वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत हल्दवानी : महाराष्ट्राच्या महिला व पुरुष या दोन्ही वॉटरपोलो संघांनी ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. महिलांना विजयासाठी चांगलेच झगडावे लागले, पण पुरुषांनी सहज विजय मिळवित आगेकूच केली. इंदिरा गांधी स्टेडियमची जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू आहे. महिला गटात महाराष्ट्र व पश्चिम बंगाल यांच्यात अतियश रंगतदार लढत झाली. कधी महाराष्ट्राकडे, तर कधी बंगालकडे आघाडी असायची मात्र, ७-७ अशा बरोबरीनंतर महाराष्ट्राने लागोपाठ २ गोल करत आघाडी घेतली. मग ही आघाडी टिकवत महाराष्ट्राच्या महिलांनी ९-७ गोल फरकाने बाजी मारली. सर्वाधिक ५ गोल करणारी मुंबईची तन्वी मुळे या विजयाची शिल्पकार ठरली. राजश्री गुगळे (२गोल), याना अग्रवाल (१), पुजा कुमरे (१) यांनीही विजयात आपला वाटा उचलला. पुरुष गटात महाराष्ट्राने केरळचा १०-३ गोल फरकाने धुव्वा उडविला. महाराष्ट्राकडून अश्विनकुमार कुंडे व सारंग वैद्य यांनी २-२ गोल केले, तर भूषण पाटील, श्रेयस वैद्य, ऋतुराज बिडकर, अक्षयकुमार कुंडे, पीयूष सुर्यवंशी, पार्थ अंबुलकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. महिला संघाला विलास देशमुख व योगेश निर्मल यांचे, तर पुरुष संघाला रणजित श्रोत्रीय व उमेश उत्तेकर यांचे मार्गदर्शन लाभले.