Category: मुंबई

Mumbai news

शिवाजीपार्कवर आज ‘मनसे’ कमळ फुलणार

स्वाती घोसाळकर मुंबई : दादरचे शिवाजीपार्क अनेक एतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. भारतातील सर्वपक्षीय अनेक दिग्गज नेत्यांनी या मैदानावर सभा गाजवल्या आहेत. याच एतिहासिक सभांच्या मालिकेत भर टाकणारी सभा उद्या शुक्रवारी दादरच्या शिवाजी…

ऑलिवंट, ऑर्थर, एस पुलांच्या पुनर्बांधणीची गरज नाही

रेल्वे प्रशासनाचे मुंबई महानगरपालिकेला पत्र मुंबई : माझगाव येथील ऑलिवंट पूल, आर्थर पूल, भायखळा येथील एस पूल या तीन पुलांच्या पुनर्बांधणीची सध्या गरज नसल्याचे रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेला कळवले आहे. रेल्वेमार्फत १० ते १५ वर्षांनंतर या पुलांच्या पुनर्बांधणीबाबतचे पुनरावलोकन करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास या पुलांचे कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई शहर भागातील पुलांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमधील (महारेल) अधिकाऱ्यांची बुधवार, १५ मे रोजी संयुक्त बैठक पार पडली. मुंबई शहरात सुरू असलेली पुलांची कामे वेगाने, तसेच नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या बैठकीत दिले. मुंबई महानगरपालिका आणि महारेल यांच्यात रेल्वेवरील पूल बांधणी कामात समन्वय असावा, जेणेकरून नागरिकांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल. तसेच पुलांच्या पुनर्बांधणी कामांदरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शहर भागातील जीर्ण पुलांची दुरूस्ती आणि वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिका आणि महारेलने संयुक्तपणे रेल्वेवरील पुलांची कामे हाती घेतली आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर, उप प्रमुख अभियंता (शहर) राजेश मुळे, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (व्यवसाय विकास आणि वित्त) सुभाष कवडे, महारेलचे व्यवस्थापक (नियोजन) जितेंद्र कुमार, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक असीतकुमार राऊत, अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक श्रीरामगिरी श्रीकांत आदी उपस्थित होते. मुंबईत रेल्वे मार्गांवर असलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येतो. प्रत्यक्ष पूल उभारणी प्रकल्पाची कामे ही महारेलमार्फत करण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील रे रोड, भायखळा, टिळक पूल (दादर) आणि घाटकोपर येथील पुलांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तीन पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला मंजुरी मुंबई शहरातील करी रोड पूल, माटुंगा (रेल्वे खालील पूल), महालक्ष्मी पूल आदी पुलांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजुरी देण्यात आली. या पुलांच्या कामांचा प्राथमिक टप्प्यातील अभ्यास सध्या सुरू आहे. या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. तसेच वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. तीन पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुनरावलोकनानंतरच ऑलिवंट, ऑर्थर आणि एस (भायखळा) या तीन पुलांचा सद्यस्थितीबाबत रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला आहे. मध्य रेल्वेने २४ एप्रिल २०२४ रोजी महापालिकेला पत्र पाठविले आहे. हे पूल सुस्थितीत असून सद्यस्थितीत या पुलांची पुनर्बांधणीची आवश्यकता नाही असे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे. मुंबई शहरातील चार पुलांच्या कामाची सद्यस्थिती रे रोड पूल – ७७ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी नोव्हेंबर २०२४ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. भायखळा पूल – ४२ टक्के काम पूर्ण. हा पूल वाहतुकीसाठी ऑक्टोबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. टिळक पूल – ८ टक्के काम पूर्ण. घाटकोपर पूल – १४ टक्के काम पूर्ण.

भारतीय मसाल्यांची परदेशातील बदनामी थांबवा

राष्ट्रीय निर्यातदार संघटनांची मागणी रमेश औताडे मुंबई : ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच या मासाल्याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला पत्रव्यवहार करत हे पदार्थ योग्य कसे ? असा सवाल केला आहे. यामुळे भारताची बदनामी झाली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्तरावरील चार मसाला निर्यातदार संघटनांनी केला असून या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केली आहे. इथिलिन ऑक्साईड हे किटकनाशक मसाले नाशवंत होऊ नये म्हणून जगभर प्रमाणात वापरण्याची मान्यता आहे. मसाले निर्यात करणारा भारत हा सर्वात मोठा देश असून 14 लाख मेट्रिक टन मसाले भारत निर्यात करतो.4 बिलियन ची आर्थिक उलाढाल या व्यवसायात आहे. सर्व ग्राहकाला  शुद्ध माल देण्यासाठी भारताचे मान्यताप्राप्त प्राधिकरण कार्य करत असताना नाहक बदनामी करण्यासाठी हे एक षडयंत्र रचले जात आहे.असे निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. इथिलिन ऑक्साईड चेप्रमाण कमी जास्त होण्याची अनेक कारणे आहेत. गोदाम मधून हाताळणी होताना, जहाजात संपर्कात येणारी वेगवेगळी कंटेनर, कामगारांची हाताळणी, मेडिकल पदार्थ स्पर्श, त्या त्या देशातील हवामान, अशी अनेक कारणे असताना व भारतीय अन्न पदार्थ प्राधिकरणाने निर्यात होताना खात्री करून प्रमाणित केल्यानंतर संबंधित देशांनी त्यांच्या प्रगोगशाळेत केलेल्या चाचणीचा दाखला देत भारतातील पदार्थ खराब असल्याचा अंदाज देणे हे कितपत योग्य आहे असा सवाल निर्यातदार असोशीयशन चे अध्यक्ष हितेश गुतका यांनी यावेळी केला आहे.

महिला स्वच्छताकर्मींनी केला मतदानाचा निर्धार

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीचे मतदान सोमवारी 20 मे रोजी असून त्यामध्ये प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावणेबाबत स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये विविध घटकांना सामावून घेतले जात असून जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला स्वच्छताकर्मींच्या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित शंभरहून अधिक स्वच्छतासखींना अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी मतदानाचे महत्व सांगितले. तसेच प्रत्येक स्वच्छतासखींनी आपला मतदानाचा हक्क बजावावा तसेच कुटुंबियांनाही बजाविण्यास सांगावे असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी सर्व स्वच्छतासखींनी ज्या डाव्या हाताच्या बोटावर मतदान केल्याची खूण अर्थात शाई लावण्यात येणार आहे ती तर्जनी उंचावून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला व आमच्यासारखाच सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे प्रतिकात्मक आवाहन केले.

नमुंमपा अतिक्रमण विभागाने हटवले 15 अनधिकृत होर्डींग

यापुढेही सुरू राहणार अनधिकृत होर्डींगविरोधी धडक कारवाई नवी मुंबई : 13 मे रोजी सायं. 4 नंतर आकस्मिक वादळ व पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने तसेच या कालावधीत मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना लक्षात घेत राज्य शासनाच्या आदेशाच्या पार्शवभूमीवर नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी 14 मे रोजी दूरदृश्य प्रणालीव्दारे तातडीने बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी नमुंमपा क्षेत्रात ठिकठिकाणच्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच 30 एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी आणि अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू करावी असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याचप्रमाणेसिडको, एमआयडीसी, रेल्वे, सायन पनवेल महामार्ग अशा ठिकाणी असलेल्या होर्डींगबाबतही संरचनात्मक परीक्षण करून घेणेबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाने लगेचच तत्पर कार्यवाही सुरू करून परवाना विभागाकडून परवानाधारक होर्डींगची माहिती प्राप्त करून घेत अनधिकृत होर्डींग हटविण्याच्या कार्यवाहीला तत्परतेने सुरूवात केली. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच विभागांमध्ये तेथील विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त यांचे समक्ष तोडक कार्यवाहीस सुरूवात करण्यात आली. 15 एप्रिल रोजी सायं. 5 वाजल्यापासून 16 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग विरोधातील धडक कारवाईत आकाराने मोठे होर्डींग स्वरूपातील 15 अनधिकृत जाहिरात फलक अविश्रांत काम करून हटविण्यात आले. यामध्ये बेलापूर स्टेशन लगत तसेच बेलापूर अग्निशमन केंद्राच्या बाजूला सार्वजनिक शौचालयाच्या जवळ पदपथावर असलेल्या अशा 2 ठिकाणच्या मोठ्या होर्डींग निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 1 शिरवणे येथे प्लॉट क्र. 43 वर असलेले 3 मोठे अनधिकृत होर्डींगही हटविण्यात आले. वाशीगाव मधील कृष्णा रेस्टॉरंट जवळ विनापरवानगी उभारण्यात आलेले 2 मोठे होर्डींग तसेच तुर्भे विभागात सानपाडा स्टेशनच्या पूर्व भागात असलेल्या 4 अनधिकृत होर्डींगवर तोडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभागात एमआयडीसी भागात गवळीदेव स्थळाच्या पुढे सेंट्रल रोडवर असलेली दिशादर्शक कमानीची लोखंडी फ्रेम होर्डींग काढण्यात आले. ऐरोली विभागात सेक्टर 3 बसडेपो मधील 1 अनधिकृत होर्डींग तसेच दिघा येथे हॉटेल मुंबई एक्सप्रेसच्या समोरील 2 मोठे अनधिकृत होर्डींग निष्कासित करण्यात आले. अशाप्रकारे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत काल संध्याकाळपासून पहाटे 5 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डींग हटविण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली असून आजही ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात अनधिकृत मोठे होर्डींग हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढील काळात ही कारवाई अशीच तीव्रतेने सुरू राहणार असून नवी मुंबईत कोणतीही दुर्घटना घडू नये याकरिता महानगरपालिका दक्ष असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन.

वर्षा गायकवाड लढवय्या नेत्या, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कट्टीबद्ध – रमेश चेन्नीथला उत्तर मध्य मुंबईसह मुंबईचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार – वर्षा गायकवाड मुंबई : निवडून आल्यानंतर जनतेसाठी काय करणार यासाठीचे न्याय पत्र वर्षा गायकवाड यांनी सादर केले आहे. वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांनीही आयुष्यभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी काम केले आहे. वर्षा गायकवाड वडिलांचा वारसा पुढे नेत असून त्या लढवय्या नेत्या आहेत. आमदार व मंत्री म्हणून काम करत असताना मुंबईकरांच्या प्रश्नासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना विजयी करुन संसदेत पाठवा, मुंबईकरांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासठी त्या कट्टीबद्ध आहेत, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. उत्तर मध्य मुंबईच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या न्यायपत्राचे प्रकाशन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात काय केले व पुढे काय करणार यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावरच बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. ४ जूनला देशातील भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईकरांना भेडसावत असलेल्या समस्यांवर जनतेशी चर्चा करून एक त्रिसुत्री बनवण्यात आली असून या न्यायपत्राच्या माध्यमातून मुंबईकरांचे प्रश्न मांडलेले आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबईतील मोकळ्या जागांचे संवर्धन करणे, झाडांची कत्तल होऊ नये, विमानतळ फनेल झोन मधील पुनर्वसनासाठी विशेष धोरण आखले जावे यासाठी प्रयत्न केला जाईल. मुंबईची जीवनवाहिनी लोकलमधील गर्दी कमी व्हावी यासाठी लोकलची संख्या वाढवणे, लांब पल्ल्याच्या रेल्वेचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. हाऊसिंग सोसायट्यांवर लावलेला अन्यायकारक जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुंबई शहरात प्रदुषण ही सुद्धा एक महत्वाची समस्या असून त्यावर उपाय योजना करण्यावरही भर दिला जाईल, असे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, काँग्रेस पक्षाने न्यायपत्र जाहीर केलेले आहे, ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून पाचव्या टप्यातही जनतेचे समर्थन कायम राहिल. मुंबईतील महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नसीम खान यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, आमदार अमिन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, संगठन प्रभारी प्रनिल नायर, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, आनंद शुक्ला, महेंद्र मुणगेकर, आदी उपस्थित होते.

केसपेपरसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करा

आयुक्त भूषण गगराणी यांचे केईएम रुग्णालय प्रशासनाला निर्देश मुंबई : केईएम रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असून रुग्णांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी बाह्यरुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नियुक्त करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी, तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी भूषण गगराणी यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट दिली. रुग्णालयातील विविध विभागांनाही त्यांनी भेटी दिली. याप्रसंगी बाह्यरुग्ण खिडकीजवळील रुग्णांशी संवाद साधताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, तसेच विविध विभागांतील अधिकारी उपस्थित होते. केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा गगराणी यांनी आढावा घेतला. शतक महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी व्हावे, अशी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. केईएम रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हिस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. रुग्णालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रमांचे आयोजन

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राची भौगोलिक रचना व स्थलांतरित लोकसंख्या यामुळे हे क्षेत्र हिवताप व डेंग्यू या आजारांसाठी संवेदनशील आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सर्वेक्षण तसेच साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळी नाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण तसेच  राबविण्यात येणा-या जनजागृती मोहीमा यांच्या माध्यमातून प्राधान्याने हिवताप व डेंग्यू आजारांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनुषंगाने 16 मे 2024 रोजीच्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा ( Connect With Community, Control Dengue)‘ जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार डेंग्यूविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग घेऊन डेंग्यू आजारास प्रतिबंध करणे हे राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक तसेच जनजागृतीपर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिनी अर्थात 16 मे रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात मोठी बांधकामे वा झोपडपट्टी अशा एकूण 38 ठिकाणी डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 16 ते 21 मे 2024 या कालावधीत प्रत्येक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी रुग्णालये, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक व खाजगी प्रयोगशाळा प्रमुख यांची प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांना हिवताप, डेंग्यू,  साथरोग, जलजन्यरोग याबाबत संबोधित करण्यात येणार आहे. याच 16 ते 21 मे कालावधीत डासअळीनाशक फवारणी व रासायनिक धुरीकरण कामगारांच्या सभा घेऊन फवारणी काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 21 मे  रोजी मुख्यालयातील आरोग्य विभागात आरोग्य सहाय्यक यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.डेंग्यू हा विषाणुजन्य आजार असून, डेंग्यू विषाणू संक्रमित एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे तो प्रसारित होतो. हा एडिस इजिप्ती डास गच्चीवरील व घराच्या परिसरातील पाण्याच्या साठ्यात तसेच भंगार साहित्य, टायर्स, रिकाम्या बाटल्या, करवंटया, रंगाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, घरावर टाकलेले प्लास्टिक आच्छादन, कुंडयांखालील ताट, कुलर्समधील पाणी अशा पाणी साचलेल्या ठिकाणी अंडी घालतो आणि डास उत्पत्ती होते. ही डास उत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घेणे व झाल्यास ती तात्काळ नष्ट करणे गरजेचे ठरते. डेंग्यू आजाराची लक्षणे म्हणजे – एकाएकी तीव्र ताप येणे, तीव्र डोकेदुखी स्नायुदुखी, सांधेदुखी व उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे अशा प्रकारची असून अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ वैद्यकिय सल्ला घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. डेंग्यू आजार रोखण्यासाठी – आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून – पुसून कोरडी करावीत, घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावेत, झाकण नसल्यास कापडाने झाकावे, घराच्या परिसरातील अडगळीचे सहित्य नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात व झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, गॅलेरीत / छतावर पाणी साठेल असे भंगार सामान ठेवू नये, गळके नळ आणि पाईपलाईन वेळीच दुरुस्त करावी, कोणाताही ताप अंगावर काढू नये – अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी. नवी मुंबईकर नागरिकांनी डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात आणि हिवताप / डेंग्यूची लक्षणे आढळल्यास नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयात किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे-शिवानंद टाकसाळे

अशोक गायकवाड मुंबई : सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले. मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलन संपन्न झाले यावेळी शिवानंद टाकसाळे बोलत होते. रविवार दि.१२ मे रोजी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन महात्मा गांधी हाँल ,एस व्ही रोड ,तलावाजवळ ,वांद्रे (पश्चिम) मुंबई येथे करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद टाकसाळे ( आयएएस सेवानिवृत्त), विनायक विसपुते (असि. कमिश्नर मुंबई महापालिका), डॉ. अभय विसपुते (डायरेक्टर एस आर व्ही हॉस्पिटलस् ग्रुप्स्,), प्रा.श्रीकांत मुरलीधर सोनवणे (MA ,MMCJ , Ph.d.IEC. (डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स, पत्रकारिता महाविद्यालय नाशिक), डॉ अजय भामरे,( प्र कुलगुरू मुंबई विद्यापीठ), अँड.सी.डी.सोनार (मार्गदर्शक धुळे सोनार समाज), अँड. राजन दीक्षित (सोलापूर उपाध्यक्ष, भारतीय ओबीसी संघटन दिल्ली )सुरेखा सोनार, (नगरसेविका, मिरा -भाईंदर महानगरपालिका) प्रभाकरजी मोरे(ट्रस्टी, मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ तसेच संस्थापक जन्मबंध फाउंडेशन), प्रकाश खरोटे (अध्यक्ष,मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळ)आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार आणि दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर मोरे यांनी केले. यावेळी प्रास्ताविकात सांगितले. की, कोरोना महामारीने दोन अडीच वर्षे सर्व संपूर्ण जग ठप्प झाले होते, अशा परिस्थितीत जगाबरोबर समाजानेही कोरोना परिस्थितीचा मुकाबला केला. अशा परिस्थितीतून सावरुन आजचा मुंबई ऐक्यवर्धक मंडळाचा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,असे यावेळी सांगितले. मंडळाचे सचिव घनःशाम सोनार यांनी मंडळाचा वार्षिक अहवाल उपस्थितांसमोर वाचून दाखविला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मुंबई अहिर सुवर्णकार ऐक्यवर्धक मंडळाचे कामाचे कौतुक केले. तसेच सुवर्णकार समाजाने मतभेद विसरून एकत्रित येण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे. अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सुवर्णकार समाजातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केले आहे अश्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमासाठी मुंबई तसेच मुंबई परिसरातील समाजाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यामध्ये नवी मुंबई सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय खरोटे सचिव हेमकांत सोनार तसेच कळवा समाजाचे अध्यक्ष चैतन्य वानखेडे तर धुळे येथून अँड. राकेश रनाळकर तसेच अनेक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव घनश्याम सोनार , घनश्याम विसपुते , सुनील सोनानिस , रत्नाकर वडनेरे , विशाल सोनार, वसंत सोनार , जयेश खरोटे, संजय विभांडीक, आशा खरोटे , अनुराधा वानखेडे, वर्षा सोनवणे ,पुनम सोनवणे आदींनी अधिक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी सोनार (साम टीव्ही)यांनी केले तर उपस्थितांचे आभार घनःशाम विसपुते यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

वडाळा ‘आरटीओ’च्या तिजोरीत ४८३ कोटी

मुंबई : नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, नवीन अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नूतनीकरण, वाहनांचा कर, वाहनांवरील बिनबोजा उतरविणे व चढविणे, वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र व त्याचे नूतनीकरण, वाहनांना जारी केलेले शुल्क आणि दंड वसुली यातून वडाळा आरटीओला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४८३.७७ कोटी रुपये महसूल मिळाला. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४५०.२२ कोटी महसूल मिळाला होता. या दोन वर्षांच्या तुलनेत महसुलात सुमारे ७ टक्के म्हणजे ३३.५५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून वडाळा आरटीओला दंडात्मक कारवाईकरिता कार्यालयीन कार्यक्षेत्रामध्ये विधीग्राह्य नसलेली अनुज्ञप्ती, बिल्ला (बॅच) धारण न करणे, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, विमा प्रमाणपत्र वैध नसणे, वायू प्रदूषण प्रमाणपत्र वैध नसणे, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक, विना परवाना / अवैध प्रवाशी वाहतूक, विनाआच्छादन माल वाहतूक, विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या वाहनचालक व मालक यांच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये जारी करावयाच्या प्रकरणांकरीता वार्षिक लक्ष्य १४,४०० प्रकरणे होते. दंडात्मक कारवाई करून तडजोड शुल्क वसुलीचे वार्षिक लक्ष्य म्हणून ४ कोटी ५० लाख देण्यात आले. तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षात वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांकडून तपासणीद्वारे वाहनधारकांकडून एकूण ३ कोटी ७१ लाख रुपये दंडवसुली करण्यात आली. वडाळा आरटीओने गेल्या आर्थिक वर्षात एकूण १०,५०० ऑटोरिक्षा टॅक्सी वाहनांची तपासणी केली. दोषी ३,४०० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ६१.०५ लाख इतकी तडजोड शुल्क रक्कम वसूल करण्यात आली. तसेच एकूण ८५८ प्रकरणी परवाना व अनुज्ञप्ती निलंबन करण्यात आले, असे वडाळा आरटीओ कार्यालयाने सांगण्यात आले.