Category: मुंबई

Mumbai news

भारतातील पहिली संकल्पना गाडगेबाबांच्या धर्मशाळेत

रमेश औताडे मुंबई : ज्या गोरगरीब रुग्णांना मुंबईत येऊन उपचार घेण्याची वेळ येत होती त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय त्या वेळी श्री संत गाडगे महाराजांनी ओळखून जी धर्मशाळा उभी केली त्या धर्मशाळा वास्तूचे आता लवकरच नऊ मजल्यात रूपांतर होणार असून रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकांच्या राहण्याची सोय इथे केली जाणार आहे. भारतातील हि पहिली संकल्पना असणार आहे. अशी माहिती श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट चे प्रमुख विश्वस्त हेमंत सुधाकर सामंत यांनी दिली. मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयासमोर असणारी ही धर्मशाळा आता ४५ रूम असणारी नवीन इमारत होणार आहे. त्याच्या बेसमेंटला रुग्णवाहिका पार्किंग करण्याची जागा ठेवली जाणार आहे. शिवाय रुग्णवाहिका घेऊन आलेल्या चालकाच्या राहण्याची सोय केली जाईल. या धर्मशाळेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ५० रुपयांत राहण्याची सोय उपलब्ध होते. दोन वेळचे शिजवलेले अन्नदेखील मिळते. झोपण्यासाठी अंथरुण, पांघरूण आणि खाटदेखील दिली जाते. जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराची सुविधा देण्यात आली आहे. ही सर्व सुविधा फक्त ५० रुपयांत दिली जात असल्याने रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसते. २८ फेब्रुवारी १९९३ रोजी या धर्मशाळेचे भूमिपूजन झाले. सात वर्षांनी इमारतरूपी ही धर्मशाळा उभी झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र रुग्णांच्या नातेवाइकांच्या राहण्याच्या सोयीवर लक्ष केंद्रित असूनही त्यांना भोजन देणे, दूध आणि फळे देणे, महाग औषधे असतील तर त्यासाठी काही दात्यांचा शोध घेणे, वैद्यकीय शिबिरे भरवणे, भुकेलेल्यांना अन्नदान करणे अशा अनेक उपक्रमांतून धर्मशाळेचा अखंड प्रवास सुरू आहे. परळ येथील संत गाडगे महाराज धर्मशाळेत दिवसाला १०० लोक राहण्याची सोय आहे. या धर्मशाळेत १६ रूम असून, वर्षाला जवळपास साडेतीन हजार रुग्णांची सोय केली जाते. कर्करोगग्रस्त लहान मुलांना अनेक महिने इथेच राहावे लागते. त्यांचे आई-वडील अनेकदा त्यांना पदपथावर झोपवतात. केईएम, वाडिया आणि टाटा या तीन महत्त्वाच्या रुग्णालयांतील रुग्णांसाठी ही धर्मशाळा खरंच आधार बनली आहे. मुलांना मनोरंजन म्हणून टीव्हीचीदेखील सोय आहे. या वास्तूची निर्मिती गुणवंतराव चराटे यांनी केली. स्वच्छतेवर भर देत आजही पंढरपूरच्या दिंडीत जवळपास ४०० ते ५०० स्वच्छता कर्मचारी सहभागी होतात. तिथला संपूर्ण परिसर स्वच्छ करतात, असेही सामंत यांनी सांगितले. 00000

मुलुंडमधील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

मुंबई : माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुलुंडमध्ये नुकताच ममता दिन साजरा करण्यात आला.यानिमित्त शिवसेना मुलुंड विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेच्या   शाखा क्रं १०८ व  फँमिली प्लॅनिग असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई  तर्फे महिलां पुरुषांसाठी…

कोकणी-मालवणी माणूसच मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही

सुनील प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई : लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुका होतील. मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, शिवसेनेचीच आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर कोकणी मालवणी माणूसच भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, विधानसभेतील शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी काल रात्री विश्वास व्यक्त केला तर दादरमध्ये सगळ्या जत्रा होतात पण मालवणी जत्रोत्सव होत नाही, अशी खंत व्यक्त करुन माहीमचे आमदार, विभागप्रमुख महेश सावंत यांनी दादरमध्ये मालवणी जत्रोत्सव भरविण्याचे सूतोवाच केले. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ आयोजित आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ तसेच मागाठाणे मित्र मंडळाच्या सहकार्याने मालवणी महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या महोत्सवाची सांगता काल रात्री शिवसेना नेते प्रतोद सुनील प्रभू आणि आमदार महेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी या दोघांनी आयोजकांचे कौतुक करतांना कोकणी मालवणी चाकरमान्यांनी ओसंडून वाहणारे मैदान हीच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. कोकणी माणूस आणि शिवसेना वेगळी करताच येणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खऱ्या अर्थाने कोकणी मालवणी माणसाने पुढे नेण्याचे काम केले आहे. या मालवणी महोत्सवामुळेच कोकणी माणसाला शिवसेनेने बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे, असेही सुनील प्रभू यांनी सांगितले. उत्सव प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या सह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते मालवणी महोत्सव आणि देव गिरोबा मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक १४, १२ चे सर्व पदाधिकारी, मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा महोत्सव यशस्वी केला. प्रभू आणि सावंत या आमदारांनी सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’मुळे कमी होऊ लागले हवेतील धुळीचे प्रमाण

नवी मुंबई : नियमित स्वच्छता करण्यासोबतच ज्या रस्त्यांवर अधिक वर्दळ असते किंवा एखादा दुर्लक्षित परिसर असतो अशा ठिकाणांकडे विशेष लक्ष देत त्याठिकाणी डीप क्लिनींग करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे…

नूतन हिंदी प्राथमिक हायस्कूल येथे हस्तकला व विज्ञान प्रदर्शन संपन्न

कल्याण : कल्याण पूर्वेतील राष्ट्रीय सेवा परिषद संस्थेच्या नूतन हिंदी प्राथमिक  विद्यालयातील प्राथमिक विभागाचे सुंदर कलाकृती व विज्ञानावर आधारित प्रयोग यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक शाळेत संस्थापक शिवकुमार त्रिपाठी व मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध शालेय उपक्रमांचे आयोजन करत असतात. विद्यार्थी दरवर्षी कला, व्यावहारिक अनुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कलाकृती आणि प्रयोग सादर करतात. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणे आहे. यावर्षी देखील याच उद्देशाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये गणेश विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शन व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्नू पांडे, मीनल पाटील, वृता पाटील, चंद्रकला सिंग, रशिदा खान, सोनल त्रिपाठी, अंजू पांडे आणि कमलेश मिश्रा ह्या शिक्षकांनी व शाळेतील कर्मचारी रामजी यांनी मेहनत घेतली. तसेच विद्यार्थी व पालक इत्यादींच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

केडीएमसी क्षेत्रात बांधकाम परवाना मिळणार ऑनलाईन

 त्रासमुक्त परवानग्या मिळण्याण्यासाठी आँनलाईन प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम परवानगीसाठी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. नवीन वर्षात, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा  टिडीआर्, रिडेव्हलमेन्ट,  परवानगी शुल्क फी, आदी परवानग्या आँनलाईन माध्यमातून राबिविण्यासाठी मनपा यंत्रणा सज्ज झाली आहे. केडीएमसीच्या मते, बांधकाम आराखड्यांसाठी ही सुविधा आधीच होती, परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे लोक बांधकाम परवानगी ऑफलाइन घेत असत. अलीकडेच, बांधकाम परवानगीशी संबंधित कामात पारदर्शकता आणण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  केडीएमसीच्या नगररचना विभागाने गुरुवारी शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांची बैठक बोलावली, जिथे त्यांना इमारत आराखड्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आणि त्याबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांचे निराकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. केडीएमसी नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक नगररचना संचालक नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी सांगितले की ही सुविधा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. कोणताही विकासक देशातील कोठूनही ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आराखडा सादर करू शकतो. टेंगळे यांनी सांगितले की, या ऑनलाइन सुविधेअंतर्गत बांधकाम व्यावसायिकाला त्याच्या योजनेशी संबंधित फाइल कोणत्या विभागात आहे हे पाहता येईल आणि जर त्या फाईलमध्ये काही प्रलंबित कागदपत्रे असतील तर ती तो ऑनलाइन पाठवू शकेल. या सर्व कामांसाठी त्याला कार्यालयात जावे लागणार नाही. केडीएमसी इमारत आराखडे ऑनलाइन सादर करण्यासाठी आणि मंजुरीसाठी राज्य सरकारने प्रदान केलेल्या बीपीएमएस सॉफ्टवेअरचा वापर करत आहे आणि ते सुरळीतपणे काम करत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांनी केडीएमसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. याबाबत विकासक विमल ठक्कर म्हणाले, “आजच्या काळात सर्व काही ऑनलाइन झाले आहे, ज्यामुळे काम सोपे होत आहे. अशा परिस्थितीत, बांधकाम आराखड्याची परवानगी ऑनलाइन असल्याने, आम्हाला आता अधिकाऱ्यांना वारंवार भेटण्यासाठी जावे लागणार नाही आणि आराखडा मंजूर करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे होईल.” या आँनलाईन परवानगी प्रक्रिया मुळे जलदगतीने तसेच पारदर्शक, परवानगी प्रक्रिया मार्ग मोकळा झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

नमुंमपा मुख्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यानिमित्त मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या हस्ते, इतर अधिकारी – कर्मचारी यांच्या उपस्थितीत…

आत्माराम मोरे साखळी कॅरम स्पर्धा

प्रसाद मानेला विजेतेपद   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क सुपर लीग कॅरम चँम्पियनशिप स्पर्धेत पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या प्रसाद मानेने विजेतेपद पटकाविले. दडपण न घेता अचूक सोंगट्या टिपणाऱ्या उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू  प्रसाद मानेने सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पोद्दार अकॅडमी-मालाडच्या प्रसन्न गोळेचा सहाव्या निर्णायक सामन्यात १२-४ असा चुरशीचा पराभव केला आणि प्रसादने अजिंक्यपदाला गवसणी घातली. सुरुवातीचे बोर्ड हातचे निसटल्यामुळे प्रसन्न गोळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेत्या-उपविजेत्यांना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व सुरेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. दादर-पश्चिम येथील सिबीईयू हॉलमध्ये रंगलेल्या स्पर्धेत युनिव्हर्सल हायस्कूल-दहिसरच्या वेदांत राणेने तृतीय तर पाटकर विद्यालय-डोंबिवलीच्या नील म्हात्रेने चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला.  महात्मा गांधी विद्यामंदिर-वांद्रेची तनया दळवी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे निधी सावंत, देविका जोशी, केतकी मुंडले, पोद्दार अकॅडमी-मालाडचा पुष्कर गोळे, नारायण गुरु स्कूलचा उमैर पठाण, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम आदी उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. पंचाचे कामकाज क्रीडापटू चंद्रकांत करंगुटकर, अर्जुन कालेकर, ओमकार चव्हाण आदींनी केले. राज्य क्रीडा दिनानिमित को-ऑप.बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबईचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने संपन्न झालेला कॅरमचा शालेय उपक्रम पूर्णपणे मोफत स्वरूपाचा होता. खेळाडूंच्या पालकवर्गाने सुपर लीग कॅरम स्पर्धेच्या आयोजनाची मुक्तकंठाने स्तुती केली.

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा

भाजपा राज्य अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन मुंबई : जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी  बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे, प्रकाश जावडेकर, खा. नारायण राणे, खा. अशोक चव्हाण तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. बावनकुळे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश न मिळाल्याने कार्यकर्ते निराश झाले होते. त्या निकालातून आम्ही बरेच काही शिकलो. त्या नैराश्यातून संघटनेला बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना आखली. पुण्यात झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक आपण जिंकणारच, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीमुळेच आपण हा विजय मिळवू शकलो. कार्यकर्त्यांच्या परिश्रमापुढे मी नतमस्तक होतो, अशा शब्दांत  बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत बसविण्याचे काम आम्ही करू, असेही बावनकुळे यांनी नमूद केले. गेल्या अडीच वर्षांत राज्यात पक्ष संघटनेतर्फे झालेल्या विविध अभियानांची माहितीही  बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी यावेळी संघटन पर्व अंतर्गत राज्यात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश – चंद्रकांत सूर्यवशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ जानेवारी रोजी ००.०१ वाजल्यापासून  ते  २६ जानेवारी २०२५ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात १४ जानेवारी रोजी जिल्ह्यात मकर सक्रांत दिन साजरा केला जाणार आहे. तसेच २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. अशा वेळी  आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम,, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी  बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.