Category: मुंबई

Mumbai news

जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २४-२५

साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी, ज्ञानेश्र्वर, श्री गणेश यांची पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत.   मुंबई : श्री साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी मंडळ, ज्ञानेश्र्वर मंडळ, श्री गणेश क्लब यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या पुरुषात आंबेवाडीने ५-५ चढायांच्या डावात वीर नेजाजीचा प्रतिकार ३३-३२ असा संपविला. पूर्वार्धात ११-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या आंबेवाडीने पूर्ण डावात २७-२७ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामन्याचा निर्णय लावण्याकरीता प्रत्येक संघाला ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात आंबेवाडीने ६-५ अशी सरशी साधली. साहिल शेलार, भावेश वाघ यांनी आंबेवाडी कडून, तर आदित्य चव्हाण, विजय कदम वीर नेताजी कडून उत्कृष्ट खेळले. साईराज स्पोर्टस् ने जिजामाता नगर सार्वजनिक गणेश मंडळाचा ३३-२२ असा पाडाव केला. विश्रांतीला ११-०६ अशी आघाडी घेणाऱ्या साईराजने नंतर देखील त्याच तडफेने खेळत आपला विजय साकारला. जिजामाताचा जयदास पायमोळी चमकला. ज्ञानेश्वर मंडळाने श्री गावदेवीला ४५-२८ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २५-१० अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानेश्वरने उत्तरार्धात आपल जोश कायम ठेवत हा विजय साकारला. राहुल जुईकर, प्रणव कणेकर यांच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. श्री गावदेवीचे विकास घाग, आदित्य शेलार बरे खेळले. श्री गणेश क्लबने अमेय बिरमोळे, श्रीकांत मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर हिंदकेसरीचा ३०-१६ असा सहज पराभव केला. हिंद केसरीचा प्रणव वराडकरची लढत एकाकी ठरली. शिवनेरी मंडळाने जय खापरेंश्वरचा ३१-१२ असा, तर श्री साईनाथ मंडळाने बाल उत्कर्षला ३१-११ असे पराभूत करीत आगेकूच केली. 00000

बीकेसी-कुलाबा भुयारी मेट्रो प्रवास लवकरच

मुंबई : ‘एमएमआर’मधील वाहतूक कोंडी सोडवून नागरिकांचा प्रवास सुकर, सुसाट करण्यासाठी, कोणत्याही ठिकाणांहून इच्छितस्थळी ५९ मिनिटांत पोहोचता यावे यासाठी मेट्रो, सागरी सेतू, उन्नत रस्त्यासह अन्य प्रकल्पांच्या कामाला वेग देण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेशाचा (एमएमआर) विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून ‘ग्रोथ हब’ संकल्पनेनुसार केला जाईल. नववर्षात विकास केंद्राच्या आराखड्यातील ३० प्रकल्पांच्या कामाला टप्प्याटप्प्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सुरुवात करेल. अटल सेतू प्रभावित क्षेत्रात तिसरी मुंबई अर्थात नवनगर वसविले जाईल. या नवनगरचा आराखडा तयार करून भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, तसेच ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह बोगद्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या वर्षात आरे-कुलाबा असा थेट भुयारी प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी – कुलाबादरम्यानची भूमिगत मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. एमएमआरमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. त्यानुसार एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी विशेषत्वाने एमएमआरडीएकडून मेट्रोसह अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. त्यानुसार नव्या वर्षात एमएमआरडीएकडून कामे सुरू असलेली कोणतीही मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची चिन्हे नाहीत. यासाठी मुंबईकरांना २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. गृहनिर्मिती एमएमआरमध्ये ३० लाख रोजगार निर्मितीसह आठ लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यादृष्टीने २०२५ मध्ये कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. नवनगरसाठी भूसंपादन अटल सेतू प्रभावित क्षेत्रात नवनगर अर्थात तिसरी मुंबई विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नवनगरासाठी भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पहिला टप्प्यातील स्मारक जानेवारीअखेरीस खुले होण्याची शक्यता आहे. तर वसई – विरार आणि मिरा – भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून त्याद्वारे वसई-विराराला पाणीपुरवठा केला जात आहे. आता दुसरा टप्पा येत्या काही महिन्यात पूर्ण करून मिरा-भाईंदरला मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकास केंद्र एमएमआरडीएकडून एमएमआरच्या विकासासाठी मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा विकास प्रकल्प राबविले जात आहेत. पण आता संपूर्ण एमएमआरचा आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक विकास केंद्र म्हणून विकास करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. निती आयोगाने एमएमआर ग्रोथ हबची शिफारस केली आहे. निती आयोगाच्या शिफारशीनुसार एमएमआर ग्रोथ हबचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता ग्रोथ हबमधील ३० प्रकल्पांना एक – एक करून नव्या वर्षात सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एमएमआरचा २०३० पर्यंत आर्थिक विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. मार्च २०२५ मध्ये बीकेसी-आचार्य अत्रे, वरळी मेट्रो स्थानक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. तर जून २०२५ आचार्य अत्रे, वरळी, मेट्रो स्थानक – कुलाबा टप्पा सुरू होईल. हे टप्पे सुरू झाल्यास आरे – कुलाबा असा थेट भुयारी मेट्रो प्रवास करणे शक्य होणार आहे. एमएमआरडीएकडून सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या विस्तारीकरणाअंतर्गत वाकोला नाला ते पानबाई इंटरनॅशनल स्कुल दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या रस्त्याचे काम नव्या वर्षात पूर्ण करून तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास अमर महल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग असा प्रवास सिग्नल विरहित आणि केवळ ३० ते ३५ मिनिटांत करता येईल. ठाणे – बोरिवली २० मिनिटांत ठाणे – बोरिवली अंतर केवळ २० मिनिटांत पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम नव्या वर्षात सुरू होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे ऑरेंज गेट येथे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करून पूर्वमूक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना चर्चगेट, मरिन ड्राईव्हला अतिवेगाने जाता यावे यासाठी ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामासही २०२५ मध्ये सुरुवात करण्यात येणार असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. 00000

 धान-भरडधान्य खरेदीसाठी शासकीय पोर्टलवर नोंदणी करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती   मुंबई : शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  धनंजय मुंडे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे. ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. 00000

 जुन्या इमारतींतील रहिवाशांची पात्रता यादी संकेतस्थळावर दिसणार!

 दलालांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी उपाय   मुंबई : शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेली रहिवाशांची पात्रता यादी आता संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याच्या नावाखाली दलालांकडून होणारा हस्तक्षेप त्यामुळे बंद होणार आहे. म्हाडाने ही संपूर्ण प्रक्रिया ॲानलाईन करुन दलालांचा रहिवाशांशी येणार संपर्क कमी केला आहे. यानुसार सुरुवातीला दोन हजारांहून अधिक रहिवाशांची पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण करून ही यादी तयार होणार असल्यामुळे आता मूळ रहिवाशाची सदनिका परस्पर हडप करण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे. त्यानंतर सर्वच इमारतींतील रहिवाशांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. पात्रता निश्चित झाल्यामुळे संबंधित रहिवाशांना पुनर्विकासाच्या वेळी फायदा होणार आहे. रहिवाशांची पात्रता यादी तयार नसल्याचे कारण पुढे करीत काही इमारतींचा पुनर्विकास पुढे सरकू शकला नव्हता. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आता पात्रता यादीत फेरफार होण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसांचा कार्यक्रम सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार गृहनिर्माण विभागानेही असा कार्यक्रम सादर केला असून त्यात या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात १३ हजारहून अधिक जुन्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास सुरू असून रहिवाशांची पात्रता यादी उपलब्ध नसल्यामुळे पुनर्विकासाचा गाडा पुढे सरकत नसल्याची बाब उघड झाली आहे. या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाल्यास पात्रता यादीमुळे अडथळे येऊ नयेत, यासाठी रहिवाशांची पात्रता यादी तयार करून ती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे गृहनिर्माण विभागाने ठरविले आहे. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. मात्र मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्याशिवाय महापालिकेकडून पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही. ‘ना हरकत प्रमाणपत्रा’साठी रहिवाशांची पात्रता यादी महत्त्वाची असते. मात्र बऱ्याच वेळी या पात्रता यादीत घोळ असतो. परिणामी पुनर्विकासाची प्रक्रिया रखडली जाते. त्यामुळेच पुनर्विकास सुरू होण्याआधीच पात्रता यादी उपलब्ध असेल तर प्रक्रिया लवकर मार्गी लागू शकते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे गृहनिर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 00000

हक्काच्या घरांसाठी उद्या म्हाडा भवनावर मोर्चा

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत संक्रमण शिबिरार्थींना निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी हक्काचे घर द्यावे, या मागणीसाठी संक्रमण शिबिरातील रहिवासी २ जानेवारी रोजी म्हाडा भवनावर मोर्चा काढणार आहेत. निर्मलनगर वसाहतीच्या पुनर्विकासाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. या पुनर्विकासात येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींचाही समावेश करण्यात आला आहे. या संक्रमण शिबिरातील ८० कुटुंबांना अन्य संक्रमण शिबिरातील गाळे वितरीत करण्यात आले आहेत. आम्ही ४० वर्षांहून अधिक काळ संक्रमण शिबिरात राहत आहोत, आता आणखी किती वर्षे संक्रमण शिबिरात राहायचे ? असा मुद्दा उपस्थित करीत या संक्रमण शिबिरार्थींनी निर्मलनगर पुनर्विकासातच ८० जणांना कायमस्वरुपी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणी करीत संक्रमण शिबिरातील गाळे रिकामे करण्यास नकार दिला. यासाठी काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय संक्रमण शिबिरार्थींच्या विरोधात गेला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्चा न्यायालयात आव्हान दिलेे. तसेच निर्मलनगर पुनर्विकासातच कायमस्वरुपी घरे देण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता म्हाडा भवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी नगरसेवक ॲड. मनमोहन चोणकर यांनी दिली. 00000

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक, पाटकर रस्ता, नेहरू रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे भाग म्हणून ओळखले जातात. या भागातील रस्ते, चौक वाहने, नागरिकांसाठी…

कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद

कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम, प्रभागांमधील पाणी पुरवठा वितरण वाहिन्यांमधील गळती दुरुस्तीची कामे गुरुवारी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत पालिका…

 रस्त्यांची स्वच्छता व रस्ते धुणे याव्दारे हवा गुणवत्तेत सुधारणा   

 सखोल स्वच्छता मोहीमेत नवी मुंबई : शहरातील प्रदुषणाला आळा बसावा व हवा गुणवत्ता चांगली राहावी यादृष्टीने सखोल स्वच्छता मोहीमांचा पंधरवडा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार 13 जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असून 30 डिसेंबर पासून या मोहीमांना प्रभावी रितीने सुरुवात करण्यात आलेली आहे. यामध्ये ब्रशझाडू, फ्लीपर मशीन यांच्या सहाय्याने रस्ते, पदपथ, दुभाजक या ठिकाणी साचलेली धूळ, माती यांची सखोल सफाई करण्यात येत असून त्यानंतर फॉगर्स मशीनव्दारे मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द झालेले प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे रस्ते स्वच्छतेप्रमाणेच हवेतील धूळीचे प्रमाण कमी होउुन हवा गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होत आहे. नागरिकांकडून या डीप क्लीनिंग मोहीमेचे मोठया प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे. या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी बेलापूर विभागात पारसिक हिल या ठिकाणी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर यांनी स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक व स्वच्छताकर्मी यांच्या सहयोगातून सखोल स्वच्छता केली. विशेष म्हणजे या मोहीमेत एसआयइएस महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. नेरुळ विभागात सहा.आयुक्त  जयंत जावडेकर व स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांच्या नियंत्रणाखाली प्रशांत कॉर्नर ते राजीव गांधी उड्डाणपूल ते वझीराणी स्पोर्टस्‍ क्लब पर्यंत रस्ते सफाई करण्यात आली. तुर्भे विभागात सहा.आयुक्त प्रबोधन मवाडे व स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांच्या नियंत्रणाखाली कोपरी तलाव परिसरात सखोल स्वच्छता करण्यात आली. अशाप्रकारे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मुख्य रस्ते, त्याबाजूचे पदपथ व त्यामधील दुभाजक यांच्या कडेला जमिनीशी घट्ट झालेली माती व धूळ यांची ब्रश झाडूने स्वच्छता मित्रांनी सखोल स्वच्छता केली व त्यानंतर फॉगींग मशीनाव्दारे प्रक्रियाकृत पाणी मारुन रस्ते व पदपथ स्वच्छ करण्यात आले. उदयाही सर्व विभागात सखोल स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले असून यामुळे वातावरणातील धूळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून या मोहीमेचे नवी मुंबईकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 00000

जेष्ठ नागरिक ही देशाची शक्ती- देवेंद्र भुजबळ

मुंबई : १५० कोटी लोकसंख्या असलेला आपल्या देशात १० टक्के म्हणजे जवळपास १५ कोटी नागरिक ,हे जेष्ठ नागरिक आहेत. अशा या नागरिकांना समाजाने, कुटुंबीयांनी अडचण न समजता शक्ती समजून त्यांचा…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई : अशोक गायकवाड राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.मंत्री भोसले म्हणाले की, राज्याची सर्वांगीण प्रगती ही पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. राज्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार असून, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल किंवा जमीन हस्तांतरणात अडचणी येत असतील तर त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणे राज्याच्या आणि जनतेच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने या महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री भोसले यांनी केला. 0000