Category: मुंबई

Mumbai news

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

मुंबई : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले. मंत्रालयात मंत्री . सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी  मंत्री .सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरस्वती स्पोर्ट्स क्लब, मध्य रेल्वे आणि महिलांमध्ये रचना नोटरी वर्क्स अंतिम विजेते 

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे पार पडली.   व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा  (८-८-९-६) १७-१४ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे दिलीप खांडवीने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अवधूत पाटीलने १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने प्रत्येकी १:००, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले. पश्चिम रेल्वेतर्फे सम्यक जाधवने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. वृषभ वाघने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. दिपक माधवने २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले. व्यावसायिक महिला गट: व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महावितरण कंपनी संघाचा (६-५-४-६) ११-१० असा  १ गुण व १:१० मिनिटे राखुन पराभव केला. रचनातर्फे पुजा फरगडेने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. श्वेता जाधवने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. सेजल यादवने ३:२०, १:४० मिनिटे संरक्षण केले. महावितरण तर्फे दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. ४ फुट ११ इंच किशोर गट: ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा  (३-१-१-२) ४-३ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. सरस्वतीतर्फे मेहक आदवडेने नाबाद ६:००, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. वरुण गुप्ताने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. शिवम झाने १:००, १:०० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थीतर्फे अपसर शेखने ३:२० मिनिटे संरक्षण केले. पवन गुरवने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओमकार जाधवने २:३० मिनिटे संरक्षण केले. तृतीय क्रमांकाचे सामने: व्यावसायिक महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र पोस्टाने मुंबई पोलीस संघाचा (५-३-४-५) ९-८ असा १ गुणांनी पराभव केला तर व्यावसायिक पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोस्टने संघाचा (९-७-३-४) १२-११ असा  १ गुण व ३:१० मिनिटे राखून पराभव केला. ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-२) १०-४ असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ४ फुट ११ इंच किशोर गट आक्रमक – पवन गुरव (विदयार्थी) संरक्षक – अधिराज गुरव  (ओम साईश्वर)…

मुंबई पोर्टमधुन सेवाभावी कार्यकर्ते गणेश पोळ सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणामधील २७  वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा  सेवानिवृत्ती बद्दल २८  जानेवारी २०२५  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. गणेश पोळ हे मुंबई पोर्टमध्ये ५  जानेवारी १९९८  रोनजी टॅली क्लार्क  म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना नोकरीमध्ये  टीसीसीसी, ज्युनियर असिस्टंट,  सीनियर असिस्टंट असा बढतीचा प्रवास मिळाला. गणेश पोळ यांचा २७  वर्षाच्या कालावधीमध्ये  मुंबई पोर्टच्या जमीन धोरणात सहकार्य करण्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता.  म्हणूनच तत्कालीन चेअरमन श्रीमती राणी जाधव यांनी मुंबई पोर्ट लँड पॉलिसीचा जो केंद्र सरकारला अहवाल पाठविला,  त्यामध्ये त्यांचा नामोउल्लेख होता. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये नोकरी लागण्यापूर्वी त्यांनी गुड नाईट या कंपनीच्या  उत्पादकतेमध्ये संशोधनाचे मोठे काम केले आहे. त्यांच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा मुंबई पोर्ट  प्रशासनाला चांगलाच फायदा झाला.  त्यांनी मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व निस्वार्थीपणे सेवा केली.  त्यांच्या सेवेचा अनेक कामगारांना व  अधिकार्‍यांना चांगलाच फायदा झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासात गोल्ड मेडल मिळविले आहे. मुंबई पोर्ट  मधुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन गणेश पोळ यांनी सिव्हीलमध्ये वकिलाची प्रॅक्टिस करण्याचा  निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा व हुशारीचा  न्यायालयामार्फत  सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळो, अशा सर्वच वक्त्यांनी  त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पोळ यांच्या सेवाभावी कार्यावर आधारित ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे  व फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्टचे मुख्य यांत्रिक अभियंता नितीन बोरवणकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर्स प्रदीप नलावडे,  ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे  पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील. संदीप चेरफळे तसेच कर्मचाऱ्यांमधील सहकारी मित्र मंगेश गवारे, संदीप गावडे. ॲड. गिरीश तळेकर. अधिकारी बोस, पत्नी रेखा पोळ मुलगी अनुषा पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. गणेश पोळ यांनी सत्काराला उत्तर दिले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी शीला भगत,  विष्णू पोळ, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस,  संतोष कदम तसेच मुंबई पोर्टचे अधिकारी, गणेश पोळचे सहकारी मित्र,  कुटुंबिय, गोदीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मंगेश सावंत यांनी  सुंदर केले तर आभार युनियनचे संघटक चिटणीस आप्पा भोसले यांनी मानले.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

देशाचे संविधान बदलणार ही ‌भिती व्यर्थ , तसे झाले‌‌ तर देश रस्त्यावर उतरेल!-अॅड.वालावलकर

राजेंद्र साळसकर मुंबई : देशाचे संविधान बदलणार ही भिती व्यर्थ आहे.संविधान बदलने इतके सोपे नाही आणि जर‌ तसे झाले तर त्याविरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे वकिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अमृतमहोत्सवी वर्षांची वाटचाल,यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या परळ येथील आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने रविवारी प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या‌ औचित्याने २५ वकीलांचा,परळगाव, लालओठा मैदानावरील सुसज्ज शामियान्यात गुणगौरव सोहळा पार पडला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.नरेंद्र‌ वालावलकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या वकीलांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन‌ गुणगौरव‌ करण्यात आला.सत्कारात महिला वकिलांचाही समावेश होता‌. त्यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर आपल्या भाषणात पुढेम्हणाले,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य आणि अधिकार या गोष्टी बहाल करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संकुचित होता कामा नये,त्याचे संरक्षण करण्याची शिकवण देणारा प्रजासत्ताकदिन आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कोल्हापूरे होते. मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस विजय परदेशी म्हणाले,हे डॉक्टर,वकील‌ यांचा ते‌ पेशा बजावत असले‌ तरी,ते विविध समाजाची‌ बांधिलकी निभावत असतात.त्याची सामाजिक संस्थांनी उचित अशी दखल‌ घेणे‌,ही त्यांची नैतिक जबाबदारी असते.तीच जबाबदारी जोपासण्याचे‌ काम आम्ही करीत आहोत.याप्रसंगी स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली. या प्रसंगी परळगावातील‌‌ लेखक काशिनाथ माटल यांच्या लेखणीची ओळख करून देताना विजय परदेशी म्हणाले, काशिनाथ माटल यांनी पाच वाचनीय आणि उत्कृष्ट कथासंग्रह ‌लिहून परळकरांना अभिमान संपादून दिला आहे. त्यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचा दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे,त्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात‌ आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते‌.

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली येथील जी-41,सेक्टर- 03, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम आज दिनांक 27/01/2025 रोजी अतिक्रमण मोहिम राबवुन सदर बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी जी विभाग ऐरोलीचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच अतिक्रमण पोलिस पथक उपस्थित होते.  सदर कारवाईसाठी 3 हॅमर, 1 गॅस कटर, 3 ब्रेकर, 15 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, उरण फाटा नवी मुंबई महामार्ग (हायवे) रस्त्यालगत असलेल्या एकूण 22 अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. अे विभाग कार्यालय बेलापूर व बी विभाग कार्यालय नेरुळ कार्यालयामार्फत संयुक्त मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आलेले आहेत. या धडकमोहिमेसाठी अे विभाग कार्यालय व बी विभाग कार्यालयतील अधिकारी/ कर्मचारी, मजूर- 12, जेसिबी-01,तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 मुंबई पोर्टमधील गोदी कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक स्नेहसंमेलन संपन्न

मारुती विश्वासराव यांना मुंबई कामगाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणाच्या गोदी विभागातील नोकरीत असणारे कर्मचारी व सेवानिवृत्ती  कर्मचाऱ्यांचे  ४८ वे कौटुंबिक स्नेहसंमेलन २६ जानेवारीला शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सर्वप्रथम ७६  व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सध्या  मुंबई बंदरात पूर्वी ४४ हजर कामगार होते,  आता २७०० कामगार शिल्लक राहिले आहेत. तरी देखील मुंबई बंदरातील गोदी कामगारांनी ६५ दशलक्ष टन मालाची चढ उतार केली आहे. गोदी कामगारांनी कमी कामगारांमध्ये जास्त उत्पादकता काढली आहे. बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०२२ पासून भरघोस पगारवाढीचा वेतन करार झाला आहे. या वेतनकराराची प्रत्यक्षात वाढ १  फेब्रुवारी २०२५  पासूनच्या पगार व  पेन्शनमध्ये मिळणार आहे. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, ज्ञानेश्वर वाडेकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल  एम्प्लॉईज युनियनचे जनरल  सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बापू घाडीगावकर, मुंबई बंदर प्राधिकरण आऊट डोअर डॉक्स स्टाफ पूजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे, मुंबई पोर्ट ट्रस्ट  एस.सी. एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे कार्याध्यक्ष अंकुश कांबळे आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन फिलोंथरोपी फाउंडेशनचे पदाधिकारी  व उत्कृष्ट निवेदक विजय सोमा सावंत यांनी केले. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे व ज्ञानेश्वर वाडेकर  यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांना मुंबई  कामगार रत्न पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,  सेवानिवृत्तीबद्दल बापू घाडीगावकर व दुबे यांचा सत्कार करण्यात आला. गोदी विभागातील अधिकारी व युनियन पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. करमणुकीचा कार्यक्रम म्हणून गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “नियम व अटी  लागू करा” या लोकप्रिय नाटकाचा २८२ वा प्रयोग दाखविण्यात आला. स्नेहसंम्मेलनासाठी आलेल्या  गोदी कर्मचाऱ्यांच्या  कुटुंबामुळे सभागृह भरगच्च भरले होते.

सानपाडा येथे  एसपीएल २०२५ क्रिकेट सामन्यांचा सांगता सोहळा  संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबईमधील सानपाडा तरुणाईची व क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची क्रिकेट लीग, सानपाडा प्रिमियर लीग च्या ८ व्या पर्वाचा सांगता समारंभ मोठया जल्लोशात संपन्न झाला, अशी माहिती मारुती…

हिंदुस्थान कंपोजिटसच्या ११०० कामगारांना थकीत डिएचे धनादेश मिळणार

उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कार्यक्रम मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील  व आता बंद असलेल्या  हिंदुस्थान कंपोजिटस लिमिटेडमधील   (फेरोडो) ११०० कामगारांचा थकलेला महागाई भत्ता- डिएचे  वितरण धनादेश देऊन उद्या बुधवारी सकाळी ११ वा. मातोश्रीवर होणार आहे. हे वितरण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या  पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते काही कामगारांना धनादेश देऊन प्रतिकात्मक करण्यात येणार आहे. नंतर या धनादेश वितरणाचा  कार्यक्रम आमदार सुनिल राऊत, लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे,मुंबईचे सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ आणि कामगारांच्या  उपस्थितीत बुधवारीच सायंकाळी ५ वा. एसएनडीटी कन्या महाविद्यालय सभागृह घाटकोपर पश्चिम येथे होणार आहे. अशी माहिती या डिएची थकीत रक्कम मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे प्रमुख कार्यकर्ते शिवसेना माजी उपविभागप्रमुख नंदू आंबोकर यांनी दिली. या कार्यक्रमास माजी महापौर महादेव देवळे, हिंदुस्थान कंपोजिटसचे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार चौधरी,माजी नगरसेवक सुनिल भालेराव हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना समन्वयक रवींद्र कोठावदे, शिवसेना उपविभागप्रमुख विजय पडवळ, शाखाप्रमुख निलेश पोहरकर यांनी केले आहे. हा थकीत डीए मिळावा यासाठी नंदू आंबोकर यांच्यासह सुधीर पाटील,अप्पा चव्हाण,एल.जी.नाईक यांनीही प्रयत्न केले.या प्रयत्नांना लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे,सह पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांची साथ लाभली.या पार्श्वभूमीवर विक्रोळीत संदेश विद्यालयात हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांची एक बैठक  झाली. थकीत डीएचा लढा ३० वर्षे औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयात चालूनही यावर काही निर्णय होईना शेवटी संतप्त कामगारांनी हा लढा आऊट ऑफ कोर्ट सोडवावा, कोर्टाबाहेर सोडवावा अशी भूमिका विक्रोळीच्या बैठकीत घेतली.त्यानंतर आंबोकर यांच्यासह सर्व प्रयत्नकारांनी हिंदुस्थान कंपोजिटसच्या मालकांशी चर्चा केली.त्यावेळी मालकही कोर्टाबाहेर यावर तोडगा काढण्यात तयार झाले. त्यानुसार सुवर्णमध्य काढून प्रत्येक  कामगाराला,मृत कामगारांच्या वारसाला ही डीएची रक्कम त्यांनी केलेल्या सेवा वर्षानुसार मिळणार आहे. ३० वर्षांच्या लढ्यानंतर हे पैसे मिळत आहे,ही आम्हा सर्व कामगारांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची गोष्ट आहे,असे नंदू आंबोकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास आमदार सुनिल राऊत यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.