Category: होम

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर के. सीता राममोहन राव, जयश्री पाटणेकर, कुमार सोहोनी, अजित भुरे, ईशा डे ठरले मानकरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले असून हे पारितोषिक वितरण रविवार, १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. के. सीता राममोहन राव यांना संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्कार, जयश्री पाटणेकर यांना संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, कुमार सोहोनी यांना उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, अजित भुरे यांना ज्येष्ठ रंगकर्मी तर ईशा डे यांना उत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय डॉ. नीती बडवे यांच्या मुशाफिरी या पुस्तकासाठी उत्कृष्ट प्रवास वर्णनाचा तर तन्वी गोरे यांना संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्रीचा पुरस्कार दिला जाणार आहे. संगीत विशारद परीक्षेत मुंबई विभागातून प्रथम आलेल्या सौम्या क्षीरसागर आणि रोहन देशमुख यांनाही कै. ताराबाई दीक्षित पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – २४३०४१५०, ७७००९९४४९५.

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे

पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकीत करणी, जादूटोणा आदी अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करा – संजय बनसोडे अनिल ठाणेकर सांगली: सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा माहोल आहे. निर्भय आणि निपक्षपाती निवडणुका या लोकशाहीला अत्यंत महत्त्वाचे आहेत.लोकशाहीच्या या उत्सावास करणी, जादूटोण्याचे अशा अंधश्रद्धाचा आधार घेतला जात आहे ही निषेधार्य बाब आहे. अशा घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लावणारे आहेत. करणी आणि जादूटोणा किंवा तत्सम अंधश्रद्धेचे प्रकार करणाऱ्या तातडीने कारवाई झाली पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले आहे. नुकताच विटा येथे एका पुढाऱ्यांचा घरासमोर असे अंधश्रद्धेचे, करणी चे प्रकार करणाऱ्यास रंगेहात पकडले, संबंधित व्यक्तीला पोलिसाच्या हवाली केले. या घटनेचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी  अशा प्रवृत्तींना वेळी रोखले पाहिजे, संबंधित जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही असे अनेक करणी, जादूटोणाचे अघोरी प्रकार केल्याचे उघडकीस आले होते,त्या त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यापक प्रबोधन करून लोकांच्या जनजागृती केली होती. विशेषता उमेदवार किंवा नेत्यांच्या घराजवळ असे प्रकार केले गेले होते. आष्टा, इस्लामपूर,कामेरी आदी ठिकाणी संघटनेने प्रबोधन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम केले होते. काही दिवसापूर्वी येलूर गावातही  हयात नसलेल्या मोठ्या नेत्यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचून करणी केल्याचे उघडकीस आले होते. असे प्रकार करणाऱ्या मांत्रिक,तांत्रिक,बुवाबाबांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, पोलिसांनी या बाबतील सोमोटो गुन्ह्ये दाखल करावेत. आवश्यकता असेल तिथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मदत करतील गावोगाव जाऊन प्रबोधन करतील. पोलीस खात्याने काही  महिन्यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा एक कक्ष करण्याचा आदेश पारित केला होता मात्र अद्याप सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये असा कक्ष झाल्याचा ऐकिवात नाही. महाराष्ट्राला संत आणि सुधारकांचा बलदंड वारसा आहे. आपल्या संत सुधारकांचा वारसा समजून न घेतल्यामुळे अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याची वेळ आपल्या येत आहे. करणी,जादूटोणा  या बाबी पूर्णपणे भ्रामक आहेत, अवैज्ञानिक आहेत. करणी जादूटोणा किंवा देव घालून कुणाचं चांगलं किंवा वाईट करता येत नाही याची आम्ही खात्री देतो. करणी जादूटोणा किंवा देव घालण्याचे कुणाच्या कडे सामर्थ्य असेल तर त्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे थेट आव्हान आहे.अशा कोणत्याही  चमत्कारिक गोष्टी सिद्ध करणाऱ्यास समितीचे २१ लाख रुपयांचे बक्षीस आहे.आज अखेर ही आव्हान कोणीही स्वीकारलेले नाही. जादूटोणा किंवा करणी करून कुणाचं बरं वाईट करता येत असते तर  भारताच्या सीमेवरील सैनिकाच्या ऐवजी हे तंत्र मंत्र करणारे लोकच ठेवले असते.निवडून येण्यासाठी उमेदवार काय काय करतात हे आपल्याला ज्ञात आहे, नैतिकतेचा ऱ्हास होताना निवडणुकीत दिसत आहे त्यात अशा अंधश्रद्धांचा आधार ही बाब सुद्धा चिंताजनक आहे. आधुनिक काळात अशा अंधश्रद्धाचा आधार घेणे हा ज्ञानाचा विज्ञानाचा माणुसकीचा पराभव आहे. महाराष्ट्राचा सुद्धा निर्मूलन समिती गेली ३६ वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं प्रभावी काम करीत आहे. प्रबोधनाच्या पातळीवर आम्ही नेहमीच सज्ज आहोत,लोकांच्या जागृतीसाठी आम्ही कार्यकर्ते तत्पर आहोत.

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक

एसटीच्या प्रत्येक इंधन पंपावर आता भविष्याची चार्जिंग, ईव्ही स्थानकांना प्राधान्य द्या – प्रताप सरनाईक मुंबई : बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, भारत २0४ 7 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल, आणि एसटी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध आहे.” सध्या एसटीच्या सुमारे ९० टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या, तरी टप्प्याटप्प्याने त्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई-बसेसना प्राधान्य दिले जाणार आहे.याच दृष्टीने, एसटीच्या जागेवर सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून (PPP) उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजीसह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात एसटीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच “ एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास, भविष्यातील वाहनव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही केवळ सुविधा नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.या निर्णयामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे

ठाणेकरांना लवकरच कोंडीमुक्त प्रवासाची अनुभूती-एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडी कशी दूर होईल याला प्राधान्य देण्यात येत असुन कोस्टल रोड तसेच उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे, लवकरच ठाणेकरांना वाहतुक कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रजासत्ताक दिनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या “कार्निव्हल” चे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ठाणे शहर वाहतुक शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने साकेत येथील पोलीस क्रीडासंकुल मैदानात प्रजासत्ताक  दिनापासुन २८ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांच्या कार्निव्हलचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, वाहतुक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट आणि स्टॅडअप कॉमेडीयन नविन प्रभाकर आदींसह अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या वाहतुकीच्या चित्ररूपी दिनदर्शिकेचे लोकार्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्याचे सत्कार केले. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते, त्याप्रमाणें प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांची जनजागृती लहानग्यापासून केली जात आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी, कार्निव्हलच्या प्रदर्शनात मांडलेल्या ई दुचाकी तसेच, ई मोटारी चालवण्याची अनुभुती घेतली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शिंदे यांनी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी “रस्ता सुरक्षा हीच जीवन सुरक्षा” हे अधोरेखित करताना शहरातील रस्त्यांबरोबरच पदपथ राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले. पदपथ नागरीकांना चालण्यासाठी आहेत, ते अबाधित ठेवले पाहिजेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे अपघात कमी होण्यास मदत होईल.या अनुषंगाने, महापालिका, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्वांनी नियम पाळले तर, अपघात होणारच नाहीत, ड्रंक एंड ड्राइव्हची मोहिम अधिक तीव्र केल्यामूळे देखील अपघात कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, ठाण्याची वाहतूक कोंडी कशी दूर होईल यासाठी प्राधान्य देण्याचे सुतोवाच करून ना. शिंदे यांनी घोडबंदर रोड पूर्ण खड्डेमुक्त करणार असल्याचे सांगितले. या सत्यावर अनेक ठिकाणी थोडे कट आपण बंद केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. त्याचबरोबर कोस्टल रोड, उन्नत मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे, त्यामुळे लवकरच ठाणेकरांना कोंडी मुक्त प्रवास करण्याचा अनुभव येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिली.

७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या

ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त ७५ महिलांच्या ७५ गुलाबी ई-रिक्षा प्रवाशांसाठी मोफत धावल्या ठाणे : २७ जानेवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंती निमित्त ७५ महिलांनी आपल्या ७५ गुलाबी ई-रिक्षाने लहान मुलांपासून ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सेवा देऊन जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी केली.  सकाळी १० वाजता ७५ महिला गुलाबी युनिफॉर्म घालून ७५ गुलाबी ई-रिक्षा सोबत शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका, ठाणे येथे उपस्थित होत्या. मिलींद बल्लाळ, राजन साप्ते आदी मान्यवरांच्या हस्ते भगवा झेंडा फडकवून मोफत सेवेचे उदघाट्न करण्यात आले. वाट न बघता आज रिक्षा मिळली, आज कोणी रिक्षाने नाही म्हटले नाही,   प्रवास सुखकर झाला, अशा प्रतिक्रिया ठाणेकर नागरिकांनी दिल्या. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाजसेवेच्या दृष्टीकोनाला आणि कार्याला दिलेली ही आदरांजली आहे, असे आयोजक जयदीप कोर्डे, डॉ. श्रीकांत राजे, संजय मिरगुडे, अविनाश पावळे यांनी म्हटले.

 भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव…

भुवन शाळेच्या खेळाडूंवर ग्रामस्थांकडून भेटवस्तूंचा वर्षाव… प्रजासत्ताकदीनी पोलीस निरिक्षक दादासो एडके यांच्या हस्ते शाळेच्या खेळाडूंचा गौरव! राजीव चंदने मुरबाड : जिल्हा स्तरावर लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल जि. प. भुवन शाळेच्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या सर्व विद्यार्थ्यांवर ग्रामस्थांकडून व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुरबाड कडून विशेष भेटवस्तू,ड्रेस, शैक्षणिक साहित्य, गौरवचिन्ह देऊन विशेष कौतुक करण्यात आले. हा कौतुक सोहळा मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, प्रसिद्ध समाजसेवक व दानशूर व्यक्तिमत्व मेहबूबभाई पैठणकर, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, रघुनाथ बांगर यांच्या शुभहस्ते पार पडला. प्रथमच जिल्हा परिषद भुवन शाळेच्या खेळाडूंना जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस भेटल्यामुळे सर्व ग्रामस्थांना व शिक्षकांना अत्यानंद झाला आहे.विजेत्या संघाचे ढोलताश्याच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामस्थांनी स्वागतही करण्यात आले. आज प्रजासत्ताक दीनाचे औचित्य साधून सर्व ग्रामस्थांनी या खेळाडूंचे गोड कौतुक करत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत शैक्षणिक साहित्याची भेट दिली आहे.तसेच यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिनेही दप्तर, वह्या, ट्रॉफी देऊन या मुलींना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरिक्षक दादासाहेब एडके, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, दररोज होणारे अपघात या विषयी मार्गदर्शन करून शाळेचे शिक्षक व खेळाडूंना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस  शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पोलीस निरिक्षक दादासो एडके, गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड, समाजसेवक मेहबूबभाई पैठणकर,  सरपंच भुमिका बांगर,उपसरपंच सुनिल बांगर, माजी सरपंच रघुनाथ बांगर,दर्शना बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बांगर,ग्रामसेविका सौ. सिंघासने, रिपाईचे दिनेश उघडे, अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे अण्णा साळवे, लोकक्रांतीचे नरेश मोरे, रमेश देसले, जितेंद्र पंडित,सुधाकर शेळके, पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शंकर करडे, तालुका अध्यक्ष दिलीप पवार, सचिव संजय बोरगे, संतोष राऊत,मिडियासेलचे चेतन पोतदार, राजिव चंदने,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यातील विद्यार्थ्यांना शशिकांत केळशीकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांची उपस्थिती दिवा : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिवा परिसरातील विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य व वह्या वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम भाजपा काजू महामंडळ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रुपेश बेलोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. हा कार्यक्रम महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा सरचिटणीस, ह्युमन राईट्स राष्ट्रीय सरचिटणीस तसेच टायगर ग्रुप ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत (सतीश) केळशीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले वह्या व शैक्षणिक साहित्य यावेळी वितरित करण्यात आले. तेथे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थिती कोकण प्रतिष्ठान दापोली खेड मंडणगड अध्यक्ष तुषार गायकर, उपाध्यक्ष दिलीप शिगवण, सल्लागार गणेश दवंडे, तसेच भाजपा सदस्य साधना सिंग जी, पूनम सिंग व टायगर ग्रुप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र भोईर काका, दिवा शहर उपाध्यक्ष कैलास गोगावले, रमेश कोळी, कु. सूरज पानसरे व सर्व सहकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले असून, अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन

शिळ– दिवा रस्त्यावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना निवेदन आरती परब दिवा: शिळ– दिवा रस्त्यावर सातत्याने घडणऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा प्रभाग समितीच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिळ– दिवा रस्त्यावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे तसेच महाकालेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर वाहनांची वेगवान वर्दळ होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. रस्त्यावर योग्य वेगमर्यादा दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक तसेच आवश्यक सूचनाफलक नसल्यामुळे वाहनचा लकांना दिशा न मिळाल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढत असल्याचे सांगण्यात आले. या मार्गावर शाळा व वस्ती असल्याने लहान विद्यार्थी, नागरिक व स्थानिक रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे महाकालेश्वर मंदिराजवळ, दिपक सर्विस सेंटर समोर, राॅबो स्कुल शंकर मंदिर समोर, चंद्रकांत आलिमकर घरा समोर, तुलाजा भवानी मंदिर शिळगांव प्रवेशद्वार समोर, सुभेदार स्कुल समोर या चार ठिकाणी तातडीने गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग पथ व आवश्यक सूचनाफलक बसविण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण 

धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण  रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, मुंबई : आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीवर राज करणाऱ्या धर्मेंद्र यांना मरणोत्तर भारतातील मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून यंदाच्या २०२६ सालचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वोच्च अशा पद्मविभुषण पुरस्कारासाठी देशभरातून धर्मेंद्र यांच्यासह पाच जणांची निवड केली, तर  १३ जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.…