Author: bittambatami.com

निवडणूक निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज-दीपक सिंगला

अशोक गायकवाड पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात होणारी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून मतदारांनी आपला संविधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करून इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देताना दीपक सिंगला बोलत होते. यावेळी पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस उप अधीक्षक सत्य साई कार्तिक, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत कराडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश माने, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, माध्यम समन्वयक शिवप्रसाद बागडी, किरण गायकवाड यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. मतदान साहित्य वितरण, मतदान केंद्राच्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, टपाली मतदानाची आकडेवारी, आचारसंहिता कालावधीत केलेली कारवाई, संवेदनशील तसेच विशेष मतदान केंद्रांची माहिती, मावळ मतदारसंघात येणाऱ्या मतदारांची आकडेवारी, दिव्यांग तसेच तृतीयपंथी मतदारांची आकडेवारी, मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या मनुष्यबळाची माहिती, मतदान साहित्य वाटप प्रक्रिया, गृहमतदानाची आकडेवारी, आदर्श मतदान केंद्रांची माहिती, वाहतुक आराखडा, मतदान यंत्रांची आकडेवारी तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर असलेल्या विविध निर्बंध आणि त्याबाबतच्या नियमावलीबाबत दीपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. मावळ मतदारसंघात एकूण १६ संवेदनशील मतदान केंद्रे असून या मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे देखील ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती देताना सत्य साई कार्तिक म्हणाले, भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेद्वारे पोलीस गस्त, पोलीस पथ संचलन तसेच प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय विविध पथकांद्वारे देखील पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे. पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मतदान केंद्र तसेच इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे, असे सत्य साई कार्तिक यांनी सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सुमारे २ हजार ५६६ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे एकूण ११ हजार ४८४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच २९१ सेक्टर अधिकारी देखील नेमण्यात आले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय रविवार १२ मे रोजी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्याचे वितरण केले जाणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, उन्हापासून बचाव होण्यासाठी शेड, प्रतिक्षा कक्ष तसेच प्रथमोपचार पेटीसह ओआरएस सुविधाही देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती दीपक सिंगला यांनी दिली. मतदानाच्या दिवशी संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडण्यात आली आहेत. तसेच संपुर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तात्काळ समन्वय करण्यासाठी आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रत्येकी १ असे एकूण ७ नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष समन्वयासाठी २ उपजिल्हाधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवून माहिती संकलन आणि जलद गतीने संवाद साधण्यासाठी ३ तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी एका कार्यकारी अभियंत्याची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालय स्तरावरील नियंत्रण कक्षाची रचना करण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातंर्गत येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात ओळख मतदार चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले.मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात ४४ भरारी पथक, १९ तपासणी पथक, ३८ स्थिर सर्वेक्षण पथक, १२ व्हिडीओ सर्वेक्षण पथक, ६ कृती दलासह ईव्हीएम सुरक्षा पथक आणि इतर आवश्यक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून या पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटी ४९ लाख रुपये रोख, ६९ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मद्य, ६२ लाख ४७ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, १ कोटी ९८ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान वस्तू, २० वाहनांमधून ३९ लाख १२ हजार रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच संबंधितांवर विविध कलमांच्या आधारे एकूण २७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दीपक सिंगला यांनी दिली. *चौकट* १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ रोजी , बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रिडा संकुलातील वेट लिफ्टींग हॉलमध्ये मतमोजणीची प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे २४, १४, १४, १६, २४ आणि १६ असे एकूण १०८ मत मोजणीचे टेबल असणार आहेत. पिंपरीसाठी २३ फेऱ्या, कर्जतसाठी २४ फेऱ्या, उरणसाठी २४ फेऱ्य़ा, मावळसाठी २५ फेऱ्या, चिंचवडसाठी २३ फेऱ्या तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या अशा एकूण १४४ मतमोजणीच्या फेऱ्या होतील. त्याचबरोबर टपाली मतदानासाठी ४ टेबल, ईटीपीबीएससाठी १ टेबल असे एकूण ५ टेबल असतील. एकूण ११३ टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

25 ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तयारी तरत आहे. 25 ठाणे लोकसभा…

कल्याण लोकससभा मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान

ठाणे :निवडणूक कर्तव्यावर असलेले परंतु ज्यांचे मतदान कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आज टपाली मतदानाची सुविधा 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सर्व 6 विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात आली होती. यावेळी 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेल्या व सध्या नेमणूक असलेल्या क्षेत्राबाहेर राहणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील तसेच निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी,कर्मचारी यांनी टपाली मतदान केले. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे तर 143- डोंबिवली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांनी कल्याण येथील विष्णुदास भावे कलामंदिर येथे टपाली मतदान केले. तर 144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी देखील टपाली मतदान केले. त्याचप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच निवडणूक कर्तव्यावरील आणि 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ क्षेत्राबाहेर मतदार असलेल्या 564 अधिकारी/ कर्मचारी वर्गाने टपाली मतदानाद्वारे (postal ballate) आपल्या मतदानाचा हक्क काल बजावला. अत्यावश्यक सेवेत असलेल्या, 24-कल्याण लोकसभा मतदार संघातील नोंदणीकृत मतदार-पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी, अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 /12 ड व EDC  कार्यप्रमाण पत्राकरीता नमुना 12 अ मध्ये अर्ज केला होता व जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत अशा 12 अ च्या पात्र कर्मचाऱ्यांना EDC  प्रमाणपत्र वितरण करणे,  तसेच नमुना 12 / नमुना 12 ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन, टपाली मतपत्रिकांच्या मतदानाकरीता निवडणूक निर्णय अधिकारी, 24- कल्याण लोकसभा मतदार संघ यांच्या स्तरावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदान केले. 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ परिक्षेत्राबाहेरील निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा दि 17 मे व 18 मे 2024 रोजी देखील उपलब्ध राहणार आहे.

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान-संजय यादव

अशोक गायकवाड मुंबई : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी सांगितले. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी यादव यांनी यावेळी दिली.

कल्याण मोमीस समूहाने बाईक रॅलीच्या माध्यमातून केली मतदान जनजागृती

ठाणे : कल्याण पश्चिम मतदारसंघात कल्याण मोमीस समूहातर्फे मतदार जनजागृतीकरिता बाईक रॅली काढण्यात आली होती. या बाईक रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. आम्ही नक्की मतदान करणार असा संदेश या…

युजीसी नेट परीक्षेसाठी १५ मे पर्यंत मुदतवाढ

मुंबई : देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये विविध विषयांमध्ये पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट या परीक्षेची मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० मे होत. यूजीसी नेट या परीक्षेचे नियोजन मागील काही वर्षांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)च्या मार्फत केले जाते. यंदाही एनटीएमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका सुरू असल्याने अनेक शिक्षक, कर्मचारी हे या निवडणूक कामात असल्याने यूजीसी नेटसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार १५ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. तसेच १६ ते १७ मे रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थी परीक्षा शुल्क भरू शकतात. ऑनलाईन प्रवेश अर्जात काही सुधारणा करायची असल्यास त्यासाठी १८ ते २० मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ugcnet.nta.ac.in या लिंकवर जाऊन नोंदणी करता येईल. यूजीसी नेट परीक्षेला बसणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ हजार १५० रुपये प्रवेश शुल्क आहे; तर ईडब्लूएस, ओबीसी, एनसीएल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये आणि एसटी, एससी, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी ३२५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

मतदानासाठी २० मे रोजी भरपगारी सुट्टी – अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात २० मे  रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात पाचव्या टप्प्यात सोमवार २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दि. २० मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून देय आहे. १.  सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. २. ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ३. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे १३५ ब (२) नुसार कारवाईस पात्र राहतील. ४. हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

ठाकरे गटाकडून वायकरांना नोटीस

मुंबई : ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्यासहीत कुटुंबियांना अटक होण्याची भीती होती. ती टाळण्यासाठीच मनाविरुद्ध एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला अशी जाहीर कबुल देणाऱ्या रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात…

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज ११ मे, आजचा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास महामंडळ ( टी डी बी )…