Author: bittambatami.com

शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून कल्याणासाठी काम करा – छायादेवी शिसोदे

ठाणे : शिवाजी महाराजाचे आदर्श समोर ठेवून ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करा, असे मत ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी व्यक्त केले. ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे येथील आवारात शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता संपन्न झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेकाची मानाची गुढी उभारुन सगळ्यानी वंदन केले. राष्ट्रगीत व राज्यगीत गात उत्साही वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल गौरवपर भाषण केले. शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आपण सर्वांनी ग्रामस्थांच्या कल्याणासाठी काम करावे. संकटावर मात करत काम करण्याची प्रेरणा आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून सातत्याने घ्यायला हवी. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते व सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा दिल्या. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.पु. व स्व) प्रदिप कुलकर्णी, लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता संदिप चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे, स्वच्छा व पाणी पुरवठा विभाग प्रमुख अतुल पारसकर इतर सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुत्रसंचालन अनिल सुर्यवंशी यांनी केले.

जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार –  डॉ. गंगाधर परगे

अनिल ठाणेकर ठाणे : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अतिसार नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागामार्फत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा आज, ६ जून ते २१ जून या कालावधी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अतिसाराच्या उपचारासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात व आंतररुग्ण विभागात ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून या कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रम जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पाडणार असून जिल्हास्तरीय पर्यवेक्षण देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. दरवर्षी शासनातर्फे एकाचवेळी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटना टाळल्या जातात. या पंधरावड्या मध्ये आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देणार असून ५ वर्षांखालील सर्व मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अतिसार लागण झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकीट व झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार असून पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण व समुपदेशन केले जाणार आहे. हा कार्यक्रम राबवताना अति जोखमीचे क्षेत्र व दुर्बल घटकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरित मंजूर, बेघर मुले आशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार असून मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व दूषित पाणीपुरवठा क्षेत्र याकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य सेविकेमार्फत ग्राम आरोग्य पोषण दिवशी ५ वर्षांखालील बालकांच्या माताना अतिसाराचा प्रतिबंध कसा करावा तसेच ओआरएस व झिंकचे महत्व, स्तनपान चालू ठेवणे बाबत, स्वच्छतेविषयी माहिती, शौचालयांचा वापर इत्यादिबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे. चौकट जिल्हयात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्रांमध्ये ० ते ५ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ५२ हजार १७३ असून एकूण १ हजार ३०५ आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करून सेवा दिली जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ठामपा प्रयत्नशील – प्रशांत रोडे

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरण पूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात यासंदर्भात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीस, स्वंयसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव २०२४ साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणपती मुर्तीसाठी जनजागृतीकरता, महिती पत्रके, फलक व ध्वनीफित याद्वारे करण्यात येईल. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. पर्यावरण पूरक मूर्ती बनवून, प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करूया, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा.

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

राज ठाकरेंकडूनही भाजपाला पाठिंब्याची घोषणा नितीन दूधसागर नवी मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला, याबद्दल श्री. डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केला. कोकणामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल, असा विश्वासही आमदार डावखरे यांनी व्यक्त केला. गेल्या १२ वर्षांत कोकणाच्या सर्वोतोपरी विकासासाठी कार्य केले असून, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.

लवकरच शाळा सुरू होत असताना ठाणे जांभळी नाका बाजारात पालक आणि विद्यार्थी शैक्षणिक साहित्य, वह्या,पुस्तके आणि स्कूल बॅग घेण्यासाठी लगबग सुरू असताना दिसत आहे. (फोटो प्रफुल गांगुर्डे)

‘दलित-मुस्लिमांची नाराजी हटवा’!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांच्या आमदारांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुस्लिम आणि दलित समाजापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्यासह मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांशी संबंधित नाराजी दूर करण्याबाबत आमदारांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीत सर्व आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या प्रचार मुद्द्यांमध्ये फरक असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक मुद्द्यांवर भर देवून दलित-मुस्लिम समाज जोडण्यावर भर देण्याबाबत सांगण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबाबत यावेळी ठरविण्यात आले. विधानसभेची तयारी करा लोकसभा निवडणुकीत झालेल्या अपयशातून सावरून आता विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्री धर्मराव आत्राम आणि विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ मात्र या बैठकीस अनुपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या. यापैकी केवळ रायगड लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर बारामती, शिरूर आणि धाराशिव या मतदार संघांत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षात नैराश्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे १८ आमदार संपर्कात असल्याचे सांगून आणखी अस्वस्थता निर्माण केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित आहेत.

उल्हासनगरातील अतिरिक्त आयुक्तांच रिक्त पद १० महिन्यांनी भरले

उल्हासनगर : गेल्या 10 महिन्यांपासून रिक्त असलेले उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे पद अखेर भरण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने या पदावर किशोर गवस यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे. महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत. तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर यांची 5 सप्टेंबर 2023 रोजी बदली झालेली आहे. तेंव्हापासून हे पद होते.मुळात किशोर गवस हे मार्च महिन्यात उपायुक्त या पदावर महानगरपालिकेत आलेले आहेत.ते परिवहन सेवेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित किंबहूना प्रगतीपथावर असणाऱ्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.आता त्यांची महाराष्ट्र शासनाने पदोन्नती करून त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे किशोर गवस हे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरी समस्या मार्गी लागणार असे चित्र दिसू लागले आहे.

फलकाची सदोष संरचना, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाला सादर

घाटकोपर दुर्घटना मुंबई : कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो. मात्र वादळी वाऱ्यात टिकेल इतक्या क्षमतेची या जाहिरात फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती, असा अहवाल या दोन तज्ज्ञांनी नुकताच पालिका प्रशासनाला दिला आहे. घाटकोपरच्या छेडानगर येथे १३ मे रोजी महाकाय जाहिरात फलक पडून १४ जणांचा मृत्यू झाला. भविष्यात असा प्रसंग घडू नये यासाठी या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेतली होती. त्याकरिता पालिका प्रशासनाने संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे आणि डॉ. अभय बांबोले यांनी या दुर्घटनेतील तांत्रिक कारणांचा अभ्यास करून नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. केवळ प्रति तास ४९ किमी एवढ्या वाऱ्याचा वेग सहन करेल एवढीच या जाहिरात फलकाची क्षमता होती. मात्र १३ मे रोजी प्रति तास ८७ किमी एवढ्या वेगाने वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे हा फलक उभा राहू शकला नाही, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. मुंबई शहर सागरी किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे प्रति तास १५८ किमी एवढ्या वादळी वाऱ्यात उभे राहू शकेल अशाच पद्धतीने फलकांची संरचना असायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र घाटकोपरचा जाहिरात फलक हा मजबूत नव्हता. दोषपूर्ण संरचनेमुळे हा फलक पडल्याचे या अहवालात म्हटले आहे. मालाडमध्ये फलक हटविताना एक जखमी मालाड येथील लिबर्टी मार्गावरील जवाहरलाल नेहरू क्रीडांगणानजीकचा पालिकेने नोटीस बजावलेला अनधिकृत डिजिटल फलक बुधवारी रात्री आठच्या सुमारास हटविताना कोसळला. हा फलक महेंद्र कुर्ले (६२) यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात जयकिरण कन्स्ट्रक्शनचे विकासक आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर, पालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील कारवाईला वेग देत अनेक अनधिकृत फलक हटविले. अद्यापही अनधिकृत फलक हटविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, जयकिरण कंपनीने इमारत बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली नव्हती. त्यानंतर नोटीस पाठवली होती.

कपिल पाटील यांच्या पराभवामुळे नैराश्यातून तरूणाची आत्महत्या

शहापूरमधील घटना कल्याण : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या शहापूर तालुक्यातील साजिवली गावातील खैरेपाडा येथील संजय पद्माकर अधिकारी (३५) या भाजपच्या कार्यकर्त्याने बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहापूर तालुक्यातील भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून संजय अधिकारी यांची ओळख होती. सरळांबे ग्रामपंचायत आणि परिसरातील सामाजिक कार्यात संजय आघाडीवर असायचे. कपील पाटील यांच्या विजयासाठी त्यांनी शहापूर तालुक्यात प्रचाराचे काम केले होते. एका पायाने अपंग असुनही त्यांची पक्ष कार्यासाठीची धडपड कौतुकास्पद होती. भिवंडी लोकसभेत कपिल पाटील पुन्हा खासदार म्हणून निवडून जावेत यासाठी संजय अधिकारी यांची धडपड होती. भाजप कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी शहापूर तालुका पिंजून काढला होता. मतमोजणीच्या दिवशी कपील पाटील यांचे पक्ष प्रतिनिधी म्हणून संजय अधिकारी यांना ओळखपत्र मिळाले होते. पण मतमोजणीच्या दिवशी ते गैरहजर राहिले. त्यानंतर कपील पाटील पराभूत झाल्याची माहिती मिळताच, संजय खूप व्यथित झाले. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. रात्रीच्या वेळेत मित्रांसोबत चर्चा करत असताना आता जगण्यात काही अर्थ नाही, अशी भाषा त्यांनी केली होती. मित्रांनी त्यांना समजावले होते. असे टोकाचे पाऊन न उचलण्याचे सूचित केले होते. बुधवारी रात्री पत्नी, त्याची दोन मुले घरात झोपी गेल्यानंतर संजयने राहत्या घरात गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीला आला. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची माहिती मिळताच कपिल पाटील यांचे कौटुंबिक सदस्य देवेश पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी अधिकारी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संजय यांच्या कुटुंबीयांना कपील पाटील फाऊंडेशनतर्फे सहकार्य केले जाणार आहे.

कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

कल्याण : कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांना दोन दिवसापूर्वी गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या प्रकाश भीमसेन बनसोडे (५४) या इसमाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मानसिक बिघडलेली स्थिती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमधून आपण हा प्रकार केला आहे, अशी कबुली आरोपी प्रकाश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना दिली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी प्रकाश बनसोडे या इसमाने फेसबुक समाज माध्यमातून एका मोठ्या लघुसंदेशाव्दारे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या धमकीपत्रात महेश यांना असलेल्या राजकीय पाठबळाचा उल्लेख करण्यात आला होता. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यातील गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना, आता हे नवीन धमकी प्रकरण चर्चेला आले होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तातडीने याप्रकरणाचा तपास करून गुरुवारी धमकी देणाऱ्या प्रकाश कदम या इसमाला अटक केली होती. या इसमाची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तो मद्यपी असल्याचे, त्याची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि त्याची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे आढळले. याऊलट प्रकाश हा महेश गायकवाड यांचा फेसबुक मित्र असल्याचे तपासात पुढे आले. आपल्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमधून हा प्रकार घडला आहे, अशी कबुली प्रकाशने पोलिसांना दिली. या प्रकारात तथ्य नसल्याचे दिसून आल्यावर त्याला योग्य ती समज देऊन पोलिसांनी त्याची सुटका केली. महेश गायकवाड यांनाही या प्रकरणाची पोलिसांनी माहिती दिली आहे.