Author: bittambatami.com

तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर माकपचा हजारोंचा धडक मोर्चा

अनिल ठाणेकर ठाणे : पोलीस आणि प्रशासन यांच्या दादागिरीविरुद्ध तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, माकपचे पाॅलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, लहानी दौडा, सुरेश भोये, चंद्रकांत घोरखाना यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जबरदस्त धडक मोर्चा काढण्यात आला. गेले काही महिने तलासरी तालुक्यात पोलीस आणि प्रशासन भाजप-आघाडीच्या राज्य सरकारने आणलेल्या दबावाला बळी पडून सामान्य आदिवासी, महिला यांवर दादागिरी करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे, त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कहर म्हणजे थेट तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनीता शिंगडा यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करण्याची भाजपच्या गुंडांनी हिम्मत केली. याचा समाचार घेणे भागच होते.  या त्यांच्या दादागिरीविरुद्ध जबरदस्त मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवण्याचा निर्णय मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांनी घेतला. आठवडाभर जोरदार प्रचार करून बुधवारो, १२ जून २०२४ रोजी हजारो महिला व पुरुषांचा मोर्चा दणकेबाज घोषणा देत तहसील आणि पोलीस स्टेशनच्या आतच घुसला. अखेर सर्व अधिकार्‍यांनी तातडीने शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. सर्व तक्रारी ताबडतोब सोडवण्याचे आश्वासन दिल्यावरच मोर्चा संपला. 0000

शासकीय वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू

 कल्याण व भिवंडीतील मागासवर्गीय मुलांमुलींचे ठाणे :- इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या भिवंडी व कल्याण येथील मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतीगृहांचे गृहपाल प्र. ना. मडावी यांनी केले आहे. वसतीगृहात प्रवेशासाठी अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (सर्व छायांकीत प्रती)- 1. गुणपत्रिका, 2. शाळा सोडल्याचा दाखला, 3. जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), 4. उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकारी),  5. रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), 6. आधार कार्ड तसेच प्रवेश घेतेवेळी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. 1. शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 2. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत, 3. वैद्यकीय प्रमाणपत्र 4. पासपोर्ट साईज फोटो  5.  10 रुपयांचे कोर्ट फी टिकीट लावून वसतिगृह नियमाचा करारनामा करुन द्यावे लागेल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शॉपीग कॉम्पलेक्स, पहिला माळा, भिवंडी, (संपर्क क्र 9767612897) मागास तथा आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, भिवंडी, मानसरोवर शाँपिग कॉम्प्लेक्स, दुसरा माळा भिवंडी.मुलांचे शासकीय वसतिगृह (गुणवंत), कल्याण, गौरी अपार्टमेन्ट, पाचवा माळा, बेहतुरकर पाडा, कल्याण पश्चिम, (संपर्क क्र. ९७६७६१२८९७). या वसतिगृहात वर्ग 11 ते 12 व पॉलिटेक्निक प्रथम / आय. टी. आय मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. (हे वसतिगृह शासकीय इमारत, गौरीपाडा, कल्याण, येथे स्थलांतरित करण्यात येत आहे.) 000

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे –  रमेश बैस

अशोक गायकवाड मुंबई :नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो ३००’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. १२) संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले. राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर पुस्तके छापता येणार आहेत. तंत्रज्ञान सर्वांकरिता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींकरिता वरदान सिद्ध होत आहे. मात्र दिव्यांगांना नोकरी व्यवसायाकरिता आज नवनवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. या दृष्टीने त्यांना कौशल्याबाबत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. दिव्यांगांना ज्ञान व कौशल्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑडिओ पुस्तके तयार केली पाहिजे तसेच ती स्वस्त व सहज उपलब्ध करून दिली गेली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. नॅब इंडिया संस्थेने दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे व सर्वोत्कृष्ट दिव्यांग सहायता केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले. यावेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘नॅब’ संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम तसेच इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या मार्श इंडिया, एचएसबीसी व कन्सर्न इंडिया फाउंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती देणाऱ्या एका माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले, कार्यवाहक मानद महासचिव डॉ. विमल कुमार डेंगला, सचिव हरेंद्र मल्लिक, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समिती सदस्य, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

अशोक गायकवाड मुंबई:राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.* सातारा येथील डॉ धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, या पैकी जे अगोदर त्या दिवसापर्यंत केली आहे. सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी टी शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा. राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.

एमसीएफ बोरिवली येथे राज्य कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने २२ ते २४ जून २०२४ दरम्यान रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने ९ वी एम सी एफ राज्य मानांकन…

अनूसूचित व नवबौध्द प्रवर्गातील विदयार्थ्यांनी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा – वंदना कोचुरे

अशोक गायकवाड नवी मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी दि. १२ जुलै २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यतील असावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे इत्यादी या योजनेच्या अटी आहेत. विद्यार्थ्यांनी अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

डोंबिवलीत वीजेचा पुरवठा दहा तास बंद

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू…

मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही- राहुल गांधी

केरळ : मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधान मोदींना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधान मोदींना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश…

निधी वाटपात महाराष्ट्रावर अन्याय

मुंबई : महाराष्ट्रातून जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकडे जमा होतो पण राज्याला निधी देताना मात्र हात आखडता घेतला जातो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन…