Category: मुंबई

Mumbai news

परळ बीआयटी वसाहतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारावे

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची महापालिका आयुक्तांकडे मागणी   मुंबई : परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे साक्षी दरेकर, भरत घोलप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. परळ विभागात बीआयटी वसाहत असून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१२ ते १९३२ या कालावधीत आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास होते. त्यांनी या ठिकाणाहून सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती. त्यामुळे ही वास्तु पाहण्यासाठी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच अनुयायी येत असतात. परंतु त्या वास्तुपर्यंत पोहचण्यासाठी लोकांना अडचण होते. त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक तसेच कमान नाही. त्यामुळे पर्यटक तसेच अनुयायींना अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी बीआयटी वसाहतीच्या दोन्ही बाजूला म्हणजेच परेल ब्रीजच्या बाजूस विठ्ठल चव्हाण मार्ग या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे तसेच प्रभादेवी परेल स्थानक येथून येणाऱ्या मार्गावर सुभाष डांबरे रोड या ठिकाणी सन्माननीय माता रमाई यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केली. 00000

अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ विषयावर व्याख्यान

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील विकासात महत्वपूर्ण योगदान असणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या 26 मे रोजीच्या 150 व्या जयंती दिनाच्या औचित्याने शनिवार दि. 22 जून 2024 रोजी, सायं 6.30 वा., वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच डिजीटल अशा तिन्ही प्रसार माध्यमांमध्ये वीसहून अधिक वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असलेले व सध्या बीबीसी मराठीचे संपादकपद भूषविणारे संपादक, व्याख्याते श्री. अभिजीत कांबळे यांचे ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिक्षण हेच माणसाच्या प्रगतीचे प्रमुख साधन आहे हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण प्रसारावर विशेष भर दिला. त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्रियांच्या शिक्षणाकडेही प्राधान्याने लक्ष दिले. शिक्षणाचे महत्व ओळखून त्याकाळी ठोस भूमिका घेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीच्या शैक्षणिक विचारांना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 15,  ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या ‘ज्ञान हीच शक्ती’ या विचारसूत्रावर आधारित ‘ज्ञानस्मारक’ म्हणून येथे भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी नावाजले आहे. याठिकाणी ‘विचारवेध’ शृंखलेंतर्गत नियमित आयोजित करण्यात येत असलेल्या मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांतून श्रोत्यांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. या व्याख्यानांना नागरिकांचा नेहमीच उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते म्हणून मानांकित राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी शनिवार, दि. 22 जून 2024 रोजी, ऐरोली मुलुंड खाडी पुलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. 6.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या नामवंत व्याख्याते व संपादक श्री. अभिजीत कांबळे यांच्या ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांची दूरदृष्टी’ या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००००

एपीएमसीतील नालेसफाईची पोलखोल, पहिल्याच पावसात बाजारात साचले पाणी

मुंबई : उपनगरांसह नवी मुंबई शहरात रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले होते. बाजार आवारात तसेच मुख्य प्रवेशद्वारावर पाणीच पाणी झाले होते. त्याचबरोबर कांदा बटाटा बरोबर पाचही बाजारात जागोजागी पाणी साचले होते. कांदा बटाटा मोठया प्रमाणात पाणी भरल्याने पहिल्याच पावसात एपीएमसी मधील नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. एपीएमसी मधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारे ही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात व परिसरात पाणी साचले होते. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ न केल्याने हे पाणी साचले आहे. बाजारात नाल्याची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याने बाजार आवारात ठीक ठिकाणी पाणी साचले होते. ठेकेदाराकडून दाखवण्यासाठी नालेसफाई केली जाते, चेंबर ते चेंबर सफाई होत नाही, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसी प्रशासनाकडून बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामासाठी १२ लाखांचा ठेका दिला जातो त्याच बरोबर चार महिने नाल्याची देखभालीचा समावेश आहे. मात्र ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याने बाजारात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून होत आहे. 00000

‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’चा

ज्ञानेश्वर माऊली पालखी स्वागत सोहळा   मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने ६ जुलै २०२४ या दिवशी लोणंद (सातारा) येथे “माऊलीचे” दर्शन आणि वारकरी भक्तांना “लाडू वाटप” हा कार्यक्रम होणार आहे. तरी इच्छुकांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करावी आणि ठरलेल्या दिवशी सोबत येऊन या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई. ही संस्था गेले १५ वर्षे लोणंद येथे वारकऱ्यांना लाडू, पाणी, बिस्कीट आदींचे वाटप वारकऱ्यांना केले जाते. यावेळी दहा हजार लाडू वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी संपर्क शंकर पवार ९९८७१९९५६५, श्रीधर फडतरे ८००७७७९०९५, श्री.नलावडे मामा ९८६९३९७६६५. धारावी विभाग :- महेश अंकुश-कवडे ९८६७०८०२०८ (पत्रकार, ग्राहक संरक्षण कक्ष, धारावी विधानसभा उपसंघटक). ०००००

नवी मुंबईकरांना मिळणार मूलभूत सुविधा

खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी   नवी मुंबई,  नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन प्राधिकरणांमध्ये समन्वय राखला जावून मुलभूत नागरी सुविधा तातडीने नवी मुंबईकरांना मिळाव्यात, या उद्देशाने नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत एका बैठकीचे आयोजन केले. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिले. शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. नवी मुंबई परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती देण्याचे निर्देश बैठकीच्या प्रारंभीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. नवी मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आयुक्तांना बैठकीत निवेदन सादर केले. खासदार नरेश म्हस्के यांनी याविषयी आयुक्तांशी चर्चा करत पुतळा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या. नवी मुंबईमध्ये सिडकोने उभारलेल्या अति अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील सोसायटीतील रहिवाशांना नागरी सुविधा मिळतांना अडचणी येत असल्याची बाब रहिवाशांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात चर्चा करून या सोसायट्यांमध्ये नागरि सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना दिले. नवी मुंबईतील रहिवासी परिसर आणि शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने कित्येक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना केली. नवी मुंबईतील बालवाडी शिक्षकांना नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. नवी मुंबई मनपा परिवहन सेवा आणि कर्मचाऱयांच्या वेतनासंदर्भात देखिल आयुक्तांशी चर्चा करून शहरातील नागरिकांना चांगली व दर्जेदार परिवहन सेवा देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नवी मुंबईत धोकादायक इमारतींना चांगला एफएसआय मिळतो. याचा फायदा घेऊन काही ठिकाणी दलालांच्या सांगण्यावरुन विनाकारण इमारती धोकादायक ठरवल्या जातात आणि नोटीसा दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरी महापालिकेने स्वत: सक्षम तांत्रिक सल्लागार नेमून अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे जेणेकरून सर्वसामान्य रहिवाश्यांना दिलासा मिळेल असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई मनपा क्षेत्रातील नागरि सुविधा देण्यासंदर्भात, मैदाने, बगिचा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, गटई कामगारांना व्यवसाय परवाने ताबडतोब देणे, पारसिक झील शेवटच्या टोकापासून परिवहन सेवा सुरू करणे, वाशी- नवी मुंबई गणेशकृपा भाजीपाला मंडई व मच्छीमार्केट येथे सोयीसुविधा पुरविणे, निलगिरी गार्डन ते बेलापूर किल्लापर्यंत अंडरपास तयार करणे आणि त्या ठिकाणी ध्वनीनिरोधक यंत्रणा बसविणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, नवी मुंबईतील नवीन कंत्राटी ठेकेदार हे कामगार कामावर ठेवताना जुन्या कामगारांना डावलत असून त्यांना न्याय मिळवून द्यावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रांमधील साहित्य नादुरुस्त झालेली आहेत, ती दुरुस्त करणे, पुनर्विकास योजनेसाठी एक खिडकी योजना राबविणे, स्थानिक भूमीपुत्रांच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती दोन महिन्यांत मिळवून देणे अशा विविध सामाजिक प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरप्रमुख विजय माने, उप जिल्हाप्रमुख रामशेठ वाघमारे, अजय सावंत, सरोज दळवी, रोहिदास पाटील, शिवराम पाटील, साईनाथ वाघमारे, संपर्कप्रमुख किशोर पाटकर, सरोज पाटील, नगरसेवक शिवराम पाटील, जगदिश गवते, सुरेश सपकाळ, रामसिंग यादव, प्रशांत पाटील, आंकाश मढवी, संजीव वाडे, युवा सेनेचे चेतन पाटील आदी उपस्थित होते. 00000

लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे लक्ष द्या – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड   नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ ला सामोरे जाताना स्वच्छता विषयक विविध उपक्रमांमध्ये व दैनंदिन बाबींमध्ये अधिक व्यापक लोकसहभाग घेण्यासाठी प्रयत्न केले जावेत असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त…

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत !

मुंबई : महाराष्ट्रवासीयांना खुषखबर आहे. पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतर्गत आता पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे…

जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे

नाशिक : मनोज  जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगर :  सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127  जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे…

लोकसभेला घासून नाही तर ठासून आलो- एकनाथ शिंदे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल ठाकरे यांना करीत लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला असे प्रतिपादन…