Category: मुंबई

Mumbai news

…तर पत्रकार सन्मान योजनेपासून  वंचित पत्रकरांची आघाडी होईल

योगेश वसंत त्रिवेदी यांची टीका मुंबई : देवेंद्र फडणवीस हे  शिवसेना भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी १ ऑगस्ट २०१९ साली राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु केली. ही योजना अतीशय चांगली आहे. परंतु पत्रकारिता आणि प्रशासन यातील झारीतल्या शुक्राचार्यांमुळे या योजनेचा असंख्य पत्रकारांना अद्यापही लाभ मिळू शकलेला नाही. ज्येष्ठ पत्रकारांनी सरकारी जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जायचे काय ? राज्य अधिस्वीकृती समितीने २०१६ साली ५८ वर्षे वय आणि २५ वर्षांचा अनुभव असा ठराव मंजूर केला परंतु त्याचा शासन निर्णय (जीआर) आठ वर्षे होऊनही निघालेला नाही. ९ मे २०२३ ला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यक्रमात आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेची रक्कम मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री. प्रमोद डोईफोडे यांच्या मागणीवरून अकरा हजारावरुन वीस हजार रुपये करण्याची घोषणा केली. या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले. पत्रकारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्च २०२४ रोजी शासन निर्णय जारी केला परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ पत्रकारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेक पत्रकार चरितार्थ चालवू शकत नाहीत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असेच जर सुरु राहिले तर सन्मान योजना न मिळणाऱ्या पत्रकारांची वंचित आघाडी निघायला वेळ लागणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी ठणकावले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या मेळाव्यात योगेश त्रिवेदी यांनी ज्येष्ठ पत्रकारांची व्यथा कळकळीने मांडतांना सांगितले की, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेबाबत सविस्तर पत्र दिले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ ही ऐंशी वर्षे जुनी नोंदणीकृत संस्था असून अध्यक्षांनी लोकसभेच्या निकालानंतर तातडीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेपासून वंचित राहिलेल्या पत्रकार संघ सदस्यांची अधिस्वीकृती पत्रिका, आधार कार्ड च्या प्रती घेऊन अध्यक्षांच्या पत्रासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना साकडे घालावे आणि वंचित राहिलेल्या पत्रकारांना आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानपूर्वक सन्मान योजनेचा लाभ मिळवून द्यावा. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, सरचिटणीस संदीप चव्हाण, सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण शिदोरे, मधुकर भावे, नीला उपाध्ये, डॉ. सुकृत खांडेकर, राही भिडे, देवदास मटाले, विलास मुकादम, प्रदीप वर्मा, प्रभाकर राणे, अनंत मोरे, विजयकुमार बांदल, अनिकेत जोशी, उदय तानपाठक, दिनेश गुणे, सदानंद खोपकर, किरीट मनोहर गोरे, प्रा. हेमंत सामंत, विष्णु सोनावणे, मिलिंद कोकजे, घनःश्याम भडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट, नरसोबावाडी यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटना यांच्या मान्यतेने ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, तालुका शिरूर, जिल्हा – कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. ८ ते १० जून २०२४ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा २ विभागात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना तब्बल १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येईल. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यंदाच्या वर्षी आपले ७० वे वर्ष साजरे करत असून यंदाच्या हंगामातील हि दुसरी स्पर्धा आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी आपली नावे आपल्या क्लबमार्फत दिनांक १ जून २०२४ पर्यंत  जिल्हा संघटनेकडे नोंदवावीत.

गोखले पुलाची जोडणी ३० जूनपर्यंत होणार पूर्ण

‘व्हीजेटीआय’च्या देखरेखीखाली काम मुंबई : उंचीतील तफावतीमुळे डोकेदुखी बनलेला अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीशी जोडण्याचे काम ३० जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. हे  काम वेगाने आणि ठरवलेल्या वेळापत्रकानुसार सुरू आहे. बर्फीवाला पूल हा गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याचे काम वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली सुरू आहे. अस्तित्वात असलेल्या सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उंचावून ती नवीन बांधलेल्या गोखले पुलाच्या पातळीला जोडण्याचे काम १४ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याचा आराखडा आयआयटी तसेच व्हिजेटीआय या संस्थांनी तयार केला आहे. पुलाला कोणताही धोका न पोहोचवता हे काम सुरू आहे. अशी होणार जोडणी १) सी. डी. बर्फीवाला पुलाच्या शेवटच्या दोन तुळई वेगळ्या करणे. तुळई वेगळी करण्यासाठी पीलर  नियंत्रित पद्धतीने व पुलाच्या संरचनेला कोणताही धोका न पोहोचवता तोडणे. २) गोखले पुलाशी सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी जुळाल्यानंतर तोडलेले जॉइंटचे पुन्हा काँक्रिटिंग करणे. ३) नवीन बिअरिंग व जोडणी सांधे (एक्स्पांशन जॉइंट) बसविणे. कामांची प्रगती १) बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याचे आणि जुळविण्याचे काम पूर्ण झाले आहे. २) नवीन बेअरिंगसाठी कार्यादेश देऊन त्या आणण्यात आल्या. चाचणीही पूर्ण. ३) आर. सी. सी. काँक्रिट करणे, नवीन बिअरिंग बसविणे हे काम ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!

मुंबई : मुंबईतघाटकोपरच्या पंतनगर येथे १३ मे रोजी १२० फूटांचं महाकाय होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ जणांचा जीव गेला. तर ७५ जण जखमी झाले. या घटनेनंतर मुंबई शहर आणि उपनगर परिसरातील होर्डिंग्जचा मुद्दा प्रकाशझोतात आला. मनपानं पालिका आणि रेल्वे हद्दीतील अशा महाकाय होर्डिंग्ज कंपन्यांना नोटीस पाठवली. पालिकेनं आखून दिलेल्या नियमावलीपेक्षाही अधिक आकाराचे अशा एकूण ४५ होर्डिंग्ज कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. पण त्यातील २९ होर्डिंग्ज अजूनही तसेच आहेत. संबंधित जाहिरात कंपन्यांनी किंवा रेल्वेनं कोणतीही कारवाई केलेली नाही. मनपानं होर्डिंग हटवण्याबाबतची नोटीस पाठवलेल्यांमध्ये वांद्रे आणि चर्नीरोड येथील महाकाय होर्डिंगचाही समावेश आहे. वांद्रे पूर्व येथे १२० फूटांचं तर चर्नीरोड येथे १००x३० फूटांचं महाकाय होर्डिंग आहे. मनपाच्या नियमावलीनुसार कोणतंही होर्डिंग ४०x४० फूटापेक्षा अधिक असून नये. तरीही मुंबईत आजही २९ महकाय होर्डिंग्ज तसेच आहेत. मनपाच्या परवाना विभागातील एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की मोठ्या आकाराचे होर्डिंग्स रेल्वेच्या जागेवर आणि रेल्वे पोलिसांच्या (GRP) जमिनीवर आहेत, जी राज्य सरकारच्या मालकीची आहे. ४५ पैकी घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग वगळता आणखी दोन होर्डिंग्ज अशाप्रकारे घाटकोपरमधून एकूण ६ तर दादरच्या टिळक पुलावरील ८ होर्डिंग्ज आम्ही हटवले आहेत. मनपाने १६ मे रोजी मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वे (WR) यांना नोटीस बजावली होती आणि त्यांना तीन दिवसांच्या आत सर्व मोठ्या आकाराचे होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले होते. हे होर्डिंग मनपाच्या हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या जीआरपीच्या जागेवर आहेत. महालक्ष्मी, वांद्रे आणि खार भागात रेल्वेहद्दीत सर्वाधिक होर्डिंग्ज आहेत. मनपा अधिकारी म्हणाले, “आम्ही होर्डिंग उतरवण्याची नोटीस बजावली होती. परंतु रेल्वे किंवा एजन्सीने प्रतिसाद दिलेला नाही काही दिवसांपूर्वी एका रेल्वे अधिकाऱ्याने होर्डिंग्ज हटवण्याची गरज नसल्याचं विधान केलं होतं. कारण होर्डिंगची विविध पातळीवर तपासणी केल्यानंतरच त्यास परवानगी दिली जाते. ‘होर्डिंगची रचना आयआयटी आणि व्हीजेटीआयसारख्या टॉप संस्थांच्या अभियंत्यांकडून तयार केले जातात. आम्ही एक मध्यवर्ती संस्था आहोत आणि आम्ही आमच्या स्वतःच्या नियमांचे पालन करतो’, असं रेल्वे अधिकाऱ्यानं म्हटलं होतं.

बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत हॉटेल, बार, पबवर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर विभागातील 03 लेडीज बार / पब, 01 ढाबा, 03 चायनीज तसेच तुर्भे विभागातील 03 पब / बार यांच्यावर 28 मे रोजीच्या रात्रीपासून व पहाटेपर्यंत कारवाई  करण्यात आली. या कारवाईपोटी रु. 1 लाख इतकी दंडात्मक वसूली करण्यात आली. सदरची कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. सदर मोहीम अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, अतिक्रमण विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त श्री.शशिकांत तांडेल, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त  डॉ.अमोल पालवे, वाशी विभागाचे सहा.आयुक्त श्री.सागर मोरे, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.भरत धांडे आणि अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्या सहयोगाने करण्यात आली. यापुढेही अशीच तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 527 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2024 – 2025 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 527 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये…

अनेक वीज कनेक्शन ? आता बिल भरा एकाच क्लिकवर

 नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अनेक वीज कनेक्शन आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या विविध सरकारी खात्यांसाठी आणि खासगी कंपन्यांसाठी महावितरणने सर्व कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली असून वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही संबंधितांना मिळणार आहे. महावितरणने उपलब्ध केलेल्या या अभिनव सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करून अनेक कनेक्शन असलेल्या वीज ग्राहकांना अभिनव सुविधा उपलब्ध केली आहे. राज्यामध्ये पोलीस, ग्रामविकास, पाणीपुरवठा अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या कंपन्यांना एका समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यामध्ये त्यांच्या विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्याची वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली नाहीत अशी समस्या येते. त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागते. तसेच कधी कधी बिल भरले नसल्याने कनेक्शन तोडले जाते. महावितरणने उपलब्ध केलेल्या सुविधेमुळे एकदा ऑनलाईन नोंदणी केली की संबंधित सरकारी खात्याला किंवा कंपनीला त्यांच्या मुख्यालयात बसून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलतही मिळेल. याखेरीज कागदी बिलाच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यामुळे प्रत्येक बिलामागे दहा रुपये सवलत आणि डिजिटल पेमेंट केल्यामुळे कमाल पाचशे रुपये सवलतही मिळेल. या सुविधेसाठी महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयात माहिती मिळेल. महावितरणने सरकारी विभाग आणि खासगी कंपन्यांना उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेला बळ मिळणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनी याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे त्यांना आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल, त्यांच्या अंतर्गत विविध कार्यालयात होणारा विजेचा वापर आणि त्यावर होणारा खर्च याची माहिती सहजपणे एकत्रित मिळेल तसेच बिलाबाबत काही तक्रार असल्यास तीही सहजपणे ऑनलाईन करता येईल.

म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीची प्रतीक्षा

मुंबई : पावसाळ्याच्या आधी दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करत मे महिन्याच्या मध्यावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाला क्रमप्राप्त असते. त्यानुसार दरवर्षी मे महिन्याच्या मध्यमावर ही यादी जाहिर…

जागावाटपावरून भुजबळांचे घुमजाव

मुंबई : राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात टाळ्या मिळवल्या खरे…

मुंबईसह कोकणात आज पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा तडाखा बसणार मुंबई : मुंबईकरांनी आपल्या छत्र्या आता बाहेर काढायला हरकत नाही. राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. भारतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या ४८…