Category: मुंबई

Mumbai news

महाराष्ट्र जिद्दीने खेळला हाच ‘सुवर्ण विजय’ – संदीप तावडे

मुंबई : ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने आणखी एक सुवर्ण विजय मिळवला. या विजयाचे महत्त्व विशद करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे शासकीय परिषद सदस्य संदीप तावडे यांनी संघाच्या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. मातीचा गुण आणि जिद्द विजयाचा मार्ग दाखवतो “प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचा जो आपल्या मातीचा गुण आहे, तोच आपल्याला विजयाच्या मार्गावर नेतो. अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या विजयाबद्दल खात्री होती; आम्हाला फक्त तो किती गुणांनी जिंकतो हे महत्त्वाचे वाटत होते,” असे तावडे यांनी नमूद केले. ओडिसाचा आव्हान आणि महाराष्ट्राची जिद्द ओडिसाच्या संघाने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली होती. त्यांनी काही नवीन तांत्रिक कौशल्ये विकसित केली होती, परंतु महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ती जिद्दीने पार केली. “ड्रीम रनसारखे नवीन नियम महाराष्ट्राच्या खेळाडूंवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत, कारण तीनही फळीतील खेळाडूंनी मजबूत संरक्षण केले. इतर संघांवर मात्र या नियमांचा परिणाम दिसून आला,” असे तावडे म्हणाले. राज जाधवचा उत्कृष्ट खेळ “दुसऱ्या पाळीत संरक्षण करताना तिसऱ्या फळीतील दोन खेळाडू मैदानात उतरल्याने थोडेसे दडपण आले होते. परंतु राज जाधवने आपल्या उत्कृष्ट संरक्षणामुळे 1 मिनिट 40 सेकंद टिकून सामना सोपा केला,” असे त्यांनी सांगितले. संघाचा संपूर्ण विजय आणि भविष्यासाठी मार्गदर्शन तावडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या संघातील खेळाडूंनी जिद्द, कौशल्य आणि कठोर परिश्रमाने सुवर्णपदक मिळवले आहे. “महाराष्ट्र खो-खो संघाचे यश भविष्यातही कायम राहील, आणि हे विजय नवोदित खेळाडूंना प्रेरणा देतील,” असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या संघाने आपल्या मातीतील जिद्द आणि सांघिक मेहनतीच्या जोरावर सुवर्ण विजय संपादन केला आहे. हा विजय महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव आहे. महाराष्ट्राच्या संघाच्या यशामागे जिद्द आणि मार्गदर्शनाचा हातभार – प्रशांत इनामदार ४३वी कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि कुमार संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी या स्पर्धेतील अनुभव आणि संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रास कोर्टमुळे प्रारंभिक आव्हाने “या स्पर्धेतील क्रीडांगण ग्रास कोर्टचे होते, त्यामुळे सुरुवातीला खेळाडूंना या क्रीडांगणाशी जुळवून घेणे अवघड गेले. गवतावरून पाय घसरत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत होती. तरीही त्यांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीने या अडचणींवर मात केली,” असे प्रशांत इनामदार म्हणाले. नियोजनाचा अभाव आणि खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक राष्ट्रीय स्पर्धेतील नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. “निवास व्यवस्था सुमार दर्जाची होती, परंतु भोजन व्यवस्था मात्र सर्वोत्तम होती. खेळाडूंसाठी सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली,” असे त्यांनी सांगितले. प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन संघाच्या यशामागे प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. “डॉ. चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले आणि प्रशांत पाटणकर यांनी संरक्षण व आक्रमणासाठी योग्य धोरणांची आखणी करून खेळाडूंना बोनस गुण कसे मिळवावेत याबाबत मार्गदर्शन केले,” असे इनामदार यांनी नमूद केले. मॅटवर अंतिम सामना आणि सरावातील फरक “मॅटचे क्रीडांगण एकच असल्यामुळे संघांना अंतिम सामना थेट मॅटवर खेळावा लागला. मॅटचा पूर्ण अंदाज नसल्यामुळे महाराष्ट्राने जास्त फरकाने विजय मिळवला नाही, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या खेळाडूंचा सराव सकाळी व सायंकाळी होतो, परंतु तिथे दिवसभर सामने खेळवले जात होते, त्यामुळे काहीशी आव्हाने निर्माण झाली,” असे त्यांनी सांगितले. खेळाडूंचा जिद्दीने विजय “महाराष्ट्राच्या कुमार संघाने उपउपांत्यपूर्व फेरीतील कोल्हापूर विरुद्धच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यांतही दोन्ही संघांनी जिद्दीने खेळत सुवर्णपदक मिळवले,” असे इनामदार यांनी सांगितले. प्रशांत इनामदार यांनी संघाच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या जिद्दीचे विशेष कौतुक केले. राज्य निवड समिती आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ चंद्रजीत जाधव व कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले यांनी सर्वोत्तम संघ निवडला. त्यांचेही विशेष कौतुक. या विजयाने महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव वाढवला आहे. कठोर परिश्रम हेच महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाच्या विजयाचे रहस्य – प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड ४३व्या कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले आहे. या विजयाबद्दल बोलताना संघाचे प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड यांनी यशाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला, तांत्रिक प्रशिक्षणाला, आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या भक्कम पाठबळाला दिले आहे. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी आणि उत्कृष्ट संघनिर्मिती…

आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील – विहंग सरनाईक

 ५ वर्षात उभारणार ५० मैदाने अनिल ठाणेकर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा या आयपीएल स्पर्धेसारख्या खेळविण्यात येतील असे प्रतिपादन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांनी केले. तसेच महायुतीचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चवर मजबूत काम करत आहे .  म्हणून आपण सुद्धा क्रिकेट साठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचे काम एकत्र करूयात आणि येत्या ५ वर्षात ठाणे जिल्ह्यात एक नव्हे तर ५० मैदाने उभारण्याचा निर्धार ठेवून असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे.स्पर्धेचे आयोजक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीग (MPL) चे अध्यक्ष विहंग सरनाईक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य विकास पाटील, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन चे सेक्रेटरी एम.डी.मराठे, अध्यक्ष जयंत वेलदे , सदानंद केळकर आदी उपस्थित होते. तर बाळाराम खोपकर यांनी सूत्रसंचालन केले ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या ठाण्यातील प्रसिद्ध 48 व्या एन.टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी बोलताना विहंग सरनाईक यांनी वरील वक्तव्य केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळल्या गेलेल्या १६ वर्षांखालील स्टार स्पोर्टस् क्लब आयोजित एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत ठाण्यातील श्री माँ विरुध्द कल्याण येथील के सी गांधी स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगला. के सी गांधी स्कुल ने श्री माँ विद्यालय शाळेचा पराभव करत एन. टी. केळकर चषकावर आपले नाव कोरले. गेली दोन वर्ष श्री माँ विद्यालयाने हा चषक जिंकला होता. मात्र ह्या वर्षी के सी गांधी शाळेने पारितोषिक जिंकल्याने त्यांची हॅट्ट्रिक हुकली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न, ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ४५ षटकांच्या या स्पर्धेत श्री माँ विद्यालय शाळेने प्रथम फलंदाजी करून ३४.४ षटकात ११७ धावांवर के सी गांधी शाळेच्या गोलंदाजांनी रोखले तर ११७ धावांचा पाठलाग करतांना श्री माँ विद्यालयाच्या खेळाडूंना मात देत के सी गांधी शाळेच्या खेळाडूंनी हा सामना ३० षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात जिंकला असून ६ गडी राखून हा सामना जिंकला.

दणकून निवडून आलो तर ठणकावून उत्तर देऊ..!

  विश्वनाथ भोईरांचा माजी आमदार राजू पाटलांना टोला डोंबिवली :  ईव्हीएममशीन मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या भाजपा शिंदे यांची राजकीय खेळी सुरु असल्याची टिका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या टिकेला आता शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी ठणकावून उत्तर देत सांगितले आहे की राजू पाटील जिंकले असते तर त्यांनी हा मुद्दा उचलला नसता. ते पडले तसेच त्यांच्या विरोधात आम्ही लढलो म्हणून हा आकस असू शकतो. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. परंतू आता आम्ही दणकून निवडून आलो आहोत, तर ठणकावून उत्तर देतो असे भोईर म्हणाले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएममशीन वरुन सत्ताधाऱ्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. विविध मतदारसंघातून विरोधी उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मधील मत नोंदणीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे हे निवडणूक जिंकले आहेत. येथे शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर व मनसेचे राजू पाटील यांचा पराभव झाला आहे. 66 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. याठिकाणी राजू पाटील व सुभाष भोईर यांनी जिल्हा प्रशासनाकडे येथील व्हीव्हीपॅट मशीनमधील मत मोजणीसाठी अर्ज केला आहे. तसेच राज्यातील सत्तातरणावरुन सध्या भाजपा आणि शिंदे गटात सुरु असलेले राजकीय नाट्यावर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी भाष्य केले आहे. माजी आमदार पाटील म्हणाले, ईव्हीएमच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी सध्या काय राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले..शेवटी यांना बीजेपी सांगेल तेच करायचे आहे.. ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा संशय येतोय. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 65 हजार मतदान वाढले आणि 66 हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झालेत.. वाढलेलं सगळंच मतदान त्यांनाच मिळालं का ?? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीन मधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असे पाटील यांनी म्हटले आहे. 0000

प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया मृत्यूच्या दाढेतून बचावले

डॉ. पराग अजमेरांच्या उपचाराला यश  मुंबई  : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात प्रख्यात ह्रुदयरोग तज्ज्ञ डॉ. पराग अजमेरा यांना यश मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र मिशन पीस UN चे राजदूत दहिसर येथील प्रख्यात रेकी तज्ज्ञ डॉ. प्रवीण गोपालदास पुरेचा भाटिया यांना चक्कर आल्याने आणि उजवा हात व पाय संवेदनाहीन झाल्याने बोरिवली मुंबईतील अरिहंत हॉस्पिटलमधील इंटेसिव्ह कार्डियाक केअर युनिट (ICCU) मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मुलाने त्यांना त्वरीत अरिहंत हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ पराग अजमेरा यांनी तपासणी केली आणि तपासणीत डॉ. पुरेचा भाटिया यांना सोडियमची पातळी कमी, हिमोग्लोबिन कमी, फॅटी लिव्हर आणि मेंदूला रक्तपुरवठा करण्यात अडथळा येत असल्याचे निदान केले. त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर इंट्राव्हेनस औषधे दिली गेली. ते धोक्याबाहेर असले तरी अजमेरा यांनी त्यांच्यावर दीर्घकालीन उपचारांचा सल्ला दिला आहे. डॉक्टर पुरेचा भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात डॉ. पराग अजमेरांच्या प्रयत्नांना यश आले, उपचाराला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु त्यांना विश्रांती घेण्याचा आणि पाहुण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. प्रवीण भाटिया यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन, भारतीय जनता पक्षाचे नेते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांना आपल्या अल्टरनेट मेडिसीन आणि रेकी यांच्या माध्यमातून उपचार केले आहेत.  ते सेंट्रल कौन्सिल ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसीन इंडिया चे डायरेक्टर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोपालजी मावजी पुरेचा यांचा वारसा लाभलेल्या डॉ. प्रवीण भाटिया यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आल्या बद्दल डॉ. पराग अजमेरा यांचे दहिसर बोरीवली येथील नागरिकांनी आभार मानले आहेत.

भीषण आगीत खासगी बँकेचे ११ एसी जळून खाक;

सुदैवाने कुणालाही दुखापत नाही मुंब्राः  बँकेच्या वातानाकुलित (एसी) यंत्राना लागलेल्या भीषण आगीत ११ आऊटडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी मुंब्र्यात घडली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा शहरातील कौसा भागातील नशेमन गृहसंकुलाच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एका खाजगी बँकेची शाखा आहे.या बँकेच्या तळ मजल्यावरील एसी युनिटला सोमवारी सकाळी पावणेसात वाजता भीषण आग लागली.याबाबतची माहिती मिळताच वीज वितरण करणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अथक प्रयत्नानी आग विझवली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु बँकेचे ११ एसी आऊडडोअर युनिट पूर्णपणे जळून खाक झाले.आगीची झळ  बँकेच्या जवळ असलेल्या मोबाईल आणि  कपड्याच्या दुकानांना देखील बसली.यात दुकानांचे  किरकोळ नुकसान झाले असल्याची माहिती ठामपाच्या आप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.

चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात पुन्हा सवलत मिळणार?

मुंबई : भारतीय जनता पार्टीप्रणित महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे निश्चित झाल्यानंतर विकासकांची अनेक महिन्यांपासूनची चटईक्षेत्रफळातील अधिमूल्य सवलतीची मागणी मान्य होण्याची शक्यता आहे. या बाबतचा प्रस्ताव तयार असून १५ डिसेंबर ते १५ जूनपर्यंत साधारणत: सहा महिन्यांसाठी चटईक्षेत्रफळाच्या अधिमूल्यात सवलत देण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र ही सवलत किती असेल, याबाबत या सूत्रांनी मौन धारण केले. या बदल्यात विकासकांनी घरखरेदीदारांना फायदा द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आल्याचे कळते. करोनाच्या काळात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यावेळी एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने सविस्तर अभ्यास करून सध्या असलेले अधिमूल्य भरमसाठ असून ते कमी करावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वर्षभरासाठी चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात ५० टक्के सवलत दिली होती. त्यामुळे पालिका, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित अनेक प्रकल्पांत विकासकांनी लाभ उठवला होता. महायुती सरकारने समूह पुनर्विकासासाठी अधिमूल्यात वर्षभरासाठी ५० टक्के सवलत दिली होती. आता अधिमू्ल्यात पुन्हा सवलत पुन्हा मिळावी, याबाबत विकासकांकडून वेळोवेळी शासनाकडे मागणी केली जात आहे. माजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही त्यावेळी तयार करण्यात आला होता. परंतु मावळत्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. आता नव्या सरकारकडून याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. करोना काळात चटईक्षेत्रफळ अधिमूल्यात दिलेल्या सवलतीच्या बदल्यात घरखरेदीदारांना लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचा संपूर्ण भार संबंधित विकासकांनी उचलावा, अशी अट घालण्यात आली होती. विकासकाने तसे पत्र करारनामा नोंदणीकृत करताना नियोजन प्राधिकरणाला सादर करावा आणि संबंधित प्राधिकरणाने याबाबतची यादी उपनिबंधक कार्यालयाला द्यावी, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. ज्या विकासकांनी असा लाभ दिलेला नाही, त्यांना चटईक्षेत्र‌फळ अधिमूल्यात सवलत न देण्याचे ठरविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विकासकांच्या संघटनेने कंबर कसली असून यावेळी नक्की सवलत मिळेल, असा विश्वास त्यांना वाटत आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची दरवाढ झालेली असून विकासकांना विविध शुल्कांपोटी ४० ते ४५ टक्के अधिमूल्य भरावे लागत आहे. त्यात सवलत मिळाली तर बांधकाम व्यवसायाला संजीवनी मिळेल, असा विश्वास विकासकांकडून व्यक्त केला जात आहे. ०००००

डोंबिवलीत मालमत्ता कर थकविणाऱ्या क्रिटीकल केअर सेंटरसह पाच गाळे सील

पालिकेच्या ‘ग’ प्रभागाची कारवाई डोंबिवली : वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या येथील ‘ग’ प्रभाग हद्दीतील वाणीज्य वापर असलेल्या पाच आस्थापना ‘ग’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी सील केल्या. या मालमत्ताधारकांकडे एकूण १६ लाख ५४ हजार ९७७ रूपयांची थकबाकी आहे. पाच गाळे सील करण्यात आलेल्या थकबाकीदारांच्या यादीत डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोडवरील गोविंद राजाराम पाटील यांच्या राजाराम निवासमधील पाच दुकान गाळ्यांचा समावेश आहे. या गाळ्यांचे मालक असलेल्या गोविंद पाटील यांच्याकडे मालमत्ता कराची ११ लाख ३७ हजार २३४ रूपयांची थकबाकी आहे. त्यांना ही थकित रक्कम भरणा करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. त्यांच्याकडून ही रक्कम भरणा न करण्यात आल्याने त्यांचे व्यापारी गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली. मानपाडा रस्त्यावरील लक्ष्मी निवास येथील क्रिटीकल केअर सेंटर यांचीही पालिकेकडे मालमत्ता कराची सात लाख १६ हजार ७४३ इतक रक्कम थकित होती. त्यांनाही पालिकेने वारंवार नोटिसा पाठवून कर भरणा करण्याची ताकीद दिली होती. त्यांनी ही रक्कम वेळेत भरणा केली नाही. त्यामुळे त्यांचे क्रिटीकल केअर सेंटर सील करण्यात आले, असे साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी सांगितले. पालिकेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात आस्थापना सील करण्याच्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, मालमत्ता कर उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक आयुक्त कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी, गोविंद पोटे, मोहम्मद खान यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. गेल्या दोन महिन्याच्या काळात पालिकेचा कर्मचारी वर्ग विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होता. या कालावधीत मालमत्ता कराची अपेक्षित वसुली पालिकेला करता आली नाही. येत्या चार महिन्यावर पालिकेचा अर्थसंकल्प येऊन ठेपला आहे. मालमत्ता कराचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाला आता धावपळ करावी लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका संपताच प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. जे मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांच्या मालमत्ता सील करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. कोट ‘ग’ प्रभाग हद्दीत काही मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. अशा धारकांना वारंवार नोटिसा देऊनही ते कर भरणा करत नाहीत. त्यामुळे अशा मालमत्ताकरधारकांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम आयुक्त डॉ. जाखड, उपायुक्त देशपांडे यांच्या आदेशावरून सुरू केली आहे. ग प्रभाग हद्दीतील एकूण सहा आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. -संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

एसएनडीटी विद्यापीठात संविधान आणि शहीद दिन

नवी मुंबइ : एसएनडीटी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लाईफ लॉँग लर्निंग अँड एक्स्टेन्शन आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस आणि शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना विभाग संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, संविधान समजून घेऊन समाजसेवकांनी त्यातील आपली भूमिका ओळखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यातून समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी योगदान कसे देता येईल, याबाबतही विचार केला पाहिजे. महिला तसेच उपेक्षित घटकांसाठीही विशेष कार्य करण्याची तळमळ अंगीकारली पाहिजे. सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव यांनी सांगितले की, महिलांना समान संधी देताना त्यांचा चा राजकारणातीलदेखील सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, तुम्ही माझी मंदिरे बांधण्यापेक्षा माझा अनुनय करा, संविधानातील मूल्ये अंगीकृत करा, याची माहिती सहाय्यक प्राध्यापक डॉ. वाघमारे यांनी दिली. यावेळी विभागातील विद्यार्थीनींनीही मनोगत व्यक्त केले. काहींनी गीते गायली, कविता वाचन केले. याप्रसंगी संविधान प्रस्तावनेचे वाचनदेखील करण्यात आले. देशाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहिदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली. 0000

नायडूंकडून आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

आंध्र प्रदेश :  आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलं आहे. गतमुख्यमंत्री जगनमोहन रेड्डीयांच्या सरकारने राज्यात वक्फ बोर्डची स्थापना केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेनं चंद्राबाबू नायडू यांच्याबाजुने कौल…

शिंदे इन अॅक्शन; वाटाघाटी पुन्हा सुरु

स्वाती घोसाळकर मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महत्वाच्या बैठकी रद्द करून दोन दिवस दरे गावी गेल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. दोन दिवस शिंदे यांनी आपला सर्व…