Category: होम

जिल्हा परिषद निवडणुका जाहीर स्लग- ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला निकाल 

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील रखडलेल्या  १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  या निवडणुकीत जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागा भरल्या जाणार आहेत. महिलांबरोबरच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी मोठ्या प्रमाणावर आरक्षण लागू करण्यात आले आहे. ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये घेतली जात आहे. निवडणूक होणाऱ्या १२ जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर यांचा समावेश आहे. या निवडणुकीची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्याच दिवसापासून १६ ते २१ जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होईल, तर २७ जानेवारी ही उमेदवारी माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतदारांना एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी असे दोन मते द्यावी लागतील . ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजता जाहीर प्रचार समाप्त होईल आणि त्यानंतर प्रचार तसेच जाहिरातींवर बंदी राहील. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५,४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, पुरेशा प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१,५३७ कंट्रोल युनिट्स आणि १,१०,३२९ बॅलेट युनिट्सचा समावेश आहे. मतदार यादी १ जुलै २०२५ या आधारे तयार करण्यात आली असून, दुबार नावे असलेल्या मतदारांसाठी ” हे चिन्ह वापरण्यात आले आहे. मतदारांना माहिती मिळवण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप तसेच आयोगाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध आहे.

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज

निवडणूक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ती निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज…

इराणमध्ये अराजकता! आंदोलनात २००० हून अधिकांचा मृत्यू

इराण: इराणमध्ये महागाई, भ्रष्टाचार आणि हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे देशात अराजक माजले आहे. देशात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  देशभरातील निदर्शनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांची संख्या इराणी अधिकाऱ्यांनी मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर वाढत्या दबावादरम्यान, खराब आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली अशांतता, इराणी अधिकाऱ्यांसमोर तीन वर्षांतील सर्वात मोठे अंतर्गत आव्हान आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून सत्तेत असलेल्या इराणच्या धार्मिक अधिकाऱ्यांनी निदर्शनांवर दुहेरी दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यांनी आर्थिक समस्यांवरून निदर्शनांना समर्थन दिले आहे आणि त्याच वेळी कारवाई देखील केली आहे. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर अशांतता भडकवल्याचा आरोप केला आहे. ‘ज्यांना ते दहशतवादी म्हणतात, त्यांनी निदर्शने हायजॅक केली आहेत, असंही ते म्हणाले. एका मानवाधिकार गटाने यापूर्वी शेकडो मृत्यू आणि हजारो अटक झाल्याची नोंद केली होती. काही दिवसापूर्वी इंटरनेट बंद करण्यासह संप्रेषण निर्बंधांमुळे माहितीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. photo caption इराणमधिल रस्त्यांवर आंदोलकांचे मृतदेह न्यायाच्या प्रतिक्षेत

प्रचार संपला राडे सुरू, लक्ष ‘लक्ष्मी’कडे

 डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर शिंदेंच्या सेनेचा कोयत्याने हल्ला नवीमुंबई भाजपाकडून शिंदेंच्या कार्यकर्त्याला मारहाण उल्हासनगरमध्ये ५० लाखांची कॅश पकडली मुंबई:  मुंबईसह राज्यातील २९ महागनरपालिकांसाठीच्या निवडणूकीचा प्रचार संपला असून निवडणूकीतील राड्याला मात्र सुरूवात झाली…

दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ (ड) मध्ये बळीराज सेनेची कडवी झुंज

दिवा- ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली असून प्रचाराचा वेग चांगलाच वाढला आहे. दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २८ (ड) मध्ये बळीराज सेनेने प्रवीण उतेकर यांना उमेदवारी देत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. या निर्णयामुळे या प्रभागात बळीराज सेनेची मोठी राजकीय दहशत निर्माण झाली आहे. रविवारी ११ रोजी बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम तसेच पक्षाचे अन्य वरिष्ठ पदाधिकारी दिवा येथे जाहीर मेळावा झाल्याने बळीराज सैनिकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. राजकीय सर्व्हेनुसार या प्रभागातील खरी लढत बळीराज सेनेभोवतीच फिरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. दिवा शहरात राज्यातील विविध भागांतून नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण विभाग, विद्युत व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था तसेच पावसाळ्यात साचणारा चिखल या गंभीर समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये आता बदलाची तीव्र इच्छा असून बळीराज सेना हा एक नवा आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. प्रवीण उतेकर यांनी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांच्या कार्यप्रेरणेने त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह बळीराज सेनेत  जाहीर प्रवेश केला. त्यानंतर घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक २८ (ड) मधून उमेदवारी दिली. दरम्यान, दिवा शहरात बळीराज सेनेने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून निवडणूक रणांगणात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. s

दिवेकर शिवसेना–महायुतीच्या नेहमीच भक्कमपणे पाठीशी – डॉ. श्रीकांत शिंदे

दिवा–सीएसटी लोकल सुरू करण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिवेकरांना आश्वासन दिवा, दि. १२ जानेवारी : “दिवेकर नागरिक शिवसेना–महायुतीच्या नेहमीच पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेल्या दहा वर्षांत आम्ही जे वचन दिले, ते पूर्ण…

ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाहीतर, हिरवे गुलाल उधळतील – नितेश राणे

ठाणे: एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवावा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर येथून ओपन जीपमध्ये सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊ गीताने गुंजलेली ही रॅली तब्बल दोन तास चालली. रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहाद वर प्रखर भाष्य केले. आम्ही मुंबई – ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात, मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या. असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे ना. राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे. ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसला नाही तर १६ तारखेला हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा मंत्री राणे यांनी दिला. चौकट बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात. तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा. तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शून्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही त्यांनी मनसेची उडवली. ००००

कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील –विश्वनाथ भोईर

कल्याण: कल्याण पश्चिमेत शिवसेना आणि भाजप महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, संघटनात्मक ताकद आणि अनुभवी नेतृत्वाच्या जोरावर विजयाचा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आमदार भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला आहे.  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील आमदार विश्वनाथ भोईर यांनी शिवसेना–भाजप युतीच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांना विधानसभा निवडणुकीतच पराभवाचा सामना करावा लागला असल्याने त्यांचा धोका आता कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत “आव्हान असल्याचे कुठेही वाटत नाही. काही प्रभागांत अपवादात्मक परिस्थिती असू शकते; मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवलीवर बारीक लक्ष आहे. आमची टीम अत्यंत तगडी असून मैदानात पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यामुळे कोणाचेही आव्हान वाटत नाही,” असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “गेली अनेक वर्षे शिवसेनेवर प्रेम करणारे मतदार आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याशी कधीही अंतर ठेवलेले नाही. मतदार आमच्यापासून लांब नाहीत. इतकी वर्षे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात, आताही तीच साथ द्या असे आवाहन करतानाच कल्याण पश्चिमेतील जनता शिवसेना–भाजप युतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

२०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार 

२७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचा २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडविणार कल्याण : २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने २०१५ रोजी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवकांविरोधात एल्गार पुकारला असून २७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडवणार असल्याची भूमिका मांडत स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा उचलणाऱ्या मनसे, शिवसेना(उबाठा), काँग्रेस, एनसीपी (एसपी) पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले आहे. २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीची बैठक पार पडली यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीबाबत २७ गावांतील नागरिकांची भूमिका सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे. काही दिवसांपूर्वी जो पर्यंत या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विरोधी पक्षांनी पाठींबा दिला होता. मात्र सत्ताधार्यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने विरोधकांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी २७ गावांच्या अस्मितेचा प्रश्न घेतला आहे हे समितीने पहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा मुद्दा प्रचारात मांडला आहे. मात्र सत्ताधारी पक्षांना याबाबत गांभीर्य नसून, त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच कल्याण येथे झालेल्या सभेत २०१५ साली २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पुनरावृत्ती केली असून एकाच गोष्टीसाठी दहा वर्षे पाठपुरावा करावा लागत आहे हि खेदाची बाब आहे. निवडणुकीनंतर संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्यावर दबाव आणू, मात्र हा विषय नगरविकास खात्याकडे प्रलंबित असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या खात्याचे मंत्री आहेत. हा चेंडू त्यांच्या कोर्टात असून याबाबत शून्य टक्के समर्थन त्यांच्याकडून येत आहे. प्रचारात शिवसेनेचे उमेदवार २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात होते. त्यामुळे ज्या ज्या पक्षांनी स्वत्तान्त्र नगरपालिकेबाबत समर्थन दिले आहे त्यांच्या पाठीशी संघर्ष समिती आणि २७ गावांतील नागरिक उभे असून ज्यांनी हा मुद्दा घेतला नाही त्यांना मतदानाच्या दिवशी अद्दल घडविणार असल्याची भूमिका २७ गाव सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मांडली आहे.

निधी संकलनाने गाठला ५३ कोटींचा टप्पा

टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मुंबई, १३ जानेवारी : टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) २०२६ ने यंदा समाजोपयोगी निधी संकलनात नवा विक्रम प्रस्थापित केला असून, स्पर्धेच्या प्रत्यक्ष शर्यतीपूर्वीच तब्बल ५३.७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. युनायटेड वे मुंबई या फिलान्थ्रॉपी पार्टनरच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अधिक गती मिळण्याची शक्यता असून, यंदाची आवृत्ती मॅरेथॉनच्या इतिहासातील सर्वात प्रभावी समाजसेवी उपक्रमांपैकी एक ठरत आहे. यंदा विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच निधी संकलन करणाऱ्या फंडरेझर्सची विक्रमी संख्या. शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, प्राणी कल्याण आणि समुदाय विकास अशा विविध सामाजिक कारणांसाठी नव्या फंडरेझर्सनी पुढाकार घेतला आहे. एकूण सहभागी फंडरेझर्सपैकी जवळपास ७५ टक्के म्हणजे १,१०० हून अधिक फंडरेझर्स हे नवखे असून, त्यांनी आतापर्यंत ५.६ कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला आहे. २००४ पासून आतापर्यंत टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून एकूण ५३६ कोटी रुपयांहून अधिक निधी संकलित करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, धावपटू आणि वैयक्तिक देणगीदार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा सामाजिक ठेवा उभा राहिला आहे. यंदा कॉर्पोरेट सहभागातही मोठी वाढ झाली आहे. १९४ कॉर्पोरेट संघ यंदा सहभागी झाले असून, त्यातील ४० कंपन्या प्रथमच मॅरेथॉनच्या समाजसेवी उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच ६८ नव्या स्वयंसेवी संस्था यंदा सहभागी झाल्याने एकूण सहभागी एनजीओंची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. हे या व्यासपीठावरील विश्वासार्हता आणि परिणामकारकतेचे द्योतक असल्याचे आयोजकांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रथमच निधी संकलन करणाऱ्या काही फंडरेझर्सनी आपले अनुभव मांडले. यामध्ये आर्यवीर झुंझुनवाला, हसीना थेमाली, समीर मेंगल, इरा खान आणि शांता वल्लुरी गांधी यांचा समावेश होता. अनेकांनी सुरुवातीचा संकोच, लोकांकडे मदतीसाठी हात पुढे करण्याचा अनुभव आणि मिळालेला सकारात्मक प्रतिसाद याविषयी मनमोकळेपणाने सांगितले. ०००००००००