Category: मुंबई

Mumbai news

कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज

मुंबई : भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे. एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च २०२५ रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव समीर पाथरे आणि खजीनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते. कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट)  उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. हा कार्यक्रम उत्पादक, पुरवठादार, उद्योग तज्ञ आणि उद्योजकांना संधी शोधण्यासाठी,  नियामक चौकटींवर चर्चा करण्यासाठी आणि बायोस्टिम्युलंट्स, जैव कीटकनाशके आणि जैव खतांमधील नवीनतम प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणेल. शंभर हून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडली जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट)  उपाय, नाविन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे. परिषद सत्रांमध्ये बायोस्टिम्युलंट नियम, कर धोरणे, उद्योग आव्हाने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल अंतर्दृष्टी.  उद्योग नेटवर्किंग: B2B कृषी-इनपुट क्षेत्रातील प्रमुख घटकांना जोडणारे विशेष नेटवर्किंग सत्रे,  लघू आणि मध्यम उद्योजकीय क्षेत्रातील लहान आणि उदयोन्मुख व्यवसायांकडून सहभागाला प्रोत्साहन देणे. , आयात अवलंबित्व कमी करणे: आयात केलेल्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देणे. व्यवसाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि बाजार विस्ताराच्या संधींचा शोध घेण्यासाठी या व्यासपीठाचा फायदा घेण्यासाठी देशभरातून खत तसेच शेती औषधे तसेच उत्पादन उपयुक्त मिशनरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेतील स्टॉलच्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच उत्पादक, पुरवठादार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांना या परिवर्तनकारी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन धुरगूडे पाटील यांनी केले. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा +९१ ९६८९१५२८३७ वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे. PHOTO CATION मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अखिल भारतीय अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगूडे पाटील. सोबत सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे.

साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातील पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक मंत्री . आशिष शेलार यांनी मुंबईत केली. नामांकने प्राप्त झालेले कलाकार तसेच पुरस्कार प्राप्त तांत्रिक व  बालकलाकार यांचे मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या,पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मॅन, समायरा,गाभ,ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी, (फोर ब्लाइंड मॅन) ओंकार बर्वे (फोर ब्लाइंड मॅन) , प्रियंकर घोष (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्ध गोडबोले, विवेक लागू,बाबासाहेब सौदागर, विजय भोपे,श् रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे १. सर्वोत्कृष्ट कथा : १.अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) २. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मॅन) ३. सुमित तांबे (समायरा ) २. उत्कृष्ट पटकथा : १. इरावती कर्णिक (सनी) २.पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मॅन) तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) ३. उत्कृष्ट संवाद: १. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.मकरंद माने सोयरिक ३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी) ४. उत्कृष्ट गीते: १. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव, गाणे : यल्गार होऊ दे) २.अभिषेक रवणकर (अनन्या,गाणे-ढगा आड या) ३.प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा गाणे-अलगद मन हे) ५. उत्कृष्ट संगीत : १.हितेश मोडक (हर हर महादेव) २.निहार शेंबेकर (समायरा) ३.विजय गवंडे (सोंग्या) ६. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : १.अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे) २.हनी सातमकर (आतुर) ३.सौमिल सिध्दार्थ (सनी) ७.उत्कृष्ट पार्श्वगायक: १.मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत :भेटला विठ्ठल माझा) २.पद्मनाभ गायकवाड (गुल्हर गीत – का रे जीव जळला) ३.अजय गोगावले (चंद्रमुखी गीत : घे तुझ्यात सावलीत) ८. उत्कृष्ट पार्श्वगायिका: १.जुईली जोगळेकर (समायारा गीत – सुंदर ते ध्यान)२.आर्या आंबेकर (चंद्रमुखी गीत बाई ग कस करमत नाही) ३.अमिता घुगरी (सोयरिक गीत – तुला काय सांगु कैना) ९. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक : १.राहूल ठोंबरे-सजीव होवाळदार (टाईमपास 3 गीत : कोल्ड्रीक वाटते गार) २.उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गीत- आई जगदंबे) . सुजीत कुमार (सनी गीत – मी नाचणार भाई) १०.उत्कृष्ट अभिनेता:१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे )२.वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)३.ललीत प्रभाकर (सनी) ११.उत्कष्ट अभिनेत्री : १.सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)२.अमृता खानविलकर(चंद्रमुखी) ३.सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह) १२.उत्कृष्ट विनोदी अभिनेता १.मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)२.संजय नार्वेकर (टाईमपास 3) ३.भारत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर) १३. सहाय्यक अभिनेता :१. योगेश सोमण (अनन्या) २ किशोर कदम (टेरीटरी)…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री . मुश्रीफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष  द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी,  विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी, करावयाच्या सुधारणा, पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या  इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री . राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील, अशी माहिती आयुक्त निवतकर यांनी दिली.

दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात-मंत्री अतुल सावे

मुंबई : दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत. त्यापैकी दूध संकलन केंद्र ही पहिली पायरी असून, दूध प्रक्रिया क्रेंद्र व दूध उत्पादक यांच्यातील दुवा ठरते. यातून बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दूध योजना केंद्रचालक यांच्या मागण्यांबाबत तसेच व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी निर्देश दिले. मंत्रालयात मंत्री . सावे यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई दूध योजना केंद्रचालक वेल्फेअर असोसिएशन व महाराष्ट्र दूध वितरक सेना यांच्या मागण्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी  मंत्री .सावे बोलत होते. मंत्री सावे म्हणाले,की दूध व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. त्यामुळे या क्षेत्राचा विकास महत्त्वाचा आहे. दूध व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक व राज्यातील दुग्धशाळांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली. या समस्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असेही मंत्री सावे यांनी सांगितले. या बैठकीस दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरस्वती स्पोर्ट्स क्लब, मध्य रेल्वे आणि महिलांमध्ये रचना नोटरी वर्क्स अंतिम विजेते 

विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ४ फुट ११ इंच व व्यावसायिक पुरुष व महिला खो-खो स्पर्धा मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे पार पडली.   व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेचा  (८-८-९-६) १७-१४ असा ३ गुणांनी पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे दिलीप खांडवीने १:१०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. अवधूत पाटीलने १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. मिलिंद चावरेकर व रोहन शिंगाडेने प्रत्येकी १:००, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात प्रत्येकी ४ गडी बाद केले. पश्चिम रेल्वेतर्फे सम्यक जाधवने १:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ५ गडी बाद केले. वृषभ वाघने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. दिपक माधवने २:१०, १:३० मिनिटे संरक्षण केले. व्यावसायिक महिला गट: व्यावसायिक महिला गटाच्या अंतिम सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महावितरण कंपनी संघाचा (६-५-४-६) ११-१० असा  १ गुण व १:१० मिनिटे राखुन पराभव केला. रचनातर्फे पुजा फरगडेने २:००, २:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. श्वेता जाधवने २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. सेजल यादवने ३:२०, १:४० मिनिटे संरक्षण केले. महावितरण तर्फे दिलेली लढत संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. ४ फुट ११ इंच किशोर गट: ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या अंतिम सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा  (३-१-१-२) ४-३ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. सरस्वतीतर्फे मेहक आदवडेने नाबाद ६:००, नाबाद ३:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. वरुण गुप्ताने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. शिवम झाने १:००, १:०० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थीतर्फे अपसर शेखने ३:२० मिनिटे संरक्षण केले. पवन गुरवने १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओमकार जाधवने २:३० मिनिटे संरक्षण केले. तृतीय क्रमांकाचे सामने: व्यावसायिक महिला गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्र पोस्टाने मुंबई पोलीस संघाचा (५-३-४-५) ९-८ असा १ गुणांनी पराभव केला तर व्यावसायिक पुरुष गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने महाराष्ट्र पोस्टने संघाचा (९-७-३-४) १२-११ असा  १ गुण व ३:१० मिनिटे राखून पराभव केला. ४ फुट ११ इंच किशोर गटाच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१०-२-२) १०-४ असा १ डाव व ६ गुणांनी पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ४ फुट ११ इंच किशोर गट आक्रमक – पवन गुरव (विदयार्थी) संरक्षक – अधिराज गुरव  (ओम साईश्वर)…

मुंबई पोर्टमधुन सेवाभावी कार्यकर्ते गणेश पोळ सेवानिवृत्त

मुंबई : मुंबई पोर्ट  प्राधिकरणामधील २७  वर्षाच्या सेवेनंतर वरिष्ठ सहाय्यक लिपिक व युनियनचे निष्ठावंत कार्यकर्ते गणेश पोळ यांचा स्वेच्छा  सेवानिवृत्ती बद्दल २८  जानेवारी २०२५  रोजी मुंबई पोर्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. गणेश पोळ हे मुंबई पोर्टमध्ये ५  जानेवारी १९९८  रोनजी टॅली क्लार्क  म्हणून नोकरीला लागले. त्यानंतर त्यांना नोकरीमध्ये  टीसीसीसी, ज्युनियर असिस्टंट,  सीनियर असिस्टंट असा बढतीचा प्रवास मिळाला. गणेश पोळ यांचा २७  वर्षाच्या कालावधीमध्ये  मुंबई पोर्टच्या जमीन धोरणात सहकार्य करण्यामध्ये महत्त्वाचा हिस्सा होता.  म्हणूनच तत्कालीन चेअरमन श्रीमती राणी जाधव यांनी मुंबई पोर्ट लँड पॉलिसीचा जो केंद्र सरकारला अहवाल पाठविला,  त्यामध्ये त्यांचा नामोउल्लेख होता. त्याचप्रमाणे मुंबई पोर्टमध्ये नोकरी लागण्यापूर्वी त्यांनी गुड नाईट या कंपनीच्या  उत्पादकतेमध्ये संशोधनाचे मोठे काम केले आहे. त्यांच्या हुशारीचा व बुद्धिमत्तेचा मुंबई पोर्ट  प्रशासनाला चांगलाच फायदा झाला.  त्यांनी मुंबई पोर्टमध्ये प्रामाणिक व निस्वार्थीपणे सेवा केली.  त्यांच्या सेवेचा अनेक कामगारांना व  अधिकार्‍यांना चांगलाच फायदा झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासात गोल्ड मेडल मिळविले आहे. मुंबई पोर्ट  मधुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन गणेश पोळ यांनी सिव्हीलमध्ये वकिलाची प्रॅक्टिस करण्याचा  निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यांच्या बुद्धिमत्तेचा व हुशारीचा  न्यायालयामार्फत  सर्वसामान्य नागरिकांना फायदा मिळो, अशा सर्वच वक्त्यांनी  त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गणेश पोळ यांच्या सेवाभावी कार्यावर आधारित ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे  व फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, मुंबई पोर्टचे मुख्य यांत्रिक अभियंता नितीन बोरवणकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर्स प्रदीप नलावडे,  ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, युनियनचे  पदाधिकारी विद्याधर राणे, विजय रणदिवे, मनीष पाटील. संदीप चेरफळे तसेच कर्मचाऱ्यांमधील सहकारी मित्र मंगेश गवारे, संदीप गावडे. ॲड. गिरीश तळेकर. अधिकारी बोस, पत्नी रेखा पोळ मुलगी अनुषा पोळ यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. गणेश पोळ यांनी सत्काराला उत्तर दिले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी शीला भगत,  विष्णू पोळ, मारुती विश्वासराव, मीर निसार युनूस,  संतोष कदम तसेच मुंबई पोर्टचे अधिकारी, गणेश पोळचे सहकारी मित्र,  कुटुंबिय, गोदीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मंगेश सावंत यांनी  सुंदर केले तर आभार युनियनचे संघटक चिटणीस आप्पा भोसले यांनी मानले.

सदगुरु श्री भाऊ महाराज जन्मोत्सव  सोहळ्याचे आयोजन  

मुंबई : भाऊ महाराज उपासना ट्रस्ट यांच्यावतीने सद्गुरू श्री भाऊ महाराज यांचा ९२ वा जन्मोत्सव सोहळा गुरूवार दिनांक ३० जानेवारी ते ३१ जानेनारी २०२५ या कालावधीत श्री दत्त मंदिर,देसलेपाडा,श्री क्षेत्र  दहागांव, वासिंद येथे आयोजित करण्यात आला आहे. सद्गुरू श्री भाऊ महाराज   यांच्या जन्मोत्सवा निमित्त गुरूवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक ९वा.श्री भाऊ  यांच्या समाधीवर  लघु  सौरसुक्त आणि लघुपंचसुक्त पवमान पठणाने स़ततधार अभिषेक व सकाळी १० वाजता श्रीभानुदास चरित्रामृत ग्रंथाचे एकदवसीय परायण तसेच शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ठिक ८ वा.भाऊ महाराजांच्या समाधीचे षोडशोपचार पूजन व सकाळी ९.३० वाजता भाऊ महाराज यांच्या सहस्त्र नामावलीचे पठण ,सकाळी १०.३० वाजता गुरू पादुकांवर रूद्राभिषक सोहळा होईल आणि सकाळी ठिक ११.३० वाजता भाऊ महाराज शिष्य परिवाराच्यावतीने श्रीहरिभजन सादर होईल. त्याचबरोबर दुपारी ठिक१२.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर सायंकाळी ठिक ४ वाजता सद्गुरू श्री भाऊ महाराज यांच्या  पादुकांचा मठ ते हनुमान  मंदिर पर्यंत पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

देशाचे संविधान बदलणार ही ‌भिती व्यर्थ , तसे झाले‌‌ तर देश रस्त्यावर उतरेल!-अॅड.वालावलकर

राजेंद्र साळसकर मुंबई : देशाचे संविधान बदलणार ही भिती व्यर्थ आहे.संविधान बदलने इतके सोपे नाही आणि जर‌ तसे झाले तर त्याविरुद्ध संपूर्ण देश रस्त्यावर उतरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे वकिलांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी बोलताना केले. अमृतमहोत्सवी वर्षांची वाटचाल,यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या परळ येथील आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाच्या वतीने रविवारी प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.या‌ औचित्याने २५ वकीलांचा,परळगाव, लालओठा मैदानावरील सुसज्ज शामियान्यात गुणगौरव सोहळा पार पडला.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.नरेंद्र‌ वालावलकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विविध न्यायालयात कार्यरत असणाऱ्या वकीलांचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन‌ गुणगौरव‌ करण्यात आला.सत्कारात महिला वकिलांचाही समावेश होता‌. त्यावेळी ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर आपल्या भाषणात पुढेम्हणाले,धर्मनिरपेक्षता,स्वातंत्र्य आणि अधिकार या गोष्टी बहाल करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान संकुचित होता कामा नये,त्याचे संरक्षण करण्याची शिकवण देणारा प्रजासत्ताकदिन आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ ऍडव्होकेट नरेंद्र वालावलकर यांनी येथे केले.समारंभाच्या अध्यक्षस्थानी दादर ऍडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. कोल्हापूरे होते. मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस विजय परदेशी म्हणाले,हे डॉक्टर,वकील‌ यांचा ते‌ पेशा बजावत असले‌ तरी,ते विविध समाजाची‌ बांधिलकी निभावत असतात.त्याची सामाजिक संस्थांनी उचित अशी दखल‌ घेणे‌,ही त्यांची नैतिक जबाबदारी असते.तीच जबाबदारी जोपासण्याचे‌ काम आम्ही करीत आहोत.याप्रसंगी स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमाची प्रशंसा केली. या प्रसंगी परळगावातील‌‌ लेखक काशिनाथ माटल यांच्या लेखणीची ओळख करून देताना विजय परदेशी म्हणाले, काशिनाथ माटल यांनी पाच वाचनीय आणि उत्कृष्ट कथासंग्रह ‌लिहून परळकरांना अभिमान संपादून दिला आहे. त्यांच्या ‘सावट’ आणि ‘बेवारस’ या दोन कथासंग्रहांचा दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन होणार आहे,त्याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात‌ आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते‌.

मुंबईसह नाशिक,कोल्हापूर, सांगली, जळगावमध्ये उबाठा गटाला खिंडार

मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका राजूल पटेल शिवसेनेत अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई महापालिकेतील उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आणि महिला संघटक राजूल पटेल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. याचबरोबर राज्यभरातील उबाठा गटाच्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी  धर्मवीर आनंद दिघे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील स्वर्गीय आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि उबाठा गटाच्या महिला संघटक राजूल पटेल, विलेपार्लेचे शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने मुंबई आणि उपनगरात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत झाली आहे. कोल्हापूर जिल्हातील प्रदेश जनरल सेक्रेटरी सुजीत समुद्रे, प्रमोध धनावडे, शीतल कांबळे, उल्हास वाघमारे, किरण कांबळे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रशांत कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मालेगाव शहापूरमधील २०० कार्यकर्ते, उबाठाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते पक्ष प्रवेश केला. याशिवाय नाशिक शिक्षक सेना, जळगाव शिक्षक सेनेतील शेकडो सदस्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. चौकट राजुल पटेल या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. त्या विधानसभेच्या महिला संघटक आणि माजी नगरसेविका आहेत. पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. राजुल पटेल यांनी वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट नाकारण्यात आले. यापूर्वी त्यांनी विधानसभा २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामाविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली व बेलापूर विभागात निष्कासनाची कारवाई करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली येथील जी-41,सेक्टर- 03, ऐरोली येथील आरसीसी इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते. सदरचे अनधिकृत बांधकाम आज दिनांक 27/01/2025 रोजी अतिक्रमण मोहिम राबवुन सदर बांधकाम अंशत: निष्कासित करण्यात आले आहे. या धडक मोहिमेसाठी जी विभाग ऐरोलीचे सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश जाधव, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे व अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच अतिक्रमण पोलिस पथक उपस्थित होते.  सदर कारवाईसाठी 3 हॅमर, 1 गॅस कटर, 3 ब्रेकर, 15 मजूर व 01 मुकादम यांचा वापर करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील, उरण फाटा नवी मुंबई महामार्ग (हायवे) रस्त्यालगत असलेल्या एकूण 22 अनधिकृत झोपडया स्वत:हून हटविने आवश्यक होते. अे विभाग कार्यालय बेलापूर व बी विभाग कार्यालय नेरुळ कार्यालयामार्फत संयुक्त मोहिमेचे आयोजन करुन अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आलेले आहेत. या धडकमोहिमेसाठी अे विभाग कार्यालय व बी विभाग कार्यालयतील अधिकारी/ कर्मचारी, मजूर- 12, जेसिबी-01,तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. तसेच यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.