Author: bittambatami.com

वस्ताद वसंतराव पाटील यांचा गौरव

मुंबई : सांगली येथील ईगल फाऊंडेशनने भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील यांनी कुस्ती खेळात चार दशके केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची २०२४च्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या ९ जून रोजी ईगल फाऊंडेशनच्यावतीने होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभ डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, उप संचालक श्रीमती निशादेवी बंडगर (वाघमोडे), दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील, आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, डॉ. मीना श्रीवास्तव,  पत्रकार सुनिल पाटील, अमोल पांढरे, बाळासाहेब कोळेकर, अविनाश रामचंद्र यांचादेखील समावेश आहे. वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री गणेश आखाड्यातील सर्व कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पालकवर्गानी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करा

भाजप नेते जगन्नाथ पाटील यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी कल्याण: मुरबाड विधानसभेतील भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी उघडपणे विरोधात काम केले. याची सर्व माहिती आपल्याकडे आहे. पक्षविरोधी काम केल्यामुळे आमदार कथोरे यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी हे पत्र दिल्याने दोन पाटील विरुध्द कथोरे असा सामना येत्या काळात रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन वर्षापासून कपील पाटील आणि किसन कथोरे यांच्यात धुसफूस सुरू आहे. भाजप नेत्यांनी वेळोवेळी या धुसफूशीवर पांघरूण घालून हा वाद वाढणार नाही याची काळजी घेतली. आता माजी मंत्री जगन्नाथ पाटील या ज्येष्ठ नेत्याने कथोरे यांच्या विरुध्द प्रदेश नेत्यांना कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याने भाजपच्या ठाणे जिल्ह्यात मोठी बंडाळी होण्याची चिन्हे आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विषय उफाळून आल्याने कथोरे समर्थक प्रसंगी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच कथोरे समर्थकांनी कपील पाटील यांच्या त्रासाला कंटाळून स्वतंत्र भूमिका घेण्याची गळ कथोरे यांना घातली होती. त्यावेळी प्रदेश नेत्यांनी कथोरे यांना सबुरीचा सल्ला दिला होता. प्रदेश नेत्यांच्या एकत्रित बैठकीत कपील पाटील यांनी आपले आक्षेप स्पष्ट मांडले होते. कथोरे यांनी यावेळी कोणताही खुलासा केला नव्हता, असे जगन्नाथ पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. कपील पाटील यांच्या विजयासाठी आपल्या सांगण्यावरून मुरबाड मतदारसंघात मेळावे झाले. तेथे कथोरे उपस्थित होते. त्यानंतर कथोरे यांनी पडद्यामागून आपल्या कार्यकर्त्यांना जेथे आगरी समाजाची गावे आहेत तेथे महाविकास आघाडीचे बाळ्या मामा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे यांना मत देण्याचे फर्मान सोडले. अशा १०० कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे. भाजपच्या विजयासाठी वरिष्ठांकडून आदेश असताना कथोरे यांनी त्या आदेशाला काडीचीही किमत दिली नाही. प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना धुडकावून लावले, असा आक्षेप जगन्नाथ पाटील यांनी पत्रात घेतला आहे. कथोरे यांच्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष आहे. पक्षाच्या विरोधात आणि कपील पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किसन कथोरे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष याविषयी बोलून सविस्तर माहिती दिली आहे. इतर भाजप नेत्यांना याविषयची पत्रे पाठवून किसन कथोरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. जगन्नाथ पाटील (भाजप नेते) या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. केवळ गैरसमज आणि आकसापोटी मला लक्ष्य बनवले जात आहे. मी भाजपचा कार्यकर्ता असून पक्षवाढीसाठी सातत्याने काम करीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट होईलच. आमदार किसन कथोरे (मुरबाड)

डोंबिवलीतील कोपरमध्ये वनराई नष्ट करून बेकायदा इमारतीचे काम सुरू

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या वारंवार तक्रारी करूनही ह प्रभागाच्या तोडकाम पथकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तक्रारदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता कोपरमधील चरू बामा शाळेच्या मागील भागात कॅप्टन तुकाराम हश्या म्हात्रे रस्त्यावर कृष्णा टाॅवरजवळ जुनाट आंबे आणि वनराई तोडून त्या जागेवर भूमाफियांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत. या इमारतीच्या पायाभरणीचे काम रात्रंदिवसात पूर्ण करून पाऊस सुरू होण्यापूर्वी या इमारतीच्या उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता स्थानिक भूमाफियांनी या बेकायदा बांधकामाची उभारणी सुरू केली आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते विनोद गंगाराम जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केली आहे. उपायुक्त तावडे यांची तक्रारदार जोशी यांंनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे. ह प्रभागाचे राजेश सावंत यांंनी आपण निवडणूक कामात खूप व्यस्त आहोत. आता एका बैठकीत आहोत, असे सांगून म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला, असे तक्रारदार विनोद जोशी यांंनी सांंगितले. सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू असताना मागील दोन महिन्यात ह प्रभागात एकाही बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्याने या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांवर कारवाई का करत नाहीत, अशा तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन ह प्रभागात बेकायदा बांधकामांवर का कारवाई केली जात नाही, याचा आढावा घेण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे. कोपर येथे चरू बामा शाळेच्या मागे सुरू असलेले बेकायदा बांधकामा पायभारणी स्तरावर असताना तोडून टाकण्याची मागणी तक्रारदार जोशी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोपरमध्ये चरू बामा शाळा परिसरात अलीकडे एकही नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे नगररचना अधिकाऱ्याने सांगितले. ह प्रभागातील बेकायदा बांधकामे कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्यांचा खुराडा, जुनी डोंंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स व गटारावर बांधलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीत शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, राहुलनगरमधील रमाकांत आर्केड, सुदाम रेसिडेन्सी बेकायदा इमारती, कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरा समोरील बेकायदा इमारत. गणेशनगरमध्ये रेल्वे मैदानाच्या बाजुला सुरू असलेली बेकायदा इमारत.

सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीस हरियाणातून अटक

पनवेल-अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी पाचव्या आरोपीस हरियाणातील भिवानी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. या प्रकरणात २० हून अधिक आरोपी फरार आहेत. रविवारी अटक केलेल्या आरोपीचे नाव दीपक हवासिंग गोगालिया उर्फ जॉनी वाल्मिकी असे आहे. सलमान याच्या हत्येचा कट रचून सलमानच्या हत्येसाठी पाकिस्तानातून शस्त्र खरेदी करण्याचे नियोजन लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील मारेकऱ्यांनी केले होते. पोलिसांच्या हाती मारेकऱ्यांनी आपसात केलेले फोनवरील व्हिडीओचे संभाषणाचा महत्वाचा पुरावा लागल्याने पोलिसांना या हत्येचा कट उधळता आला. दीपकला शनिवारी हरियाणातील भिवानी येथील तिग्रणा पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. दीपक सलमानच्या हत्येच्या कटातील संशयीत आरोपींची राहण्याची तसेच गुन्हा करताना वापरण्यात येणाऱ्या वाहनांची व्यवस्था करणार होता. दीपक हा सातत्याने व्हिडीओ कॅालद्वारे कटातील संशयीत आरोपितांच्या संपर्कात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दीपकच्या गुन्ह्यातील सहभागाविषयीची माहिती भिवानी (हरियाणा) येथील पोलीस अधीक्षक वरूण सिंघला यांना कळविल्यानंतर भिवानी येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र व त्यांच्या पथकाने दीपकला ताब्यात घेतले. भिवानी येथील न्यायालयासमोर दीपकला हजर केल्यावर न्यायालयाने ५ जूनपर्यंत दीपकला ट्रांझीट कोठडी रिमांड दिल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी दिली.

आज अवजड वाहनांसाठी अटल सागरी सेतू बंद

नवी मुंबई: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही. वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, हे बंदर रोड, शिवडी पुर्व मुंबई येथे ३१ दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा स्ट्रॉग रूम आहे. चार जून रोजी या ठिकाणी मत मोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटल सेतू शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिाट) येथे कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच माल वाहतूककरणारी वाहने यांना अटल सेतू दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या  मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी असेल. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यावेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग मंगळवारी चार जून  रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दरम्यान बंद असणार आहे. नवी मुंबई एमटीएनएल दक्षिण वाहिनी ते शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडी पूल मार्गे तर हलकी वाहनासाठी पर्यायी मार्ग – कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) असणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसुचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन बंब , रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.

श्रमिक जनता संघ युनियनच्या अध्यक्षपदी मेधा पाटकर यांची फेरनिवड !

ठाणे : श्रमिक जनता संघ युनियनची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवारी २ जून २०२४ रोजी ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे पार पडली.  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची युनियनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासचिव पदावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालीया, उपाध्यक्ष पदी डॉ संजय मंगला गोपाळ, खजिनदार म्हणून अविनाश नाईक, सह खजिनदार पदावर सुदर्शन साहू, सचिव पदावर सुनील कंद आणि संजय चौहान यांची पुढील काळासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारी समिती सदस्य म्हणून अर्चना पवार, अनिता कुमावत, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, बापू ओव्हाळ, सूरज वाल्मिकी, गौतम सहानी, पुजा पंडित, रोशन गायकर सुखेंदु मडैया, दुर्गेश खवसे राजकुमार दुबे, रामसुशील विश्वकर्मा, संतोष गुप्ता, बैजनाथ यादव, कृपाशंकर मिश्रा , चंद्रकांत चौधरी, विरेंद्र सावंत, नवीन मिश्रा आदी आणि कार्यालयीन सचिव म्हणून अजय भोसले यांची निवड करण्यात आली. कल्याण येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान मंगल कार्यालय येथे १ व २ जून रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आणि राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी भूषविले. महासचिव जगदीश खैरालिया यांनी प्रास्ताविक केले तर डॉ संजय मंगला गोपाळ यांनी सूत्रसंचालन केले. अधिवेशनात सरकारने चार लेबर कोड रद्द करून सर्व कामगार कायदे पुन्हा अंमलात आणावे, मैला सफाईचे काम यांत्रिक पद्धतीने करावे, मैन्युअल स्कैवेंजिंग प्रतिबंध कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, खाजगीकरण – कंत्राटीकरण पध्दत बंद करून कायम नोकरी द्यावी, समान कामाला समान वेतन अदा करा, कमीत कमी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळालेच पाहिजे, वर्षानुवर्षे मछली विक्री व्यवसाय करणाऱ्यांचे सर्वेक्षण करून अनुज्ञप्ती पत्र/ लायसन्स द्यावे, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा, गीग कामगारांसाठी कामगार कायदे लागू करा, ग्लोबल वार्मिंग आणि वाढत्या उष्णते पासून कष्टकरी श्रमिकांना सुरक्षा सुविधा पुरविल्या जाव्या,  मध्यप्रदेश येथील सेंच्युरी, मराल आणि पीडीपीएल कारखान्यातील श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठींबा देत विविध ठराव ही मंजूर करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या २०१५ पासूनच्या किमान वेतनाचा फरकाची सुमारे सात कोटी रक्कम त्वरित अदा करा, ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक मनोरूग्णालय, मध्य रेल मधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर युनियनच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्धार अधिवेशनात समारोप सत्रात करण्यात आला. शनिवारी १ जून रोजी कार्यशाळेत ज्येष्ठ अधिवक्ता रवींद्र नायर, सुधा भारद्वाज आणि एनएपीएमचे कार्यकर्ते श्री भार्गव यांनी युनियनचे प्रमुख कार्यकर्त्यांना विविध श्रमिक अधिनियम आणि श्रमिकांचे अधिकार या बाबतीत मार्गदर्शन केले होते. युनियनचे कार्यकारिणी सदस्य नविन मिश्रा यांनी प्रेरणादायी क्रांतीगीतं सादर करून सर्वांची मने जिंकली. वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके, अन्नसुरक्षा अभियानचे कार्यकर्ते विशाल जाधव आणि भारत जोडो अभियानच्या वरिष्ठ कार्यकर्त्या गुड्डी एस. एल., आणि घर बचाओ घरं बनाओ आंदोलनच्या संयोजिका पूनम कनौजिया यांनी समारोप सत्रात श्रमिक जनता संघाच्या मागण्यांना पाठींबा जाहीर केला. कल्याण युनिटचे प्रमुख आणि युनियनचे सचिव सुनील कंद यांच्या नेतृत्वाखाली शिबीर आणि अधिवेशन यशस्वी होण्यासाठी बापू ओव्हाळ, समीर दरेकर, शाम गायकवाड, हरेश ढमाले, सुनील दिवेकर, अजय भोसले, रुपेश जाधव, राधा किसन पांजगे, सुनिल भालेराव, दत्तात्रय जाधव आणि संदिप थूल आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

नालेसफाईची बहुतांशी कामे पूर्ण

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  केली पाहणी आपत्कालीन कक्ष कार्यान्वित, आपत्कालीन हेल्पलाईन क्र. ८६५७८८७१०१ ठाणे (०३) : ठाणे महापालिका क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारे यांची सफाई पूर्ण होत आली…

मोखाडा तालुक्यातील डोल्हारा तलावात बुडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील डोल्हारा येथील पाझर तलावात जान्हवी देवीदास कडू, या 11 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे. शनिवार 1 जुन रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून मोखाडा पोलिसांनी शोधमोहीम राबवली. मात्र रात्री उशीरापर्यंत जान्हवीचा तपास लागला नाही. अखेर, दुसर्या दिवशी तालुक्यातील घोसाळी येथील तरुणांच्या मदतीने जान्हवीचा मृतदेह हाती लागला आहे. या घटनेची मोखाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. याबाबत मोखाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी देवीदास कडु  (11), व तिची  मैत्रीण मनु किसन बोढेरे (12)  या दोघी डोल्हारा येथील बंधाऱ्यावर अंघोळीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी जान्हवी हीस पाण्याचा अंदाज आला नाही तसेच जान्हवी हिस पोहता येत नसल्याने ती खोल पाण्यात जावुन बुडुन मृत्यू पावली आहे. या घटनेची खबर जान्हवी चे मामा किशोर खोडे यांनी मोखाडा पोलिसांना दिली आहे‌. जान्हवीच्या मृत्यू बाबत माझा कोणावर संशय नसुन काही एक तक्रार नसल्याची खबर खोडे यांनी दिली आहे‌. मोखाड्यातील साहसी तरुणांची मदत मृत जान्हवीचा तपास उशीरा पर्यंत लागत नसल्याने पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल  (एन्ा.डी.आर.एफ.) यांना पाचारण केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी मोखाड्याजवळील घोसाळी येथील वामन जाणू माळी, जगन सक्रू माळी, नाना सक्रू धोंडगा, शिवराम वसंत दिघा, दिनकर झिपर मुरथडे आणि रावजी लक्ष्मण दिघा या सर्वानी धाडसी व अथक प्रयत्न करून जान्हवीचा मृतदेह शोधून काढला. त्यांच्या सत्कार्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गिते यांनी कौतुक केले असून मोखाडा पोलिसांना तपास कामात सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत. पालकांनी पाल्यांची काळजी घ्यावी उन्हाळी सुट्टीचे दिवस असल्याने आपली पाल्ये आजोळी जावून सुट्टीचा मनमुराद आनंद उपभोगत असतात. मात्र त्यातून अनेक दुर्घटना घडत असतात आणि त्यायोगे आपल्या जीवलगांची जीवीत हानी आपल्याला पाहवी लागते. ही कधीही भरून न निघणारी हानी असल्याने पालकांनी आप आपल्या पाल्यांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच खबरदारीच्या दृष्टीने त्यांचे योग्य ते समूपदेशन करण्याचे आवाहन मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदीप गिते यांनी केले आहे.

नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं

मंत्रालयासमोरची घटना मुंबई : मुंबईतल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. रस्तोगी यांची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. लिपी रस्तोगी ही LLB करत होती. वयाच्या २७ व्या वर्षी तिने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं आहे. त्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे असंही कळतं आहे मात्र त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या मुलीची आई राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.