Author: bittambatami.com

विद्यापीठांच्या मैदानावर सरावासाठी दिव्यांग क्रिकेटपटूंचे राज्यपाल रमेश बैस यांना साकडे

अशोक गायकवाड मुंबई : मुंबई व्हीलचेअर क्रिकेट चमूच्या सदस्यांनी नीलोत्पल मृणाल यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली आणि विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या मैदानावर सराव करु द्यावा, अशी मागणी केली. व्हीलचेअर क्रिकेट खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना मुंबई तसेच राज्यातील इतर सार्वजनिक विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या मैदानावर सराव करु द्यावा, या दृष्टीने विद्यापीठांना सूचना कराव्या अशी मागणी यावेळी दिव्यांग खेळाडूंनी केली. अनेक दिव्यांग खेळाडू व क्रिकेटपटू गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील असून खासगी क्लब / जिमखाना येथे जाऊन सराव करणे त्यांना परवडत नाही. विद्यापीठाच्या मैदानावर सरावासाठी दिव्यांगांना मनाई केली जाते असे सांगून विद्यापीठांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी मैदाने वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दिव्यांग खेळाडूंनी केली.

मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी

अशोक गायकवाड रायगड :लोकसभा सार्वत्रिक निवडणूक करीता ३२ रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार, ४ जून रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली अलिबाग येथे पार पडणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज रविवार (दि.२) रोजी मतमोजणी निरीक्षक संजीव कुमार झा यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.* यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले विविध कक्ष, मतमोजणी कक्षाची विधानसभा निहाय रचना, बैठक व्यवस्थापन, निवडणूक अधिकारी कर्मचारी, मत मोजणी प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा, आपत्कालीन यंत्रणा, वैद्यकीय कक्ष, अत्यवश्यक सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष या सर्व तयारीची पाहणी केली. तसेच आढावा घेतला. यावेळी वाहनतळांची जागा निश्चिती, ध्वनीक्षेपक यंत्रणा, वाहतूक वळविणे आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. मतमोजणीच्या अनुषंगाने विविध घटकांना कोणताही त्रास होणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्व ती खबरदारी घेण्याच्या सूचना झा यांनी दिल्या. यावेळी झा यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीसाठी केलेली तयारी व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी आचारसंहिता भंगासंदर्भात ठाणे : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेसंदर्भात तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख रोहितकुमार राजपूत  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघांतर्गत ठाणे जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींसाठी तळ मजला, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे अहोरात्र 24 X 7 ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाकडे ‘लेखी तक्रारी’ किंवा ‘टोल फ्री क्रमांक 18008911350’ वर नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येतील, असे कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024, ठाणे जिल्हा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा पथक प्रमुख, आदर्श आचारसंहिता रोहितकुमार राजपूत यांनी कळविले आहे.

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी संजय यादव

अशोक गायकवाड मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.* या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.)यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावरील आवश्यक त्या सोयीसुविधा आणि उपाययोजना बाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांचा सातत्याने आढावा सुरू आहे. मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदारसंघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी 8 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल. मतदान फेऱ्या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. यामध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ १८, शिवडी -१९, भायखळा -१९, मलबार हिल-२०,मुंबादेवी -१६, कुलाबा -२० अशा फेऱ्या होणार आहेत. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघ-१९, चेंबूर- २१, धारावी-१९, शीव-कोळीवाडा -१९, वडाळा-१८, माहिम १८,अशा फेऱ्या असतील. सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने दिनांक २ जून २०२४ रोजी सकाळी ६:०० ते दिनांक ५ जून २०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस उपायुक्त (अभियान) बृहन्मुंबई यांनी निर्गमित केले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.

विविध आयुधांचा उपयोग करून सभागृहाचा जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर- जितेंद्र भोळे

मुंबई : राज्याचे कायदेमंडळ हे सार्वभौम आहे. जनतेच्या हिताचे कायदे करणे, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य कायदेमंडळाच्या  माध्यमातून होत असते. विविध संसदीय आयुधांचा उपयोग करून सदस्य जनतेचे प्रश्न, समस्या, भोवतालच्या परिस्थितीची माहिती सभागृहाला देतात. या माहितीच्या आधारावर कार्यवाही करून सभागृहात जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येतो. सभागृहातील या कार्यवाहीची माहिती जनतेला देण्याचे महत्वाचे काम प्रसारमाध्यमे करीत असतात, असे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी आज केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात ‘माध्यम साक्षरता अभियान’अंतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना’ या विषयावर सचिव (1) श्री. भोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रावेळी व्यासपीठावर मातिही व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. विधिमंडळाला आर्थिक, कायदे निर्मिती व माहिती घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत सचिव (1) श्री. भोळे म्हणाले, सदस्य आपआपल्या मतदासंघातील प्रश्न सभागृहात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, नियम 293 अन्वये चर्चा आदींच्या माध्यमातून मांडत असतात. कामकाजातील या सर्व प्रकारांमध्ये विधेयक हे सर्वात महत्वाचे असते. विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर विधान परिषदेकडे पाठविली जातात. आवश्यकता असल्यास संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात येते. वित्तीय बाबींशी संबधित विधेयक हे सर्वप्रथम विधान सभेत मांडण्यात येते. धन विधेयक ठरविण्याचा अधिकारी विधानसभा अध्यक्षंना असतो. सचिव (1) श्री. भोळे पुढे म्हणाले, सभागृहातील वित्तीय कामकाज महत्वाचे असते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विनियोजन विधेयक पारीत करावे लागते. विधेयक पारीत न झाल्यास अर्थसंकल्पीय तरतूदींचा विनियोग करता येत नाही. तसेच शासकीय विधेयकांसोबत अशासकीय विधेयकेसुद्धा मांडण्यात येतात. शासकीय विधेयकाप्रमाणेच अशासकीय विधेयक राजपत्रात प्रसिद्ध होत असते. सभागृहात सदस्यांना विशेषाधिकार मिळालेले असतात. त्यांना भाषण स्वातंत्र्य असते. तसेच अधिवेशन काळात त्यांना अटक करता येत नाही. यासोबतच विधीमंडळाच्या विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असून सध्या 40 समित्या आहेत. या समित्यांचे कामकाज वर्षभर सुरू असते. समित्या शासनाला शिफारशी करू शकतात. कामकाजाचे वार्तांकन करताना प्रसार माध्यम प्रतिनिधींना या आजच्या कार्यशाळेचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह मुंबई : विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमांची असल्याचे प्रतिपादन करीत या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटनीय कार्यक्रमात महासंचालक श्री. सिंह बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक श्री. सिंह म्हणाले, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोड म्हणाले, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी  बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले,  लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या गुणवत्ता वाढ होणे गरजेची आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचलन पल्लवी मुजुमदार यांनी तर आभार वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू

मिरारोड: येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  काशिगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत कंपनीतर्फे क्रिकेट मॅच आयोजित करण्यात आल्या होत्या. बॉक्स क्रिकेट खेळत असताना कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. त्यावेळी हा तरुण  फलंदाजी करत होता.क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला व  त्याचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या एका 4२ वर्षीय तरुणाचा खेळताना हृदयविकाराने दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून तपास करत आहेत. मयत रामगणेश कृष्णन तेवर (42)हा एका बिल्डर कडे कामाला असून त्या बिल्डर मार्फत कर्मचाऱ्या करता  क्रिकेट स्पर्धा काशिगांव येथील खाजगी जागेत  रविवारी  आयोजित करण्यात आल्या होत्या.

शालेय विद्यार्थ्यांकरिता कबड्डी प्रशिक्षण शिबिर संपन्न

मुंबई : सचिंद्र आयरे फाउंडेशन व लालबागचा राजाच्या आशिर्वादाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शनि. व रवि. दिनांक ०१ व ०२ जून २०२४ रोजी कबड्डी खेळाचे दोन दिवसांचे ‘विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता अर्जुन पुरस्कार सौ. माया मेहेर यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार तारक राऊळ, महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र सुर्वे, द्रोणाचार्य पुरस्कार भार्गव कदम, सचिंद्र फाऊंडेशनचे सचिंद्र आयरे, प्रशिक्षक मिलिंद कोलते, संदीप काणेकर, अशोक लोटणकर, सुरेश गोरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना रविंद्र सुर्वे म्हणाले की, शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही मनसोक्त खेळा. खेळात प्रगती करताना ध्येय निश्चित करा, पण शॉर्ट – कट मारू नका. या खेळाडूंना मिलिंद कोलते, मोरे यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय खेळाडू पांडुरंग भोगले यांनी केले.

शक्तीप्रदर्शन करत ॲड. अनिल परब यांची उमेदवारी दाखल

महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी  नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सोमवारी दि. ३ जून रोजी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. हि निवडणूक प्रचंड मताधिक्यांनी जिंकण्याचा विश्वास यावेळी ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला. गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड. अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ॲड. परब सकाळी ११ वाजता वांद्रे येथील निवासस्थानातून बाहेर पडले. एमआयजी क्लब येथेून हजारो शिवसैनिकांसह ते नवी मुंबईत आले. यावेळी ॲड. परब यांच्याबरोबर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, पदवीधर मतदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते सोबत होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी बेलापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड.परब म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी मुंबई पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी दाखल केली. मी शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विजय मिळवून देईन. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली त्याच्या जोरावर प्रचंड मताधिक्यानी विजयी होण्याचा मला विश्वास आहे, असा विश्वास ॲड. परब यांनी व्यक्त केला. त्यापुढे बोलताना ॲड परब म्हणाले कि, समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी त्यांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा केला. मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो. शिंदे गट किंवा भाजप कोणीही माझ्यासमोर येऊ देत. बाळासाहेबांच्या आशीर्वादासमोर आणि शिवसैनिकांच्या ताकतीसमोर कोणीही टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड परब म्हणाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शेकापचे आमदार जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आमदार सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार विलास पोतनीस, आमदार रमेश कोरगावकर, आमदार प्रकाश फातर्फेकर इत्यादी उपस्थित होते. शिवसेनेचे विलास पोतनिस यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. त्या जागी ॲड. परब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. ७ जून उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

आकाश सावला अजिंक्य ठाणे : आकाश सावलाने अश्विन माळीचा पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे  विजेतेपद मिळवले. प्रथम फलंदाजी करताना अश्विन माळीने २ षटकात दोन षटकारांच्या सहाय्याने १२ धावा केल्या होत्या. पण या दरम्यान तो तीनवेळा बाद झाल्याने त्याच्या एकूण धावसंख्येतून ९ धावा वजा करण्यात आल्या. विजयावर शिक्कामोर्तब करताना आकाश सावलाने एकदाही बाद न होता २ षटकात १६ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन वेळा चेंडू सीमापार पाठवला.  याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकाशने आर्यन देशमुखचा पराभव केला होता. या लढतीत ८ चेंडूत आकाशाच्या खात्यात १३ धावा जमा झाल्या तर आर्यनला केवळ ९ धावा करता आल्या. अन्य लढतीत अश्विन माळीने सिद्धेश गावंडेंचा पराभव केला. अश्विनने १९ धावा बनवल्या तर सिद्धेशने १६ धावपर्यंत मजल मारली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्यन देशमुख विजेता ठरला . आर्यनने ३९ धावा जमवल्या. या धावसंख्येला उत्तर देताना सिद्धेशने ३१ धावा केल्या. स्पर्धेत एकूण चार झेल आणि एक धावचीत करणाऱ्या  रोहित राजभरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मोतीराम मोरेकर स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.