Category: मुंबई

Mumbai news

‘सेट’ परीक्षा ७ एप्रिलला

मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार मुंबई : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले…

मुंबईत कचरा करणाऱ्यांकडून ७५ हजार रुपये दंड वसूल

मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ऑनलाईन पद्धतीने दंड वसुलीच्या कारवाईच्या पहिल्या दिवशी ७२ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत महानगरपालिका प्रशासनाकडून तंत्रज्ञानाचा…

महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला!

 मार्चअखेरपर्यंत ५४७१ पैकी ४३३२ प्रकल्प मंजूर! मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल ठाणे (५९७), मुंबई उपनगर (५२८), रायगड (४५०), नागपूर (३३६), नाशिक (३१०) आदींचा समावेश आहे. राज्यातील प्रदेशनिहाय संख्या पाहिल्यास मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड हा मुंबईलगतचा भाग आणि कोकणाचा समावेश असलेल्या महाप्रदेशातील प्रकल्पांची संख्या १९७६ अशी सर्वात जास्त आहे. यानंतर पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताराचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील १४१५ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळालेले आहेत. विदर्भातील ४३७ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले असून त्यात नागपूरचे ३३६ प्रकल्प आहेत. उत्तर महाराष्ट्रातील ३४७ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात नाशिकचे ३१० प्रकल्प आहेत. मराठवाड्यातील १४९ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मिळाले आहेत. त्यात औरंगाबादचे ११७ नवीन प्रकल्प आहेत. दादरा नगर हवेलीचेही आठ प्रकल्प आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, घरखरेदीदारांच्या तक्रारी उद््भवू नये यासाठी महारेरा नोंदणी क्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैद्यता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणी क्रमांक मंजूर करते. याशिवाय कल्याण-डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी क्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून ‘बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र’ त्यांच्या पदनिर्देशित ईमेल वरून महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर पाठवणे बंधनकारक केले आहे. महारेराने गेल्या १९ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याशिवाय नोंदणी क्रमांक दिला जात नाही. सुरूवातीच्या तुलनेत यात सुसूत्रता आलेली असली तरी प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी आवश्यक असलेले मंजुरीचे इमेल मिळण्यात काही प्रमाणात होणारा विलंब आणि प्रस्तावातील त्रुटींची संबंधित विकासकाकडून पूर्तता होऊ न शकल्याने ५४७१ प्रकल्पांपैकी ४३३२ प्रकल्पांना नोंदणीक् क्रमांक मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित ११३९ प्रकल्पांची छाननी सुरू आहे. संबंधित विकासकांनी त्रुटींचा पूर्तता केल्यानंतर त्यांना नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे महारेराच्या प्रवक्त्याने सांगितले.

 धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांची उमेदवारी

 प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा… मुंबई : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून  अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला. शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

महारेराचा प्रस्ताव मंजुरीतील वेग वाढला

मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात मार्चअखेर महारेराने नवीन नोंदणीसाठी राज्यातून आलेल्या ५४७१ नवीन प्रस्तावांपैकी ४३३२ नवीन प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर केले आहेत. यात सर्वाधिक प्रकल्प पुण्याचे असून ही संख्या ११७२ आहे. या खालोखाल…

ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारणार

  ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल मुंबई : ठाण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) स्वारस्य निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) एकमेव स्वारस्य निविदा सादर झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा विकास करण्यासाठी ठाण्यातील ५० एकर जागा एमसीएला देण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास ठाण्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान विकसित करण्यात येईल. एमएसआरडीसीच्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्या जागा निविदा प्रक्रियेअंतर्गत विविध खासगी संस्था, कंपन्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीतील आमणे गावापासून काही अंतरावरील ५० एकर जागा क्रिकेट मैदानासाठी ६० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. भिवंडीतील वडपे गावापासून ५ किमी अंतरावर ही जागा असून सध्या ही जागा एमएसआरडीसीच्या ताब्यात आहे. क्रिकेट मैदानासाठी राखीव असलेली ही जागा विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर २०२३ मध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकासित करण्यासाठी इच्छुक संबंधित संस्थेचा अनुभव, त्यांचे किती खेडाळू राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत. सदस्य संख्या आदी बाबींची पडताळणी करण्यात येणार होती. त्यानुसार जानेवारीत निविदा सादर करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत एकमेव एमसीएने स्वारस्य दाखवत अर्ज सादर केल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमसीएच्या निविदेची छाननी करून एमएसआरडीसीने ५० एकरचा भूखंड एमसीएला देण्यासंबंधीचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. आता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास हा भूखंड एमसीएकडे हस्तांतरित करण्यात येणार असून एमसीए या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान विकसित करणार आहे. आचारसंहितेनंतरच या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे मैदान विकसित झाल्यास ठाण्याला पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होणार आहे.

आता भाजपचा मनमानी कारभार उघडा पाडणार

रमेश औताडे मुंबई : राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडले कारण इडी कडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही असेच घडणार आहे. भाजपचा मनमानी कारभार आता उघडा पाडणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी धनराज वंजारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. भारताची लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपाने केले आहे. भाजपाचे प्राण हे ईव्हीएम मशीन मध्ये आहे परंतु त्याचा आत्मा आता जनतेकडे असेल. त्यामुळे भाजपाचा ४०० पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे. न्यायालयाने आता इलेक्ट्रॉल बाँड ची तपासणी करणे गरजेचे आहे कारण एक्सटॉर्शन चे रॅकेट हे भाजपाच्या माध्यमातून ईडी चालवत आहे.  खंडणीच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी भाजपाने विविध कंपन्यांना धमकावून जमा केला आहे असा आरोप धनराज वंजारी यांनी केला आहे. भाजपाने आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करून पक्षातील इतर आमदार व खासदारांना धमकावून भाजपाकडे खेचण्याचे षड्यंत्र केले होते. परंतु आम आदमी पक्षात सर्व देशभक्त व क्रांतिकारी लोक आहेत आम्ही सर्व भगतसिंगाचे चेले आहोत. देशहितासाठी जेल काय फाशी घेण्यास सुद्धा तयार आहोत. आणि त्यामुळेच भाजपाचा डाव फसला आहे .आज देशात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला घाबरत असतील तर फक्त आणि फक्त अरविंद केजरीवाल यांना  घाबरतात हे आता स्पष्ट झाले आहे. असे धनराज वंजारी यांनी सांगितले. आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झाला आहे आणि सर्व भ्रष्टाचारीना सोबत घेऊन नरेंद्र मोदी आमच्या पार्टी विरुद्ध कारवाई करत आहेत हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.  तसेच या लोकसभेच्या निवडणुकीत ४००  पार चा नारा हा आता त्यांचे स्वप्नच राहणार आहे असे ऍड.संदीप कटके यांनी यावेळी सांगितले. संजय सिंग यांना सहा महिने जेलमध्ये फक्त यामुळेच ठेवण्यात आले की त्यांनी त्यांचा आवाज लोकांमध्ये भाजपाच्या विरुद्ध उचलला. भाजपा हा आमच्या पार्टीच्या नेत्यांना किती घाबरते हे आज सिद्ध झाले आहे. आम आदमी पार्टीचे बाकीचे नेतेही पुढच्या काळामध्ये निर्दोष बाहेर येतील यामध्ये कुठलीही शंका नाही. असे यावेळी ऍड संदीप कटके यांनी सांगितले.

राहुल गांधी, प्रियंकाच्या विदर्भात जाहीर सभा

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला…

मुंबईतील नाल्यांचा गाळ रात्रंदिवस काढणार

मुंबई : यंदा नालेसफाई उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही नालेसफाई करून शहर व उपनगरांतील लहान -मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १० लाख २१ हजार ७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. मात्र नालेसफाईचे मोठे आव्हान पालिकेपुढे आहे. आतापर्यंत आतापर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिका प्रशासनाने यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू केली आहेत. नालेसफाई उशिरा सुरू केल्यामुळे नालेसफाईची कामे यंदा रात्रंदिवस केली जाणार आहेत. महापालिकेने मुंबईतील मिठी नदी, लहान – मोठे नाले, हायवे लगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे काम ३१ कंत्राटदारांवर सोपवले आहे. गेल्या वर्षी नालेसफाईच्या कामाला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र यंदा १८ मार्चपासून नालेसफाई कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाई कामे उशिराने सुरू झाली आहेत. नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात आणि पावसानंतर अशा तीन टप्प्यात करण्यात येणार आहेत. मिठी नदी, लहान व मोठे नाल्यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेने कंत्राटदारांच्या माध्यमातून १ एप्रिलपर्यंत म्हणजे गेल्या १५ दिवसांत मिठी नदीचे ४८.५८ टक्के सफाई काम केले आहे. शहर व उपनगरांतील लहान – मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य आहे. कामावर सीसीटीव्हीची नजर मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत मुंबईत एका दिवसात तब्बल ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता. तसेच, त्याचवेळी समुद्राला मोठी भरतीही होती. त्यामुळे मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ मोठी हानी झाली. त्यानंतर मीठी नदीची सफाई केली जाते. नदीच्या रुंदीकरण, खोलीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील छोट्या, मोठ्या नालेसफाईची कामेही हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मिठी नदी व नालेसफाईवर पालिकेकडून सीसीटिव्हीची नजर ठेवली जाणार आहे. दीड लाख मेट्रीक टन गाळ काढला शहर व उपनगरे येथील लहान-मोठ्या नाल्यांमधून मिळून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मेट्रिक टन म्हणजे १६.५१ टक्के इतका गाळ काढण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. – १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – शहर भागात नालेसफाई कामाच्या अंतर्गत ३०,९३९.९४ मे.टन. इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे.टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे.टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. – पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे.टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे.टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

कामगार, शेतकरी  व देश विरोधी सरकारला पराभूत करा !

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राजकीय संमेलनातील ठराव मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी,जनता व देश विरोधी  सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात मंजूर करण्यात आला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात नुकताच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले. त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला एकमुखी पाठिंबा दिला. इंटक,आयटक, एसएमएस,सिटू, एआयसीसीटीयू, बीकेएस एम, राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते, डॉ.कैलास कदम, डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, आमदार सचिन अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदाराचे हित जोपासत आहे. भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनांनी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी ४ श्रम संहिता आणल्या आहेत. हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार!अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे. कामगार कर्मचारी कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डी . एल. कराड  ठरावावर भाषण करताना म्हणाले की, आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबिय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधीl सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असे डॉ. कराड यांनी  आपल्या भाषणात सांगितले. महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कैलास कदम  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले, येणारा १ मे कामगार दिन केंद्र सरकार विरोधी कामगार निषेध दिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले, अंगणवाडी, आशा कामगार पासून  गिरणी कामगारांपर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या केंद्र  सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे. याप्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे कॉ. मिलिंद रानडे, कॉ.उदय भट, कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. कॉ.उदय चौधरी, साथी निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात केंद्र सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा देऊन  कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.