Author: bittambatami.com

अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध – मनीष सिंह

  रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ चे प्रकाशन       ठाणे : न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार असल्याचे आश्वासन मुंबई मंडळाचे वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी मनीष सिंह यांनी दिले. रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मनीष सिंह बोलत होते. ‘आजोबापासून मी रेल्वे परिवाराचा सदस्य असून माझे वडील, चुलते सुद्धा रेल्वे कर्मचारी होते. त्यामुळे समस्त रेल्वे परिवाराविषयी मला नितांत आदर असून पदाच्या माध्यमातून मला मिळालेल्या अधिकाराचा वापर कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक कसा करता येईल यावर माझा कटाक्ष राहिला आहे. तुमच्या न्याय अडचणी सोडविण्यासाठी मी रेल्वे पेन्शनर्ससोबत सदैव उपलब्ध राहणार’, असे आश्वासन देऊन पुढे ते म्हणाले , ‘तुमच्या या मराठी भाषेतील ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’चे भविष्यात हिंदी व इंग्रजी भाषेत रूपांतरित होऊन ते अधिकाधिक रेल्वे पेन्शनर्स पर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरो.’ रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे मुखपत्र ‘रेल्वे पेन्शनर्स वार्ता’ या त्रैमासिकाचे प्रकाशन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी, मुंबई मंडल मनीष सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी, २६ जुलै रोजी रेल्वे स्कुल कल्याण येथे शेकडो रेल्वे पेन्शनर्स॔च्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आले. याप्रसंगी मुंबई मंडळ मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ. महेंद्र गांगुर्डे, रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री अतर सिंह, रिटायर्ड रेल्वे पेन्शनर्स वेलफेयर असोसिएशनचे झोनल अध्यक्ष एन. हरिदासन, झोनल महामंत्री आर. के. सारस्वत, उपाध्यक्ष अरविंद माने, कोषाध्यक्ष अनुप कुमार, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आनंदी व निरामय जीवनासाठी पेन्शनर्सनी आपल्या खाण्या -पिण्याच्या सवयित व जिवन जगण्याच्या शैलीत बदल करने अत्यंत आवश्यक आहे. उतारवयात अधिक खाणे टाळावे तसेच एकाच ठिकाणी तासनतास बसून रहाणे, अथवा झोपून रहाणे धोकादायक असून शरीराची सतत हालचाल चालू ठेवणे गरजेचे आहे. मित्र मंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणे, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे, यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवल्यास आपण औषधांपासून अलिप्त राहू शकतो व स्वतःला आनंदी ठेऊ शकतो, असे मनोगत मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ महेंद्र गांगुर्डे यांनी व्यक्त केले.यावेळी रेल्वेच्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ज्योती श्रीवास्तव, ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन चे राष्ट्रीय महामंत्री श्री अतर सिंह, कल्याण (प.) शाखेचे ज्येष्ठ अध्यक्ष एस के घुमरे, सिसोदिया आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन हरिदासन यांनी केले तर सूत्रसंचालन आर के सारस्वत यांनी केले व आभारप्रदर्शन अरविंद माने यांनी केले. 000

 ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे पत्रकार पाल्यांचा गुणगौरव

ठाणे : करिअर घडवतानाही छंद जोपसता येतात. मात्र त्यात गफलत करू नका. आपल्या पालकांनी मोठया कष्टाने तुम्हाला घडवले आहेत. त्यांची जाण ठेवत योग्य कार्यक्षेत्र निवडा. कार्यक्षेत्र कोणतेही निवडत असला तरी एकाग्रतेने परिश्रम करा, सोशल मिडीयाच्या मागे न धावता स्क्रीनटायमिंग कमी करा, खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यशाची ही गुरुकिल्ली पत्रकारांच्या पाल्यांना दिली. निमित्त होते दहावी बारावीत उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव आयोजित केला जातो. कोव्हिड काळात बंद झालेला हा उपक्रम पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी पुन्हा सुरू केला आहे. शनिवारी ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दहावी शालंत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तनिष्का वाजपेयी, प्रांजली मोरे, ऋग्वेद घरत, उमैमा अन्सारी, सिद्धार्थ पांडे तर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अथर्व गुंडे, कीर्ती कनोजिया, पद्मजा शिंदे, दुर्वा आचार्य, रिथिक्षा शेट्टी आदी विद्यार्थांचा सत्कार  खासदार नरेश म्हस्के, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, रोख रक्कम, पुस्तक आणि प्रमाणपत्र असे या गौरवाचा स्वरुप होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, पत्रकार दिवसभर बाहेर फिल्डवर बातमीच्या शोधात काम करत असतात. अनेक पत्रकारांचा संघर्ष आपण पाहिला आहे. त्यांच्या खडतर परिश्रमामुळे फलीत म्हणून तुमचा आज गुणगौरव होत आहे. त्यांचे हे कष्ट कधी विसरू नका. करिअर घडवताना उदरनिर्वाह होईल आणि ताठ मानेने समाजात जगता येईल असे क्षेत्र निवडा असे ते म्हणाले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनीही सोशल मिडीयाचा योग्य वापर कसा करायचा याविषयी मार्गदर्शन केले. सर्व  क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे मोबाईलच्या स्क्रीनमधून जितके ज्ञान मिळवता येईल तितकेच घ्या, बाकी वापर टाळा असा सल्ला दिला. तसेच एकाग्र पद्धतीने परिश्रम घेतले तर स्वप्न नक्की पूर्ण होती ही यशाची गुरुकिल्ली दिली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी, ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष आनंद कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सचिव निलेश पानमंद सह सचिव गणेश थोरात आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. पत्रकार संघाचे सदस्य अनुपमा गुंडे, अमर राजभर, सचिन देशमाने, अशोक गुप्ता, प्रफुल गांगुर्डे, पंकज रोडेकर आणि संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी यांनी केले. चौकट पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी ठाण्यातील पत्रकारांना योजनेतून जी घरे मिळाली होती. मात्र एका ना हरकत प्रमाणपत्रामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दूर केली. त्यामुळे या कार्यक्रमाचे औचित्य साधत पत्रकारांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ना हरकत प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच पत्रकारांच्या वैद्यकीय विम्याच्या नुतनीकरणाचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्रेही यावेळी वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या रास्त मागण्या यापुढेही पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त राव यांनी दिले. तर पत्रकारांच्या विस्तारित कक्षासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी सुचना देत अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी प्रशासनाला दिले. 0000

 रेल्वे स्वच्छतागृह कंत्राटदाराकडून मुतारीसाठीही पैसे वसुली

संजय वाघुलेंकडून रेल्वेकडे तक्रार     ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहातील कंत्राटदाराकडून दररोज हजारो प्रवाशांकडून मुतारीसाठी एक ते दोन रुपयांची आकारणी करून प्रवाशांची फसवणूक केली जात आहे. मोफत असलेल्या सुविधा न देता कंत्राटदाराकडून हजारो रुपयांची वसूली केली जात आहे. या प्रकाराविरोधात भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली असून, स्वच्छतागृहाबाहेर मुतारी मोफत असल्याची पत्रके लावली आहेत. ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये दररोज सुमारे साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची वर्दळ आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहे उभारली आहेत. तर काही स्वच्छतागृहे पे अॅण्ड यूज तत्वावर आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये मुतारीचा वापर मोफत आहे. परंतु, स्वच्छतागृहांच्या बहुसंख्य कंत्राटदारांकडून प्रत्येक प्रवाशाकडून एक ते दोन रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांबाहेर रेल्वेची स्वच्छतागृहाची नियमावली असलेली पत्रके लावली. तसेच कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांकडून मुतारीसाठी पैसे न घेण्याचा इशारा दिला. या संदर्भात ठाणे रेल्वे स्टेशनच्या व्यवस्थापकांकडेही तक्रार करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 00000

 जिल्ह्यातील ८ तलाव गाळमुक्त

२२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश       ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ राबविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे. सन २०२४ व २०२५ या वर्षात मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी व कल्याण या पाच तालुक्यात पाझर तलाव व गाव तलावाचे एकूण ५० तलाव गाळमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जून २०२४ पुर्वी जिल्ह्यातील एकूण ८ तलावातील गाळ २२ हजार ०५० क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या ८ तलावातील पाणीसाठा दोन कोटी २० लाख ५० हजार लिटरने वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ४२ गाव तलाव व पाझर तलावांची काम मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील ५, कल्याण तालुक्यातील २, शहापूर तालुक्यातील १ अशी एकूण ८ काय जून २०२४ पुर्वी  पूर्ण करण्यात आली आहेत. मागील वर्षी जून २०२३ पूर्वी १६ कामे पूर्ण करण्यात आली असून ३६ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या तलावांमध्ये ३ कोटी ६० लाख लिटर पाणीसाठा वाढला आहे- दिलीप जोकार, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद ठाणे  ग्रामीण भागातील पाच तालुक्यात ६५ सिंचन व पाझर तलाव आहेत. लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडील आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तलावाचे प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता १८ हजार ४०७ स.घ.मी. असून सद्यस्थिती उपलब्ध पाणीसाठा १६ हजार ४८०स.घ.मी. आहे. 0000

 झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!

अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!     मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन झालेले नाही. उलटपक्षी ज्या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्यात आली आहे, त्यानुसारच चटईक्षेत्रफळ वितरित करण्यात आले असून ते योग्य आहे, अशी भूमिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नगर विकास विभागाला लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचे कायदेशीर मत सोबत जोडले आहे. अशा १८ योजनांना पालिकेकडून याआधीच अभय मिळाले असले तरी भविष्यात अशा योजना मंजूर करावयाच्या किंवा नाही, याबाबत संदिग्धता असल्यामुळे अनेक योजना प्रतीक्षेत आहेत. झोपु योजनांसाठी विकास नियंत्रण नियमावलीत ३३(१०) अशी तर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनासाठी संक्रमण सदनिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नव्या नियमावलीत ३३(११) ही तरतूद आहे. यासाठी झोपु प्राधिकरण नियोजन यंत्रणा आहे. या दोन तरतुदी वगळल्या तर इतर सर्व तरतुदींसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण असून यापुढे झोपु प्राधिकरणाने ३३(१२)(ब) (रस्त्यावर असलेले अतिक्रमण वा अडथळे दूर करुन संबंधितांना सामावून घेणे) तसेच ३३(१९) (व्यावसायिक वापर केल्यास पाच इतके चटईक्षेत्रफळ) या तरतुदींसोबत झोपु योजना संलग्न करू नयेत तसेच संलग्न केलेल्या योजना रद्द कराव्यात, असे पत्र झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले होते. या पत्राबाबत झोपु प्राधिकरणाने नगरविकास विभागाला स्पष्टीकरण करून आपला निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नगरविकास विभाग काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ३३(१२)(ब) अंतर्गत पाच तर ३३(१९) अंतर्गत १३ झोपु योजना आतापर्यंत मंजूर झाल्या आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे. प्राधिकरणाने या पत्रात म्हटले आहे की, ३३ (९) म्हणजे समुह पुनर्विकास वगळता कुठल्याही तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याची विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद आहे. या तरतुदीसाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. उर्वरित तरतुदींसाठी कुठेही महापालिका आयुक्त असा उल्लेख नाही. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आपल्या अधिकारात निर्णय घेऊ शकतात. ३३(१२)(ब) या तरतुदीशी झोपु योजना संलग्न करण्याचे पत्र महापालिकेनेच पहिल्यांदा दिले होते. आताही महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडूनच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. याबाबत झोपु प्राधिकरणाने माजी न्यायमूर्ती भोसले यांचे मत घेतले असून त्यांनाही महापालिका आयुक्तांना असे करता येणार नाही. फार तर याबाबत राज्य शासनाकडे दाद मागावी, असे भोसले यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम – किशन जावळे

रायगड : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने ०१ जुलै २०२४ रोजीच्या…

२९ जुलैनंतर पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही – सोमनाथ घार्गे

रायगड : २९ जुलै २०२४ रोजीनंतर मैदानी चाचणीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत समावून घेतले जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग तथा अध्यक्ष, रायगड जिल्हा पोलीस भरती…

सर्वेश जावळेचा वाढदिवस कायम स्मरणात राहील असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा

मुंबई : अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन साठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND (NAB) ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त…

 कळंब पोश्री नदीपुलाला भगदाडामुळे वाहतुकीस धोकादायक

ताबडतोब उपाययोजना करा – विनोद भोईर     नेरळ : कळंब पोशिर नदीपुलावर मोठे भगदाड पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात, अशी प्रतिक्रिया विनोद भोईर ( ग्रामस्थ वारे) यांनी दिली आहे. तर कर्जत मुरबाड महामार्गावर असलेल्या पोशीर नदी पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे,त्यात सततच्या पावसाने पुलाला मोठे भगदाड पडून पुलाच्या एक बाजूचा आतील भराव वाहून गेला आहे,पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिली तर अवजड वाहनाच्या भाराने पुलाचा कळंब कडील भाग पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी, अशी प्रतिक्रिया दीपक म्हसे ( ग्रामस्थ खैरपाडा-कळंब) यांनी दिली आहे. कर्जत मुरबाड महामार्गावरील कळंब येथील पोश्री नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो ,भगदाड पडलेल्या भागात बेरिकेट लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.मात्र सततधार पावसाने तसेच अवजड वाहनाच्या भारामुळे पुलाचा एकभाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मागील आठवड्या भरापासून सततधार कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे,त्यातच ठाणे आणी रायगड जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजल्या जाणाऱ्या कर्जत मुरबाड हायवे वरील कळंब येथील पोशीर नदीपुलावर कळंब कडील भागात मातीचा भराव खचल्याने पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे, शनिवारी सायंकाळी एका वाहन धारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्या असल्याचे दिसले तसेच पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून मोठा भगदाड पडला असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना या बाबत कळवले असता पोलिसांनी खचलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरता स्वरूपात बॅरिकेट्स लावल्या असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, सुमारे ७० ते ८० वर्ष जुनं बांधकाम असलेल्या व दगडी पिलरवर उभारलेल्या पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली आहे मात्र जुनं बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालले आहे ,पुलाच स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत ,वृक्ष- वेळीच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणिक कमकुवत होत आहे,त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून यापुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ,वाहनधारक करत आहे.

कुलगुरू प्रा. डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांना मानद कर्नल पदवी भारत सरकारकडून जाहीर

२९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा अशोक गायकवाड     रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.२९ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. ही पदवी विशिष्ट सेवा पदक मिळवलेले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून १९ विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी ,वास्तुशास्त्र ,हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे ३४० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. विद्यापीठ परिवाराकडून संलग्नित महाविद्यालयाकडून तसेच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 00000