Category: मुंबई

Mumbai news

धारावी पुनर्वसनासाठी आतापर्यंत सव्वातीनशे एकर अतिरिक्त भूखंड!

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी आतापर्यंत मुलुंड, कांजूरमार्ग-वडाळा येथील सुमारे ३०१ एकर  भूखंडापाठोपाठ आता कुर्ला दुग्धशाळेचा २१ एकर भूखंड नाममात्र दराने देण्याचे प्रस्तावित असल्यामुळे या पुनर्विकास करणाऱ्या अदानी समूहाला सुमारे ३२२ एकर भूखंड वितरित केला जाणार आहे. एकीकडे सामान्यांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाला भूखंड देण्यात तत्परता न दाखविणाऱ्या राज्य शासनाने धारावी पुनर्विकास कंपनीला मात्र झुकते माप दिल्याची तक्रार आहे. कुर्ला पूर्वेला नेहरूनगर परिसराजवळ असलेला हा मोक्याचा भूखंड दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांनी महसूल विभागाला हस्तांतरित केला असून आता महसूल विभागाकडून तो धारावी पुनर्विकासासाठी म्हणजेच अदानी समूहाला दिला जाणार आहे. या भूखंडावर धारावीतील अपात्र झोपडीवासीयांसाठी घरनिर्मिती केली जाणार आहे. ६०० एकर भूखंडावर पसरलेल्या या झोपडपट्टीत सुमारे तीन ते चार लाख रहिवासी आणि १३ हजार छोट्या व्यावसायिकांचा समावेश आहे. या सर्वांचा पुनर्विकास करण्यासाठी या प्रकल्पाला विशेष दर्जा देत शासनाचा २० टक्के आणि अदानी समूहाचा ८० टक्के वाटा असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. या विशेष हेतु कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत सध्या रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू असून २००० पर्यंतच्या पात्र रहिवाशांना धारावीतच तर २०११ पर्यंतच्या पात्र रहिवाशांना अडीच लाख रुपये आकारून व त्या व्यतिरिक्त इतर अपात्र रहिवाशांना धारावीबाहेर घरे दिली जाणार आहेत. त्यासाठीच धारावी पुनर्विकास कंपनीला आतापर्यंत ३२२ एकर भूखंडाची तजवीज राज्य शासनाने केली आहे. कांजूरमार्ग-भांडूप-वडाळा येथील २८३ एकर खाजण भूखंड मिळावा यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ज्या पात्र झोपडीवासीयांसाठी घरे उभारली जाणार आहेत, तो रेल्वेचा एका कोपऱ्यातील भूखंड आहे. त्यामुळे उर्वरित भूखंड हा वांद्रे-कुर्ला संकुलाशी जोडून त्याचे मूल्य वाढणार असल्याचे एका वास्तुरचनाकाराने सांगितले. विकासहक्क हस्तांतरण हक्क म्हणजेच टीडीआरच्या स्वरूपात याआधीच राज्य शासनाने अदानी समूहाला दिले आहेत. आता मुंबईतील अतिरिक्त भूखंड आंदण दिले जात आहेत. याबाबत धारावी पुनर्विकास कंपनीच्या प्रवक्त्याने काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास असमर्थता दर्शविली. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह यांनीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कुर्ला दुग्धशाळेचा भूखंड महसूल विभागाला हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय १० जून रोजी जारी करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखेपाटील यांच्याकडेच महसूल व दुग्धविकास खाते आहे. त्यामुळे दुग्धविकास मंत्री म्हणून विखेपाटील यांनी त्यास मान्यता दिली आहे.  १५ मार्च २०२४ मध्ये महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी करून मुंबईतली सार्वजनिक हिताच्या पायाभूत प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भूखंड सवलतीच्या दराने देण्याबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी रेडी रेकनरच्या २५ टक्के दराने शुल्क आकारून शासकीय, निमशासकीय किंवा ज्यात शासनाचा अंशत: सहभाग आहे अशा म्हाडा किंवा धारावी पुनर्वसन प्रकल्प आदी संस्थांना भूखंड वितरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार हा भूखंड धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात येत आहे, असे नमूद केले आहे. या भूखंडावर सध्या दुग्धशाळा, कर्मचारी वसाहत, शीतगृह, मुख्य इमारत आणि इतर बांधकामे आहेत. कर्मचारी वसाहतीत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी राहात आहेत. त्यामुळे जागा हस्तांतरित केल्यानंतर त्यांची पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या भूखंडापैकी अडीच एकर भूखंड मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे मेट्रोसाठी देण्यात आला आहे. अशी उदारता सामान्यांच्या गृहनिर्माणासाठी दाखविली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १२५३ एकर भूखंड अतिरिक्त हवा! धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे एकूण क्षेत्र आहे ५५० एकर आणि या प्रकल्पासाठी धारावीबाहेरील रेल्वे (४५ एकर), मुलुंड जकात नाका (१८ एकर), मुलुंड कचरापट्टी (४६ एकर), मिठागरे: २८३ एकर, मानखुर्द कचरापट्टी (८२३ एकर), बीकेसी जी ब्लॅाक (१७ एकर) व मदर डेअरी कुर्ला (२१ एकर) असा एकूण १२५३ एकर भूखंड आंदण दिला जाणार असल्याचा दावा धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी केला आहे. ००००००

आंबा कोयी संकलनात शालेय विद्यार्थ्यांचाही उत्साही सहभाग

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात आलेल्या आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलन उपक्रमात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सोसायट्या, ज्यूस सेंटर, रेस्टॉरंट व हॉटेल्स या ठिकाणाहून 50 हजारपेक्षा अधिक कोयी संकलित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला असून विशेषत्वाने महिलांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. या शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली असून शाळा, महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यामुळे या मोहीमेत विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होत असून आपला घरातून आंब्याच्या सुकवलेल्या कोयी आणून त्यासाठी निर्माण केलेल्या विशेष वाहनात दिल्या जात आहेत. अशाचप्रकारे सेक्टर 14, वाशी येथील अँकरवाला एज्युकेशन ॲकेडमीच्या विद्यार्थांनी संकलित केलेल्या आंब्याच्या कोयी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोयी संकलन करणा-या विशेष वाहनात दिलेल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नकळतपणे केले जात आहेत. रेड एफएम वाहिनीच्या “गुटली रिटर्न्स” या उपक्रमालाही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सहकार्य केले जात असून नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर उरलेल्या कोयी एका भांड्यात स्वच्छ पाण्याने धुवून ऊन्हात सुकवाव्यात व महानगरपालिकेच्या कोयी संकलनासाठी फिरत असलेल्या विशेष वाहनात द्याव्यात आणि सक्रिय सहभागातून पर्यावरणशील दृष्टीकोन जपावा असे आवहान नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. ००००००

 खासदार बाळ्या मामा यांनी घेतली भिवंडी मनपा आयुक्तांची भेट

शहर विकासाच्या कामांचा घेतला आढावा भिवंडी :भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी भिवंडी मनपा आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेऊन शहर विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. भिवंडी शहर हे कामगार व मुस्लिम बहुल वस्ती असलेले शहर असल्याने पावसाळ्यात व पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासनाच्या असलेल्या जबाबदाऱ्या, शहरातील नाले सफाई,धोकादायक इमारती,रस्त्यांची अपूर्ण कामे,कचरा समस्या व येणाऱ्या बकरीईद सणानिमित्त करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा यावेळी खासदार म्हात्रे यांनी घेतला.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू,माजी उपमहापौर इम्रान खान,माजी नगरसेवक मतलुब सरदार,हालीम अंसारी यांच्यासह मनपा उपायुक्त व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटी दरम्यान माजी नगरसेवक व मनपा अधिकारी यांच्या उपस्थितीत शहर विकासाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शहरातील नाले सफाईच्या मुद्यांवर व बकरी ईद सणात मनपा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी मनपा प्रशासनाकडून घेतली जात नाही त्यामुळे दरवर्षी शहरात बकरीईद सणानंतर प्रचंड दुर्गंधी व घाण पसरलेली असते,त्यामुळे यावेळी मनपा प्रशासनाने त्याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे केली. यावेळी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी बकरी ईद सणासाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून मनपा कर्मचारी व कामगार युनियन यांच्याशी चर्चा करण्यात आली असून बकरी ईद सणात मनपा प्रशासनाकडून कोणतीही कसर राहणार नाही असे आश्वासन यावेळी मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी उपस्थित माजी नगरसेवकांना दिले. पावसाळी आपत्कालीन परिस्थितीचा आढावा व बकरी ईद सणात मनपा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला मनपा प्रशासन बकरीईद सणासाठी सज्ज असल्याची ग्वाही यावेळी मनपा आयुक्तांनी आपल्याला दिली असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या मुद्द्याकडे आपण स्वतः सर्व सोयी सुविधांकडे विशेष लक्ष देणार असल्याची प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी दिली आहे.

 रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  प्रवाशांचे होणार हाल ! मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १६ जून २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार…

मुंबई-गोवा हायवेची पावसात दैना

रायगड : पहिल्याच पावसाने मुंबई–गोवा हायवेची दैना उडाली आहे. हायवेवर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची ही अवस्था झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या…

अजित पवारांमुळे भाजपाला फायदा !

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अजब तर्क मुंबई : भाजापाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळेच पराभव झाल्याची तर्कसंगत मांडणी करण्यात आली होती. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आज अजब तर्क देत ऑर्गनायझरलाच खोटे ठरवले.…

‘मी एक मास्तर’ पुस्तक प्रकाशन सोहळा

मुंबई : रविवार, दिनांक ९ जून रोजी लोणावळ्यातील गुरुकुल विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवर्य दीपक चैतन्य गंगोळी लिखित “मी एक मास्तर” ह्या शिक्षण क्षेत्राशी निगडित अशा पुस्तकाचे प्रकाशन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या…

 महायुतीच्या कार्यकर्त्याच्या साथीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईन

कपिल मोरेश्वर पाटील यांचा विश्वास, भिवंडीत हजारो कार्यकर्त्यांची सभा भिवंडी : आगामी काळातील विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहा पट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल. आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून, कार्यकर्त्यांच्या साथीने राखेतून पुन्हा भरारी घेऊ, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. त्याचबरोबर भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिकनिमित्ताने आनंदोत्सव आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती. भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथून यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिवंडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर कपिल पाटील यांनी उपस्थित हजारो कार्यकर्ते व नागरिकांबरोबर संवाद साधला. या वेळी भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी  भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून मोदी… मोदी… गजर केल्याने वातावरण दुमदुमून गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढील पाच वर्षांत होणार्‍या कार्यातून गौरवशाली इतिहास घडविला जाईल. भाजपासह महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मोदीजींचा विकास हा घराघरांपर्यंत पोचवावा, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अनपेक्षित पराभवाने आलेली मरगळ दूर करून विधानसभा व महापालिका निवडणुकीत विजयासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. भिवंडीत `तो’ पॅटर्न चालल्यानंतरही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असते, तर आपली हार झाली नसती. देशात अनेक ठिकाणी चाललेल्या पॅटर्नप्रमाणे भिवंडी मतदारसंघात `घरभेदी’ हा पॅटर्नही चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा हा पराभव झाला असून, त्यात योगदान देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना खड्यासारखे बाजूला करून भाजपाला मजबूत करण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी व नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहील. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. चौकट तेच प्रेम…तोच विश्वास… अन् उसळलेली उत्स्फूर्त गर्दी! भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅट्रीकनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती. कपिल पाटील यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत होते. तर अनेकांनी कपिल पाटील यांना हस्तांदोलन करीत पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

मुंबईत हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई : मुंबईत जानेवारी-मे या कालावधीत हिवतापाचे १,६१२ रुग्ण आढळले. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हिवताप निर्मूलनासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करीत असलेले प्रयत्न अपुरे…

डॉक्टरच्या आईस्क्रीममध्ये सापडला बोटाचा तुकडा

मुंबई : मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आईस्क्रीम उत्पादकाच्या अज्ञात कर्मचाऱ्याविरूद्ध तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा…