Author: bittambatami.com

पोलीस दलातील ८०५ जागांसाठी ४६ हजाराहून अधिक अर्ज

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांच्या एकूण ८०५ जागांकरिता राज्यभरातून ४६ हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले असून याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये महिला उमेदवारांचे सुमारे नऊ हजार अर्ज आहेत. राज्यात २०२२-२०२३ या वर्षासाठीची भरती प्रक्रिया यंदाच्या वर्षी होणार असून या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचण्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण या पोलीस दलात शिपाई, वादक आणि वाहन चालक अशा एकूण ८०५ जागांवर भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलीस दलातील ११९ आणि ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांचा समावेश आहे. ठाणे शहर पोलीस दलातील ६८६ जागांपैकी ६६६ जागा या पोलीस शिपाई पदासाठी असतील. तर २० जागा वाहनचालक पदासाठी असणार आहेत. तसेच ग्रामीण पोलीस दलात ११९ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ७३, वाहन चालक पदासाठी ३८ आणि पोलीस वादक या पदासाठी आठ जागा आहेत. ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या एकूण ८०५ जागांसाठी ४६ हजार ६२४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याची सरासरी केल्यास प्रत्येक एका जागेसाठी ५७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ठाणे शहर पोलीस दलात सर्वाधिक म्हणजेच, ३९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे आठ हजार ४२ अर्ज आहेत. तर ग्रामीण पोलीस दलात ७ हजार १९ जणांचे अर्ज आले आहेत. यामध्ये महिलांचे प्रमाण १ हजार १५ इतके आहे. ठाणे शहर पोलीस दलाची मैदानी चाचणीची प्रक्रिया ठाण्यातील साकेत मैदानात होणार आहे. तर ठाणे ग्रामीण पोलिसांची मैदानी चाचणीची प्रक्रिया मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद मैदानामध्ये पार पडेल. मैदानी चाचणी दरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तैनात असतील. ठाण्यातील साकेत मैदान आणि परिसरात १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस कर्मचारी आणि ७० मंत्रालयीन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. पावसाळ्यात ही भरती प्रक्रिया होणार असल्याने उमेदवारांसाठी मैदानात मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच एखादा उमेदवार त्याचे छायाचित्र आणण्यास विसरल्यास त्याच्यासाठी छायाचित्रकार आणि प्रत काढण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे. – संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, ठाणे शहर पोलीस. कोट मुंब्रा येथे भरती प्रक्रियेसाठी आदल्या दिवशी अनेक उमेदवार येतील. त्यांच्या सुविधेसाठी मैदानात मंडप उभारण्यात आला आहे. त्यांना खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी ३५० अधिकारी कर्मचारी तैनात असतील. – डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. ०००००

 ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार

ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त   ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदार संघाच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये कोकण पदवीधर मतदार संघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजीत पानसे तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैय्या, उबाठाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून याठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहाव्यास मिळणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यात, ठाणे जिल्ह्यातील ९८ हजार ९३, रायगड जिल्ह्यातील ५४ हजार ९३१, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ हजार ५५१, पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३३३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ६८६ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय महत्व वाढलेल्या या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारांची आकडेवारी कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री १२ हजार ९८७, पुरुष १५ हजार ९३० तर, तृतियपंथी ८, ठाणे जिल्हा स्त्री ४२ हजार ४७८, पुरुष ५६ हजार ३७१ तर, तृतियपंथी ११, रायगड जिल्हा स्त्री २३ हजार ३५६, पुरुष ३० हजार ८४३ तर तृतियपंथी ९, रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८, पुरुष १३ हजार ४५३ तर, तृतियपंथी ०, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री ७ हजार ४९८, पुरुष ११ हजार ५३ तर, तृतियपंथी ०, असे एकूण २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाचे रमेश कीर, भाजपचे निरंजन डावखरे, भीमसेना विश्वजित तुळशीराम खंडारे, अपक्ष अमोल अनंत पवार, अरुण भिकण भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशूराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, ॲड. शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, असे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 00000

कल्याण-डोंबिवलीत साथरोग नियंत्रणासाठी फवारणी मोहीम

कल्याण : पावसाळा सुरू झाल्याने विविध प्रकारचे साथरोग या काळात डोके वर काढतात. या साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने शहराच्या विविध भागात विशेष जंतुनाशक, धूर फवारणी मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या विशेष फवारणी मोहिमेचे नियोजन केले आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकातून या मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर, स्वच्छता अधिकारी शरद पांढरे, के. पी. जगताप उपस्थित होते. या विशेष मोहिमेत १२२ सफाई कामगार, १२२ पितळी फवारणी पंप, ३० धुराच्या मशीन, तीन धुराच्या जीप्स, ११ ट्रॅक्टर्सचा समावेश आहे. सकाळ, संध्याकाळ ही फवारणी केली जाणार आहे. हातगाड्या सुरू साथरोगाच्या नियंत्रणासाठी आयुक्तांनी विशेष फवारणी मोहीम सुरू केली असली तरी ज्या उघड्यावरील हातगाड्यांवरील खाद्य पदार्थांमुळे हे साथरोग पसरतात. त्या गाड्या ग प्रभाग सोडून नऊ प्रभागांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. संध्याकाळी चार वाजल्यापासून खाऊ गल्ल्या ग्राहकांनी भरून जातात. सर्वाधिक हातगाड्या डोंबिवलीत ह प्रभाग, ई प्रभाग, ड, अ प्रभागात लावल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. 000

करंजाडेवासियांचे पाणी प्रश्नासाठी आंदोलन

पनवेल : लाखो रुपये किमतीची घरे खरेदी केली मात्र पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याने वर्षभरात करंजाडेवासियांना दीड कोटी रुपयांचे टँकरचे पाणी खरेदी करुन प्यावे लागले. अशी संतापजनक परिस्थिती करंजाडेची असल्याने करंजाडेवासियांना दुसऱ्यांदा मोर्चाचे हत्यार उपसावे लागले. मंगळवार आणि पाऊस असल्याने कामावर सुट्टी टाकून अनेक नागरिक या मोर्चात छत्री व पाण्याची बाटली घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरीक व महिलांचा समावेश होता. करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्नासाठी उरणच्या आमदारांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. मागील अनेक वर्षे रहिवाशी समाजमाध्यमांवर आणि प्रसारमाध्यमांवर पाणी प्रश्नावर बोंबाबोंब करुनही उरणचे अपक्ष आ. महेश बालदी हे पाणी प्रश्न सोडवू न शकल्याने करंजाडेतील रहिवाशांनी संताप जाहीर केला होता. अखेर चार महिन्यांवर विधानसभेच्या निवडणूका असल्याने आ. बालदी यांनी सिडको भवनात करंजाडे वसाहतीच्या पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मागील आठवड्यात सिडको अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मदारांच्या बैठकीपूर्वीच नागरिकांच्या संघटनेने मंगळवारचा दिवस मोर्चासाठी जाहीर केल्यामुळे मंगळवारी ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजता मोर्चा वसाहतीमधील सेक्टर ६ येथील बस थांब्यापासून सुरू झाला. या मोर्चेकरींना जेएनपीटी महामार्ग रोखायचा होता. मात्र पोलिसांनी विरोध केल्यामुळे आणि सिडको अधिकाऱ्यांनी वसाहतीमध्येच आंदोलन ठिकाणी येऊन आश्वासन देण्याचे ठरल्याने मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या चौकी शेजारीच मोर्चा थांबवला. सिडको मंडळाचे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रणिक मुळ यांनी मोर्चेकऱ्यांना जीर्ण जलवाहिनी यापुढे बंद ठेऊन नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा कार्यान्वित केल्याची माहिती दिली. तसेच २० दश लक्ष लिटर पाण्याची गरज असलेल्या वसाहतीला यापुढे सूरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले. करंजाडे पिपल्स फाऊंडेशनचे विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन या सोसायट्यांच्या संघटनेने पाठिंबा दिल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी सांगितले.

 सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने ‘मार्ड’चा आंदोलनाचा इशारा

निवासी डॉक्टर आक्रमक   मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केली असून याप्रकरणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास शस्त्रक्रिया विभागातील कक्षात कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. मागील वर्षभरात महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांवर सात ते आठ वेळा हल्ले झाले आहेत. अशा हल्ल्यामुळे डॉक्टरांच्या जीवाला धोका निर्माण होतोच, पण रुग्णसेवेमध्येही व्यत्यय येतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र त्यावर अद्यापपर्यंत काहीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. परिणामी, वारंवार डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्वरित आणि निर्णायक कारवाई करावी. निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्ण सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना अशा हल्ल्यापासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी विनंती ‘मार्ड’ने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना केली आहे, अशी माहिती ‘केंद्रीय मार्ड’चे अध्यक्ष अभिजित हेलगे यांनी दिली. दरम्यान, सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षेकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरांवर आंदोलनाची वेळ आणू नये, असा इशाराही ‘मार्ड’ने सरकारला दिला आहे. 000000

‘तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंद करू’

डोंबिवली एमआयडीसीतील युवा उद्योजकांची उव्दिग्नता   डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील सुमा्रे ४५ रासायनिक कंपन्यांना शासनाने बंद करण्याच्या दिलेल्या नोटिसा आणि त्यात एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या कंपनी स्फोटांंच्या मालिका, या सगळ्या प्रकाराने सरळमार्गी काम करणाऱ्या उद्योजकांनाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. कंपनी चालक असलेल्या आपल्या घरातील कर्त्या पुरुषाला होत असलेला हा त्रास पाहून त्यांच्यासोबत काम करणारी त्यांची मुले म्हणजेच, युवा उद्योजकांनी उव्दिग्न होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनीच बंंद करू, असा सल्ला वडिलांना दिला आहे. डोंबिवली एमआयडीसीत मागील साठ वर्षांपासून उद्योजक व्यवसाय करत आहेत. आता कंपनी चालकांची तिसरी पीढी उद्योजक म्हणून पुढे येत आहे. अनेक कंंपनी चालकांची मुले, मुली परदेशातून उच्च शिक्षण घेऊन डोंबिवली एमआयडीसीतील आपल्या आजोबांनी सुरू करून वडिलांनी पुढे चालविलेला उद्योग अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. या उच्चशिक्षित नव उद्योजकांनी आपल्या कंपनीतील जुन्या पारंपारिक ढाच्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक बदल केले आहेत. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया वाढली आहे, असे उद्योजक सांगतात. अनेक कंपन्यांमध्ये आता कंपनी सुरू करणारे आजोबा, वडील आणि मुलगा, मुलगी (नातू) असे चित्र दिसते. आपली कंपनी आता आपली मुले पुढे नेणार आहेत. म्हणून कंपनी संचालक मंडळात बहुतांशी कंंपनी चालकांनी आपली पत्नी, उच्चशिक्षित आपली मुले, मुली यांना संचालक, भागीदार म्हणून घेतले आहे. कंपनीतील उत्पादन प्रक्रिया अधिक पारदर्शक, सचोटीने करून वर्षातून दोन ते तीन वेळा कंपनीच्या प्रवेशव्दारावर येणारे शासकीय अधिकारी कंपनी तपासणी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही हेतूने येणार नाहीत, अशी व्यवस्था या नवतरुण उद्योजकांनी कंपनीत केली आहे. एमआयडीसीतील अमुदान कंपनी स्फोटानंतर या कंपनी मालकाला झालेली अटक. भागीदार वृद्ध आईला झालेला त्रास पाहून एमआयडीसीतील अनेक उद्योजकांच्या युवा उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असेल तर संबंधितांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. परंतु, एका कंपनीत स्फोट होतो. सरसकट सर्वच रासायनिक कंपन्यांंना कंपनी बंदच्या नोटिसा, स्थलांतरासाठी शासनाकडून आग्रह धरला जात असेल. कंपनीतील स्फोटानंतर पोलीस गुन्हा दाखल होऊन तुरुंगात जावे लागत असेल तर कंपनी बंद करून दुसरे काही सुरु करू, असा सल्ला युवा उद्योजकांनी आपल्या वडिलांना देण्यास सुरुवात केली. एका उद्योजक तरुणीने तर उद्योग विस्ताराचे स्वप्न घेऊन मी या व्यवसायात आले आहे. विवाह, कुटुंब या गोष्टी न पाहताच मी जर तुरुंगात जाणार असेल तर आपणास कंपनी चालविण्यास अजिबात रस नाही, असे मत नाव छापण्याच्या अटीवर व्यक्त केले. कंपनी स्फोटानंतर संंबंधित कंंपनीचे मालक असलेले कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होते, असा अनुभव अनेक उद्योजकांनी सांगितला. डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी बंद नोटिसा, स्फोटांच्या मालिका, त्यामुळे इतर उद्योजकांना होणारा त्रास पाहून नव उद्योजक आपल्या पारंपरिक उद्योगातून बाहेर पडण्याचा गांभीर्याने विचार करू लागले आहेत. 0000

पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सुसज्ज राहण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

नवी मुंबई : यावर्षी अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसात मोठया प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले. विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपडया शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले. पाऊस लांबल्यामुळे सद्यस्थितीत नमुंमपा क्षेत्रात आठवडयातील तीन दिवस संध्याकाळच्या वेळेत पाणी पुरवठा देता येत नाही यामागील भूमिका नागरिकांनी समजून घेतली आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणात आणखी 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा याच्या आपण प्रतिक्षेत आहोत. त्यानुसार पाणी पुरवठयाचे नियोजन केले जात आहे. त्याची माहिती वेळोवेळी नागरिकांना देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यावर्षी पूर्वापार पध्दतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करणेबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पावसाळी कालावधीत उद्भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करुन ठेवणेबाबत आरोग्य विभागास निर्देशित करण्यात आले. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवा-याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करणेबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. घाटकोपर, मुंबई येथील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत तत्परतेने अनधिकृत होर्डिंग निष्कासीत करण्याची कार्यवाही केली असून नोंदीत 53 पैकी 47 अनधिकृत होर्डिंग हटविलेले आहेत. उर्वरित 4 एमआयडीसी अखत्यारितील होर्डिंगही त्यांचेमार्फत त्वरित हटविण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले. परवाना विभाग तसेच नगररचना विभाग यांच्यामार्फत दिल्या जाणा-या परवानग्या, परवाने, प्रमाणपत्रे याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. त्याचप्रमाणे जन्मदाखले संबधितांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सक्षम करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या सर्व बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले. 15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणत: 6 हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजीटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त्‍ श्री. सुनिल पवार व श्री. शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्याकडून शासन, लोकन्यायालय आदी स्तरावरील पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला. पावसाळी कालावधीत सर्व घटकांनी क्षेत्रीय स्तरावर सतर्क रहावे व मदतकार्यासाठी सुसज्ज असावे असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी दिले.

‘नौपाड्यात शाळांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाईचा आग्रह’

भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाचे पोलिसांना निवेदन   ठाणे : नौपाडा येथील शाळा- हाविद्यालयांच्या परिसरात थाटलेल्या पानटपऱ्या व सिगारेट विक्रीची दुकाने बंद करण्याची आग्रही मागणी भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाकडून…

 ‘आव्हाडांनी वायकरांना शुभेच्छा द्याव्या’

प्रताप सरनाईक यांचा सल्ला   ठाणे : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून रविंद्र वायकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या, असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ‘जो जिता वो सिकंदर’ आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचेही ते म्हणाले. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचेही ते म्हणाले.  विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचेही ते म्हणाले. दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यशस्वी झाले आहेत.  राज्यात लोकसभेला केवळ १५ जागा लढल्या आणि ७ जागा निवडून आणल्या. त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक स्त्राईक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरला आहे. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्याने काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करुन दाखविले आहे. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले आहेत. त्यामुळे बाकी कोण काय बोलत त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचे असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या विषयी त्यांनी छेडले असता,  या विषयावर आम्ही बोलणार नाही. आम्ही या विषयावर बोलणे अयोग्य आहे असे ते म्हणाले. सरनाईक यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल त्यांना केला असता, सरनाईक यांचे नाव नेहमीच मंत्रीपदासाठी येत आहे. मात्र मुख्यमंत्री हा एक ठाणेकर याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक वेळी विधानसभेचा एक सदस्य म्हणून आपले नाव मंत्रीपदासाठी चालते यावरच मी समाधानी असल्याचे ते म्हणाले.  त्यातही मंत्रीपद जर माझ्या नशिबात असेल तर ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. ००००

शहापूर, मुरबाडच्या ८२ हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा

ठाणे : पावसाळा लागून १५ दिवस झाले. मात्र जिल्ह्यात आजूपर्यंतही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील तब्बल २३३ गाव-पाड्यांमधील ८२ हजार १०३ गावकऱ्यांना आजही तब्ब्ल ४८ खासगी टॅंकरवद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे मुबलक पाण्याअभावी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या तालुक्यांमध्ये अन्य तालुक्यांच्या तुलनेत जीव घेणी पाणी टंचाई आजही सुरू आहे. अर्धा जून संपत असतानाही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे आजपर्यंत २३३ गावपाड्यांना ४८ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील ४३ माेठ्या गांवांसह १५५ आदिवासी पाड्यांना ४२ खासगी टॅंकर पाणी पुरवठा करीत आहेत. शहापूरमधील ६३ हजार ६८३ ग्रामस्थांना या तीव्र पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर मुरबाड तालुक्यातील १७ माेठे गांवे आणि १८ पाड्यांसाठी सहा टॅंकरव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. मुरबाडमधीाल ही १८ हजार ४२० गावकऱ्यांना या पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी या २६२ गावपाड्यांना ४८ टॅकरने एक लाख एक हजार ७०७ लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यात आला होता. 00000