माहीममधील मराठी नागरिकांच्या सुरक्षित व सन्माननीय घरासाठी प्रसाद लाड यांची सभागृहात ठाम मागणी
माहीममधील मराठी नागरिकांच्या सुरक्षित व सन्माननीय घरासाठी प्रसाद लाड यांची सभागृहात ठाम मागणी मुंबई, फेब्रुवारी : मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या माहीम येथील मच्छीमार कॉलनी, पोलीस वसाहत, म्हाडा ट्रान्झिट कॅम्प, एसबीआय, ओएनजीसी व इतर स्वायत्त वसाहती मिळून सुमारे ३४ एकर परिसरातील एकूण ४५ इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासाचा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे ठामपणे उपस्थित केला. मच्छीमार समाज, पोलीस कर्मचारी, रिपेअर बोर्डाच्या इमारतींमध्ये राहणारे सर्वसामान्य मराठी कुटुंब, अशा सुमारे ३४०० कुटुंबांचे जीवन आज जीर्ण, धोकादायक आणि मूलभूत सोयीसुविधांअभावी अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू आहे. गळकी छते, पडझडीचा धोका, लिफ्ट नसलेल्या चार-पाच मजली इमारती, पावसाळ्यात होणारी गळती अशा अवस्थेत मुंबईचा कष्टकरी मराठी नागरिक राहत असल्याची गंभीर बाब आमदार लाड यांनी सभागृहासमोर मांडली. सन २००३ मध्ये या प्रकल्पाला लेटर ऑफ इंटेंट देण्यात आले; मात्र २०२५ साल उजाडूनही पुनर्विकास पूर्ण झालेला नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. स्थानिक सहकारी गृहनिर्माण संस्थांनी देखील विकासकावरील परवानग्या रद्द करून शासनामार्फत क्लस्टर धोरणांतर्गत पुनर्विकास करावा, अशी लेखी मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या माहीम नाक्यालगत, एका बाजूला बीकेसी आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असलेल्या या परिसराचा नियोजनबद्ध क्लस्टर विकास झाला तर मच्छीमार, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य मराठी कुटुंबांना सुमारे ५५० चौरस फुटांचे सुसज्ज, सुरक्षित आणि मालकी हक्काचे घर मिळू शकते, असा ठाम विश्वास आमदार लाड यांनी व्यक्त केला. या लक्षवेधीला उत्तर देताना प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, संबंधित विकासकास विलंबाबाबत नोटीस देण्यात आली असून, म्हाडाचे उपाध्यक्ष यांनी बैठक घेऊन सहा महिन्यांत ठोस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्लस्टर धोरणांतर्गत या योजनेचा सकारात्मक विचार करून एमएमआरडीए/एमएसआरडीसी व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने (Joint Venture) प्रकल्प गतीने मार्गी लावण्याची कार्यवाही केली जाईल. अधिवेशनानंतर प्राथमिक बैठक घेऊन अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे. मुंबईच्या मातीशी नाळ जोडलेल्या माहीममधील मराठी नागरिकांना सुरक्षित, प्रशस्त आणि सन्माननीय जीवनमान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड यांची ही लढाई पुढेही सुरूच राहील. मुंबईच्या विकासात मुंबईकर मराठी माणूस केंद्रस्थानी असलाच पाहिजे, हीच या लक्षवेधीमागील भूमिका आहे.
