Author: bittambatami.com

लोकसभेला घासून नाही तर ठासून आलो- एकनाथ शिंदे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल ठाकरे यांना करीत लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला असे प्रतिपादन…

‘भगवा’ छत्रपतींचाच, त्यावर कोणतेच चिन्ह नको- उद्धव ठाकरे

मुंबई : भगवा रंग हा शिवछत्रपतींचाच आहे, छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्हा छापू नका, चिन्ह छापून भगवा तुमचा होत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मशाल घरोघरी…

शालेय गणवेशाचे मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते वाटप

मुंबई : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि आर्थिक लाभ मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारे शालेय गणवेशाचे शिलाईकाम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून  करून घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मविम बचत गटांकडून शिवणकाम केलेल्या शालेय गणवेशाचे वाटप महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (ऑनलाइन) करण्यात आले. मंत्री कु.तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात प्रातिनिधीक स्वरूपात काही शाळांमध्ये मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, मविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे(ऑनलाइन) सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही बचतगट  आणि शाळेतील विद्यार्थी शिक्षक (ऑनलाइन) उपस्थित होते. मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. यावर्षी ‘एक राज्य एक गणवेश’ योजनेनुसार राज्यभरात एकाच रंगाचे गणवेश वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे एकसमानता पाहायला मिळते. यापुढे  गणवेश शिवणकाम करताना शालेय शिक्षण विभागाचे आणि मविमच्या तेजस्विनी या नावाचे स्टिकर लावता येतील का, याचाही विचार करावा, अशा सूचना करून बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मितीची संधी दिल्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे  आभार मानले. महिलांना गणवेश शिवणकाम देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात, याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेशाचे  वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत होत आहे  आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असल्याचे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक- देवेंद्र फडणवीस

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येवू न देता शिकविणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धोरणातही या बाबीचे महत्व अधोरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता देण्यात यावा. वाहतूक भत्ता न मिळालेल्या दोन शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या. टाटा सामाजिक संस्थेने प्रती विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. 00000

महाराष्ट्राला कौशल्य संपन्न बनवण्याची जय्यत तयारी सुरु!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन   मुंबई : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी महत्वाची पाऊले उचलण्यात येणार आहेत. तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घेण्यात येणाऱ्या मेळाव्याचे नियोजन, महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठीची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन इत्यादी गोष्टींबाबत महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनीचे नियोजन आणि सद्यस्थितीत सुरु असलेल्या बॅचेस तसेच भविष्यातील प्रवेश प्रक्रियेचे नियोजन याबाबतचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. या अकादमीमध्ये सध्या जर्मन भाषेचे प्रशिक्षण सुरु आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ठाण्यात सुरु झालेल्या स्वच्छ भारत अकॅडमीच्या माध्यमातून विविध विषयात कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याठिकाणी मिळणारे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना खात्रीशीर नोकरी आणि १८ ते ३५ हजार इतके वेतन मिळेल. येथील पहिल्या बॅचेस पूर्ण झाल्या असून, आता भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. सदर अकॅडमी पाच महसुली विभागात कार्यान्वित करण्याबाबत देखील मंत्री लोढा यांनी निर्देश दिले आहेत. येत्या ३ महिन्यात १ हजार महाविद्यालयांमध्ये आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे, जेणेकरून शिक्षणासह कौशल्य विकासाला सुद्धा प्राधान्य दिले जाईल. तसेच ग्रामीण भागात कौशल्य विकासासाठी ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या जोडीला आता १००० ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये नव्या केंद्रांची स्थापना होणार आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाकडून राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी कॅबिनेट मंत्री लोढा स्वतः लक्ष घालत आहेत. या कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबत कठोर निकष असल्याने त्याबाबत काही महत्वाच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या आहेत. तसेच ऑगस्ट महिन्यात भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कन्व्हेन्शन मुंबईमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातील स्टार्टअप्सना आमंत्रित करण्यात येणार आहे. याबाबत असलेल्या तयारीची देखील मंत्री लोढा यांनी माहिती घेतली. २ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा घेतला. या व्यतिरकीत कौशल्य रोजगार विभागांतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशा सूचना मंत्री लोढा यांनी दिल्या आहेत. या कार्यक्रमात सर्व ITI मिळून सुमारे २ लाख विद्यार्थी योग दिवसात सहभागी होतील.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर   ठाणे : जिल्हा परिषद ठाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदाचा पदभार आज स्वीकारला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता. छायादेवी शिसोदे यांनी जिल्हा परिषदेचा कार्यभार उत्कृष्टपणे सांभाळला आहे. सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व प्रकल्प संचलक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सन २०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले गेले. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रुती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार मिळाला आहे. कुपोषण मुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अति तीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचे काम वर्धा जिल्ह्यात केले आहे.‌ वर्धा जिल्हा राज्यात पहिला पीएम विश्वकर्मा राबविण्यात रोहन घुगे यांनी विषेश प्रयत्न केले आहेत. कुपोषण, शिक्षण, कृषि, पशु, आरोग्य अशा विविध विषयावर अभ्यासपुर्वक कामकाज त्यांनी केले असून विविध नाविन्यपुर्ण योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी मोलाचे कामकाज वर्धा जिल्ह्यात केले आहे. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांच्या प्रगति पथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. शिक्षण विभागातील रिक्त पदे, शाळा भेटी, विद्यार्थी संख्या यांची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिली.ग्रामीण भागात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन नियोजन संदर्भातील माहिती घेण्यात आली. ग्रामस्थांच्या कल्याणासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन विकास कामांची प्रत्यक्ष पाहाणी करण्याचे नियोजन करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांनी प्रयत्नशील राहायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे आदी यावेळी उपस्थित होते. 0000

संजय केळकर यांनी काढली कोकणपट्टी पिंजून !

पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाणे, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी निरंजन डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन आ. संजय केळकर यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला. केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन करुन केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या दौऱ्यात श्री. केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते. 0000

राज्य सरकारी कंत्राटदारांची उपासमार

२७ जूनला अधीक्षक अभियंत्यांच्या दारात करणार ठिय्या आंदोलन   ठाणे : राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे. मात्र, त्यांची देयके देण्यात चालढकल करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विभागिय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या मागण्या मान्य केल्यास येत्या गुरूवारी, २७ जून रोजी, अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा आवळे यांनी दिला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास, जलजीवन मिशन विभाग, ग्रामविकास व जलसंधारणसारख्या अनेक शासनाच्या विभागाकडे काम करणाऱ्या कंत्राटदार यांची अनेक प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी शासन, मंत्री व प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाही. याबाबत शासनास कंत्राटदार महासंघाने वेळोवेळी ५ मागण्याचा ड्राफ्ट दिला होता. पत्रव्यवहार व बैठक ही घेतली होते, परंतु शासन काहीही करीत नाही, असा आरोप करून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ही निदर्शने केली. दरम्यान,  राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्राम विकास जलजीवन मिशन, जलसंधारण, स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामे करणाऱ्या कंत्राटदार यांची देयके तातडीने देऊन   कंत्राटदार त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे व्यवसायिक यांची वर्षानुवर्षे देयकेच मिळत नसल्याने होणारी आर्थिक पिळवणूक व उपासमार तातडीने बंद करावी;  राज्यातील सर्व विभागाकडील कामे मंजुरी करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनाने सदर कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबविण्यात येऊ नये, आदी मागण्यांचे निवेदन महासंघाने दिले असून या मागण्यांची आठवडाभरात पूर्तता न केल्यास अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ००००

प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अनिल ठाणेकर   ठाणे :पांढऱ्या रेशनकार्डधारकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत  ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मुख्यमंत्री या नात्याने राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळीत असून गोर-गरीब जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आरोग्य सेवेचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेल्या पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना दिला जात आहे. त्यामुळे पांढर्‍या रेशनकार्डधारक या सुविधेपासून वंचित राहत होते. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून ज्या पध्दतीने पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना जी आरोग्य सुविधा मिळते त्याचप्रमाणे पांढर्‍या रेशनकार्डधारकांना मिळावी, अशी  मागणी जनतेतून होऊ लागली आहे. पांढरे रेशनकार्डधारक असलेले अनेक नागरिक या राज्यामध्ये असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर मोफत वैद्यकिय उपचार होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर पांढर्‍या रेशनकार्डधारकांची शिधापत्रिका आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करून महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिल्यास याचा फायदा राज्यातील गोर-गरीब समाजाला होईल व त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. मुख्यमंत्री या नात्याने नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे धाडसी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पांढर्‍या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा हाही धाडसी निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. ०००००

५ जुलैपासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम-  भरत बास्टेवाड

 अशोक गायकवाड अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे.…