Category: होम

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मुंबई : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे…

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात संगीतमय धूलिवंदन

रंगाच्या उधळणीबरोबरच संगीतात रमली तरुणाई ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील भगवती मैदानावर अपूर्व उत्साहात संगीतमय धूलिवंदन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पारपंरिक व नैसर्गिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार गाण्यांवर तरुणाईने ठेका धरला. या उत्सवाला नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदू संस्कृतीतील प्रमुख सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरे करण्यावर विश्वास सामाजिक संस्थेकडून प्राधान्य दिले जाते. त्यानुसार यंदा नौपाड्यातील भगवती मैदानावर धूलीवंदनाच्या दिवशी सकाळी ११ पासून रंगोत्सव २०२४ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने धूलीवंदनाबरोबरच बहारदार संगीताची मैफल सादर करण्यात आली. धूलीवंदनानिमित्ताने प्रसिद्ध गायक-गायिका सारिका सिंग, अनुजा वर्तक, विद्या शिवलिंग, सई जोशी, प्रशांत मापेरी, निलेश निरगुडकर, सतीश भानुशाली यांच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या प्रसिद्ध गीतांवर तरुणाईने ठेका धरला. रंगाची मुक्त उधळण करीत नागरिकांनी धूलीवंदन साजरे केले. विश्वास सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष संजय वाघुले यांच्याबरोबरच भाजपाचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा प्रभाग अध्यक्ष रोहित गोसावी, भाजपा जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गौरव अंकोला, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, विश्वास सामाजिक संस्थेचे सदस्य अमित वाघचौरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी मेहनत घेतली.

२८ मार्चला मुंबईत महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद

आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार – अजित पवार पुणे : २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा अजितदादा पवार यांनी आज पुणे येथे केली. आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर आदींसह पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या ४८ जागा असून त्यामध्ये जवळपास कुणी कोणत्या जागा लढवायच्या याबाबत मागेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ९९ टक्के काम झाले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्या टप्प्यात विदर्भातील निवडणूक होणार आहे. आंबेगाव येथे शिवाजीराव आढळराव पाटील हे २० वर्षापूर्वी पक्षातून गेले होते ते आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरी जागा तिथेच जाहीर करेन असे सांगतानाच बाकीच्या जागा २८ मार्चला जाहीर करणार आहोत असे अजितदादा पवार म्हणाले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी ४८ जागा होत्या. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लढलो होतो. त्यामध्ये भाजपच्या २३ जागा निवडून आल्या. शिवसेनेच्या १८ जागा निवडून आल्या आणि ४ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या एक नवनीत राणा यांना पुरस्कृत केले होते. तर एमआयएमची एक जागा अशा निवडून आल्या होत्या. मात्र माध्यमांमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी फक्त तीन जागा लढवणार अशा पध्दतीने गैरसमज पसरवण्याचे काम करण्यात आले. आमच्या महायुतीत कुणाचेही गैरसमज नाहीत. मित्रपक्षांनी २३ जागा निवडून आणल्या आहेत तेवढ्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. त्यात एकत्र बसून अतिशय व्यवस्थित मार्ग काढलेला आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर एक – एक लोकसभा आणि आमदारांवर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. बाकीची टिम आमची काम करणारच आहे. शिवाय जिथे महायुतीचे उमेदवार असतील तिथे मंत्री व आमदारांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे असेही ठरल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले. जाहीरनाम्यावर काम सुरू आहे तो लवकरच दिला जाईल. स्थानिक प्रश्न आहेत तेही त्या जाहीरनाम्यात यावेत अशी भूमिका आहे. स्टार प्रचारक यादीवर एकत्र बसून चर्चा झाली आहे त्यामुळे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.राज्यातील लोकसभा प्रचारक म्हणून राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे हे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. अशा पध्दतीने आम्ही लोकांसमोर जाणार असून लोकांचा विश्वास आम्ही जिंकू आणि नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्राचे बळ त्यांच्या पाठीशी उभे करु असा निर्धार करण्यात आल्याचेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत कुणालाही भेटण्याचे आणि बोलण्याचा अधिकार आहे. माझ्यावर टिका होते आहे आणि तुम्हीही करु शकता माझी भूमिका ही फक्त विकासाला, देश प्रगतीपथावर पुढे चालला आहे. आज जगात देशाचे नाव वाढत आहे. प्रतिष्ठा मिळाली आहे असेही अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले.

क्षयरोगविषयक जागरूकता प्रसार

क्षयरोग दिनानिमित्त विविध उपक्रमांतून नवी मुंबई : भारतामधून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे. हे ध्येय साध्य करण्याकरिता सन 2015 च्या तुलनेत क्षयरोगाच्या प्रमाणात 80% घट, क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात 90% घट तसेच क्षयरोगाचा नि:शुल्क उपचार असे आहे. त्या अनुषंगाने नमुंमपामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. नमुंमपा कार्यक्षेत्रात केंद्र शासन व राज्य शासनाच्या मागदर्शक सुचनांनुसार 24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, 3 सार्वजनिक रुग्णालये व माताबाल रुग्णालयामार्फत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रुग्णास मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात येतो. दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटना, क्षयरोगसंदर्भात लक्ष वेधून घेण्यासाठी क्षयरोग निर्मुलनासंदर्भातल्या महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजी घोषवाक्य प्रसारित करते. यावर्षीचे घोषवाक्य “Yes!, We Can End TB”  – “होय, आपण टीबीचा अंत करू शकतो” हे असून यावर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच नमुंमपा रुग्णालयांमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वस्ती पातळीवर विशेषत: झोपडपट्टी व अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात पथनाटय घेण्यात आले. या व्यतिरिक्त जनसमुदाय सभा, रुग्ण सभा कर्मचारी प्र‍शिक्षण, इ. जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. जागतिक क्षयरोग दिनाच्या अनुषंगाने तेरणा वैदयकिय महाविदयालय व डी.वाय.पाटील वैदयकिय महाविदयालय अंतर्गत पोस्टर्स स्पर्धा, कॉन्फरन्स, पथनाटय, रुग्णांचे आरोग्य शिक्षण इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ‘निक्षय पोषण योजना’ अंतर्गत दरमहा रु. 500 उपचार पूर्ण होईपर्यंत क्षयरुग्णांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. नागरिकांनी शासकीय रुग्णालयास संशयित क्षयरुग्ण संदर्भित केल्यानंतर रुग्णाचे क्षयरोगाचे निदान झाल्यास माहिती देणाऱ्या नागरिकांस रु. 500 चा लाभ देण्यात येतो. जे नागरिक क्षयरुग्णांचा यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत करतात त्यांना रु.1000 चा लाभ देण्यात येतो. क्षयरोगाचे निर्मूलन करणेकरीता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व रुग्णालये, क्लिनिक, लॅब्स इ. नी त्यांच्याकडे उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांची माहिती नमुंमपास कळविणे आवश्यक आहे. नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोगमुक्त करणेकरिता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

निवडणूक रोख्यांवर सर्वपक्षीय मंथन गरजेचे – नितीन गडकरी

नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून बित्तंबातमी विशेष अविनाश पाठक भाग २ प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी पैसा हा लागतोच. त्यासाठीच सोयीचे व्हावे आणि गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून आमच्या सरकारने इलेक्टोरल  बॉण्ड्स…

 ज्युनियर गटात ठाण्याचे वर्चस्व

 श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटी ट्रस्ट आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ डेरवण (चिपळूण) : येथे सुरु असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२४  स्पर्धेत चौथ्या  दिवशी  खो खो मध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात राजेंद्र विद्यालय, खंडाळा…

मातोश्री गंगुबाई शिंदे रुग्णालयात दोघींवर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

ठाण्यात गुडघा प्रत्यारोपणासह खुब्याची रोबोटिक शस्त्रक्रिया होतेय मोफत ठाणे : ठाण्याच्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या कॅश काऊंटर नसलेल्या भारतातील पहिल्या रुग्णालयामध्ये प्रथमच दोन गरजु महिला रुग्णांवर रोबोटिक मशिनद्वारे गुडघ्याच्या प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्ण आता स्वतःच्या पायावर हिंडु फिरू शकत असल्याने त्यांच्या नातलगांनी या नविन रोबोटीक तंत्रज्ञानाचे तसेच, गंगुबाई शिंदे रुग्णालयाचे विशेष आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री गंगुबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन ठाण्यातील किसननगर येथे हे कॅश काऊंटर नसलेले गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयात तब्बल १२ कोटी रुपये किमतीचे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे मशिन नुकतेच कार्यन्वित करण्यात आले आहे. या मशिनद्वारे बदलापुर येथील पुष्पा केदारे ५० वर्षीय यांच्या उजव्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. केदारे यांना गेल्या तीन वर्षापासुन संधीवात झाल्याने त्यांचे पाय वाकडे झाले होते. बसायला व उठायलाही त्रास होत होता.तर, भिवंडीच्या बेबी गायकवाड ६६ वर्षीय महिलेच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. चालताना अडखळत चालावे लागत होते. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयाचा लाखोंचा खर्च या रुग्णांना परवडणारा नव्हता. काही नातेवाईकाच्या संदर्भाने गंगुबाई शिंदे रुग्णालयाची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार रुग्णालयात दाखल केल्यानंतर येथील भुलतज्ज्ञ डॉ.अक्षय राऊत, अस्थीतज्ज्ञ डॉ. सचिन पांडे यांनी या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया  नुकत्याच केल्या. याकामी रोबोटीक स्पेशालिस्ट तंत्रज्ञ दुर्गेश तोडणकर, तंत्रज्ञ अजित आहेर, राकेश सोनार यांचेही शस्त्रक्रियेसाठी मौलिक साह्य लाभले. या शस्त्रक्रियेनंतर केवळ एकच दिवस त्रास जाणवल्याचे रुग्णांनी सांगितले.रोबोटीक ही ओपन सर्जरी आहे. एक शस्त्रक्रिया करण्यासाठी साधारण सव्वा तासांचा अवधी लागला. एरव्ही मॅन्युअली ऑर्थोपेडीक ऑपरेशनमध्ये असलेले धोके या मशिनद्वारे केलेल्या शस्त्रकियेमध्ये टाळता येतात. या मशिनचा लाभ म्हणजे याद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतेही इन्फेक्शन्स होत नाहीत अथवा रक्तस्त्राव देखील कमीतकमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास उद्भवत नसल्याचे डॉ.पांडे यांनी सांगितले. गुडघा प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णाच्या संपुर्ण शरीराचे सिटी स्कॅन केल्यानंतर ती सर्व माहिती रोबोटिक मशिनच्या संगणकीय मेमरीमध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर मशिनद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी संगणकाद्वारे तयारी केली जाते. रोबोट, पेन्डन्ट, ओटीएस, सर्जिकल प्लॅनिंग केल्यानंतर रोबोट स्वतः ही गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतो. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. मात्र या शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना खूप काळजी घ्यावी लागते. दोनच दिवसात रुग्ण चालु लागतो. – डॉ.सचिन पांडे, ऑर्थोपेडीक सर्जन ठाण्यात गेली दोन वर्ष सुरू असलेल्या मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे या रुग्णालयामध्ये रुग्णाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिधापत्रिका धारक गरीब रुग्णांवर अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया तसेच सर्व औषधोपचार इथे मोफत केला जातो. नुकतेच दोन महिला रुग्णावर रोबोटीक शस्त्रक्रिया करून गुडघ्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. – डॉ. जालंदर भोर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कै.गंगुबाई शिंदे रुग्णालय.

जिल्हा परिषदेचे तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिर संपन्न

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजित करणे या योजनेअंतर्गत तालूकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण, तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता जिल्हास्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य विषय जागृकता निर्माण करण्यासाठी तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिरात एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ दिला गेला. आरोग्य संबंधित माहिती, सेवा रुग्णांना देणे ही खरी गरज आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. डॉ. अशोक नांदापूरकर उप संचालक मुंबई मंडळ ठाणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर, भास्कर रेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड आणि डॉ. अभिजीत वानखेडे आणि यांच्या सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी मोलाचे योगदान देत शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्री रुग्ण 28, हृदयरोग 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग 39, पोटाचे विकार 31, नाक कान घसा 50, रक्तदाब 200, मधुमेह 94, रक्त लघवी 25, ईसीजी 25, ब्रेस्ट कॅन्सर साठीची मॅमोग्राफी  30 लाभार्थ्यांची करण्यात आली व इतर 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिराकरिता हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित बोबडे, न्यूरोलॉजिस्ट डॉ. डॉ दिलराज कडलस, बालरोग तज्ञ डॉ. श्याम राठोड,  स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढीये, , नेत्ररोग तज्ञ डॉ. देवयानी बढीये, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रशांत जावळे, कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव किरपण, दंततज्ञ डॉ. वर्षा चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. विशाल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली रोडगे, नेत्रचिकित्सा अधिकारी विठ्ठल बडीये, जनरल फिजीशियन डॉ. हिरामण साबळे उपस्थित होते. यावेळी अधिकारी, तालुकास्तरीय समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता समोर येत आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : जगाला पारदर्शी कारभाराचे बौद्धीक देणा-या भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता हळूहळू समोर येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, इंडिया आघाडीचे प्रवक्ते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. ‘इलेक्ट्रोल बॉन्ड’च्या माध्यमातून धनधांडग्यांच्या मानेवर सुरी ठेवल्यानंतर भाजपने सामान्य-गोरगरीब जनतेच्या नकळत त्यांच्या खात्यातून सरकारी योजनांसाठी पैसे वळते केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी बँक कर्मचा-यांना हाताशी घेऊन हा घोटाळा करण्यात आला आहे. लोकांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना सरकारी योजनांचा भाग केले गेले आणि लोकांच्याच टॅक्सचा पैसा वापरून भाजपची प्रतिमा उजळवण्यासाठी सरकारी जाहीरातींवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत एप्रिल २०२३ पर्यंत अनुक्रमे १६.२३ कोटी आणि ३४.१८ कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची आकडेवारी सांगितली जात असली तरी यातील बहुतांश लोकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून योजनांसाठी पैस काढले गेले आहेत. लोकांच्या खात्यातून सरकारी योजनांकडे हे पैसे वळते करण्याचे आदेश वरून देण्यात आले असल्याची कबुली स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकांच्या कर्मचा-यांनी दिली आहे. ‘Article 14’ या पोर्टलच्या @HemantGairola25 यांनी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये, कशाप्रकारे खुलेआमपणे लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला याची इत्यंभूत माहिती आकडेवारी सहित देण्यात आली आहे. article-14.com/post/banks-wan...मुख्य धारेतील मीडियाच्या रडारवरून भाजप विरोधी बातम्या केव्हाच गायब झाल्या आहेत. पण भाजपवाले आणि गोदी मीडियावाले एक गोष्ट विसरतात ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर ट्विट करताना म्हटले आहे.

अश्विन शेळकेचा अष्टपैलू खेळ

४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : अश्विन शेळकेचा अष्टपैलू खळे आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या  अरमान पठाणच्या मोलाच्या योगदानामुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने बिनेट कम्युनिकेशन संघाचा चार विकेट्सनी पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील की गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. बिनेट कम्युनिकेशन संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने ३५ षटकात १७७ धावा करत विजय निश्चित केला. युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टॉस जिकंत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. भूषण शिंदेने आक्रमक फलंदाजी करत ४३ धावांसह बिनेट कम्युनिकेशन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दीपक भोगलेने ३१, सिद्धार्थ घुलेने २५ आणि सागर मुळयेने २४ धावा बनवत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. अश्विन शेळके आणि पार्थ चंदनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. अरमान पठाण आणि ओमर पटनीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना अश्विनने २५ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी करत युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. अर्धशतकापासून वंचीत राहिलेल्या अश्विनने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. अरमान पठाणने ३२ धावा केल्या. सिद्धार्थ घुलेने दोन गडी बाद केले. तर सिद्धार्थ नरसिम्हा, प्रथमेश बेलछेडा आणि दिपक भोगलेने  प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : बिनेट कम्युनिकेशन : ३४ षटकात सर्वबाद १७५ ( भूषण शिंदे ४३, दिपक भोगले ३१, सिद्धार्थ घुले २५, सागर मुळये २४, अश्विन शेळके ७-३१-३, पार्थ चंदन ७-४२-३, अरमान पठाण ७-२४-२, ओमर पटनी ६-२७-२) पराभूत विरुद्ध  युनायटेड पटनी इंडस्ट्रीज : ३३.४ षटकात ६ बाद १७७ ( अश्विन शेळके नाबाद ४७ , अरमान पठाण ३२, सिद्धार्थ घुले ७-१-३०-२, सिद्धार्थ नरसिम्हा २.४- २४-१, प्रथमेश बेलछेडा ७-३०-१, दिपक भोगले ७-३२-१).