नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक-दिप्ती गौर मुखर्जी
अशोक गायकवाड नवी मुंबई :नमुंमपा वाशी रूग्णालयामधील आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधानकारक असल्याचे मत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती गौर मुखर्जी यांनी व्यक्त केले. आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाची पाहणी करण्याकरिता आज राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी आणि संचालक एलपीएल विक्रम पगारीया यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयास भेट दिली. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजेश म्हात्रे उपस्थित होते. सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या अंतर्गत आभा ॲपव्दारे रुग्णांची आभा नोंदणी करणे, त्यांचे टोकन नंबर तयार करणे व त्याव्दारे आभा नोंदणी कक्षातून त्वरित केसपेपर मिळविणे अशा कामांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन आदी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थितांना दिली तसेच नजिकच्या काळात रुग्णालयविषयक सर्व कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येत असल्याचेही नमूद केले. आभा ॲपव्दारे नोंदणीकरण झालेल्या रुग्णांना लांबलचक रांगा टाळून त्वरित केसपेपर मिळत असल्यामुळे रुग्णांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आभा नंबर हा युनिक असल्यामुळे संपूर्ण देशात आभा ॲपचा वापर होत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची सर्व माहिती जसे की यापूर्वीचा आजार, त्यावर झालेला उपचार, तपासण्या, औषधे अशी सर्व प्रकारची माहिती रुग्णाच्या सहमतीने उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांना चांगल्या व दर्जेदार रुग्णसेवा कमी कालावधीत देता येणे शक्य होणार आहे. आभा ॲपचा वापर होत असलेल्या खाजगी रुग्णालये, प्रयोगशाळा येथे देखील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.दिप्ती गौर मुखर्जी यांनी सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे आयुष्यमान भारत डिजीटल मिशनच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करुन हे कामकाज प्रभावीपणे होत असल्याचे नमूद केले. या योजनेचे पुढील टप्प्यातील कामकाज करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत नमुंमपाला याकामी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. या भेटी दरम्यान कोपरखैरणे येथे जूनी क्षेपणभूमी शास्त्रोक्तरित्या बंद करून त्याठिकाणी बनविण्यात आलेल्या निसर्गेद्यानाला, तेथील मियावाकी जंगल परिसराला तसेच त्या जवळील टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आकांक्षी शौचालयाचीही पाहणी करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणशील नाविन्यपूर्ण कामांची प्रशंसा केली.
