Category: होम

 लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती

लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना मिळाली नियुक्ती आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने महात्मा गांधी स्मारक रुग्णालयासाठी ऐतिहासिक निर्णय मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील कामगारांच्या दिर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच लाड पागे अंतर्गत नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, लाड पागे वारसाहक्काने ६ कामगारांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जाहीर झाला. लाड-पागे समिती अंतर्गत सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न सन २०१५ पासून सुरू होता. अथक पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर महात्मा गांधी स्मारक रुग्णालयातील एकूण ७८ रिक्त पदांवर सफाई कामगारांच्या पात्र वारसांना नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय, श्रमिक उत्कर्ष सभा आणि महात्मा गांधी स्मारक कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला आहे. या विषयावर आमदार प्रसाद लाड आणि आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला होता. त्याच प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून, २०१५ पासून प्रलंबित असलेल्या ६ पात्र वारसांना प्रजासत्ताक दिनी अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट आश्वासन दिले की, येत्या एका महिन्यात उर्वरित ७८ पैकी सर्व रिक्त पदांवर लाड-पागे समिती अंतर्गत पात्र वारसांची नियुक्ती केली जाईल. या निर्णयामुळे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांच्या जागी आता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त होणार असून, यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षित भविष्य मिळणार आहे. महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियन (मान्यताप्राप्त) च्या कामगार बांधवांसाठी हा क्षण अत्यंत अभिमानास्पद असून, सेवा, संवेदना व सामाजिक न्यायाचा आदर्श या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाला आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आमदार लाड यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर रिवणकर, डॉ. शिवकुमार भाले, डॉ. संजय असुर्लेकर, डॉ. जितेंद्र पाटील तसेच संघटनेचे सचिव दिपक गोडे उपस्थित होते. या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांना न्याय मिळाला असून, सामाजिक बांधिलकीची जबाबदारी शासन व प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीत प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली २०१५ साली अंतिम झालेल्या लाड पागे वारसांची यादी प्रथम अंमलात आणावी. व्यवस्थापनाच्या दिरंगाईमुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या वारसांवर अन्याय होऊ नये. वयाची अट शिथिल करून पात्र वारसांना नियुक्ती द्यावी. सामाजिक जबाबदारी (आईवर अवलंबित्व, कौटुंबिक परिस्थिती) लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोन ठेवावा. अनुकंपा वारसांपैकी सफाई कामगार व जातीचे प्रमाणपत्र असलेल्यांना लाड पागे समिती अंतर्गत समाविष्ट करून तातडीने न्याय द्यावा. अनुकंपा वारसांची २०१५ ची ज्येष्ठता कायम ठेवून नियुक्तीचा विचार करावा.

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांकरीता विविध विशेष स्पर्धा संपन्न अशोक गायकवाड अलिबाग : २६ जानेवारी  रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सभारंभ असून भारताची राज्यघटना अंमलात आल्याने पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. हजारो देशभक्तांच्या बलिदानातून या दिवसाची प्राप्ती झालेली असल्याने हा आपल्या देशाचा सुवर्ण दिन आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने कारागृहातील दाखल बंद्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची तसेच प्रजासत्ताक दिनाची जाणीव व्हावी तसेच कारागृहातील बंदी सुध्दा या देशाचे नागरिक आहेत त्यांना देशाविषयी आपुलकी वाटावी व स्वत:चा आत्मविश्वास वाढावा याकरीता अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता देशभक्तीपर गाणे, रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा , बुध्दीबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा व देशभक्तीपर निबंधस्पर्धा सोमवारी विविध विशेष स्पर्धा संपन्न झाल्या. या विविध स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बंद्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले तसेच शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) महारुद्र नाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बंद्यांचे भावी जीवनात शिक्षणाचे महत्व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच बंद्यांना कारागृहात दाखल असताना तसेच कारागृहातून सुटून बाहेर पडल्यावर पुढील शिक्षण कसे प्राप्त करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी प्रथम कारागृहातील सर्व बंद्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बंदी कारागृहात दाखल असताना जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा कौशल्य विभाग यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होवून प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंद्यांनी या प्रशिक्षणांत सहभाग घेतल्यास बंदी आत्मनिर्भर होवून त्यांना रोजगार उपलब्ध होईल तसेच स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळून त्यांचा उदर निर्वाह करु शकतात असे सांगून बंदी पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त बंद्यांनी हे प्रशिक्षण घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह विशाल बांदल यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता अधीक्षक.अलिबाग जिल्हा कारागृह,वर्ग-२, विशाल बाळासाहेब बांदल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण प्रगती फाऊंडेशन, श्रीवर्धन मंगेश डफळे, व उपाध्यक्ष, प्रबोधन सामाजिक सेवा संस्था अलिबाग, डॉ.मिलींद पाटील, प्रतिनिधी, प्रयास सामाजिक संस्था,मुंबई ॲड.निलेश मोहिते, प्रबोधन सामाजिक सेवा संस्थेचे प्रशिक्षक प्रांजली, अमोल माळी, सतिश मोडखरकर, प्रचिती भगत, हर्षदा दांडेकर तसेच अलिबाग जिल्हा कारागृहातील अधिकारी किशोर महादेव वारगे, तु.अ.श्रेणी-२, निशिगंधा माळी, वैद्यकीय अधिकारी, रामहरी कुटे, सुभेदार व देवलु केरबा रांजड, सुभेदार व तसेच अविनाश जाधव, गजानन खवळे,नितीन भोईर, का.शिपाई तसेच भारती शेवाळे, महिला शिपाई उपस्थित होते.

 निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले

योनेक्स सनराईज मल्टी डिस्ट्रिक्ट मास्टर्स ओपन बॅडमिंटन स्पर्धा निरंजन शहाणे आणि आनंद विठ्ठलकर जोडीने ४५+ पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले मुंबई उपनगरातील ५९ वर्षीय आनंद विठ्ठलकर यांनी ठाणे जिल्ह्यातील निरंजन शहाणे यांच्यासोबत जोडी करून, ज्यांच्यासोबत ते ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नियमितपणे सराव करतात, ४५+ पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित जोडी जस्टिन जोसेफ आणि प्रेम रोहेरा यांचा १५-६; १५-७ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत जोसेफ अँथनी कुजूर आणि सुधीर कंधारी यांच्या जोडीला १५-५; १५-७ असे आणि उपांत्य फेरीत दुसऱ्या मानांकित महेश छाब्रिया आणि सुमित कौल यांच्या जोडीला १६-१४; १५-८ असे पराभूत केले. ३५+ पुरुष दुहेरी गटात, मुंबई उपनगरातील अव्वल मानांकित आदित्य स्वामी आणि हितेश दुआ यांच्या जोडीने अजय मसंद आणि अंशु सिंग यांच्याविरुद्ध तीन अटीतटीच्या गेममध्ये १५-१०, १३-१५, १५-१३ असा रोमांचक विजय मिळवला. इतर निकाल :- महिला दुहेरी 3५+ नेहा काकडे आणि स्मिता साळगावकर यांनी नम्रता घोले आणि सोनाली सरकार यांचा १५-9, १६-१4 असा पराभव केला. मिश्र दुहेरी 3५+ आदित्य स्वामी आणि स्मिता साळगावकर यांनी अंशू सिंग आणि सरला कोटक यांचा १५-७, १५-१३ असा पराभव केला. महिला दुहेरी 4५+ रोशनी ठाकूर आणि सरला कोटक यांनी दृष्टी कुकरेजा आणि जान्हवी मेहरानी यांचा १५-१३, १५-९ असा पराभव केला. मिश्र दुहेरी 4५+ प्रेम रोहेरा आणि जानवी मेरानी यांनी जस्टिन जोसेफ आणि चेरिल गॅब्रिएल यांचा १५-७, १५-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरी ५५+ अजय विग आणि अविनाश गोडे यांनी प्रशांत मुखर्जी आणि योगेश अरोरा यांचा १५-११, १५-७ असा पराभव केला. महिला दुहेरी ५५+ नीना बाजपेयी आणि रितू अरोरा यांनी कविता जैन आणि माधवी कुरुंभती यांचा १५-१3, १५-१७, १५-१० असा पराभव केला. मिश्र दुहेरी ५५+अविनाश गोडे व कविता जैन यांनी आनंद विठ्ठलकर व प्रेरणा साधनकर यांचा १५-८, १५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि TCDBA यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे क्लब येथे ही स्पर्धा पार पडली.

 फ्लेक्सो लिंग संघाला विजेतेपद

आंतर कार्यालयीन नोबल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा फ्लेक्सो लिंग संघाला विजेतेपद ठाणे : फ्लेक्सो लिंग -लेबल डिव्हिजन संघाने ड्रिम एकादश संघाचा २७ धावांनी पराभव करत नोबल प्रिंटिंग प्रेस आयोजित मर्यादित…

 सागर वाघमारेला प्रथम मानांकन

३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी सागर वाघमारेला प्रथम मानांकन मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ गुरुवार २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री हालारी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, दादर येथे सुरु होत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री निलेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत  स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यानंतर सामन्यांना सुरुवात होणार आहे. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या स्पर्धेचे गोल्ड प्रायोजक असून सिस्का कॅरम कंपनी साहित्य पार्टनर आहे. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा प्रथमच या स्पर्धेत वापर करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एकावेळी ४८ बोर्डांवरती एकंदर १० सत्रे खेळवली जाणार आहेत. सामने वेळेवर सुरु व्हावेत यासाठी ५० बोर्ड पंच व सामना निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय स्पर्धेचा ड्रॉ व खेळाडूच्या सामन्याची माहिती हॉलमधील स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्यामुळे कमीत कमी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. स्पर्धेच्या हॉलमध्ये प्रवेश देण्यासाठी पासेसची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दिवसासाठी मर्यादित पास वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आंतर राष्ट्रीय खेळाडूंसाठी वी आय पी भोजन कक्ष उभारण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टरची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी खेळाडूंना गणवेश / टी शर्ट देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून एकाच वेळी ६ सामने लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत. तर प्रसन्ना संत, एस किशोर व मंदार बर्डे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून सामन्याचे धावते समालोचन करणार आहेत. मागील चॅलेंजर्स ट्रॉफी विजेत्या महाराष्ट्राच्या सागर वाघमारेला या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर मागील स्पर्धेतील उपविजेत्या महाराष्ट्राच्या महम्मद घुफ्रानला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला आणि पुरुष एकत्रित खेळत असल्याने महिला पुरुषांना कशाप्रकारे आव्हान देणार हि उत्सुकता आहे. यासाठी प्रत्येक सामना जिंकणाऱ्या महिलेला विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे. खुली एकेरी : १) सागर वाघमारे ( महाराष्ट्र ), २) महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ), 3) झेद अहमद ( महाराष्ट्र ), 4) रहिम खान ( महाराष्ट्र ), ५) शाहिद हिलमी ( श्रीलंका ), ६) अभिषेक भारती ( महाराष्ट्र ), ७) संदीप देवरुखकर ( महाराष्ट्र ), ८) संजय मांडे ( महाराष्ट्र )

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा –किशन जावळे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार धनंजय जाधव यांचा सन्मान अशोक गायकवाड रायगड- कर्जत: लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे. नवमतदारांनी युवक-युवती तसेच दिव्यांग व्यक्तींना मतदार नोंदणी व मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, जे.एस.एम. कॉलेजच्या प्राचार्य सोनाली पाटील, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व दिव्यांग आयकॉन साईनाथ पवार, युथ आयकॉन तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (१८९ कर्जत) म्हणून तहसीलदार डॉ.धनंजय जाधव यांचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत मतदार यादीचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हाधिकारी जावळे यांनी सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. युवक, महिला व दिव्यांग नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार विक्रम पाटील यांनी केले.

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

माजी सैनिक डॉ. भाऊराव तायडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पालघर : माजी सैनिक डॉ. भाऊराव पुंडलिक तायडे (रा. पालघर) यांनी मालमत्ता कर माफी व मालमत्ता नोंदीतील त्रुटींच्या विरोधात जिल्हाधिकारी…

 पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान

पालघरमधील आदिवासी सुरांचा देश पातळीवर सन्मान भिकल्या धिंडा यांना पद्मश्री जाहीर योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्यातील आदिवासी मातीतील सुरांची आज देश पातळीवर दखल घेतली गेली. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांचे नाव जाहीर झाले आहे. तारपा वाद्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती जगभर पोहोचवणाऱ्या भिकल्या धिंडा यांचा सन्मान झाल्याने संपूर्ण आदिवासी समाजालाच हा आपला सन्मान वाटत आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पालघर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. ९२ वर्षीय भिकल्या धिंडा यांच्या वाद्यातून निर्माण होणारे स्वर हे केवळ संगीत नसून, वारली आदिवासी संस्कृतीची ओळख नाळ आणि आत्मा आहेत. चार पिढ्या धिंडा कुटुंबांने तारपा वाजण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ऐंशी वर्षे तारपा वाजनात भिकल्या धिंडा यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून तारपा वाजवण्याचा छंद लागला. त्यांच्या घरात तारपा वाजवणारी ही चौथी पिढी आहे, असे ते सांगतात. गुराढोरा सोबतच रानावनात भटकताना तारपा वाजवण्याचा छंद मला लागला. तो छंद आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी मी आजही जपतो, केवळ मीच तारपा वाजवून थांबत नाही, तर अनेक तरुणांनाही तारपा वाद्य वाजवायला शिकवले आहे. आजच्या मोबाईलच्या युगात तरुण आपल्या संस्कृतीकडे लक्ष देत नाहीत, हे खरे असले, तरी मी मात्र तरुणांना आदिवासी संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतोय, असे ते विनयाने सांगतात. दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे वैशिष्टय भिकल्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी आहेत. ते वारली आदिवासी संस्कृतीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असले, तरी त्यांनी आपली संस्कृती प्राणपणाने जोपासली आहे. दीडशे वर्षाची तारपा वादाची परंपरा जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. साधारणपणे तारपा हे वाद्य बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाते; मात्र भिकल्या धिंडा यांची याबाबतही एक विशेष ओळख आहे. ते दहा फूट लांबीचा अवाढव्य तारपा अत्यंत सहजतेने वाजवतात .इतक्या मोठ्या तारपासाठी लागणारी फुफ्फुसाची ताकद, श्वासावरचे नियंत्रण आणि कलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून सर्वच जण थक्क होतात. हातात काठी आणि सोबतीला तारपा वाद्य घेऊन भिकल्या धिंडा हे वयाच्या दहाव्या वर्षापासून तास न तास सराव करायचे. सुमारे ऐंशी वर्ष ते तारपा वाजवत असून त्यांची सुरावरील पकड आजही तितकीच घट्ट आहे. शरीर थकले, तरी उत्साह कायम तारपा हेच आपले दैवत आहे, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. आदिवासी संस्कृतीमध्ये तारपा नृत्याला आणि वाद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत त्यांना शेकडो स्थानिक आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे; मात्र पद्मश्री हा या सर्व सन्मानात मोठा सन्मान असून आता ही कला केवळ आपल्या पुरती मर्यादित न ठेवता पुढच्या पिढीने ती जपली पाहिजे असे भावनिक आवाहन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांनी केले. वयोमानानुसार शरीर थकले असले, तरी तारपा फुंकताना त्यांच्यात येणारा उत्साह आजही थक्क करणारा आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारात आपले नाव आल्याचे त्यांना दिल्लीवरून कळवले, तेव्हा त्यांना हा आदिवासी संस्कृतीचा सन्मान आहे आपण निमित्त मात्र आहोत अशी विनयाची भावना ते व्यक्त करतात. कुटुंबात २२ माणसे आहेत. आठ गुंठे जमीन आहे. दुसरा व्यवसाय नाही. नोकरी नाही, तरी त्यांची जगण्याची धडपड अजून थांबलेली नाही. त्याबाबत ते कुणालाही दोष देत नाहीत. लहानशा झोपडीत आजही ते राहतात. पुरस्कारातून बांधले घर महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने दिलेल्या पुरस्काराच्या काही रकमेतून त्यांनी हे घर बांधले आहे. त्यांना आत्तापर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले असले, तरी एकतारा गुरुकुल तर्फे देण्यात आलेली तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून दिला गेलेला संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार, पालघर भूषण पुरस्कार, पालघर जिल्हा परिषदेचे ब्रँड पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री पुरस्काराने या सन्मानांचाच आणखी सन्मान झाला आहे. कोट ‘आदिवासी कलेची केंद्र सरकारने दखल घेतली. पद्मश्री जाहीर झाला. कलेनेच मला मोठे केले. माझी जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. ही कला, संस्कृती टिकली पाहिजे. भिकल्या धिंडा, पद्मश्री सन्मान प्राप्त कलाकार

 ‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ

‘मेक इन इंडिया’मुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला मिळत आहे बळ मुंबई-हमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सातत्याने प्रगतीपथावर असून संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मास्ट्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. ही प्रगती भारताच्या…

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन

मुरबाड नगरीत भव्य अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन राजीव चंदने मुरबाड : गुरूप्रतिपदेच्या पर्वकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात  मुरबाड तालुका भागवत वारकरी समाजसेवा मंडळाच्या विद्यमाने भव्य  अखंड हरिनाम सप्ताह सोमवार, २ फेब्रुवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी या कालखंडात आयोजित करण्यात आला आहे. इ.स. १९९८ साली गुरुवर्य वैकुंठवासी श्रीराम दादा जोशी यांनी अनुष्ठानपूर्वक सामुदायिक श्रीज्ञानेश्वरी पारायणाची मुहूर्तमेढ मुरबाडच्या मातीत रोवली. यावर्षी पारायण सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष आहे. आचार्य अशोकभाई खरे , निलेश जोशी आणि योगी फुलनाथ महाराज यांच्या पावन उपस्थितीत पारायण सोहळ्याचा प्रारंभ होईल.पारायण नेतृत्व श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप आणि पारायणाचार्य,एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत.सदर उत्सवात पुणे येथील वेदमूर्ती शमंदारशास्त्री खळदकर यांची दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्रीरामरक्षा या विषयावर प्रवचने होणार आहेत.रोज रात्री आठ ते दहा या वेळेत सर्वश्री विक्रांत महाराज पोंडेकर,जयेश महाराज भाग्यवंत,सुभाष महाराज गेठे,माधवदास महाराज राठी,भगीरथ महाराज काळे,ओंकार महाराज दुडे,आचार्य डॉ.रामकृष्णमहाराज लहवितकर यांची कीर्तने होणार आहेत.दिनांक आठ फेब्रुवारीला भव्य पालखी सोहळा आणि दिव्य असा दीपोत्सव संपन्न होईल. सोमवार दिनांक नऊ रोजी वैष्णवभूषण श्रीमहंत प्रमोद महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.या महोत्सवात हजारो भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे.या  धर्मकार्यात भाविकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच सोहळ्यात उपस्थित राहून भक्तिसुखाचा आनंद लुटावा असे आवाहन उपरोक्त मंडळाने केले आहे.