Category: मुंबई

Mumbai news

अमृता फडणवीसांनी दिला अ‍ॅक्सिस बँकेच्या नोकरीचा राजीनामा

मुंबई : तब्बल २३ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्ट करून दिली. अमृता फडणवीस यांनी जवळपास २३ वर्षे…

मुंबई विमानतळावर  हिरे, सोनंसह  कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही  कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. हिरे, सोनेसह कोट्यावधींचे अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी, ८ जणांना अटकही करण्यात आलीय. मुंबई कस्टम झोन – ३ (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण ८ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास १६.७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, ३८ लाख रुपयांचे हिरे, १५ लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात १.१३ कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत १६.७५६ कोटी इतकी आहे. तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ३८.२८ लाख आहे. याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १५.२४ लाख आहे. विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

स्वराज्याचा सूर्योदय झाला…

हिंदवी स्वराज्याचा सुर्योदय ज्यांच्यामुळे पहाता आला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर पार पडलेल्या शिवजन्म सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, फुलांची सजावट आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे भव्य आणि उत्साहपूर्ण…

पुनर्वसनाचे धोरण ठरल्याशिवाय निष्कासन करू नये : वर्षा गायकवाड

पुनर्वसनाचे धोरण ठरल्याशिवाय निष्कासन करू नये : वर्षा गायकवाड मुंबई : बर्मा शेल रेल्वे लाईन लगतच्या राजीव गांधी नगर, इंदिरा नगर, सुमन नगर आणि चिखलवाडी येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.…

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक

भांडुपमधून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत झाला नगरसेवक अनिल ठाणेकर मुंबई, मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भांडुप गावातील प्रभाग क्रमांक  १११  मधून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सीएमई विभागातून जून १९९१ साली सेवानिवृत्त झालेले  राजाराम विष्णू (सावंत ) देसाई, चार्जमन, लोको शेड यांचा मुलगा दीपक सावंत हा शिवसेना ( उबाठा ) पक्षातून नगरसेवक  म्हणून निवडून आला आहे. पोर्ट ट्रस्ट कामगाराचा मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला म्हणून त्यांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने  हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली साधारण ३२ वर्षांपूर्वी दीपक सावंत यांना शिवाजी नगर, शिवडी, मुंबई पोर्ट ट्रस्ट कॉलनी वडाळा या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी नक्की झाली होती. पक्षाचा AB अर्ज मिळाला होता. त्यामुळे पोर्ट ट्रस्ट  वसाहतीमधील रहिवाशांना खूप आनंद झाला.  कॉलनीत मिरवणूक, फटाके, ढोल ताशे वाजू लागले. पोर्ट ट्रस्ट कॉलनी मध्ये आनंद पसरला. पोर्ट  ट्रस्ट कर्मचाऱ्याच्या मुलाला उमेदवारी मिळाली म्हणून घराघरात आनंद झाला.घराघरातून ओवाळणी झाली. फुलांच्या अक्षता पडल्या. परंतु हा आनंद रहिवाशांना जास्त मिळाला नाही. पक्षात चक्र फिरली. की फिरवली.  दुसऱ्या दिवशी उमेदवारी फिरवली गेली. संपूर्ण वसाहत शोक सागरात बुडाली. जणू काही सुतक पडले. परंतु दीपक सावंत शांत होता. त्याने सगळ्यांना शांत केले. संधी हुकली. परंतु तो निष्ठेने शिवसेनेचे काम करत राहिला. दीपक  सावंतचे वडील राजाराम सावंत मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून १९९१ साली निवृत्त झाले. ते वसाहत सोडुन भांडुप गावात स्थायिक झाले. दीपक सावंत नोकरी बघून शाखेचे काम प्रामाणिक पणे आजतागायत करत आला. भांडुप गावचा तो शिवसैनिक झाला. दरम्यान संघटनेवर अनेक संकटे आली. परंतु दीपक सावंत निष्ठेने कम करत होता. आणि एवढ्या वर्षांनी पक्षाने परत संधी दिली आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भांडुप गावातून पोर्ट ट्रस्ट कामगाराचा  मुलगा दीपक सावंत नगरसेवक झाला.

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन

पी. एम. बाथतर्फे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई :  पीएमबाथ अँड बोट क्लब ट्रस्टच्यावतीने आणि मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चर्नी रोड २८ फेब्रुवारी व १ मार्चला मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई जिल्ह्याला संलग्न असलेल्या क्लब मार्फत खेळाडूंनी आपली नावे शुक्रवार २० फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, शिवाजी पार्क, दादर येथे नोंदवावीत.

 वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार

वरळीतील झोपडीधारकांचा एसआरए विरोधात एल्गार रहिवाशांच्या मोर्चाची घेतली दखल प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर होणार कारवाई – शैलेंद्र कांबळे अनिल ठाणेकर मुंबई, वरळी नाका परिसरातील प्रेम नगर व सिद्धार्थ नगर येथील इंदिरा झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) प्रकल्प सुमारे २५ वर्षांपासून रखडला आहे. याविरोधात मार्क्र्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन शक्ती संघटनेच्या वतीने  रहिवाशांनी आज एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्च्याच्या शिष्टमंडळाला प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकावर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती शैलेंद्र कांबळे यांनी दिली. यावळी मनोज यादव, तृप्ती निकाळजे, प्रविण मांजळकर, अशोक पवार,बहुजन शक्तीचे सुधाकर रणखांबे, संतोषी शिरोडकर, कलप्पा न्हावी,नवाज शेख, विशाल कांबळे, संजय मकासरे आदी उपस्थित होते. मोर्चानंतर शिष्टमंडळाने प्रशासनाकडे निवेदन सादर करत बैठकीत विकासकाच्या निष्क्रियतेबाबत तक्रार नोंदवली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे विशेष अधिकारी मजगे यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल तसेच प्रकल्प रखडविणाऱ्या विकासकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.दरम्यान, ५७ रहिवाशांना विकासकाने भाडे न दिल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत सहाय्यक निबंधक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, यापूर्वी विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती. विकासकाने भाडे देण्याचे कबूल करत धनादेश दिला; मात्र तो बाऊन्स झाल्याची माहिती देण्यात आली. तरीही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.प्रकल्पासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करून ती सार्वजनिक करावी, तसेच अपयशी विकासकाची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला.

 आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील पर्यावरणाची काळजी केवळ दिखाऊपणा भाजपा सरकारकडून राज्यात विकासाच्या नावावर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी – सुरेशचंद्र राजहंस मुंबई : भाजपा महायुती सरकारने मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास केला आणि आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पर्यावरणाची काळजी व्यक्त करत आहेत, हा केवळ दिखाऊपणा  आहे. पर्यावरण आठवडा सारख्या कार्यक्रमात भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृती अधिक महत्त्वाची असते. पर्यावरण हा केवळ परिषदांचा विषय नाही, तर तो जनतेच्या श्वासाचा, भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असे मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे. पर्यावरणावर बोलताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मुंबईतील ‘पर्यावरण आठवडा’ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या पण त्यांच्याच सरकारने राज्यात पर्यावरणाची मोठी हानी केली आहे. आरे मधील झाडांची कत्तल, चंद्रपूर ताडोबा– अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जंगलांवर वाढता ताण आहे, वेताळ टेकडी येथील झाडांवर घाला घालण्यात आला, मुंबई तील मँग्रोव्ह्स आणि सॉल्ट पॅन जमिनींवर विकासाच्या नावाखाली अनेक प्रकल्प सुरू आहेत. तपोवन मध्ये वृक्ष तोड चाललेली आहे. या सर्व घटनांनी सरकारची “विकास” ही संकल्पना नेमकी कोणासाठी आहे, हा प्रश्न निर्माण केला आहे. सरकारला खरोखरच पर्यावरणपूरक विकास हवा असेल तर, मोठ्या प्रकल्पांपूर्वी पारदर्शक पर्यावरणीय परिणाम अहवाल जाहीर करावेत. झाडतोडी ऐवजी पर्यायी आराखडे तयार करावेत. मँग्रोव्ह, टेकड्या आणि जंगलांचे कायदेशीर संरक्षण अधिक मजबूत करावे. स्थानिक नागरिक व पर्यावरणतज्ज्ञांचा सल्ला बंधनकारक करावा. केवळ शब्दांमध्ये शाश्वत आणि प्रत्यक्षात वेगळीच कृती ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राची जनता ओळखते. पर्यावरण वाचवायचे असेल, तर घोषणांपेक्षा ठोस कृती हवी. अन्यथा पर्यावरण आठवडा हा फक्त प्रतिमानिर्मितीचा कार्यक्रम ठरेल, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा

एलआयसी १०० रुपये रोज बचत योजनेची घोषणा मुंबई / रमेश औताडे जग जसे वेगाने बदलत आहे तसेच एल आय सी ने पण बदलत कात टाकली असून सामान्य ग्राहकाला अजून मोठ्या प्रमाणात जोडता येण्यासाठी रोज १०० रुपये बचत योजना जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या निधीत गुंतवणूक करण्यासाठी दैनंदिन गुंतवणूक रु. १००, मासिक गुंतवणूक रु. २०० आणि तिमाही गुंतवणूक रु. १,००० ने करता येईल.  किमान रक्कम रु. १,००० आहे. हा निधी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्र, डिजिटल व्यासपीठ आणि इतर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. याची सुरुवात २० फेब्रुवारी रोजी होईल आणि ६ मार्च २०२६ रोजी संपेल. नंतर लोक या निधीत पैसे जमा किंवा काढू शकतात. व्यवस्थापक कारण दोशी आणि जयप्रकाश तोष्णीवाल आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा म्हणाले की सरकारने सेमीकंडक्टर आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा गुंतवणूकचा संकल्प केला आहे. मुख्य गुंतवणूक अधिकारी योगेश पाटील म्हणाले की या निधीत अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात ज्या सतत वाढत राहतात, चांगला नफा करतात.

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे, मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय – आनंद परांजपे

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे, मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय – आनंद परांजपे मुंबई दि. १९ फेब्रुवारी – आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. शरदचंद्र पवार गटाकडून वारंवार विलिनीकरणाची वक्तव्य येत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे या ‘माझा दादा गेला’ त्यामुळे ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या आता गौण आहेत असे बोलत आहेत तर दुसरीकडे आमदार रोहित पवार व खासदार अमोल कोल्हे हे पडद्याआडून सातत्याने विलिनीकरणाचा मुद्दा माध्यमांसमोर बोलून महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणारे वातावरण करत आहेत असाही थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला. आमचं दैवत आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दूर्देवी मृत्यू झाला याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. विमान अपघातासाठी जबाबदार असलेली व्हीएसआर कंपनी असेल, पायलट किंवा ट्रॅक रेकॉर्ड असेल या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे हेही आवर्जून आनंद परांजपे यांनी सांगितले. केंद्रीय उड्डाणमंत्री के रामा नायडू व मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच दिवशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर्फे चौकशी सुरू केली असून ब्लॅक बॉक्सचा डाटा रिकव्हर होणारच. सुप्रिया सुळे यांनी  ब्लॅकबॉक्सचा डेटा जात नाही तो रिकव्हर होतो असे वक्तव्य पुण्यात केले आहे. मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ब्लॅकबॉक्स आगीत न जळता तो राजकीय आगीत गेला अशाप्रकारे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले याबद्दलही नाराजी आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत. पण राजकारणातील तांत्रिक बाबी त्यांना कळत नसाव्यात. त्यांनी एबी फॉर्मचा मुद्दा उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती असेल किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत या दोन ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे काही उमेदवार हे आमचा एबी फॉर्म घेऊन लढले. एबी फॉर्ममध्ये दोन भाग असतात. ‘ए’ फॉर्ममध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी तीन लोकांना त्यामध्ये प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार संजय खोडके यांच्याकडे अमरावती व नागपूर विभाग आणि माझ्याकडे कोकण आणि मराठवाडा विभाग याठिकाणी फॉर्म ‘बी’ वर सही करण्याची जबाबदारी दिली होती. आमच्या सहीचा बी फॉर्म उमेदवाराला दिला जातो. जेणेकरून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह घड्याळ दिले गेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर उभे राहिलेले आहेत. खरंतर अमोल कोल्हे यांनी आम्हाला विचारण्याऐवजी त्यांनी स्वतः चे आमदार बापू पठारे यांना त्यांची दोन्ही मुले पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजप तिकीटावर लढले त्यांना विचारले पाहिजे. मुंबई, ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार हे शिवसेना उबाठाची मशाल घेऊन लढलेले आहेत. मग उबाठा गटात शरद पवार गटाचे विलिनीकरण झाले आहे असे म्हणायचे का असा सवाल करत आनंद परांजपे यांनी अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत मात्र त्यांना राजकारणातील तांत्रिक बाबी कळत नाहीत असा टोला लगावला. विलिनीकरणाचा कोणताही विषय आमच्यासमोर नाही. सध्या आमच्यासमोर आमचं दैवत गेल्यानंतर आमची मायमाऊली राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली जाणार आहे आणि ताकदीने त्यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देणे आणि दादांचे जे व्हिजन होते त्या व्हिजनवर आमचे आमदार महायुतीमध्ये काम करतील ही प्राथमिकता आहे. त्यामुळे कायम पडद्यामागून एक एक वक्तव्य करून राज्यातील जनतेसमोर संभ्रम निर्माण करु नये असा मोलाचा सल्ला आनंद परांजपे यांनी शरद पवार गटाला दिला आहे.