Category: होम

चित्रकार चंद्रकला कदम यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

अलिबाग : ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. आपल्या चित्रकलेने चंद्रकला कदम यांनी अलिबागचे नाव देशात उंचावले अशा शब्दात थळे यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी मापगांवमधिल अनेक मान्यवर चंद्रकला कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होते. चंद्रकला कदम यांनी चितारलेल्या चिंत्रांना महाराष्ट्राच्या विधीमंडळासह देशाच्या संसदेतही मानाचे स्थान मिळाले आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या काळात देशाच्या संसदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावले गेले. हे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी चितारले होते. चंद्रकला कदम यांना शुभेच्छा द्यायला यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पत्रकार चाळके आणि ज्येष्ठ पत्रकार आणि चंद्रकला कदम यांचे पती कुमार कदम उपस्थित होते. फोटोओळ ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबागमधिल मापगावचे माजी सरपंच सुनिल थळे यांनी अभिष्ठचिंतन केले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम, पत्रकार वैभव चाळके आणि मापगावचे मान्यवर उपस्थित होते.

 ठेकेदारासह संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश

ठाणे पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरण अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा पत्रकार भवन गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदारासह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन ठेकेदार राजन शर्मा आणि संबधितांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे जिल्हा पत्रकार संघाला राज्य शासनाने गावदेवी येथील भूखंड पत्रकार भवन बांधण्यासाठी दिला होता. पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकारीणी सदस्यांनी ठेकेदार राजन शर्मा सोबत बेकायदेशीर करारनामा करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पत्रकार भवन उभारले होते. ठेकेदार राजन शर्मा यांनी पत्रकार भवना व्यतिरिक्त लगतच्या जागेत आणखी एक बेकायदा तीन मजली इमारत उभारली होती. याप्रकरणी शासनाने शर्तभंगाची कारवाई सुरू केली असता ठेकेदार शर्मा याने न्यायालयातुन स्थगिती मिळवली होती. तत्कालीन संघाची कार्यकारीणी, जिल्हा प्रशासन यांनी सदरची स्थगिती उठवण्याबाबत कोणतेही प्रयत्न न केल्यामुळे गेली पंचवीस वर्षे या दोन्ही इमारतींचा ताबा ठेकेदार शर्मा याच्याकडेच होता. तो या दोन्ही इमारतींचा गैरवापर करून यातील काही गाळे भाड्याने तर काही गाळे विक्री करून शासनासह पत्रकारांची फसवणूक केली होती. पत्रकारांसाठी राखीव असलेल्या या भूखंडावरील भवनाचा उपयोग पत्रकारांना झालाच नव्हता. ही बाब ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संजय पितळे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा भूखंड शासनाच्या ताब्यात घेण्याचा आदेश ३ ऑगस्ट २०२२ रोजी दिला होता. तसेच, तहसिलदारांच्या आदेशान्वये या जागेवरील इमारती निष्काषित करून रिकाम्या भूखंडाला तारेचे कंपाउंड उभारून शासनाचा बोर्ड लावला आहे. ठेकेदार शर्मा याने तत्कालीन महसुल मंत्र्याकरवी या गैरव्यवहार प्रकरणाला स्थगिती मिळवली होती. यावर जिल्हाध्यक्ष संजय पितळे यांनी,ठाणे उपविभागीय अधिकाऱ्याकडे वारंवार पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यानुसार सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, यांच्या १३ जाने. २०२२ रोजीच्या पत्रात नमूद केल्यानुसार या गैरव्यवहार प्रकरणात ठेकेदार शर्मा व संबंधीतांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ०००००

ज्ञानपीठ विद्यालयाचा विज्ञान प्रकल्पाला प्रथम क्रमांक

ठाणे : ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी संचलित, ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मनोरमा नगर , ठाणे (पश्चिम) या विद्यालयातील प्राथमिक विभागाचा  विज्ञान प्रकल्पाला  ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ मध्ये…

ठाण्याच्या मनोरमा नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची दुरवस्था

अनिल ठाणेकर ठाणे : शहराच्या मनोरमा नगर या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून उभारण्यात आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अत्यंत दुरवस्था झाली असून, संस्कार केंद्राची अनेक महिने स्वच्छता न केल्याने, पालापाचोळा आणि कचरा साचल्यामुळे, साहजिकच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा एकप्रकारे अवमान असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशीदेखील, संबंधित संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांचे याठिकाणी दुर्लक्ष झालेले असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मनोरमा नगरमधील श्रुती पार्क कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणाऱ्या, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसथांब्याला लागुनच हे संस्कार केंद्र असून, आधीच फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनोरमा नगरमध्ये वास्तव्यास असणारे आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि ‘लोकमित्र’ दैनिकाचे संपादक कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, या संस्कार केंद्राशी संबंधित असणाऱ्यांचा, बाबासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नसून, निव्वळ बॅनरवर झळकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झटणारे ते कार्यकर्ते असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सध्या ठाणे शहराच्या विविध भागांत, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती मोहीम व “जनमत-चाचणी” सुरु करण्यात आलेली असून, त्याच अनुषंगाने सोमवार, १६ डिसेंबर-२०२४ रोजी, मनोरमा नगर येथे, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरातील नागरिकांना केले जात असताना, याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या एका कार्यकर्त्याने, याठिकाणी बांधण्यात आलेला ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणांचा फलक, जो कार्यक्रम संपेपर्यंत ठेवण्यात येणार होता, तो दादागिरी करुन काढायला लावला होता. यासंदर्भात, पत्रकार कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, मतदानाचा अधिकार हा, बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार असून, त्याचा प्रसार करणारा फलक लावण्यास संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्याने आक्षेप घेणे, ही लाजिरवाणी घटना असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. एकेठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली संस्कार केंद्राची उभारणी करायची आणि दुसरीकडे त्याची स्वच्छता न राखता, उलट लोकशाहीमार्गाने जनजागृती करणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यकर्त्यांवर अरेरावी करायची, ही संस्कृती नसून, विकृती असल्याचे तिखट प्रतिक्रिया पत्रकार कुणाल बागुल यांनी, याप्रकरणी दिली आहे. 0000

बांग्लादेशी दाम्पत्याची कल्याणात घुसखोरी

डोंबिवली : भारताचे पारपत्र (पासपोर्ट) आणि व्हिसाविना गेल्या आठ वर्षांपासून कल्याण पूर्वेकडे असलेल्या विठ्ठलवाडीतील जुनी सोनिया कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या दोघा बांग्लादेशी घुसखोर दाम्पत्याला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी…

भाजप सरकारचा फायदा गरिबांना नाही तर मुठभर श्रीमंतानाच-वर्षा गायकवाड

मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत…

 मुंबईकरांवर आता कचरा शुल्क आकारणार?

 १०० ते १००० रुपये भुर्दंड, प्रशासकांसमोर सादरीकरण झाले   मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारती, हॉटेल आणि कमर्शियल कारखान्यांतून निघणाऱ्या कचऱ्यांवर आता मुंबई महापालिका निर्मूलन कर आकारण्याच्या विचारात असून, सोमवारी झालेल्या सादरीकरणानुसार ही करवाढ लादली गेलीच तर केवळ निवासी घरांना तब्बल ६८७ कोटी रुपयांचा कचरा कर भरावा लागू शकतो. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांच्यासमोर सोमवारी सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा कर लागू करण्यासोबतच उघड्यावर धुंकणे, उघड्यावर कचरा करण्यावरील दंड वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सध्या धुंकण्यावर फक्त २०० रुपये दंड आहे. तो ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव सादरीकरणात ठेवला गेला. मात्र, सर्वांत मोठा विषय आहे तो कचरा कर लावण्याचा आणि त्यासाठी महापालिकेचे उपविधी अर्थात बायलॉज बदलावे लागणार आहेत. या बदलासाठीची कायदेशीर बाबी तपासण्याचे निर्देश गगराणी यांनी दिल्याचे कळते. मुंबई महापालिकेकडून ५०० फुटांपर्यंतच्या घरांना किमान १०० रुपये, तर त्यापेक्षा मोठ्या घरांना ५०० ते १००० रुपये कचरा निर्मूलन शुल्क आकारण्यात येणार आहे. व्यापारी गाळे आणि व्यापारी संकुलांवर हेच कचरा शुल्क किती आकारायचे हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, निवासी भागापेक्षा ते नक्कीच जास्त असेल. अर्थात असे कोणतेही शुल्क लादताना मुंबईकरांच्या सूचना, हकरती विचारात घ्याव्या लागतील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. यापूर्वी २०१९- २० मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि त्यानंतर २०२०- २१ मध्ये प्रवीणसिंह परदेशी यांनी प्रत्येक सोसायटीला कचरा शुल्क आकारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तत्कालीन नगर सेवकांनी विरोध केल्याने सदर योजनेला स्थगिती मिळाली होती. आता प्रशासकीय राजवटीत या प्रस्तावाने पुन्हा उचल खाल्ली आहे. अधिकारी सूत्रांनी पुढारीला सांगितले की, मुंबई महापालिका कायद्यानुसार, घनकचरा व्यवस्थापनाच्या सेवा मोफत देणे महानगरपालिकेला बंधनकारक आहे. म्हणूनच या सेवेवर कोणतेही शुल्क आतापर्यंत आकारता आलेले नाही. ते लादायचे असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. सध्या पुणे, चेन्नई आणि दिल्लीत घनकचरा उचलण्यासाठी निवासी गाळ्यांना सरसकट १०० रुपये, तर व्यापारी गाळ्यांसाठी ५०० रुपये कचरा शुल्क आकारले जाते. ही ढाल आता मुंबईतही पुढे केली जात आहे. अर्थात माजी मंत्री आदित्य ठाकरे, खा. वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख आदी नेत्यांनी या हालचालींना विरोध चालवला असून, येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कचरा शुल्क आकारणी रोखली जाण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते रवी राजा यांनीही या हालचालींना विरोध केला आहे. मुंबईकरांकडून महापालिका कचरा शुल्क आकारणार असल्याचे समजले असून लवकरच दोन-तीन दिवसांत मी आणि भाजपा नेते महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन विरोध दर्शविणार आहोत, असे रवी राजा म्हणाले.

डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेचा शुभारंभ

अशोक गायकवाड अलिबाग‌ : रायगड जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते सोमवारी अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. सदर मोहीम १६ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणारं असून, या मोहिमेतंर्गत वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेतंर्गत नियमित सर्वेक्षणामध्ये कुष्ठरोगाच्या तपासणीपासून वंचित राहिलेल्या घटकांचे सर्वेक्षण, जनजागृती करुन, नवीन कुष्ठरुग्ण शोधून, मोफत बहुविध औषधोपचारांद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करणे, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. जिल्हाभरात ३७ हजार ५६८ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वीटभट्टी, खाणकामगार, स्थलांतरित व्यक्ती, कारागृहातील कैदी, वृध्दाथम, अनाथाश्रम, वसतिगृहातील विद्यार्थी इत्यादींची तपासणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेचि शुभारंभ वरसोली येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, डॉ. प्राची नेहूलकर, डॉ. सचिन संकपाळ, डॉ. अश्विनी सकपाळ उपस्थित होते.

– रेरा घोटाळ्यात फसवणूक झालेल्या कल्याण-डोंबिवलीतील ग्राहकांना न्याय द्यावा

 भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे मागणी ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील काही इमारतींमधील रेरा नोंदणी घोटाळ्यात सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. आता या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजाविल्यानंतर रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांना महापालिकेने दिलासा देण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच संबंधित बिल्डरांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत `पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’द्वारे केली. घरग्राहकांच्या संरक्षणासाठी असलेल्या रेरा कायद्यांतर्गतची नोंदणी व बिल्डरने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून मंजूर झालेल्या कर्जातून कल्याण-डोंबिवलीतील ५८ इमारतींमध्ये शेकडो रहिवाशांनी घरे घेतली असून, सहा हजार नागरिक राहत आहेत. कालांतराने रेरा कायद्याअंतर्गत मंजुरी मिळविण्यासाठी बिल्डरांनी महापालिकेकडे बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिकेने संबंधित इमारती जमीनदोस्त करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकारामुळे रहिवाशी हवालदिल झाले आहेत. या रहिवाशांची व्यथा आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत आज मांडली. या प्रकरणाची राज्य सरकारने दखल घ्यावी. तसेच सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेला निर्देश द्यावेत. तसेच या प्रकरणी बिल्डरांवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली

रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम

  मेनरोड, शालिमार भागात कारवाई नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, शालिमार आणि सराफ बाजार परिसरात सोमवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने मोहीम राबवण्यात आली. यामुळे व्यावसायिकांसह परिसरात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहीम सुरू होती. गर्दीच्या वेळी काही काळ का होईना रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशीच परिस्थिती कायम ठेवावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार परिसरात लहान व्यावसायिकांनी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यांवर आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पायी चालणाऱ्यांसह वाहनचालकांनाही कसरत करावी लागते. शालिमार परिसरात सध्या हिवाळा असल्याने लहान मुलांच्या उबदार कपड्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांसाठी स्वेटर, कानटोपी, मोजे, विविध प्रकारचे स्कार्फ, महिला वर्गासाठी आभुषणे, पर्स, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख, पादत्राणे, चादर, ब्लँकेट आदींची विक्री रस्त्यावर करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक थेट रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक कोंडीला मदत होत आहे. त्यातच हातगाड्यावाल्यांची भर पडते. शालिमार परिसरात संदर्भ सेवा रुग्णालय तसेच नाशिकरोड, इंदिरानगर, देवळालीकडे जाण्यासाठी वाहन व्यवस्था आहे. शहर बससेवेचा थांबाही आहे. अडथळ्यांची ही शर्यत पार करत वाहनचालक किंवा पादचाऱ्यांना बाहेर पडावे लागते. व्यावसायिकांनी या सर्व जागेवर अतिक्रमण करुन ग्राहकांची लुटमार सुरू केली आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वारंवार उघड झाले आहे. मागील आठवड्यात एका विक्रेत्याने महिला आणि बरोबर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. अशीच परिस्थिती मेनरोड तसेच सराफ बाजारात आहे. लहान विक्रेत्यांची गर्दी तर असतेच. शिवाय, मोठ्या दुकानदारांकडून सेलच्या नावाखाली काही सामान बाहेर विकण्यासाठी काढले जाते. भाजी विक्रेते, फुल विक्रेते यांची त्यात भर पडते. गर्दीमुळे बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. कधी कधी हे प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. या पार्श्वभूमीवर कोंडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा, ही या परिसरात येणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. संबंधित परिसराला पडलेला अतिक्रमणाचा विळखा पाहता, सुस्तावतेल्या नाशिक महापालिकेला अखेर सोमवारी जाग आली. सोमवारी सायंकाळी शालिमार, मेनरोड, सराफ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या कारवाईची पूर्वसूचना नसल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. मोहिमेतून माल वाचावा, यासाठी विक्रेत्यांची पळापळ सुरू झाली. काहींनी पुढे जात अन्य लोकांना मोहिमेची पूर्वकल्पना दिली. या धावपळीत बांबुवरील कपडे किंवा अन्य सामान काढताना बांबु रस्त्यात पडले, सामान रस्त्यावरच पडल्याने ग्राहकांना रस्त्याने मार्ग काढणे कठीण झाले. कारवाईत सातत्याचा अभाव शहरातील शालिमार, मेनरोड या परिसरात महापालिकेकडून अधूनमधून अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली जाते. परंतु, पथकाची गाडी पुढे गेली की लगेचच मागे परिस्थिती पूर्ववत होते. महापालिकेकडून सातत्याने कारवाई करण्यात येत नसल्याने अतिक्रमणधारकांचे चांगलेच फावते. शालिमार परिसरात फळविक्रेते, कपडे विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असतानाही पोलिसांकडून सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येते.