Category: मुंबई

Mumbai news

उद्योजक विजय केळुसकर यांचे आकस्मिक निधन

 ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर जवळील रासायनिक कारखान्याचे मालक, पश्चिम उपनगरातील प्रथितयश उद्योजक विजय शंकर केळुसकर यांचे काल रात्री बोरीवली पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अनुराधा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. काही काळापूर्वी त्यांच्या दोन्ही मुलांचे ऐन उमेदीच्या काळात निधन झाल्यामुळे केळुसकर परिवार दुखाच्या छायेतून बाहेर येत नाहीत तोवर कर्ते सवरते उद्योजक विजय केळुसकर काळाच्या पडद्याआड गेले. जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील एकता विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपनगराचा राजा, मागाठाणे मित्र मंडळ तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य संचालित जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे ते खंदे समर्थक होते. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विजय केळुसकर यांनी बोरीवली येथे येऊन आपला ठसा उमटविला होता. ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. काल सकाळी प्रकृती बरी वाटत नसल्याने स्वतःच चालत ते इस्पितळात गेले. त्यांना वैद्यकीय तपासण्या केल्या नंतर अती दक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रात्रीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे जय महाराष्ट्र नगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमित स्व. विजय केळुसकर यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व थरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

उध्दव ठाकरेंचे ‘मिशन २५’

स्वाती घोसाळकर मुंबई : ‘मुंबई आमच्या सायबांची, नाही कुणाच्या बापाची’ ही शिवसेनेची हक्काची ‘वाघ’गर्जना ! शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई कुणाची असा सवाल निर्माण झाला होता. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने मुंबईतील लढविलेल्या चार पैकी तीन खासदारकीच्या जागा जिंकल्या आणि त्यापाठोपाठ…

शाब्बास स्वप्नील !

उद्धव ठाकरेंकडून स्वप्नीलचे कौतुक मुंबई: शाब्बास स्वप्नील ! आम्हाला सर्वांना तुझा अभिमान वाटतो. अशा शब्दात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेचे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.…

बहीणींसाठी खुशखबर ! दीडचे तीन हजार करू !!

मुख्यमंत्र्यांचा रक्षाबंधानाच्या पूर्वसंध्येला बहीणींना शब्द  सातारा : रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील लाडक्या बहीणींसाठी खुषखबर आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत देण्यात येणारी महिना दिड हजाराची रक्कम हळूहळू वाढवत नेत तीन हजारापर्यंत केली जाईल असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री…

५८ वी सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

मुंबई संघाला विजेतेपद मुंबई : सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर येथे सुरु असलेल्या ५८ व्या सिनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या संघाने महिला सांघिक गटाचे विजेतेपद पटकाविले. साखळी गटात मुंबईने आपले सर्व सामने जिंकून ८ गुणांची कमाई करत या गटाचे विजेतेपद पटकाविले. तर ठाण्याचा संघ व पुण्याच्या संघात प्रत्येकी ४ गुण झाल्याने बरोबरी झाली. परंतु गुणकोष्टकाच्या आधारे ठाण्याच्या संघाला उपविजेतेपद तर पुण्याच्या संघ तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई संघातर्फे काजल कुमारी व अंबिका हरिथ हिने एकेरीचे सामने जिंकले. तर ऐशा साजिद खान व मिताली पाठक जोडीने आपले दुहेरीचे सामने जिंकले. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल अनिल मुंढे ( पुणे ) वि वि सागर वाघमारे ( पुणे ) २५-१९, २३-१० फहीम काझी ( मुंबई ) वि वि योगेश परदेशी ( पुणे ) १९-२१, २५-१४, २५-१० रिझवान शेख ( मुंबई उपनगर ) वि वि झैद फारुकी ( ठाणे ) २५-०, २५-१० योगेश धोंगडे ( मुंबई ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) २५-१०, १४-१० महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल काजल कुमारी ( मुंबई ) वि वि अंजली सिरीपुरम ( मुंबई ) २२-२१, २४-१८ दीक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ) वि वि प्राजक्ता नारायणकर ( मुबई उपनगर ) २५-४, १२-११ मधुरा देवळे ( ठाणे ) वि वि पुष्कर्णी भट्टड ( ठाणे ) २४-१०, २२-८ समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ११-२०, २३-१०, २०-९ ०००००

 मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित

 इकोफ्रेंडली ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन नवी मुंबई : यावर्षी 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशोत्सव – 2024 आणि 03 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 14 ऑगस्टला विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत देण्यात आलेले निर्देश तसेच शासनाकडून मागील वर्षी पर्यावरणपूरक सण साजरा करणेच्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार – 1.  सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. 2.  मा. न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. 3.  सर्व गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिक / भक्तजनांना विनम्र आवाहन करण्यात येते की, शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) पासून घडविलेल्या श्री गणेशमूर्तीं / दुर्गामातेची विक्री अथवा खरेदी करु नये. 4.  प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. 5.  पारंपारिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. 6.  सार्वजनिक उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. 7.  सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू यांचा वापर टाळण्यात यावा. 8.  वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. 9.  आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच कोर्टाच्या निर्णयानुसार ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. 10.  श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. 11.  श्रीगणेश मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणा-या भाविकांसाठी स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. 12.  विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले (बालके) आणि वरिष्ठ नागरिकांनी, गर्भवती महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. 13.  विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने शक्य झाल्यास श्रीगणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता त्याच परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेमार्फत निर्मित कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात यावे. 14.  महाराष्ट्र शासन तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या तसेच वेळोवेळी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु  होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही महाराष्ट्र शासनाच्या मागदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील  अनुपालन करावे. 15.  गणेशोत्सव व   नवरात्रौत्सवाच्या   अनुषंगाने   अवलंबविण्याच्या   परवानगी   प्रक्रियेबाबत   विभाग स्तरावर सर्व विभाग कार्यालयांमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार असून, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीस उपस्थित रहावे व नियमानुसार उत्सव साजरे करावेत. 16.  नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने विकसीत केली आहे. सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या https:// app.nmmconline.in या संकेतस्थळावर (Website) गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज करण्याची मुदत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. मंडप उभारणीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम आकारण्यात येणार नाही.  तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवरवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही उत्सवासाठी उत्सव सुरु होण्यापूर्वी दहा दिवस अगोदर ऑनलाईन प्रणालीव्दारे परवानगी देणे आवश्यक आहे असे सूचित करण्यात येत आहे. 17.  गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची तसेच कायदेशीर कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ / नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असेही सूचित करण्यात येत आहे.…

 मुंबईत ‘रेलनीर’चा पुरवठा बंद

अंबरनाथच्या ग्रामस्थांचे आयआरसीटीसी, ठेकेदाराविरोधात आंदोलन मुंबई : अंबरनाथ येथे आयआरसीटीसीद्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य आणि पश्चिम रेल्वेवर केला जातो. मात्र, अंबरनाथ येथील काकोळे ग्रामस्थांकडून आयआरसीटीसी आणि परप्रांतीय ठेकेदाराविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याची पुरवठा व्यवस्था खंडित झाली आहे. आयआरसीटीसीने मुंबईतील रेल्वे स्थानकांतील रेलनीरचा पुरवठा पुढील सूचनेपर्यंत बंद केला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकात आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये केला जातो.अंबरनाथ येथील ‘रेलनीर’च्या कारखान्यातून बाटलीबंद पाणी पोहोचवण्याचे काम मालवाहतुकीद्वारे काकोळे ग्रामस्थ करत होते. मात्र, मेपासून वाहतूक ठेकेदार मनोज खाद्यायान भांडार मुझ्झफरपूर याने मालवाहतुकीचा कारभार हाती घेतला. त्यामुळे १२ मालवाहतूकदार ग्रामस्थांची सेवा बंद झाली. तर, वाहतूक ठेकेदार भांडार यांनी ही सेवा मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनीकडे दिली. परिणामी, काकोळे ग्रामस्थ आर्थिक कोंडीत सापडले आहेत. याबाबत आयआरसीटीसी, रेलनीर, वाहतूक ठेकेदार यांच्या विरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा/कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकात, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकात ‘रेलनीर’चा बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांनी पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटल्यांची विक्री केली जाईल. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन वाहतूक ठेकेदार नेमला. मात्र, मालवाहतुकीचे काम पुन्हा काकोळे ग्रामस्थांना मिळावे यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि नवीन वाहतूक ठेकेदार यांच्या बाजू ऐकून मध्यम मार्ग काढला जाईल. मालवाहतूक खंडित झाल्याने पुढील दोन दिवस मुंबईतील रेल्वे स्थानकात ह्यह्णरेलनीरह्णह्ण बाटलीबंद पाण्याचा पुरवठा बंद राहील, असे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले. मेपासून काकोळे गावातील १२ मालवाहतूकदारांना कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांची सेवा खंडित केली. त्यामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. – नरेश गायकर, उपसरपंच, काकोळे गाव, अंबरनाथ 00000

 म्हाडाची सोडतपूर्व प्रक्रिया समजून घेण्याची संधी

 माहितीसाठी उद्या ऑनलाइन कार्यशाळा   मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २०३० घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सध्या सुरू आहे. या सोडतपूर्व प्रक्रियेदरम्यान अर्ज भरताना, अर्ज दाखल करताना इच्छुक अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेत इच्छुक अर्जदारांना मार्गदर्शन करण्यासाठी, अर्ज कसा भरावा, काही अडथळे असल्यास ते कसे दूर करावेत या संदर्भातील इत्यंभूत माहिती देण्यासाठी मुंबई मंडळाने एक ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही कार्यशाळा होणार आहे. मुंबईतील गोरेगाव, बोरिवली, मालाड, जुहू, पवई, ताडदेव, दादर, वरळी, विक्रोळी इत्यादी परिसरातील २०३० घरांसाठी १३ सप्टेंबरला सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प, अल्प मध्यम आणि उच्च अशा सर्व गटातील घरे या सोडतीत समाविष्ट आहेत. तर २४ लाख ते साडेसात कोटी अशा या घरांच्या किमती आहेत. या सोडतीसाठीच्या अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रियेला ९ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेस सुरुवात होऊन दहा दिवस उलटले तरी अर्जविक्री – स्वीकृतीस अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. महागडी घरे आणि अर्ज करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अर्जांची संख्या कमी आहेत. शुक्रवारी,१६ ऑगस्ट पर्यंत ५४०३ अर्ज भरले गेले होते. तर अनामात रकमेसह त्यातील केवळ ३२४२ जणांनी अर्ज सादर केले आहेत. हा प्रतिसाद अत्यंत कमी मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाच्या पणन विभागाने आणि म्हाडा प्राधिकरणाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाने अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी आणि इतर अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता ही ऑनलाइन कार्यशाळा होणार आहे. यात मुंबई मंडळाच्या पणन विभागाचे उप मुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड आणि अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. अर्जदारांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे. अर्ज कसा भरावा, तो कसा सादर करावा याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवले जाणार आहे. सोडतीसाठी ज्या अर्जदारांनी नोंदणी केली आहे, तसेच नोंदणी करण्यास इच्छुक आहेत अशांना https://youtube.com/live/asSycqY6Dvc?feature=share या लिंकवर जात या कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. सोडतीसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांना एसएमएसद्वारे आणि म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावरही कार्यशाळेची लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज @mhadaofficial वरही या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तेव्हा या कार्यशाळेत अधिकाधिक अर्जदारांनी, इच्छुक अर्जदारांनी सहभागी होत आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन मुंबई मंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान म्हाडा सोडतीच्या पार्श्वभूमीवर दलाल सक्रिय झाले आहेत. सोडतीत घर मिळवून देण्याच्या नावे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. बनावट संकेतस्थळामुळेही काहीजणांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बाबी उघड झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता मुंबई मंडळाने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन केले आहे. कोणत्याही आमिषाला, भूलथापांना बळी पडू नये, असेही आवाहन केले आहे. 00000

 बोरीवली पूर्व येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 पाच तासात पावणे दोनशे लोकांनी केले रक्तदान   मुंबई : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत रामचंद्र घाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भरत घाणेकर मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागाठाणे जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोरील भागात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पाच तासात सुमारे पावणे दोनशे लोकांनी रक्तदान केले. सुमारे एकशे चोपन्न बाटल्या रक्त जमा झाले. बोरीवली रक्तपेढी तर्फे हे रक्तसंकलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य, योगेश वसंत त्रिवेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम कदम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वरुण घाणेकर  कार्यक्रमास लक्ष्मीकांत नाईक, रमेश घाणेकर, संदेश कोलापटे, संजय घाडगे, सिद्धेश्वर वाघचौरे, नरेंद्र माली, अशोक पडीयार, हरिश्चंद्र कत्वांकर, बिपिन सावंत यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गायत्री नाईक, हृदया घाणेकर, रोहित गुप्ता, ओमकार कणसे, गीत घाणेकर, निशांत पेडणेकर, राहुल वाडीकर, पार्थ नगवदरिया  आदींनी परिश्रम घेतले. 00000

 ‘सैनिक हो! तुमच्यासाठी…’ सीमेवरील जवानांसाठी आरोग्यमंत्र्यांची अशीही भेट

सीमा सुरक्षा दलातील जवानांना महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली 10 ई-रिक्षाची भेट मुंबई : दूरवर जिथे नजर जाईल तिथे केवळ वाळवंट आणि समुद्राची एक किनार नजरेस येते…वाळवंट म्हणजे नुसतीच कोरडी रेती…