Category: मुंबई

Mumbai news

सेक्टर ४ घणसोली येथील बेघर निवारा केंद्र कार्यान्वित 

नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फ दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १५ मार्च, २०२४ पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. या बेघर निवारा केंद्राची क्षमता १०३ लाभार्थी इतकी असून याठिकाणी बेघर व्यक्तींसाठी चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, ॲक्वागार्ड मशीनचे पिण्याकरिता पाणी, गादी, उशी, चादर, सामान ठेवण्यासाठी लॉकर तसेच मनोरंजनाकरिता टि.व्ही. संच इत्यादी साहित्य विनामूल्य उपलब्ध्‍ करुन देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये पुरूष, महिला, दिव्यांग व्यक्ती व वृद्ध यांच्याकरिता राहण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे. या बेघर निवारा केंद्राची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि महानगरपालिकेच्या आठही विभागांचे विभाग अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणीही बेघर रस्त्यावर राहू नये यादृष्टीने रस्त्यावर बेघर व्यक्ती, (वृद्ध, महिला, मुले व दिव्यांग व्यक्ती) आढळून आल्यास त्याची माहिती नमुंमपा समाज विकास विभागातील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक श्री. तुषार पवार यांस 9881636168 अथवा आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेचे व्यवस्थापक श्री. राहुल वाढे यांस 8669393309 या क्रमांकावर संपर्क साधून दयावी असे जाहिर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते कॅरम स्पर्धा

कौस्तुभ, मिहीर, सार्थक, ध्रुव उपांत्यपूर्व फेरीत मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेत डीपीवायए हायस्कूलचा राष्ट्रीय दर्जाचा ज्युनियर कॅरमपटू कौस्तुभ जागुष्टे व एल.एन कॉलेजचा मिहीर शेख तसेच पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा धुव भालेराव आदींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. राष्ट्रीय दर्जाचे ज्युनियर कॅरमपटू पोद्दार कॉलेजची रुची माचीवले व मराठा हायस्कूलची सिमरन शिंदे, तसेच रत्नागिरीची स्वरा मोहिरे यांना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. गौरवमूर्ती गोविंदराव मोहिते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेला प्रारंभ केला. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील ४८ खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये सुरु आहेत. तिसऱ्या फेरीत सरळ जाणाऱ्या सोंगट्याचे सातत्य राखत कौस्तुभ जागुष्टेने माजी विजेत्या समीर खानचे आव्हान १७-३ असे तर मिहीर शेखने नेहाल उस्मानीचे आव्हान १४-४ असे संपुष्टात आणले. प्रारंभ छान करूनही पृथ्वी बडेकरला ध्रुव भालेरावने १२-७ असे नमविले. अन्य सामन्यात सार्थक केरकरने रुची माचीवलेचा १५-१० असा, भव्या सोळंकीने अथर्व म्हात्रेचा १६-६ असा, बलाढ्य सिमरन शिंदेला हरविणाऱ्या मयुरेश पवारने अमेय जंगमचा २३-० असा, प्रसन्ना गोळेने निधी सावंतचा १७-१० असा तर जोनाथन बोनालने तन्वी परबचा २०-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पंचाचे कामकाज सचिन शिंदे, चंद्रकांत करंगुटकर व अविनाश महाडिक आदी करीत आहेत. विजेत्या-उपविजेत्यांना स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या हस्ते शनिवारी गौरविण्यात येणार आहे.

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

राज ठाकरेंकडूनही भाजपाला पाठिंब्याची घोषणा नितीन दूधसागर नवी मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला, याबद्दल श्री. डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केला. कोकणामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल, असा विश्वासही आमदार डावखरे यांनी व्यक्त केला. गेल्या १२ वर्षांत कोकणाच्या सर्वोतोपरी विकासासाठी कार्य केले असून, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.

‘दलित-मुस्लिमांची नाराजी हटवा’!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवारांच्या आमदारांना सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुस्लिम आणि दलित समाजापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्यासह मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांशी संबंधित नाराजी दूर करण्याबाबत आमदारांना सूचना देण्यात आल्या. या बैठकीत सर्व आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या प्रचार मुद्द्यांमध्ये फरक असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक मुद्द्यांवर भर देवून दलित-मुस्लिम समाज जोडण्यावर भर देण्याबाबत सांगण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबाबत यावेळी ठरविण्यात आले. विधानसभेची तयारी करा लोकसभा निवडणुकीत झालेल्या अपयशातून सावरून आता विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्री धर्मराव आत्राम आणि विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ मात्र या बैठकीस अनुपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या. यापैकी केवळ रायगड लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर बारामती, शिरूर आणि धाराशिव या मतदार संघांत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षात नैराश्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे १८ आमदार संपर्कात असल्याचे सांगून आणखी अस्वस्थता निर्माण केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित आहेत.

फलकाची सदोष संरचना, ‘व्हीजेटीआय’चा अहवाल मुंबई महापालिका प्रशासनाला सादर

घाटकोपर दुर्घटना मुंबई : कमकुवत पाया आणि सदोष संरचनेमुळे घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय फलक पडल्याचा अहवाल व्हीजेटीआय संस्थेच्या दोन तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईला वादळी वाऱ्याचा धोका असतो. मात्र वादळी वाऱ्यात टिकेल इतक्या क्षमतेची या जाहिरात फलकाची संरचनात्मक बांधणी नव्हती, असा अहवाल या दोन तज्ज्ञांनी नुकताच पालिका प्रशासनाला दिला आहे. घाटकोपरच्या छेडानगर येथे १३ मे रोजी महाकाय जाहिरात फलक पडून १४ जणांचा मृत्यू झाला. भविष्यात असा प्रसंग घडू नये यासाठी या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेतली होती. त्याकरिता पालिका प्रशासनाने संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग) विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले होते. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्याच्या दृष्टीने हा अभ्यास करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे आणि डॉ. अभय बांबोले यांनी या दुर्घटनेतील तांत्रिक कारणांचा अभ्यास करून नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. केवळ प्रति तास ४९ किमी एवढ्या वाऱ्याचा वेग सहन करेल एवढीच या जाहिरात फलकाची क्षमता होती. मात्र १३ मे रोजी प्रति तास ८७ किमी एवढ्या वेगाने वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे हा फलक उभा राहू शकला नाही, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. मुंबई शहर सागरी किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे प्रति तास १५८ किमी एवढ्या वादळी वाऱ्यात उभे राहू शकेल अशाच पद्धतीने फलकांची संरचना असायला हवी, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र घाटकोपरचा जाहिरात फलक हा मजबूत नव्हता. दोषपूर्ण संरचनेमुळे हा फलक पडल्याचे या अहवालात म्हटले आहे. मालाडमध्ये फलक हटविताना एक जखमी मालाड येथील लिबर्टी मार्गावरील जवाहरलाल नेहरू क्रीडांगणानजीकचा पालिकेने नोटीस बजावलेला अनधिकृत डिजिटल फलक बुधवारी रात्री आठच्या सुमारास हटविताना कोसळला. हा फलक महेंद्र कुर्ले (६२) यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात जयकिरण कन्स्ट्रक्शनचे विकासक आणि संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर, पालिकेने अनधिकृत फलकांविरोधातील कारवाईला वेग देत अनेक अनधिकृत फलक हटविले. अद्यापही अनधिकृत फलक हटविण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे. दरम्यान, जयकिरण कंपनीने इमारत बांधकाम स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घेतली नव्हती. त्यानंतर नोटीस पाठवली होती.

राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी सहा विद्यार्थी स्पर्धेत

मुंबई : राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका जागेसाठी यंदा सहा विद्यार्थी स्पर्धेत आहेत. राज्यातील १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले असून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस या सर्व अभ्यासक्रमांच्या मिळून अवघ्या २२ हजार ८३३ जागा उपलब्ध आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्यात उपलब्ध असलेल्या जागांच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्या जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांना वेगळा पर्याय निवडावा लागणार आहे. यंदा नीटमध्ये महाराष्ट्रातून १ लाख ४२ हजार ६६५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी, २०२३ च्या नीटमध्ये महाराष्ट्रातील १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले होते. २०२४ च्या नीटमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील २५१ संस्थांमध्ये अवघ्या २२ हजार ८३३ इतक्या जागा आहेत. त्यातही तुलनेने परवडणाऱ्या अशा सरकारी ३६ संस्थांमध्ये ४२१० जागा, सरकारी अनुदानित २५ संस्थांमध्ये १९६८, तसेच १९० विनाअनुदानित संस्थांमध्ये १६ हजार ६५५ जागा आहेत. नीटमध्ये पात्र ठरणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे अधिक असतो. राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ७ हजार ३२४ जागा असून, त्यात सरकारी महाविद्यालयांमध्ये ३३९० जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ७६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ३१७० जागा आहेत. बीडीएससाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये २११ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ६४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४०० अशा २६७५ जागा आहेत. बीएएमएस अभ्यासक्रमाच्या ७ हजार ८५७ जागा असून, यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ५५५ जागा, सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये ९८७ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६३१५ जागा आहेत. त्याचप्रमाणे बीएचएमस अभ्यासक्रमासाठी सरकारी महाविद्यालयांमध्ये ५४ जागा आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ४५४० अशा ४५९४ जागा आहेत. बीयूएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वात कमी जागा उपलब्ध आहेत. बीयूएमएससाठी सरकारी अनुदानित महाविद्यालयांमध्ये १५३ आणि विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २३० अशा ३८३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारी व चांगले वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे. दरम्यान गत वर्षामध्ये राज्यामध्ये काही नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली असून, काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तुकडी वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची नोंद झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विशेषत: एमबीबीएसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत गटनेतेपदी मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली. पक्षाला मिळणाऱ्या मंत्रिपदात पुत्राचा विचार केला जाणार नाही, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सन्मान केला. शिंदे गटाच्या खासदारांनी इंडिया आघाडीच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात राहू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने महायुतीत १५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सात जागांवर विजय मिळाला. श्रीकांत शिंदे ( कल्याण) नरेश म्हस्के ( ठाणे) बुलढाणा ( प्रतापराव जाधव) औरंगाबाद ( संदीपान भुमरे) हातकणंगले (धैर्यशील माने) श्रीरंग बारणे (मावळ) आणि रवींद्र वायकर ( वायव्य मुंबई) बैठकीला उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळावे, ही अपेक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. तरुण आणि पारदर्शी कारभाराचे उमेदवार विधानसभेला देण्यात येतील, अशी घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राज्यातील जनतेत राज्य सरकारच्या विरोधात मोठा रोष आहे. तो लोकसभा निवडणुकीत प्रकट झाला. विधानसभा निवडणुकीतही या रोषाचा मोठा फटका सत्ताधारी पक्षाला बसेल, असा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते- पाटील, भास्कर भगरे हे खासदार हजर होते. सुप्रिया सुळे आणि नीलेश लंके नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे. त्यातून अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याचा दावा पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याविषयी जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले. आमचे आमदार तिकडे गेले तरी लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल आमच्या बाजूने आहे. आमदार गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. परत येऊ इच्छिणाऱ्या आमदारांबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे पक्षाला फटका बसल्याचे पाटील यांनी सांगितले. पिपाणी चिन्हाला सरासरी ४५ ते ५० हजार मतदान झाले आहे. एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला १ लाख ३ हजार मते मिळाली. पिपाणीचा प्रचार तुतारी असा केला गेल्याने आम्हाला फटका बसला. पिपाणी चिन्हाविषयी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. रविवारी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक ९ जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. १० जून हा पक्षाचा स्थापना दिन अहमदनगर शहरात होणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात पक्षाची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

राज्यात पावसाची दमदार हजेरी

पुणे : महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर आहे, मॉन्सून राज्यात दाखल झाला आहे. आज गुरूवारी मॉन्सून कोकणात आला आहे . रत्नागिरीसह पावासाने राज्यात आज दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात उष्णतेचा पाऱ्याने उच्चांक गाठला होता.. वाढते तापमान आणि उकड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. मात्र आता मॉन्सुन दाखल झाल्याने नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाचे  महाराष्ट्रात आगमन झालं आहे. याबाबतची माहिती हवामान खात्याच्या पुणे शाखेचे प्रमुख डॉ. होसाळीकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल अतिशय हळू सुरू होती. केरळमध्ये काही दिवस मुक्काम होता. त्यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटकात काही काळ थांबला होता. आज मात्र त्याने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. हा मॉन्सून रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगर आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून पुढे सरकला आहे, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यामध्ये आजपासून पुढील तीन-चार दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरूवारी आणि शुक्रवारी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरूवारी तर, शुक्रवारी दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आरएसएस अॅक्शन मोडवर

स्वाती घोसाळकर मुंबई :  लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचे पाणीपत झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) अक्शन मोडवर आले आहे. आरएसएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील या अपयशाबाबत चिंतन बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या…