Author: bittambatami.com

 स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायदा सुधारणा विधेयक मंजुर करा !

आमदार प्रताप सरनाईक यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी   ठाणे : लहान मुली, स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना देशामध्ये वाढत असल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा घटना समाजात घडूच नयेत, गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे यासाठी आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देणारा हा शक्ती कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू व्हावा. महाराष्ट्र विधानसभेकडून शक्ती कायदा म्हणजेच सुधारणा विधेयक आपल्याकडे अंतिम मंजुरीसाठी आले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अशा घटनांचा महाराष्ट्रातील काही राजकिय नेते आपल्या स्वार्थासाठी त्याचा वापर करीत आहेत त्यामुळे आपण या प्रकरणी लक्ष द्यावे. अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे. राज्यातील महिला, तरूणीं व बालकांवर होणारे अत्याचार बंद व्हावेत, गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे व असा गुन्हा करण्यास कोणी धजावूच नये इतका कडक कायदा लागू असावा, गुन्हेगारांना वचक बसावा याकरिता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ’शक्ती कायदा विधेयक“ मी आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत मांडले होते व हे विधेयक एकमताने मंजूर झाले. हे शक्ती कायदा विधेयक विधानसभेत २३ डिसेंबर, २०२१ तर विधानपरिषदेत २४ डिसेंबर, २०२१ रोजी सर्वांनुमते मंजूर झाले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने आमदार म्हणून मी या शक्ती कायदा सुधारणा विधेयकाची मागणी त्यावेळी राज्य सरकारकडे केली होती व विधानसभेत हे विधेयक मांडल्यानंतर “शक्ती कायदा विधेयका” ला एकमताने मंजुरी देण्यात आली. या कायद्यात काही सुधारणा करून अत्याचार्याला थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. विधानपरिषद व विधानसभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचवेळी हे विधेयक महामहिम राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. परंतू, अद्यापही या शक्ती कायद्याला अंतिम मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. त्याकरिता महामहिम राष्ट्रपतींची अंतिम संमती मिळणे गरजेचे आहे. लहान बालके, तरूणीं, स्त्रिया यांच्यावर अत्याचार करणार्या नराधमास आरोपाली फाशी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यासाठी शक्ती कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू होणे आवश्यक आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यासंदर्भात विचार करून आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यात नवीन कायदा तयार केला. त्यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ व ३७६अ मध्ये दुरूस्ती केली आहे. त्या नव्या कायद्यांतर्गंत महिलांवर अत्याचार, बलात्कार, सामुहिक बलात्कार अशा आरोपींविरूध्द गुन्हा सिध्द झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली गेली. एखाद्या महिलेवर अत्याचाराची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पोलीसांनी ७ दिवसात तपास पुर्ण करायचा व न्यायालयाने देखील त्याची सुनावणी १४ दिवसात पुर्ण करायची असे त्यात ठरविण्यात आले. या कायद्यामुळे गुन्हा सिध्द झाल्यास २१ दिवसांच्या आत आरोपीस शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढावयाचे त्या कायद्यात मंजूर करण्यात आले. महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहीत मुदतीत म्हणजे २१ दिवसाच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य त्यावेळी ठरले होते. आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारचे गुन्हे करण्याऱ्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षा होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने देखील आंध्र प्रदेशच्या धर्तीवर नवीन कायदा तात्काळ करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सदर कायदा महाराष्ट्र राज्यात लागू करण्यासाठी भारतीय दंड संहिता (इंडियन पिनल कोड) च्या कलम ३७६ मध्ये सुधारणा करणे इष्ट वाटते. असा या विधेयकाचा हेतू होता व सदरहू शक्ती कायदा विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाला असून महामहिम राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळाल्यावर हा कायदा लागू होऊ शकतो. त्याकरिता राष्ट्रपतींच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.भारतीय दंड संहिता व फौजदारी प्रक्रिया संहिता महाराष्ट्र राज्यात लागू असतांना, त्यामध्ये आणखी सुधारणा करणारे विधेयक मी त्यावेळी मांडले व विधिमंडळात ते एकमताने मंजूर झाले. याबाबत जनतेच्या व सर्व लोकप्रतिनिधींच्या भावनाही तीव्र आहेत. जो कोणी नराधम अत्याचार करेल त्या आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा दिली जाईल तसेच ती व्यक्ती द्रव्यदंडासही पात्र राहील असे या शक्ती कायद्यात निश्चित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेकडून शक्ती कायदा म्हणजेच सुधारणा विधेयक आपल्याकडे अंतिम मंजुरीसाठी आले आहे. आपण या प्रकरणी लक्ष द्यावे. अशी मी आपणास आग्रहाची नम्र विनंती महाराष्ट्रातील करोडो नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून करीत आहे असे निवेदन आमदार प्रताप सरनाईक यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले आहे. ००००

टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांची फेरनिवड

मुंबई : टांकसाळ मजदूर सभेची वार्षिक सर्वधारण सभा टांकसाळमध्ये पार पडली. या सभेमध्ये संघटनेची नवीन कार्यकरिणी बिनविरोध निवडण्यात आली. यात टांकसाळ मजदूर सभेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के.…

बाळकुमच्या दहीहंडीत ११ लाख रुपयांपेक्षा अधिक आकर्षक बक्षिसे- संजय भोईर

अनिल ठाणेकर ठाणे : साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित बाळकुमच्या या दहीहंडीत ११ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक देवराम भोईर,  स्थायी समिती सभापती, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भुषण भोईर, ठाणे शहर उप अधिकारी युवासेना विकेश संजय भोईर यांनी दिली आहे. साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित बाळकुमच्या या दहीहंडीत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीकाला उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ९ थर लावणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकास रोख २ लाख रुपये, आकर्षक चषक  व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिक दिली जाणार आहेत. या कार्यक्रमास अनेक सिनेकलावंतांच्या उपस्थितीत मराठी कोळीगीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी साईबाबा मंदिर चौक, बाळकूम नाका येथे होईल.  मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम २५ हजार  व आकर्षक चषक, महिला गोविंदा पथकास रोख रक्कम २१ हजार व आकर्षक चषक, तसेच ६ थर व ७ थरार ३ ते ५ हजार, ८ थराला २५ हजार अशी सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येणार आहे. एकंदर ११ लाखापेक्षा अधिक रक्कमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत. ठाणे, भिवंडी, मुंबई च्या गोविंदा पथकांनो या उत्सवात सहभागी व्हावं असे आवाहन माजी नगरसेवक संजय भोईर यांनी केले आहे. ००००

नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या केंद्राविरुद्ध लढावे लागेल! – पृथ्वीराज चव्हाण

राजेंद्र साळसकर मुंबई : कामगार कायदे गुंडाळताना कुणाशी चर्चा नाही की संवाद नाही,  कामगार नको आहेत.  पण उद्योगपती हवे आहेत. केंद्र सरकारने संमत केलेले, कामगार हिताविरोधी चार कोड बिल राज्यात लागू करण्याचा डाव‌ महायुती सरकारचा आहे, तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे सरकार येणार नाही,याची काळजी कामगार वर्गाला घ्यावी लागेल,असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे कामगारांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना दिला. राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या विद्यमाने संघटनेचे‌ आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११७ वी जयंती नुकतीच परेल च्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली‌.या प्रसंगी गं.द.आंबेकर जीवन गौरव व श्रम गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागतपर भाषण केले. माथाडी कामगार कायदा दुरुस्ती विधेयक मांडणारे हे राज्य सरकार केंद्राने संमत केलेल्या चार श्रम संहिता राज्यात लागू करण्याचा मोका शोधू पाहत आहे.देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश‌‌ विकसित देशांच्या पंक्तीत असेल,असे दिवा स्वप्न दाखविणा-या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चालीविरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल, असे‌ आवाहन‌ राज्याचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कामगार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, मुंबई मधील कामगारांना एक लाख ४० हजार घरे देण्याचे धाडस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविले आहे.परंतु राज्याच्या महायुती सरकारने मागील सरकारने सोडतीत लागलेल्या घरांच्या चावी वाटपापलीकडे काहीच केलेले नाही. या सरकारने सत्तेवर आल्यापासून एकाही कामगारासाठी नवीन घर बांधलेले नाही. यापूर्वी मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या एनटीसीद्वारे चालविण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीचा निर्णय घेतला.परंतु आताचे केंद्र सरकार देशातील बंद पडलेल्या एनटीसीच्या २३ गिरण्या चालविणे आमचे काम नाही,असे म्हणून टाळाटाळ करीत आहे.केंद्र सरकारने कोविडचे कारण पुढे करून चालू असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या बंद केल्या आहेत.आम्ही या प्रश्नावर  राष्ट्रीयस्तरावर लढा उभा केला. पुरस्कार प्रदान सोहळ्यात,संघटनेने अमृत महोत्सवी वर्षाची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल.केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी. संजीवा रेड्डी यांना‌ श्रमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आजाराच्या कारणास्तव ते समारंभाला आले नाहीत. मानाचा गं.द.आंबेकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कॉंग्रेस कामगार नेते भाई जगताप यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कारखाने आणि आस्थापनातील कामगार १)(सिन्नर) येथील रिंग प्लस ऍक्वा कंपनीतील कामगार (सिटु) हरिभाऊ बाळाजी तांबे यांनी कामगार चळवळीतून,२) व्हीव्हीएफ इंडिया कंपनीतील कामगार सामाजिक क्षेत्रातील निस्पृह कार्यकर्ते दिलीप गणपत‌ खोंड (मुंबई) यांना सामाजिक क्षेत्रातून,३) पाच‌ कथा संग्रह प्रसिद्ध असलेले महिंद्रा मधील कामगार लेखक विलास पंचभाई (नाशिक) यांना साहित्यातून, ४) सरकारी आस्थापनातील‌ लिपीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू नेहा मिलिंद साप्ते यांना (मुंबई) क्रीडा क्षेत्रातून,५) विविधांगी कलेने सुपरिचित असलेले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कामगार संतोष दत्ताराम शिंदे (रत्नागिरी) यांना कला‌ क्षेत्रातून आंबेकर श्रम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव विजेते कॉंग्रेसनेते आमदार भाई जगताप यांचेही यावेळी भाषण झाले. डॉ.शरद सावंत,राजेंद्र गिरी,प्रदीप मून,काशिनाथ माटल यांनी पूरस्कार निवड समितीचे काम पाहिले.गं.द.आंबेकर जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाटचालीवर एक माहितीपूर्ण चित्रफीत प्रकाशित करण्यात आली.या औचित्याने इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण गिरणी कामगारांच्या मुलांचा “आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे,रामिम संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंगावर विज पडून ४o वर्षीय आदिवासी महिलाचा जागीच मृत्यू

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील भांगवाडी चासोळे गावातील एका आदिवासी कुटुंबाच्या घरावर वीज पडल्याने एक ४० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य ३ महिला गंभीर झाल्याची घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडे या आदिवासी बहुल भागातील भांगवाडी चासोळे या गाव परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळवाऱ्या सह विजेच्या लखलखाट होऊन पावसाने हाहाकार माजवला होता. याच प्रसंगी भांगवाडी येथील गावा बाहेर असणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाच्या घरात ४ महिला व १ पुरुष घरात बसले असताना अचानक मोठ्या आवाजा सह त्या घरावर विज कोसळली त्यात ४० वर्षीय रुक्मिणी गोपाळ मेंगाळ यांच्या अंगावर विज पडल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर नंदा गुलाब मेंगाळ, हेमी अनंता लोभी, हौशा जैतू हिंदोळा ह्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी  टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रसंगी  शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख प्रकाश पवार, मा. जि.प सदस्य संजय पवार, मा. पंचायत समिती सदस्य अनिल घरत आणि समाजसेवक बंडूशेठ पवार यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेऊन योग्य ती जखमींना मदत केली. 0000

जुन्या ई रिक्षा शासकीय खात्यांना सुपूर्द करा

स्थानिकांची मागणी   माथेरान : माथेरान मधील एकूण ९४ पैकी वीस हातरीक्षा श्रमिकांच्या हाती १० जूनपासून सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टवर पर्यावरण पूरक ई रिक्षाचे स्टेरिंग आल्याने सुरुवातीला नगरपरिषदेच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या सात ई रिक्षा बंद करण्यात आल्या असून त्या सर्व ई रिक्षा शास्त्री हॉलमध्ये ठेवण्यात आल्या असून त्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अजूनही काही दिवस त्या बंद ठेवण्यात आल्या तर आगामी काळात नादुरुस्त होऊन भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावातील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्गाला नगरपरिषदेने भाडेतत्त्वावर दिल्यास त्याचा सदुपयोग होऊ शकतो आणि याच माध्यमातून नगरपरिषदेला आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. ई रिक्षा सुरू झाल्यापासूनच खऱ्या अर्थाने इकडे पर्यटकांना लोंढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आणि त्यातच ऐन गर्दीच्या वेळी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग मध्येच येऊन रिक्षात बसून जातात त्यामुळे अनेकदा त्याठिकाणी रिक्षा स्टँडवर पर्यटक संबंधित रिक्षाच्या कर्मचाऱ्यासोबत वाद घालताना दिसतात. बहुतेक खात्याचे अधिकारी, कर्मचारी वर्ग हे मोफतच ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. येथील श्रमिकांनी कर्ज काढून या ई रिक्षा घेतलेल्या आहेत त्यातच शासकीय वर्गाला मोफत सेवा उपलब्ध करून दिल्यास ह्या श्रमिकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. यासाठी नगरपरिषदेने येथील सर्व शासकीय खात्याला या जुन्या सात रिक्षा मासिक भाडेतत्त्वावर दिल्यास यातून नगरपरिषदेच्या तिजोरीत भर पडून या जुन्या सात रिक्षांची देखभाल राहू शकते असेही बोलले जात आहे. 00000

 ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील वेबसिरीजला पायबंद घाला

अविनाश जाधव यांची मागणी   ठाणे : ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन दाखविल्या जाणाऱ्या अश्लील वेबसिरीजला पायबंद घालण्यात यावा. त्यावर दाखविले जाणारे अतिरंजित, भडक, शिवराळ भाषा, नात्यांचा अनादर, पाशवी क्रूरता हे सर्वच गुन्हेगारीला प्राेत्साहित करणारे आहे. त्यामुळेच अशा वेबसिरीज आणि चित्रपटांवर नियंत्रण आणि सेन्साॅर ठेवण्यासाठी केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देण्यात आले आहे. राज्यातील ४८ खासदारांनीही संसदेमध्ये आवाज उठविण्याचेही त्यांना पत्र दिल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिली. हा प्रकार सेन्साॅरच्या नियंत्रणात आणला गेला नाहीतर मात्र मनसे स्टाईलने आंदाेलन केले जाईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, सभ्यता, कुटूंब व्यवस्था, नात्यातील संवेदनशीलता नष्ट हाेण्याआधी ओटीटी प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून सुरु असलेल्या सांस्कृतिक व्याभिचाराला सेन्साॅनच्या नियंत्रणात आणले जावे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी त्यांच्या स्वार्थासाठी भारतीय पारंपारिक शिक्षण व्यवस्था माेडीत काढून त्यांची नाेकरशाहीला अनुकूल शिक्षण व्यवस्था सुरु केली. ते परके हाेते, त्यामुळे तसे वागले. परंतू, सध्या स्वकीयांकडूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन सादरीकरण स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही अश्लील, बीभत्स, क्राैर्याच्या सीमा ओलांडणारी दृश्ये दाखविली जातात, ती संतापजनक आहेत. भावी पिढीला काय वारसा, संस्कार देत आहाेत. या प्लॅटफॉर्मवरुन दाखविली जाणारी अतिरंजित दृश्ये गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारी आहेत. कुटूंबाने एकत्रित बसून बघण्यासारखी एकही कलाकृती अशा प्लॅटफॉर्मवर नाही. भारतीय हिंदू संस्कृती रसातळाला नेण्याचा कुटील डाव परकीयांकडून खेळला जात आहे का? याचाही शाेध घेण्याची गरत असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. काही लहान मुलांकडूनही अश्लील हावभाव, नृत्य करवून घेतले जाते, त्यावरही बालकामगार विराेधी कायद्याप्रमाणे बंदी आणली गेली पाहिजे. सीए टॉपर या वेब मालिकेमध्येही आतापर्यंतच्या सर्वच भागांमध्ये लहान मुलांबाबतची दृश्ये अत्यंत संतापजनक आहेत. निव्वळ लाडकी बहिण योजना राबविणे पुरे नसून त्यांच्यासह लेकराबाळांची सुरक्षाही महत्वाची आहे. संबंधित चॅनलशीही अशा दृश्यांना आळा घालण्याबाबत पत्रव्यवहार सुरु आहे. तरीही नियंत्रण न आणल्यास मनसे स्टाईल धडा शिकविण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे. 00000

पीडित बालिकेचा वैद्यकीय अहवाल शाळेने नाकारला

बदलापूर : येथील शाळेत लैंगिक शोषण झालेल्या दोन लहान मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबातील सदस्याने शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर निष्काळजीपणा आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. लोकसत्ताशी बोलताना कुटुंबातील सदस्याने…

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक

मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी गणेशमूर्ती मातीची असावी अशा आग्रहाखातर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली. मात्र, मूर्तीकारांचे नुकसान होत असल्याचे कारण देत या निर्णयाला…

कर्जत येथील चिल्लार नदीत बुडून तरुणीचा मृत्यू

कशेळे खांडस नांदगाव परिसरात पसरली शोककळा   कर्जत :  कर्जत तालुक्यातील भोपळेवाडी येथील राहणारी वैशाली भरत ठोंबरे या तरुणीचा नेरळ येथील चिल्लार नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. वैशाली आपल्या दोन मैत्रिणीसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. संबंधित प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र वैशालीच्या मृत्यूने कशेळे खांडस नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कीकवी जवळील बोरवाडी येथील हासू पादीर यांची भोपळेवाडी येथे राहणारी भाची रक्षाबंधन कार्यक्रमासाठी मामाकडे आली होती. वैशाली ही आपल्या मैत्रिणी पूजा देवरे, सोनाली भुजाडा आणि मामाची मुलगी पूनम पादीर या २२ ऑगस्ट रोजी सकाळी चिल्लार नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीवर कपडे धुवत असताना भोपळेवाडी येथील २० वर्षीय वैशाली ठोंबरे हीचा पाय नदीवरील खडकावरून घसरला. त्यानंतर वैशाली हि पाण्यात बुडाली, तिच्या मैत्रिणींनी वैशालीचा शोध घेण्यासाठी नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या. मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्याने वैशाली ही तेथील खोल पाण्यात बुडाली. त्यानंतर बोरवाडी आणि कीकवी मधील ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ चील्हार नदीवर पोहचले. मात्र पावसाचा जोर कमी असल्याने नदी नेहमी सारखी वाहत असताना देखील नदी पात्रात बुडालेल्या वैशाली ठोंबरे ही आढळून येत नव्हती. शेवटी तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वैशाली ठोंबरे हीचा मृतदेह हाती लागला आणि थेट कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेण्य आले. त्यावेळी डॉक्टरांनी वैशाली भरत ठोंबरे हीचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. शेवटी त्याच ठिकाणी मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह पालकांचे ताब्यात दिला. त्या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी किरण बेलोसकर, तलाठी पार्वती वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मात्र वैशालीच्या मृत्यूने कशेळे खांडस नांदगाव परिसरात शोककळा पसरली आहे. 00000