखावृध्दी ही उद्दिष्ट्ये साध्य होण्यासाठी तसेच या माध्यमातून पर्यावरणाचे महत्व प्रसारित होण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास…

५५ कोटी खर्चून होणार हायवेवर मीरा भाईंदर हद्दीत ३ भुयारी मार्ग व एक पादचारी पूल – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर/अरविंद जोशी   मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवर मीरा भाईंदरच्या हद्दीत ३ भुयारी मार्ग म्हणजेच वाहनांचा अंडरपासची कामे व एका फूटओव्हरब्रीजच्या मंजूर झाली असून सुमारे ५५ कोटी रुपये खर्च करून…