Category: मुंबई

Mumbai news

अक्षय तृतीयेनिमित्त घरांची विक्री तेजीत

मे महिन्यात केवळ दहा दिवसांत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री मुंबई : घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे. घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश आणि नवीन प्रकल्पांचा आरंभ असे व्यवहार आज तेजीत आहेत. तर दुसरीकडे मे महिन्याच्या केवळ पहिल्या दहा दिवसांत मुंबईत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला घर, सोने, वाहन खरेदीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे सहाजिकच या दिवशी मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी घर खरेदी करण्याकडे वा नवीन घरात प्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी मालमत्ता बाजारपेठेतील सर्वच व्यवहार तेजीत असतात. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच तीन हजार २८० घरांची विक्री झाली आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला २९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. अक्षय तृतीयेला घरविक्रीत वाढ होते. या संधीचा फायदा घेण्यासाठी विकासक अक्षय तृतीयेला अनेक सवलती देतात. यंदाही विकासकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक सवलती दिल्या आहेत. काहींनी घर खरेदीवर सवलत जाहीर केली आहे, तर काहींनी मुद्रांक शुल्क वा इतर शुल्क माफी वा शुल्कात सवलत देऊ केली आहे. त्याचवेळी काही विकासकांनी विविध भेटवस्तू देऊ केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या नाण्यांपासून अगदी मोड्युलर किचन, फर्निचर आदी भेटवस्तूंचा यात समावेश आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी महत्त्वाचा असतो. विकासक या दिवशी नवीन प्रकल्पांना सरुवात करतात. त्यानुसार आज मुंबईत अनेक ठिकाणी नवीन गृहप्रकल्पांना सुरुवात होत असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज: देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा तोल सुटलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे. त्यांची मदत घ्यावी, असा पलटवार प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी निश्चितपणे…

वीजग्राहकांसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट

मुंबई:  महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर…

ड्रग्सवरील कारवाई कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून रोखली?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना नशेबाज करणाराड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा टाकला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना…

रिया गायकवाडचा अटकेपार झेंडा

अमेरिकेच्या बफेलो विद्यापीठात ऑनर्स स्टुडेंट कॉन्सीलच्या अध्यक्षपदी मुंबई (प्रतिनिधी):- लातुरचे माजी खा. अ‍ॅड. सुनिल गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड हिची अमेरिकेच्या बॅफेलो विद्यापीठाच्या ‘ऑनर्स स्टुडेंट’ कौन्सीलच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी तिची अध्यक्षपदी निवड झाली आहे. रिया ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (बायोमेडिकल इंजिनिअरिंग) प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. सातसमुद्रापार तिने हे यश मिळविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मा.खा. सुनिल गायकवाड, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिलकुमारजी बी. गायकवाड, विक्रांद टाइम्स व अग्रसेन टाइम्स परिवार, मुख्य संपादक अरुणकुमार एस. मुंदडा, लेखक मिलिंद काटे, ज्येष्ठ पत्रकार गुलाब भावसार, भागा वरखडे, राजीव मंडलिक, अण्णा सोमवंशी, चांद शेख, निलेश वाणी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाने गायकवाड कुटुंबीयाच्या मानात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

नालेसफाईच्या कामांना नवी मुंबईत वेग

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शहर अभियंता संजय देसाई यांची संयुक्त पाहणी नवी मुंबई : पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले असून त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने त्या नाल्यांसह शहराच्या अंतर्गत असलेल्या मोठया नाल्यांचीही पावसाळापूर्व सफाई सुरु आहे. नमुंमपा क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार आणि शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी संयुक्तपणे पाहणी करत या कामांना वेग देण्याच्या व खोल सफाई करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावर तीन नाल्यांची अभियांत्रिकी विभागामार्फत सफाई करण्यात येत आहे. नाल्यांमधून जेसीबीव्दारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहात व काठांवर असणारी मनुष्यबळ लावून साफ केली जाणारी झाडे झुडपे आणि कचरा काठांवर ठेवला जात असून हा गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी असे निर्देश देत याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे निर्देशित करण्यात आले. या पाहणीमध्ये वाशीतील से-17 नाला, से.12 नाला, से.29 नाला तसेच से.12 व से.8 येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, से.2 नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे फ्लॅप गेट्स, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आयुक्त महोदयांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे ही डेडलाईन दिली असून विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे व विशेषत्वाने नैसर्गिक नाले सफाईच्या कामांना वेग दयावा असे अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व शहर अभियंता श्री. संजय देसाई यांनी निर्देशित केले आहे. या पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मतदानाच्या प्रचारासाठी नवी मुंबईत फिरताहेत लक्षवेधी ग्रीन मॅस्कॉट्स 

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका  आयुक्त्‍ डॉ. कैलास शिेदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन 20 मे रोजी होणाऱ्या ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत. हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर वोटर हेल्पलाईन ॲपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे. हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन प्रदर्शित करीत आहेत. महापालिका निवडणुक विभागाचे उप आयुक्त्‍ श्री. शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे. पथनाटयांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

कैद्यांनाही साधता येणार कुटुंबासोबत फोनवर संवाद

मुंबई : कारागृहात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कैद्यांना लवकरच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येणार आहे. राज्यभरातील कैद्यांना ई-मुलाकात आणि स्मार्ट कार्ड कॉलिंग सुविधा दिल्या जातील अशी माहिती सरकार कडून आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. तसे प्रतिज्ञापत्रात न्यायालयात सादर करण्यात आले. याची दखल घेत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने सदर याचिका निकाली काढली. जुलै २०२० मध्ये कोविडच्या काळात, कारागृहामध्ये कैद्यांसाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, ही सुविधा २०२१ मध्ये अचानक बंद करण्यात आली. २०१६ साली जारी केलेल्या मॉडेल प्रिझन मॅन्युअलनुसार, प्रत्येक कारागृहाच्या अधीक्षकाने कैद्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि वकिलांशी संपर्क साधण्यासाठी पैसे देऊन टेलिफोन आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा देण्यात आली होती. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल सुविधा बंद करण्याचा सरकारच्या निर्णयामुळे कैद्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या स्वयंसेवी संस्थेने जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली तेव्हा, राज्य सरकारच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले सरकारच्या भूमिकेचे आम्ही कौतुक करतो. २३ मार्च २०२४ च्या परिपत्रकातील तरतुदीची राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये अंमलबजावणी केली जाईल अशी आशा बाळगून आम्ही याचिका निकाली काढतो असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकील ऍड रेबेका गोन्साल्विस यांनी अशीही तक्रार केली की जे कैदी पाकिस्तानचे नागरिक आहेत त्यांना सुविधांमधून वगळण्यात आले होते आणि त्यांना वगळण्याचे कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावर आव्हान देण्यासाठी दुसरी याचिका दाखल करण्यास सांगितले.

कुलाब्यात शनिवारी आठ तास पाणी पुरवठा बंद

मेट्रोच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली मुंबई : चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी ११ मे रोजी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात आठ तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरू असताना १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या मुख्‍य जलवाहिनीला फुटल्यामुळे गळती सुरू झाली आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते रात्री ११.३० या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या करणास्तव मुंबई महापालिकेने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. तर, नौदलास रात्री होणारा पुरवठा दुरुस्तीनंतर म्हणजेच विलंबाने होणार आहे. महानगरपालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून १५०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीद्वारे पुढे १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीवरुन होणारा पुरवठा हा कमी दाबाने तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. त्यावेळी, मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो ३ चे काम सुरू असताना या १२०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनीस गळती झाल्‍याचे निदर्शनास आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या तातडीच्या दुरूस्‍ती विभागाने घटनास्‍थळी पाहणी केली जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोका देखील निर्माण होवू शकतो. तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टिने पालिकेने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे. या कामासाठी सकाळी ९ वाजल्यापासून खोदकाम सुरु केले जाईल. तर जलवाहिनीतील पाणी उपसा करुन नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी ३.३० वाजल्यापासून केले जाईल. कुलाबा, कोळीवाडा येथे शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर नौदलास रात्री १०.३० ते पहाटे २.५० या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरूस्‍ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करुन त्यानंतर म्हणजेच पाणीपुरवठ्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा विलंबाने होणार आहे.

महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा प्रतिसाद

मुंबई : मुंबई दक्षिण मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचार फेऱ्यांना मतदार संघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवडी आणि भायखळा विभागातून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली, तसेच ठिकठिकाणी महिलांनी पुढे येऊन त्यांचे औक्षण केले तर सार्वजनिक मंडळांनी फटाके वाजवून आमदारांचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील महायुती शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांचा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू आहे. शिवडी विभागात सकाळी काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी ठीकठिकाणी आमदार यामिनी जाधव यांचे महिलांनी औक्षण केले. अनेक इमारती व उत्सव मंडळांनी फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. यामिनी जाधव यांच्यासोबत या रॅलीत महायुतीतील नाना आंबोले व इतर नेते उपस्थित होते. त्याचप्रमाणे भायखळा विभागात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये महायुतीतील नेते मिलिंद देवरा, रोहिदास लोखंडे, मनसेचे संजय नाईक आणि शलाका हरयान आदी महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी परिसरातील मंदिरात दर्शन घेतले. अफाट गर्दी , लोकांच्या उत्साहात झालेल्या या रॅलीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात यामिनी जाधव यांचे स्वागत केले. आमदार यामिनी जाधव आल्यानंतर इमारतीमधील नागरिकांनी खाली उतरून त्यांची भेट घेतली. ज्येष्ठ नागरिकांनी यामिनी जाधव यांना आशीर्वाद देत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मंडळांनी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक व्यक्तीचा आशावादी चेहेरा आणखी ताकदीने लढायला संघर्ष करायला ऊर्जा देत आहे, बळ देत असल्याचे यावेळी यामिनी जाधव यांनी सांगितले.