Category: होम

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा

कल्याणामध्ये रंगणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’  शरीरसौष्ठव स्पर्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजय साळवी यांच्या आयोजनाखाली होणार भव्यदिव्य स्पर्धा कल्याण : हिंदुस्तानातील तमाम हिंदुप्रेमी नागरिकांचे आराध्य दैवत असणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण शहर शिवसेना शाखेने शरीर सौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोण होणार ‘हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ चा मानकरी हे पाहणे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवसेना उपनेते विजय साळवी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण शहर शाखा यांच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट श्री २०२६’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा शुक्रवार ६ फेब्रुवारीला  सायंकाळी ६ वाजता कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) संतोषी माता मंदिर रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेस ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनची मान्यता आहे. या स्पर्धेला कल्याणकर क्रीडाप्रेमींनी व खेळाडूंनी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण पश्चिम व मुरबाड जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, कल्याण पश्चिम शहरप्रमुख बाळा परब, कल्याण पश्चिम विधानसभा संघटक किशोर शुक्ला आदींनी केले आहे.

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ध्यानधारणेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कल्याण : विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून एकाग्रता वाढवणे, स्मरणशक्ती सुधारणा तसेच मोबाईलचा अतिरेक सोशल मीडिया, टेलिव्हिजनमुळे एकाग्रता भंग होणे, मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी व ताण-तणाव नियंत्रण याबाबत ध्यानधारणा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक व सर्च विदिन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल काजरोळकर यांनी मार्गदर्शन केले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर व विश्वस्त लता परब, कैलास रेडीज यांच्या पुढाकाराने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, परळी, वाडा, जिल्हा–पालघर येथे विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ध्यान (मेडिटेशन) शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास बंजारा यांनी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक संजय हुंबरे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व इतर कर्मचारी यांचे आभार मानले.

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले

केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांना शिवसेना नगरसेवकांनी झापले कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयोजित  महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना झापले. महापालिकेची पहिली महासभा ही आज पार पडली. ती खऱ्या अर्थाने गाजली, या महासभेत शिवसेना नगरसेवक मल्लिक शेट्टी यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. या महासभेत तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही,  बोलू नका, नाहीतर बाहेर पडा असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांना खूप माज आलाय असं ही ते म्हणाले.  महापौर निवडीनंतर भाषणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि मल्लेश शेट्टी यांच्यामध्ये वाद पहायला मिळाला.

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी

दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी व डोंबिवली मार्गावरील बस फेऱ्या वाढवण्याची मनसेची मागणी आरती परब दिवा : दिवा रेल्वे स्टेशन ते पडले बीएसयुपी तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गांवरील ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील बसची संख्या व फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसे दिवा शहराचे सचिव प्रशांत प्रभाकर गावडे यांनी ठाणे महानगर पालिकेच्या वाहतूक व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे. दिवा रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पडले बीएसयुपी व डोंबिवली या मार्गांवर परिवहन सेवेच्या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही सध्या या मार्गांवरील बसची संख्या अपुरी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवा स्टेशन ते पडले बीएसयुपी या मार्गावर केवळ दोन बसेस असून त्यामधून फक्त सहा फेऱ्या होत असल्याने दोन फेऱ्यांमधील अंतर एक ते दीड तासांपर्यंत जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच दिवा स्टेशन ते डोंबिवली या मार्गावरही फक्त दोन बसेस असल्याने फेऱ्यांमधील अंतर मोठे असून अनेक वेळा ऐनवेळी बस रद्द केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. विशेषतः रविवारी अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत असून याबाबत प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने प्रशासनाबाबत नाराजी वाढत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. दिवा शहर व परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून अनेक नागरिक डोंबिवली एमआयडीसी, खिडकाळी आदी भागात जाण्यासाठी या परिवहन सेवेवर अवलंबून आहेत. भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेता संबंधित मार्गांवरील बसची संख्या व फेऱ्या वाढवणे अत्यावश्यक असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय कमी होऊन परिवहन सेवेचे उत्पन्न व विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून दिवा शहरातील वरील मार्गांवरील बस सेवा तातडीने सुधारावी, अशी मागणी मनसे दिवा शहराच्या वतीने प्रशांत प्रभाकर गावडे यांनी केली आहे.

  विनय चंद्रकांत शाह, परिचर, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या सेवानिवृत्ती सोहळयास प्रकाश नरसाणा,तुषार परब, रजनीकांत काजरोळकर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.

 `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

श्री गणराज नृत्य कला निकेतन, ठाणे या संस्थेच्या २५ व्या वर्धापन दिननिमित्त `नृत्यविविधा’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे -भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन व संवर्धन करणाऱ्या श्री गणराज नृत्य…

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड

शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची ठाणे महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी निवड अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत ठाणे शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांची, तर उपमहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली. मंगळवारी, ३ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता ठाणे महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी, ठाणे तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन व स्वागत केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सीएसआर निधीतून तिसरा सोलर हायमास्ट कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात शाश्वत विकासावर भर देवून शहराचा विकास करण्याचा महापालिका आयुक्त अभिनव गोयल, यांचा मानस आहे. तसेच महापालिका क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम हे कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून कामे हाती घेण्यात यावी व त्यासाठी महापालिका अधिकारी यांनी पाठपुरावा करावा, असे महापालिका आयुक्त यांचे धोरण आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सहजानंद चौक कल्याण (प) येथे तिसरा सोलार हायमास्ट हा मे. बजाज इलेक्ट्रिकल या कंपनीने कॉरपोरेट सामाजिक बांधिलकी निधीतून उपलब्ध करुन दिला असून सोलार हायमास्ट फिटींग्सचे लोकार्पण सोमवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याहस्ते संपन्न झाले. उदघाटनावेळी विद्युत यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे, उप अभियंता भागवत पाटील व मे. बजाज इलेक्ट्रिकल कंपनीचे रिजनल हेड सरोज कुमार व ओरीया हेड तरण कोहली उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत तीन सोलार हायमास्ट कॉरपोरेट सामाजिक जबाबदारी निधी मधून उभारण्यात आलेले आहेत. कल्याण (प) गणपती चौक गांधारे, इंदिरानगर चौक डोंबिवली (पूर्व) व सहजानंद चौक, कल्याण (प) या ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. सोलार हायमास्ट हे सुर्याच्या किरणांवर कार्यान्वित होणार असून त्यास विजेची गरज नाही तसेच महावितरण कंपनीची विज खंडीत झाल्यानंतर सुध्दा हे सोलार हायमास्ट कार्यान्वित राहतील, त्यामुळे चौकात प्रकाश राहणार असल्याने नागरीकांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होणार आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील १४४ हायमास्ट पैकी उर्वरीत १४१ हायमास्ट हे सोलार हायमास्ट करण्यासाठी  नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यानशिवाजी पार्क, दादर येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अँड गाईड हॉलमध्ये ३३ व्या वरिष्ठ मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षावरील ), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षावरील), आंतर कचेरी व आंतर क्लब अशा एकंदर सहा गटांमध्ये हि स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या क्लब मार्फत नावे स्वीकारली जाणार असल्याने खेळाडूंनी त्वरित आपल्या क्लबशी संपर्क साधावा. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, मुंबई येथे उपलब्ध असून दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नावे स्वीकारली जातील. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत

३५ वी किशोर–किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा महाराष्ट्राचे किशोर–किशोरी संघ उपांत्य फेरीत कुरुक्षेत्रच्या थीम पार्क मैदानावर वेग, चपळाई आणि डावपेचांचा महाउत्सव हरियाणा, क्री. प्र. : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरु असलेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. थीम पार्क मैदानावर उपउपांत्य फेरीतील सामन्यांत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता वेगवान आक्रमण, भक्कम संरक्षण आणि अचूक डावपेचांचा प्रत्यय दिला. उपांत्य फेरीत किशोर गटात महाराष्ट्र विरुद्ध ओडिसा, कोल्हापूर विरुद्ध उत्तरप्रदेश, तर किशोरी गटात महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, राजस्थान विरुद्ध हरयाणा अशी थरारक लढती रंगणार आहे. किशोर गट : महाराष्ट्राची मणिपूरवर दणदणीत सरशी उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने मणिपूरचा ३०–२१ असा ५.३५ मि. राखून ९ गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ (२.५०, १.२० मि. संरक्षण व २ गुण), सुरज खाडे (१.१०, १.५५ मि. संरक्षण), प्रफुल्ल वसावे (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), विक्रम राठोड (१.२० मि. संरक्षण व २ गुण) यांनी सलग उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मणिपूरकडून एल. सिंग (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), पी. पोहिंबा (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंज दिली. किशोरी गट : महाराष्ट्राचा विदर्भावर एकतर्फी डावाने विजय किशोरी गटात महाराष्ट्राने विदर्भावर एक डाव आणि १२ गुण राखून (२८–१६) विजय मिळवला. महाराष्ट्राकडून अनुषा तामखडे (२.५० मि. संरक्षण व ४ गुण), अपर्णा वर्दे (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), राही पाटील (२.१० मि. संरक्षण), कार्तिकी यलमार (१.५० मि. संरक्षण), ऋतुजा सुरवसे (१.३० मि. संरक्षण), पियुशा पानमळकर (नाबाद १.२० मि. संरक्षण) यांनी सलग दमदार कामगिरी केली. विदर्भकडून नव्या दुग्गा (१ मि. संरक्षण), मनवी राजू (१ मि. संरक्षण व ४ गुण), कोमल ठाकरे (४ गुण) यांनी चांगला खेळ केला. किशोर गट : ओडिसाची तामिळनाडूवर एकतर्फी धडक ओडिसाने तामिळनाडूचा २३ गुणांनी (४८–२५) पराभव केला. ओडिसाकडून सत्या (२.३०, २ मि. संरक्षण व १२ गुण), अमरज्योत (१.२०, १ मि. संरक्षण व १० गुण), धनंजय दास (१.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ साकारला. तामिळनाडूकडून कौशिक (१.५० मि. संरक्षण व २ गुण) याने किल्ला लढवला. किशोर गट : उत्तरप्रदेशची विदर्भवर दणदणीत बाजी उत्तरप्रदेशने विदर्भवर २९ गुणांनी (५३–२४) मात केली. उत्तरप्रदेशकडून देव कुमार (१.४० मि. संरक्षण व ८ गुण), बिट्टु यादव (१.४५, १.१० मि. संरक्षण व ६ गुण), इशान (१, २ मि. संरक्षण व ८ गुण) यांनी प्रभावी कामगिरी केली. विदर्भकडून रोशन पालटे (१ मि. संरक्षण व ४ गुण) याने प्रतिकार केला.…